पालक मश्रूम
साहित्य :
पालक - १ मोठी जुडी
मश्रूम - ७ ते ८
तमालपत्र - ३
बारीक चिरलेला कांदा - अर्धा
टोमॅटो बारीक चिरलेला - १
गरम मसाला/किंग मसाला - १ चमचा
मिरी - ४-५ दाणे
तिखट - १ चमचा
धने -जिरे पूड - १ चमचा
क्रीम - १ चमचा
तेल
काजू - ४ ते ५
मिरची - १
आले लसूण पेस्ट - १ चमचा
चिरलेली कोथिंबीर
चीझ
मीठ
लिंबू
कृती :
गरम तेलामध्ये तमालपत्र व मिरी घालून परतून त्यात लसूण पेस्ट व कांदा घाला. कांदा लालसर होईपर्यंत परता. मग टोमॅटो घालून थोडे परतून घ्या. पालक बारीक कापून मायक्रोवेव्ह मध्ये शिजवून घ्या. नंतर शिजवलेला पालक, १ मिरची व थोडा टोमॅटो कांदा हे एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवा व त्याची ग्रेव्ही करा. कांदा व टोमॅटो परतून झाला की त्यात धने-जिरे पूड, लाल तिखट व गरम मसाला घाला. परतून सर्व शिजवा. मग ग्रेव्ही घाला. सर्व मिश्रण ढवळून घ्या व एक उकळी आणा कारण ग्रेव्ही शिजायला पाहिजे. सर्व मिश्रण एकजीव व्हायला पाहिजे. हे सर्व शिजेपर्यंत एकीकडे तव्यावर मश्रूमचे तुकडे आणि काजू हे तेलावर परतून घ्या. मश्रूम व काजू साधारण खरपूस ब्राऊन व्हायला हवे. मग सगळे परतलेले मश्रूम व काजू पालकाच्या ग्रेव्हीमध्ये घाला. चवीपुरते मीठ घालून नीट ढवळा. लिंबू पिळून परत सर्व भाजीला एक वाफ आणा. २-३ मिनिटांनी भाजी शिजल्यावर १ चमचा क्रीम घाला व अजून २ मिनिटे शिजवा. खायला देताना त्यावर चीझ आणि कोथिंबीर घालून सजवा. ही भाजी नान किंवा पोळीबरोबर छान लागते.
-गौरी जपे