काही काळ-वेळ आहे की नाही?

ऍलिसचा कालिक प्रवास

ऍलिस इन वंडरलॅंड ऍंड फिलॉसॉफी ह्या लेखसंग्रहातील मार्क डब्लू. वेस्टमोरलॅंड ह्याच्या निबंधाचा मराठी अनुवाद

सेंट ऑगस्टीन (इ. स. ३५४-४३०) हा तत्त्वज्ञ एकदा म्हणाला होता, "वेळ म्हणजे काय? हे मला कोणी विचारलं नाही तर मी म्हणेन की मला माहीत आहे; पण ते एखाद्याला समजावून सांगायचं असेल तर मात्र मी म्हणेन की मला माहीत नाही." ऍलिसलाही बहुधा असेच वाटते. निरर्थाचा बादशहा लुइस कॅरॉल, ऍलिसच्या व आपल्यापैकी प्रत्येकाच्या वेळेविषयीच्या समजुतींना आव्हान देतो. वेळ हा पदार्थ आहे का? आंतरिक नसून बाह्य आहे का? की आपल्या अनुभवांना अर्थपूर्ण करण्यासाठी आपण जगावर लादलेले असे हे काही तरी आहे? एखाद्या परिचिताविषयी बोलावे तसा वेळेबद्दल बोलणारा हॅटर जेव्हा वेळेच्या गुणात्मक व अनुभवावर आधारित परिमाणावर भर देतो तेव्हा तो खरोखरच वेडा असतो का? नसावा कदाचित!

ऑगस्टीन: सदैव परिवर्तनशील, सदैव आता

ऑगस्टीन आपल्या कंफेशन्सच्या अकराव्या पुस्तकात वेळ व जगाच्या निर्माणाच्या प्रश्नावर विचार करून असा निष्कर्ष काढतो की जग निर्माण होण्याच्या आधी वेळ अस्तित्वात नव्हता. त्यामुळे जगनिर्मितीच्या आधी देव काय करत होता हे त्याला विचारणे मूर्खपणाचे आहे. देवासाठी आधी काही नव्हते कारण "आधी" ही संज्ञा कालिक गोष्टींना लागू आहे. देव अनादी अनंत आहे. ऑगस्टिनच्या मते देवाने ज्या क्षणी हे भौतिक जग निर्मिले त्याच क्षणी वेळ निर्मिला. जगाच्या निर्माणाआधी वेळ नव्हताच.

वेळ म्हणजे नक्की काय हा अवघड प्रश्न ऑगस्टीन त्यानंतर उपस्थित करतो. "काही घडून गेलं नाही तर भूतकाळ नसेल; काही समीप येत नसेल तर भविष्यकाळ नसेल; काही नसल्यास वर्तमानकाळ नसेल." भूत व भविष्य जर वर्तमानात अस्तित्वात नसतील तर त्यांना खरे कसे मानायचे? भूतकाळ आता नाही आणि भविष्यकाळ अद्याप अस्तित्वात आलेला नाही. ऍलिसला हे अंत:प्रेरणेने स्वत:बद्दल कळले. कॅटरपिलरशी बोलताना ती म्हणते, "मला - मला ह्या क्षणाला ठाऊक नाही हो. आज सकाळी मी उठले तेव्हा मी कोण होते ते माहीत आहे, पण त्यानंतर मी बऱ्याचदा बदलले असणार." हो, ऍलिस सतत बदलत आहे. वर्तमान भूतकाळात मिसळून जातो आणि अस्तित्वहीनतेकडे सरकू लागतो. उदाहरणार्थ, एखादा माणूस जेव्हा "लुइस कॅरॉल" हे नाव उच्चारतो तेव्हा "-ऑल" उच्चारतानाचा 'आता' "लु-" उच्चारतानाच्या 'आता'हून वेगळा असतो. ऍलिस जरी आपल्यात होणाऱ्या बदलांनी गोंधळली असली तरी आयुष्य म्हणजेच बदल हे सुरवंटाला चांगलेच ठाऊक असते. त्याचे स्वत:चे जीवन म्हणजे सुरवंटाचे फुलपाखरू होणे. तुलाही बदलाची "काही वेळाने" सवय होईल, असे तो तिला सांगतो. ऍलिसलाही कधीतरी कळेल की सर्वांप्रमाणे तिचे जीवनही स्थित्यंतरांनी भरलेले आहे. इतके सारे बदल होत असल्यामुळे ऍलिस फक्त तात्कालिक वर्तमान अनुभवू शकते. अशा प्रकारे, केवळ वर्तमानच अस्तित्वात असेल तर आपण भूत व भविष्यकाळाबद्दल कसे बोलू शकतो?

भूत, वर्तमान, व भविष्याचा मेळ घालण्यासाठी ऑगस्टीन तिघांना वर्तमानात ठेवतो. "भूतकाळात घडलेल्या गोष्टींचे वर्तमान, वर्तमानातील गोष्टींचे वर्तमान, [व] भविष्यकाळातील गोष्टींचे वर्तमान" अशा स्वरूपात प्रत्येक वेळ फक्त वर्तमानातच अस्तित्वात असते. एकीकडे आपण वेळेची लांबी मोजू पाहतो तर दुसरीकडे आपण जे आता अस्तित्वात नाही (भूतकाळ) किंवा जे अद्याप अस्तित्वात आलेले नाही (भविष्यकाळ) ते मोजू शकत नाही. ऑगस्टीन ह्याला दोन टप्प्यात वियोजित करतो. एक, वेळ म्हणजे वस्तुंचे विस्तारित अवकाशातील संक्रमण/स्थानांतर नव्हे. त्यामुळे वेळ अनुभवजन्य रीतीने, ज्ञानेंद्रियांनी आणि प्रयोगांनी मापता येत नाही. दुसरे म्हणजे वेळ ही वर्तमानात अनुभवलेली मानसिक संकल्पना आहे. त्यामुळे कालमापन म्हणजे वर्तमानकाळात मनात येणाऱ्या गोष्टींच्या पडणाऱ्या प्रभावाचे मापन. ऍलिस मॉक टर्टल व ग्रिफॉनला भेटते तेव्हा तिला आपल्या अस्तित्वावर बदलांच्या खाणाखुणा असल्याची अधिक जाणीव असते. "मी तुम्हाला आज सकाळपासूनच्या माझ्या साहसकथा सांगू शकते. कालचे बोलण्यात अर्थ नाही, कारण काल मी कोणीतरी वेगळी होते." तिला माहीत आहे की भूतकाळ स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही; किंबहुना तो केवळ आठवणींच्या रूपात वर्तमानात अस्तित्वात आहे. जरी ऍलिस भूतकाळातील घटना अनुभवू शकत नसली तरी ती वर्तमानात त्यांचे स्मरण करू शकते. ह्या उदाहरणानुसार आपण भूतकाळास आठवणींचा वर्तमानात अनुभव, व भविष्यकाळास आगामी काळाची वर्तमानात अपेक्षा म्हणू शकतो.

कांट: सर्व मनाचे खेळ आहेत

ऑगस्टिनप्रमाणे इम्मॅन्युएल कांट (इ. स. १७२४-१८०४) हा तत्त्वज्ञही कालिकत्वास मानवी चेतनेत बसवतो. 'क्रिटीक ऑफ प्युअर रीझन'मध्ये कांट म्हणतो की अनुभवाच्या शक्यतेसाठी वेळ ही आवश्यक अट/स्थिती आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे तर कोणत्याही साहसासाठी ऍलिसला मनाची अंत:प्रेरणा असणे अनिवार्य आहे. कांटच्या दृष्टिने माणसाने "एकाच वेळी" किंवा "नंतर" असे परस्परसंबंध समजण्यासाठी अनुभवात वेळ गृहीत धरलेली असते. 'ऍलिस'स ऍडवेंचर्स इन वंडरलॅंड'च्या सुरुवातीला ऍलिस उशीर होईल म्हणून चिंताग्रस्त झालेल्या व्हाइट रॅबिटला पाहते. "अरे बाप रे! अरे बाप रे! मला उशीर होणार!" व्हाइट रॅबिटने अद्याप भविष्यातील घटना अनुभवलेली नाही. सध्या तो येणाऱ्या काळाच्या अपेक्षेचा अनुभव घेत आहे. वर्तमान येऊ घातलेल्या घटनेच्या अगोदर आहे हे उमजल्यामुळे तो ह्या क्षणी काळजीत आहे.  

कांट तीन निष्कर्ष काढतो: (१) वेळ ही स्वतंत्रपणे अस्तित्वात असणारी गोष्ट नाही. (२) वेळ एक मानसिक जाणीव आहे जिच्या द्वारे आपण जगाशी संबंध जोडतो. (३) ह्या जाणिवेनुसार किंवा अंत:प्रेरणेनुसार, वेळ ही जगाशी कोणताही संबंध प्रस्थापित होण्याच्या पूर्वीच अस्तित्वात असते. कांटच्या कालिकतेच्या निष्कर्षांनुसार वेळ व्यक्तिनिष्ठ आहे, व मानवी अनुभवांसाठी ती पूर्वावश्यक आहे. वेळ आपल्या मनांमध्ये असते. दोन क्रमवार घटनांचे आपले संवेदन ह्याला साक्ष असते. घटना 'अ' व त्यानंतरची घटना 'ब' घडण्याआधीच आपल्याला वेळेचे अंतर्ज्ञान असते. त्यामुळे एकदा घटना 'अ' घडली आणि नंतर घटना 'ब' घडली की आपण समजतो की 'ब' 'अ'च्या नंतर घडली, आधी नाही. हे अंतर्ज्ञान नसते तर आपल्याला असे वाटू शकले असते की सन २००१ सन १९९९च्या आधी आले, किंवा आजची सकाळ काल रात्रीच्या आधी आली. सुदैवाने आपण असे समजत नाही. थ्रू द लुकिंग ग्लासमध्ये ऍलिस रेड व व्हाइट क्वीन्सना म्हणते तेच खरे: "एका वेळी एकच दिवस असतो."१०

बर्गसन १: एकाच ठिकाणी राहण्यासाठी धावणे

वेळ म्हणजे वस्तुंचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत संक्रमण अशी सर्वसाधारण समजूत आहे. तत्त्वज्ञ हेन्री बर्गसन (इ. स. १८५९-१९४१) ह्याने ह्या संकल्पनेला दिलेले आव्हान लुइस कॅरॉलला पटते. एलियावासी झेनो (क्रिस्तपूर्व पाचवे शतक) ऍचिलीस व कासवातील शर्यतीची गोष्ट सांगतो. शर्यतीत कासवाला आधी थोडे पुढे जाऊ दिले. झेनोच्या मते ह्यामुळे एक विरोधाभास निर्माण झाला. ऍचिलीस कधीच कासवाला गाठू शकणार नाही व शर्यत हरणार कारण दोघेही एक एक पाऊल टाकताहेत, व त्यामुळे आधीच पुढे असलेले कासव पुढेच राहणार. हीच गोष्ट लुइस कॅरॉल "कासव ऍचिलीसला काय म्हणाले"मध्ये पुढे नेतो. ह्यात शर्यत संपल्यानंतरचे दोघांतले संभाषण दिले आहे:

ऍचिलीसने कासवाला मागे टाकले होते, व आरामात त्याच्या पाठीवर बसला होता. कासव त्याला म्हणाले, "आपला शर्यत-मार्ग अनंत अंतरांची माला असूनही पोहोचलास ना शेवटापर्यंत? मी तर ऐकलं होतं की कोणी तरी झेनो नावाच्या दीडशहाण्याने हे होऊच शकणार नाही असं सिद्ध केलं होतं."

"होऊ शकतं. झालेलं आहे! सॉल्विटुर ऍंब्युलॅंडो. असं पाहा, अंतरं सतत कमी होत होती; त्यामुळे—" - ऍचिलीस.

"पण ती सतत वाढत असती तर?" कासवाने त्याला मध्येच तोडले, "मग काय?"

"मग मी इथे नसतो आणि तू एव्हाना बऱ्याच जगप्रदक्षिणा घातल्या असत्यास!", ऍचिलीस नम्रपणे म्हणाला. ११

झेनोचा अवकाशाच्या स्वरूपाविषयी गोंधळ असला तरी आपण सारे वेळेविषयी गोंधळलेले असतो कारण अंशत: तरी आपण वेळेचा विचार अवकाशाच्या संदर्भात करतो. जेव्हा आपण काल मापतो तेव्हा अवकाशाच्या संदर्भाने विचार करतो. पण बर्गसनच्या मते वेळेला अवकाशात संकुचित करता येत नाही; "वेळेचे मापन करायला गेलो की अनवधानाने आपण त्याच्या जागी अवकाश ठेवतो."१२ वेळेसंबंधी असा अवकाशिक विचार करणे चूक आहे. बर्गसन खुलासा करतो की वेळ म्हणजे "कालावधी". अवकाश पार केले असो वा नसो, कालावधी खरा असतो. "द गार्डन ऑफ लाइव्ह फ्लॉवर्स" ह्या थ्रू द लुकिंग ग्लासच्या दुसऱ्या प्रकरणात ऍलिस व रेड क्वीन हे सोदाहरण स्पष्ट करतात:

"चल, चल, जोरात धाव! " राणी म्हणाली. अन त्या दोघी इतक्या वेगाने धाऊ लागल्या की त्यांचे पाय जणू जमिनीला लागतच नव्हते …

राणीने तिला एका झाडाला टेकवून उभे केले, व म्हणाली, "आता थोडी विश्रांती घे."

ऍलिस आजूबाजूला पाहून आश्चर्याने म्हणाली, "अय्या, मला वाटतं आपण सगळा वेळ ह्या झाडाखालीच होतो! सगळं जसंच्या तसं आहे! "

राणी: "अलबत!"१३

धावण्याची क्रिया कालावधीत घडल्यामुळे ऍलिस दुसरीकडे कुठे तरी असण्याची अपेक्षा करत होती. राणीच्या स्पष्टीकरणानंतर तिच्या लक्षात येते की त्या एकाच जागी राहिल्या असल्या तरी त्यांना कालावधीचा व बदलाचा अनुभव आला आहे. बदल अवकाशित्वाची तमा न बाळगता घडतात.

प्रत्येक वर्तमान इतर सर्वांपासून भिन्न असल्यामुळे मानवी निरीक्षकास नेमक्या वर्तमानात प्रवेश नसतो. खरे म्हणजे त्याने जे अनुभवले त्याच्या गुणांपर्यंत त्याला पोहोचता येते. माणसाच्या मानसिक स्थितीनुसार वेळेचा दर्जा बदलतो. रोजच्या अनुभवांवर मन:स्थितीचा परिणाम होतो. उदाहरणार्थ आपल्या प्रेयसीसोबत असताना वेळ कसा भुर्रकन जातो हे कळतही नाही. कंटाळलेल्या विद्यार्थ्याला नेहमीचे व्याख्यान तासंतास चालल्यागत भासेल. काही अनुभव इतरांहून दीर्घ किंवा ऱ्हस्व असल्याची लोकांना जाणीव असते; तरीही विचारल्यावर ते पृथक, एकजिनसी गणिती वेळेकडे वळतात. प्रत्येक क्षण सेकंद, मिनिट, तास, इत्यादींच्या परिभाषेत संख्यात्मकदृष्ट्या समान असतो ह्या कल्पनेकडे परततात. ह्यामुळे "वेळ पटकन गेला" अशा शब्दप्रयोगांतून व्यक्त झालेल्या अनुभवाच्या गुणात्मक स्वरूपाचे स्पष्टीकरण मिळत नाही. प्रत्येक क्षण सारखा वाटत नाही. कधी कधी एक तास पटकन निघून जातो, तर कधी तो संपता संपत नाही.

झेनोच्या विरोधाभासांत वेळ म्हणजे केवळ वस्तुचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण.१४ बर्गसन आपल्या कालावधीच्या कल्पनेतील व झेनोच्या विरोधाभासांतील भेद विशद करतो. चलनाचे पुढील दोन घटक आहेत: (१) पार केलेले एकजिनसी, विभाजनीय अवकाश, आणि (२) पार करण्याची अविभाज्य, जाणीवपूर्वक केलेली क्रिया. बर्गसनच्या मते ह्या विशिष्ट व अविभाज्य क्रियांच्या मालिकेची, व त्यांच्या मुळाशी असलेल्या एकजिनसी अवकाशाची गल्लत घालण्याची झेनोने चूक केली. १५ बर्गसन म्हणतो की एक तर आपण अवकाशाला मीटर, सेंटिमीटर, मिलिमीटर इत्यादी एककात विभागतो; किंवा आरशापलीकडील जगातल्याप्रमाणे जग "बुद्धिबळाच्या पटासारखे" तरी असते!१६ अवकाश जरी अमर्यादपणे विभाजनीय असले तरी अवकाशातील दोन सहकालिक जागांना वस्तुंचे अवकाशातील स्थानांतरण समजणे चूक आहे. बुद्धिबळाच्या पटावरील सर्व चौकोन समान असले तरी ऍलिसचा चौथ्या चौकोनाचा अनुभव (ट्वीडलडम व ट्वीडलडी ह्यांचा) आणि सहाव्या चौकोनाचा अनुभव (हंप्टी डंप्टीचा) अद्वितीय व गुणात्मक दृष्ट्या वेगळे आहेत. आणि अर्थात, एखादी वस्तू एका जागी राहत असल्यासारखी दिसली तरी ती सतत बदलत असते. हे प्रकरण वाचायला सुरू केल्यापासून तुम्ही बदलले आहात; तुमचे वय वाढले आहे. कल्पना करा की एक माणूस एका कागदाकडे तीन मिनिटे टक लावून पाहतो. तो कागद बदलला का? तो माणूस नाही म्हणेल. मात्र तो हे मान्य करतो की त्या कागदाचा काही शतकात ऱ्हास होईल. अनेक शतके तो कागद एकाच ठिकाणी राहिला तरी हेच होईल. ह्यावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की सुरुवातीचा नकार कालावधी, बदल, व अवकाश ह्यांच्याविषयीच्या गोंधळामुळे होता. आपल्याला कालौघात होणाऱ्या बदलांची सवय आहे. सर्वसामान्यपणे कालिकत्वाला गणिती घड्याळी वेळ समजण्यात येत असले तरी बदल अविभाज्य आहे. ह्यातील सत्यांश ओळखल्यामुळे ऍलिस "प्रचंड गोंधळून जाते."

ऍलिस कुतूहलाने त्याच्या खांद्यावरून पाहात म्हणाली, "किती विचित्र घड्याळ आहे हे. तारीख दाखवतं पण वेळ दाखवत नाही!"

"का दाखवावी?", हॅटर पुटपुटला. "तुझं घड्याळ सन दाखवतं का?"

"मुळीच नाही. कारण बराच काळ तेच वर्ष चालू असतं.", ऍलिसने उत्तर दिले.

"माझ्या घड्याळाचंही तसंच आहे, म्हटलं!", हॅटर म्हणाला. १७

मुद्दा असा आहे की आपण वेळेवर सेकंद, मिनिट, आणि तास लादतो. ह्या गोष्टी म्हणजे वेळ नव्हे. वेळेच्या परिमाणाची आपली पद्धत काहीशी यादृच्छिक आहे. ऍलिस एक वर्ष कसे मापते ह्यावर ते कसे अनुभवले जाते हे अवलंबून आहे का? नसावे. बर्गसन लिहितो, "मी जेव्हा घड्याळाच्या काट्याच्या हालचालीचा डोळ्यांनी मागोवा घेतो तेव्हा लोक समजतात त्याप्रमाणे मी अवधी मापत नसतो. मी केवळ युगपतता (simultaneities) मोजतो. ह्या दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहेत."१८ शुद्ध अवधी मात्र मापता येत नाही. आरशाच्या पलीकडे गेल्यावर ऍलिसला दिसते की घड्याळ्याच्या मागील बाजूस "एका म्हाताऱ्याचा चेहरा आहे" व तो तिच्याकडे बघून हसत आहे.१९ तो का हसत आहे? कारण त्याला ठाऊक आहे की ऍलिसच्या जगात सामान्यपणे ज्याला वेळ समजतात ती इथे, आरशापलीकडे लागू होत नाही. खरे तर आपल्या जगासाठीही वेळेचे वर्णन करण्याची ही सर्वसामान्य पद्धत बरोबर नाही. कालावधी म्हणजे अखंड, अविभाज्य वेळ. त्याचे गणिती परिमाणीकरण संभवत नाही. त्याला मिनिटांसारख्या समसमान एककांत विभागता येत नाही. तासाची साठ मिनिटे करून त्या तासाभरात आलेले गुणात्मक अनुभव अस्सल राहत नाहीत, कारण प्रत्येक मिनिट एकाच प्रकारे अनुभवलेले नसते.

संख्यात्मक वेळ अवकाशिक एककात विभागलेली असते. जेव्हा आपण वेळ मोजू पाहतो तेव्हा तिचे बिंदूंमध्ये किंवा सेकंदांमध्ये तुकडे करतो. मग प्रश्न पडतो की दोन सेकंदांच्या मध्ये काय आहे? वेळेचे त्याहून छोटे एकक. त्या छोट्या एककांच्या मध्ये काय आहे? वेळेचे त्याहूनही छोटे एकक. ह्याला अंत नाही. वेळेचा सेकंद म्हणून विचार करणे म्हणजे अचल बिंदूंच्या एका लांबच लांब रेषेची कल्पना करणे. पण वेळ एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत कशामुळे जाते हे घड्याळ्याकडे बघून कधीच कळणार नाही. एक क्षण दुसऱ्याहून भिन्न आहे ह्याची जाणीव होऊ शकणार नाही कारण त्यासाठी दोन क्षण एकाच वेळी इंद्रियगोचर व्हावे लागतील, जे अशक्य आहे.

वास्तवाला अचल समजल्यामुळे झेनोचे विरोधाभास निर्माण झाले. झेनोने अविभाज्य स्थानांतरण, व अवकाश ह्यांची गल्लत केली. बर्गसनचा असा दावा आहे की ऍचिलीसला विचारले तर तो एक विलक्षण विधान करेल:

झेनोचा आग्रह आहे की मी (ऍचिलीस) जिथे आहे तिथून कासवाने जे स्थान सोडले आहे तिथे जावे, तिथून त्याने पुढचे जे स्थान सोडले आहे तिथे जावे, इत्यादी इत्यादी. मला धावडवण्याची त्याची ही अशी कार्यपद्धती आहे. पण माझी रीत वेगळी आहे. मी आधी एक पाऊल टाकतो, मग दुसरे, इत्यादी. पावलांच्या एका विशिष्ट संख्येनंतर मी शेवटचे पाऊल टाकतो जे मला कासवाच्या पुढे नेते. अशा तऱ्हेने मी अविभाज्य कृतींची एक मालिका पार पाडतो.२०

ऍचिलीस व कासवाची शर्यत ज्या अवकाशात घडली ते विभागता येते पण शर्यत विभागता येत नाही. वास्तव अचल नसते कारण खरे अस्तित्व बदल होत असल्याचे सूचित करते. त्याचप्रमाणे, "चलन सर्व काही नसेल तर ते काहीच नाही."२१ दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सर्व काही अविरत बदलत असते.