मस्ग्रेव्हांचा रिवाज

(सर ऑर्थर कॉनन डॉइल यांच्या ’द मस्ग्रेव्ह रिचुअल’ या कथेचा स्वैर अनुवाद)

शर्लॉक होम्सच्या वागण्यात नाही म्हटले तरी काही प्रमाणात विसंगती होतीच आणि ती मला राहून राहून जाणवत असे. रहस्य उकलण्यासाठी तर्कशुद्ध विचार करण्याची आपली पद्धत तो अत्यंत काटेकोरपणे राबवत असे. त्याच्या वेशभूषेच्या बाबतीतही तो अत्यंत नीटनेटका होता. पण त्याचे एरवीचे वागणे मात्र अतिशय गबाळे, बेशिस्तीचे होते. इतके, की दुसऱ्या कोणीही आपल्या बरोबर राहणाऱ्या मित्रांना इतके सळो की पळो करून सोडले नसेल. तसे पाहिल्यास मीही टापटीप, नीटनेटकेपणा यासाठी काही फार प्रसिद्ध आहे अशातला भाग नाही. जात्याच असलेला बेफिकीर स्वभाव आणि अफगाणिस्तानातले अंगमेहनतीचे काम यांनी मला अशा शिस्तीच्या बाबतीत एखाद्या डॉक्टरला न शोभेल असे निष्काळजी करून टाकले होते. पण होम्सच्या अव्यवस्थितपणाची म्हणजे कमाल होती. तो आपल्या सिगारेटस कोळशाच्या बादलीत ठेवायचा. तंबाखूची पुडकी पर्शियन सपातांच्या चवड्यांमध्ये ठेवायचा आणि डाकेतून आलेली कागदपत्रे एक पत्रे फोडायची सुरी खुपसून शेकोटीच्या लाकडी आवरणावर ठेवायचा. शिवाय पिस्तुलातून गोळीबार करण्याचा सराव हा उघड्यावर मोकळ्या जागेतच करायला हवा असे माझे अगदी ठाम मत आहे, पण होम्स गंमत म्हणून आपल्या खुर्चीत बसल्याबसल्या पिस्तुलातून गोळ्या झाडून समोरच्या लाकडी भिंतीवर V. R. (व्ही. आर. ) अशी देशभक्तीपूर्ण अक्षरे कोरण्यासाठी बॉक्सर काडतुसांची पेटीच्या पेटी रिकामी करायचा. बंदुकीच्या गोळ्यांच्या त्या नक्षीमुळे ना आमच्या घरातले वातावरण सुधारते ना आमच्या खोलीच्या सजावटीत काही भर पडते, असे मात्र माझे स्पष्ट मत आहे.

आमच्या घरभर रसायनशास्त्रातल्या प्रयोगांमधून उत्पन्न झालेले विचित्र पदार्थ पसरलेले असायचे आणि ते बरेचदा नको त्या ठिकाणी सापडायचे. आता जेवायच्या टेबलावरची लोण्याची बशी ही काही अशा गोष्टींची जागा आहे का? पण या गोष्टी याहूनही भन्नाट ठिकाणी सापडत असत. अर्थात हे रासायनिक पदार्थ काहीच नाहीत अशी गत होम्सच्या कागदपत्रांची होती. जुन्या केसेसच्या नोंदी असलेल्या कागदपत्रांची विल्हेवाट लावणे होम्सला साफ नामंजूर होते. पण त्याला ही कागदपत्रे आवरायची खुमखुमी वर्षा-दोन वर्षातून एखादेवेळीच काय ती येई, अशा वेळीच ही कागदपत्रे काय ती आवरली जात. मी त्याच्या आठवणींमध्ये कुठेतरी लिहून ठेवल्याप्रमाणे, त्याच्या धवलकीर्तीमध्ये भर घालणारी कामगिरी करताना त्याला जे उत्साहाचे भरते येत असे, त्याच्या अगदी उलट अवस्था ती कामगिरी पार पाडल्यावर होई. अत्यंत आळशीपणाने आपले व्हायोलीन आणि काही पुस्तके घेऊन तो दिवसचे दिवस गुळाच्या ढेपेसारखा आपल्या खुर्चीतून हलत नसे. अधूनमधून जेवायच्या टेबलापाशी काय ती त्याची खेप व्हायची. या सगळ्याचा परिणाम म्हणजे महिनोन महिने त्याच्या खोलीत हस्तलिखितांच्या थप्प्या साठत राहायच्या आणि अखेरीस अशी वेळ यायची की खोलीच्या कानाकोपऱ्यात नुसता कागदांचा खच पडलेला असायचा. ही कागदपत्रे जाळून नष्ट करणे तर सोडाच पण त्यांच्या मालकाच्या परवानगीशिवाय ती जागची हलवतादेखील येत नसत. एकदा रात्री आम्ही शेकोटीपाशी बसलो होतो. थंडीचे दिवस होते. मी होम्सला म्हटले, जर डकव-बुकात नोंदी चिकटवण्याचे काम झाले असेल तर तासा दोन तासांत खोलीतला पसारा आवरून जगणे जरा सुसह्य का करत नाहीस? माझ्या बोलण्यात अजिबात अतिशयोक्ती नव्हती हे होम्सलाही पक्के ठाऊक असल्यामुळे केविलवाणा चेहरा करून तो आपल्या निजायच्या खोलीत गेला आणि एक पत्र्याची पेटी ओढत ओढत बाहेर घेऊन आला. जमिनीवर साधारण मधोमध ती पेटी ठेवून त्याने एका स्टुलावर बसकण मारली आणि पेटीचे झाकण सताड उघडले. ती पेटी लाल चिकटपट्टी लावून वेगळ्या केलेल्या कागदांच्या गठ्ठ्यांनी सुमारे एक तृतीयांश भरलेली होती.

"वॉटसन, यात इतक्या केसेस आहेत हे तुला माहीत असतं तर तू मला यात कागदपत्रे भरून ठेवण्याऐवजी यातलीच काही कागदपत्रे बाहेर काढायचा आग्रह धरला असतास, " होम्स मिस्कीलपणे म्हणाला.

"तुझ्या सुरुवातीच्या केसेस दिसताहेत ह्या. या नोंदी माझ्याकडे असाव्यात असे मला नेहमीच वाटत आलेले आहे. " मी म्हणालो.

"होय मित्रा! माझ्या केसेसबद्दल विस्ताराने लिहिणारा आणि माझा उदो उदो करणारा चरित्रकार मला सापडेपर्यंत मी आपल्या जमेल तशा नोंदी ठेवल्या आहेत, " त्याने कागदाच्या पुडक्यांवरून हळुवारपणे हात फिरवला. "या सगळ्याच केसेस सोडवण्यात मला यश आले असे नाही, पण यातल्या काही गोष्टी लक्षात राहण्याजोग्या होत्या, " तो म्हणाला, "वॉटसन, हे बघ यात टर्लटन खुनांची केस आहे. व्हॅमबेरीच्या दारूच्या दुकानदाराची केस आहे, रशियन म्हातारीची साहसकथा आहे. ऍल्युमिनियमच्या कुबड्यांची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. शिवाय पांगळ्या रिकोलेटिची आणि त्याच्या भयंकर बायकोचीही गोष्ट यात आहे. अरे! हे बघ काय आहे! विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे ही... "

पेटीच्या तळाशी हात घालून त्याने सरकत्या झाकणाची, लहान मुलांची खेळणी ठेवायला वापरतात तसली एक लहानशी लाकडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीतून त्याने एक चुरगळलेले कागदाचे चिटोरे, एक जुन्या धाटणीची पितळी किल्ली, एक लाकडी खुंटी आणि तिला बांधलेली दोऱ्याची गुंडाळी शिवाय धातूच्या तीन गंजक्या चकत्या बाहेर काढल्या.

"मित्रा, या सगळ्या वस्तूंवरून तुला काय बोध होतो? " माझ्या चेहऱ्यावरचे गोंधळलेले भाव पाहून गालातल्या गालात हसत होम्स म्हणाला.

"या सगळ्या वस्तू माझे कुतूहल चाळवणाऱ्या आहेत हे खरे. "

"अगदी खरे आहे तुझे म्हणणे. या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्यांच्याबद्दलची गोष्ट याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहे असे तुझ्या लक्षात येईल. "

"यांच्यामागे काहीतरी इतिहास आहे तर. "

"अरे या वस्तूच ऐतिहासिक आहेत. "

"म्हणजे? काय सांगतोस काय? "

होम्सने एकेक करून त्या सगळ्या वस्तू हातात घेतल्या आणि टेबलावर कडेला ठेवल्या. मग तो आपल्या खुर्चीत नीट बसला आणि त्या वस्तूंकडे त्याने नजर टाकली तेव्हा त्याचे डोळे समाधानाने लकाकत होते. "मस्ग्रेव्हांच्या रिवाजाच्या आठवणी आहेत या. "

मी त्याच्या तोंडून या केसबद्दल याआधीही ऐकलेले होते पण त्याबद्दल जास्त माहिती मला मिळाली नव्हती. "या केसबद्दल तू मला तपशीलवार सांगितलेस तर मला फार आनंद होईल. "

"मग काय हा पसारा तसाच राहू दे का? " होम्स खट्याळपणे म्हणाला. "यामुळे तुला हवी असलेली टापटीप इथे दिसणार नाही हे खरे. पण या केसमध्ये आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल असे काही मुद्दे आहेत की आपल्याच काय इतर कुठल्याही देशाच्या इतिहासात असे नसतील. त्यामुळे या केसचा समावेश तू आपल्या कथांमध्ये केलास तर मला आनंदच होईल. कारण या केसशिवाय माझ्या कारनाम्यांची यादी पूर्ण होणारच नाही. "

Pages