पुन्हा एकदा

पुन्हा एकदा हे उभे स्तब्ध सारे
पुन्हा एकदा कोरडे शब्द सारे
सडे लोहिताचे पथी पाहताना
पुन्हा एकदा तेच प्रारब्ध का रे

पुन्हा एकदा शोक काही क्षणाचा
पुन्हा एकदा रंग राजकारणाचा
असा सारखा मार्ग हा का रणाचा
पुन्हा एकदा शोध त्या कारणाचा

पुन्हा एकदा क्षोभ जखमी मनाचा
पुन्हा एकदा गंध आंदोलनाचा
तयासी चढे गंज आश्वासनाचा
पुन्हा एकदा हात त्याला धनाचा

पुन्हा एकदा वेष भोळेपणाचा
पुन्हा एकदा मूक दुबळेपणाचा
धुरा ही कुणाची इशारा कुणाचा
पुन्हा एकदा प्रश्न ह्या शोषणाचा

पुन्हा एकदा हाक आत्मीयतेला
पुन्हा एकदा हार क्षत्रीयतेला
कुकर्मे करित साथ सक्रीयतेला
पुन्हा एकदा जीत निष्क्रीयतेला

पुन्हा एकदा चक्र फिरते नव्याने
तमोच्छेद होई पुन्हा हा दिव्याने
नभी ही भरारी खगांची थव्याने
पुन्हा एकदा देत आशा नव्याने


- हर्षवर्धन देशपांडे