माय मराठी आणि ओडिया मावशी

मी ओडिशा सोडून महाराष्ट्रात आले त्याला अजून वर्षही झाले नाही. त्यामुळे तिथल्या आठवणी अजून ताज्याच आहेत. २५ वर्षांपूर्वी मी मुंबईहून भुबनेश्वरला गेले तेव्हा ह्या दोन शहरांत मला खूपच तफावत जाणवली होती. त्याबद्दल मी मनोगताच्या २००८ च्या दिवाळी अंकात लिहिलेही आहे. पण तफावत फारशी जाणवली नव्हती ती दोन भाषांमध्ये.
नवीन ठिकाणी गेल्यावर भाषेचा जो प्रश्न येतो तो भुबनेश्वरला फारसा आला नाही. काही दिवसांतच ओडिया भाषा समजायला लागली. ह्याचे मुख्य कारण म्हणजे दोन भाषांमधली साम्यस्थळे. कित्येक मराठी शब्द जसेच्या तसे ओडियामध्ये आहेत. फक्त उच्चारात थोडा फरक असतो. दुसरे कारण म्हणजे भाषा संस्कृतप्रचुर. तेव्हा आपण बोलीभाषेत वापरत नसलो तरी संबंधित संस्कृत शब्द माहीत असल्यामुळे त्याचा अर्थ कळतो. तसेच हिंदीसदृश शब्द पण खूप आहेत. त्यामुळे भाषा समजायला त्रास होत नाही.
परक्या ठिकाणी गेल्यावर भाषा येत नसल्यास दैनंदिन व्यवहारात अडचण येते. पण इथे तसे होत नाही. तहान लागल्यावर ’पाणी’ मागितले तर ओडिसातल्या लोकांना कळते. कारण मराठीतील ’पाणी’ला ओडियातही ’पाणी’च म्हणतात. फूल, फळ, घर, लाभ इत्यादी शब्द जसेच्या तसे वापरले जातात. फक्त ओडिया भाषेत अकारान्त शब्दातील शेवटचे अक्षर लांबवले जाते. म्हणजे फूल, फळ, घर, लाभ यांचे उच्चार अनुक्रमे फुलऽ, फळऽ, घरऽ, लाभऽ असे करायचे. हे विशेषनामांच्या बाबतीतही लागू आहे. मराठीतील श्रीकांत हा इथे श्रीकांतऽ होतो. एक शब्द ऐकल्यावर मात्र अगदी सुखद धक्का बसला. आपण मराठीत ’अमुक’ हा शब्द ज्या अर्थाने वापरतो त्याच अर्थाने तो ओडियात वापरतात. फक्त उच्चार अमुकऽ असा होतो. संस्कृतोद्भव शब्दांचे कळू शकते पण ’अमुक’ शब्द दोन्ही भाषांत एकाच अर्थाने असण्याचे मूळ कशात आहे ते मात्र मला अजून उलगडले नाही.
इथल्या स्त्रिया केसात फुले माळत नसल्या तरी देवपूजेसाठी, सजावटीसाठी फुले लागतात आणि अजूनपर्यंत तरी इथे जागेची टंचाई नसल्याने बैठे घर आणि भोवती बाग असे दृश्य नेहमी दिसते. बागेत तगरीची झाडे मुबलक आणि त्याला मराठीतल्यासारखे तगरच (तगरऽ) म्हणतात. मोगऱ्याला मात्र जरा दाक्षिणात्य वळणाचे ’मल्ली’ असे नाव आहे. (कोणत्या तरी दाक्षिणात्य भाषेत मोगऱ्याला ’मळ्ळिगे’ म्हणतात असे ऐकले आहे. ) पण एक गमतीची गोष्ट म्हणजे आपण ज्याला आकाशमोगरी म्हणतो त्याला ओडियात आकाशमल्ली म्हणतात. (आकाशमोगरीचे झाड खूप उंच असते आणि त्याला लांब दांड्याची, चार पांढऱ्या पाकळ्या असलेली सुवासिक फुले येतात. आपण बोलीभाषेत ह्या झाडाला बुचाचे झाड म्हणतो. ) झेंडूच्या फुलाला गेंडू म्हणतात. हे हिंदीतील ’गेंदा’शीही साम्य दर्शविणारे आहे. जास्वंदीच्या फुलाला मात्र फारच वेगळे मंदार असे नाव आहे. गुलाबाला बहुतेक सर्व भारतभर गुलाबच म्हणतात, तसेच इथेही म्हणतात.
आपण ’वरणभात खाल्ला. ’ असे म्हणतो त्याला इथे ’भातऽडाली खाईली. ’ असे म्हणतील. भाताला भातच म्हणतात, फक्त आधी म्हटल्याप्रमाणे भातऽ असा उच्चार करायचा. डाळीला डाली. मग ती वाण्याकडे मिळणारी डाळ असो किंवा शिजवलेली डाळ असो. दुधाला ओडियात दूध असाही शब्द आहे पण तो अजिबात प्रचारात नाही. रोजच्या व्यवहारात दुधाला खीरऽ (क्षीर वरून आला असावा. ) असा शब्द आहे आणि आपण ज्याला खीर म्हणतो त्याला ओडियात खिरी म्हणतात. चटणीला चटणी पण त्यातला ’च’ चांदोबातला नाही, चंद्रातला. आणि ’ट’ थोडासा लांबवलेला असतो. परतून केलेल्या भाजीला भाज्या असे म्हणतात, उदा. : ’आळूभाज्या’, ’भिंडीभाज्या’, ’बैंगूनभाज्या’. आता ही परतून केलेल्या कोणत्या भाज्यांची नावे आहेत हे मी न सांगताही लक्षात येईल! बरेच शब्द असे मराठीशी मिळतेजुळते आहेत. आणखी उदाहरणे म्हणजे काकडीला काकुडी, लिंबाला लेंबू, आणि पालकाला पाळंक म्हणतात. मेथीला मात्र मेथी असेच नाव आहे. तेल इथे तेलच असते पण अकारान्त शब्दांचा नियम पाळणारे, तेलऽ. शिवाय स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाला तेल आणि वाहनांसाठी इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या तेलालाही तेलच म्हणतात. त्याला पेट्रोल, डिझेल असे फारसे म्हणत नाहीत. साखर, गूळ यांना चीनी, गुडऽ अशी नावे आहेत. आधी मी म्हटलेले आहेच की ओडिया आणि हिंदीमध्येही खूप साम्य आहे. (अवांतर- पण असे असूनही इथले लोक हिंदी बोलताना जरा बिचकतात कारण हिंदी आणि ओडियाच्या व्याकरणात फरक आहे. त्यामुळे लिंगवचनाच्या चुका हमखास होतात! ) आणखी काही उदाहरणे म्हणजे कलम(लेखणी), आंचल(साडीचा पदर), दाम(किंमत), झगडा(भांडण), रसोई(स्वयंपाक), आळू(बटाटा), प्याजऽ (कांदा), अचारऽ(लोणचे).
मराठीतले काही शब्द इथे जरासा वेगळा अर्थ घेऊन येतात आणि त्यामुळे कधी कधी विनोदही होतात. आपण ज्याला पुस्तक म्हणतो त्याला ते बोही (वही) म्हणतात आणि वहीला खाता! दरमहा (उच्चारी दरमा) ह्या शब्दाचा अर्थ काय असेल असे वाटते? ह्याचा अर्थ आहे पगार! दरमहा होणारी प्राप्ती अशी काहीशी व्युत्पत्ती असावी. माझी मुले मला ’आई’ अशी हाक मारत ते ऐकून इतरांना आश्चर्य वाटत असे कारण ’आई’ ह्या ओडिया शब्दाचा अर्थ आहे ’आजी’ (ही आईची आई, वडिलांच्या आईला वेगळा शब्द आहे. ). आपला दरवाजा ओडियात कपाट होतो तर मराठीतील ’कोण’ हा शब्द इथे ’काय’ म्हणून वावरतो.
नाते संबंधातील शब्द म्हणजे भाऊ आणि बहीण ह्यांना अनुक्रमे भाई आणि भौणी असे म्हणतात. म्हणजे तेही समजणे सोपे आहे. भावाला हाक मारताना मात्र भाईना म्हणायचे. मराठीतील मावशी ही ओडियातही मावशीच असते! शिवाय भाजीवाले, दुकानदार, बस कंडक्टर ही मंडळी जराश्या पोक्त बाईला ’मावशी’(उच्चारी माऽऽवशी) असे संबोधतात.
आपण कपडेबिपडे म्हणतो त्याला लुगापाटा असे म्हणतात. लुगडे आणि लुगा यामध्ये साम्य आहेच. गाय, म्हैस, कुत्रा, वाघ, सिंह, माकड ह्यांना अनुक्रमे गाई, महिसी, कुकूरऽ, बाघऽ, सिंघऽ, मांकडऽ असे म्हणतात.
क्रियापदे/धातू यांचा विचार करायला लागलो तर मराठीतील खेळणे, जाणे, खाणे, पिणे, पळणे, उठणे ह्यांचे ओडिया प्रतिशब्द अनुक्रमे खेळिबा, जिबा, खाईबा, पिईबा, पळईबा, उठिबा असे आहेत. ठेवणे ह्याला रखिबा म्हणतात. संपणे ह्याला सरिबा असा शब्द आहे. आपल्याकडेही ’सरणे’ हा शब्द संपणे ह्याअर्थी पूर्वी वापरत असतच. स्वयंपाक करणे ह्याला रांधिबा असे म्हणतात. हा शब्दही आपल्या परिचयाचा, विशेषत: महिलांच्या! कारण ’रांधा, वाढा, उष्टी काढा’ हा अष्टाक्षरी मंत्र आजही सर्वच महिलांना आचरणातून नाही तरी जुन्या साहित्यातून ऐकून माहीत असतोच!
शरीराच्या अवयवांचा विचार करायला लागलो तर त्यातही साम्य आहेच. ’कान’ला कानऽ म्हणतात तर डोळ्याला आखी. एक गंमत म्हणजे डोळ्याला डोळा असाही ओडिया शब्द आहे पण तो क्वचितच वापरला जातो. पुरीच्या श्रीजगन्नाथाचे डोळे चाकासारखे गोल आहेत. म्हणून त्याला ’चाकाडोळा’ असेही एक नाव आहे. नाकाला नाकऽ, हाताला हाथऽ, पावलाला पादऽ, डोक्याला मुंडऽ असे अर्थ सहज लक्षात येईल असे शब्द आहेत.
कित्येक शब्द तसे मराठी, संस्कृतपेक्षा फार वेगळे नसतात परंतु उच्चार जरा वेगळे असल्याने ते फारच वेगळे वाटतात. उदा. : बोनोलोख्खी हा शब्द कानावर पडला तर ही काय भानगड असेच वाटेल पण काही ठोकताळे लक्षात ठेवले तर हे काही विचित्र नाही हे लक्षात येईल. ते ठोकताळे असे: मराठीतील ’व’ चा ओडियात ’ब’ होतो, ’अ’ चा ’ओ होतो, ’क्ष’ चा ख्ख होतो. तर ह्यावरून बोनोलख्खी म्हणजे वनलक्ष्मी असावे असा अंदाज बांधता येईल. पण असे करताना कधीकधी सपशेल चुकाल. बाळकऽ हा शब्द ऐकून त्याचे मराठी भाषांतर वरील ठोकताळ्यांनुसार वाळकऽ (सुकं) असे केलेत तर ते साफ चूक. बाळकऽ म्हणजे मराठीतील बालक!
मराठीत तसे कमी वापरात असलेले पण संस्कृत किंवा संस्कृतोद्भव शब्द बरेच असतात आणि त्यामुळे ते आपल्याला सहज समजतात. उदा. : बर्तमान म्हणजे सध्या, हल्ली, ज्वर म्हणजे ताप, पत्र म्हणजे झाडाचे पान, अल्पबळऽ म्हणजे अशक्तपणा, विराट(खूप मोठे), कष्ट(त्रास), साहाज्य(मदत), मयूरऽ(मोर), गीतऽ(गाणे), नूतन(नवीन), दीपऽ(दिवा), पद्मऽ(कमळ). हे सर्व शब्द बोलीभाषेतील आहेत. ’पद्म’संबंधीचा एक गमतीदार किस्सा आहे. निवडणुकांचे दिवस होते. माझ्या एका मैत्रिणीची निरक्षर मोलकरीण मतदान केंद्रावर गेली आणि मत न देता परत आली. म्हणाली "पद्मऽ तो नाही, कोणऽ करिबी? " (कमळ तर नाही/नव्हतं, मग काय करू? ) त्यावेळी भाजप आणि बिजू जनता दल(बिजद) यांची युती होती. त्यामुळे जिथे बिजदचा उमेदवार होता तिथे भाजपचा नव्हता. पण ही पार्श्वभूमी माहीत नसल्याने त्या बाईची पंचाईत झाली होती! असो. ह्यावरून मराठीतील ’नाही’ हे ओडियातही ’नाही’च आहे हेही लक्षात येईल. ओडियात पावसासाठी बरसा(वर्षा), तर ढगांसाठी मेघा हे संस्कृतप्रचुर शब्द अगदी मोलकरणी, मजूर ह्यांच्या तोंडीही असतात कारण ती भाषाच तशी आहे. तसेच अगदी तिसरी/चौथीतला मुलगा सुद्धा ’गणिताचा अभ्यास म्हणजे किती त्रास’ हे म्हणताना त्रास ह्याअर्थी ’कष्ट’ हा शब्द वापरतो. शाळेतील पहिली, दुसरी.... आठवी, नववी ह्या इयत्तांना प्रथम, द्वितीय,.... अष्टम, नवम असे अल्पशिक्षितही म्हणतात.
घर ह्या शब्दाचा अर्थ जसा मराठीतील घर असा होतो तसाच तो शब्द घरातील खोलीसाठी सुद्धा वापरला जातो. किंबहुना त्याच अर्थाने तो जास्त वापरतात. त्यामुळे रसोईघर, पूजाघर असे शब्द इथे प्रचलित आहेत. आपण ज्याला देवघर म्हणतो त्याला पूजाघर म्हणतात. त्याला देवघर न म्हणता पूजाघर म्हणण्याचे कारण फार सुंदर आहे. ते असे: देव तर सगळीकडे, प्रत्येक खोलीत असतो मग एका विशिष्ट खोलीलाच देवघर का म्हणायचे? म्हणून जिथे बसून आपण देवाची पूजा करतो ते पूजाघर!
ओडिया लिपी वरवर पाहिली असता दाक्षिणात्य भाषांच्या लिपीसारखी वाटते. पण ती तशी अजिबात नाही. ती देवनागरीलाच जवळची आहे. खालच्या तक्त्यात जर तुम्ही बारकाईने पाहिले तर लक्षात येईल की काही देवनागरी अक्षरांच्या वरील रेघ वर ओढून तिला कमानीसारखा आकार दिला तर ओडिया अक्षर तयार होते. क, घ, ज, न, प, फ, ब, ल ही अक्षरे तशा प्रकारची आहेत.
आपल्या देशाच्या पूर्व आणि पश्चिम ह्या दोन टोकांवर बोलल्या जाणाऱ्या ह्या भाषांमधील हे साम्य मला लक्षणीय वाटले. त्या साम्यामुळेच तर मला ओडिया समजण्यास त्रास पडला नाही आणि माझ्या तेथील दीर्घ वास्तव्यात मी ती मोडकीतोडकी का होईना पण संवाद साधण्याइतपत बोलायलाही शिकले. आजही मी भुबनेश्वरला कोणाला फोन केला आणि त्यांच्याशी ओडियात बोलले तर त्यांना आनंद होतो. भाषा हा माणसांना एकमेकांशी घट्ट जोडणारा बंध आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही!
- मीरा फाटक