पाऊस
क. : अनिरुद्ध अभ्यंकर
सोसाट्याचा आज पुन्हा
हा वारा सुटला
मळभ दाटले आणि
अचानक पाऊस पडला
धावत आली खिडकीशी ती
आणिक सारा
युगा युगाचा क्षणात एका
संयम सुटला
आठवणीची सगळी दारे
उघडी पडली
मोर मनाचा चिंब चिंब
मोहरला.. भिजला
कुण्या काळचा पाचोळा
पागोळ्यांमध्ये
उंबरठ्यावर खळखळणारा
ओघळ अडला
ओठ दाबला दातांमध्ये
मिटले डोळे
एक आवंढा निर्धाराने
मागे वळला
केस सारखे केले
आणले हुकमी हसू
मूक आत पडणारा
पाऊस कुणा न कळला
- अनिरुद्ध अभ्यंकर