काळी - पिवळी

"सरदारजी, उजवीकडे वळा आणि बरोबर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा! "

मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरूपी सताड उघड्या असलेल्या फाटकातून आत शिरायची आणि मी वडिलांच्या हातातून रुपयाची नोट घेऊन सरदारजींच्या पुढे करायचो. दचकू नका, ही ६०च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरून झाल्यावर पाचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही. आणि शहरही(? ) इतके मोठे नव्हते की कुणी टॅक्सी वापरेल. त्यामुळे दादरला आजीआजोबांकडे जाण्यातले टॅक्सी हे आणखी एक आकर्षण होते. दादर टीटीच्या बाजूला उतरायचे, बाहेर मस्त कमानदार चार खांबी छत होते, तिथे येऊन उभे राहिले की दूर रांगेत उभी असलेली टॅक्सी पुढ्यात येऊन उभी राहायची. मग सरदारजी दरवाजा उघडून उतरायचे आणि पुढून वळसा घेत ’बैठिये जी’ असे म्हणत डावा हात गाडीच्या झाकणावर ठेवत उजव्या हाताने गर्रकन मीटरचा झेंडा फिरवायचे आणि क्रिंग-खण्ण असा आवाज यायचा. त्या काळी प्रवाशाला कुठे जाणार असे विचारायची पद्धत नव्हती, प्रवाशाने टॅक्सीवाल्याला ’अमकीकडे येणार का? ’ असे आर्जव करायची वेळ आलेली नव्हती. मग डौलदार वळण घेत टॅक्सी आंबेडकर रस्त्याच्या दिशेने निघायची आणि लगोलग डावे वळण घेत टिळक पुलावर यायची. मग कोतवाल उद्यानावरून डावे वळण घेत पुढे मारुती-मागे चर्च असलेल्या देवळाला उजवे घेत ऍंटोनियो डिसिल्वा शाळेवरून पुढे यायची आणि घर यायचे. वास्तविक दादर स्थानकात उतरल्यावर टीटीला न जाता पूल पार करून फुलबाजारात उतरले की चालत दोन मिनिटांवर घर! मात्र ठाण्यात टॅक्सी नव्हती आणि श्रीमंत नसले तरी देवाच्या दयेने मुलाच्या टॅक्सीच्या हट्टाला वडील उधळपट्टी समजणारे नव्हते, त्यामुळे आमची चैन बिनबोभाट पार पडायची.

मध्यमवर्गाच्या चैनीच्या सर्वोच्च कल्पनांपैकी एक म्हणजे टॅक्सीत बसणे. आपल्याकडे गाडी असू शकते हा विचारही मध्यमवर्गाच्या मनाला शिवला नव्हता. गाडी म्हणजे डॉक्टर, बडा वकील, व्यापारी वा सरकारी उच्चपदस्थ यांचीच असू शकते हे समीकरण मनात पक्के होते. मुंबईकराला बेस्टची खास सवय. घरातून खाऊन बाहेर पडायचे, खाली रस्त्यावर आले की थोड्याच वेळात बस हजर व्हायची. साहजिकच टॅक्सी ही चैन असली तरीही मुंबईकराच्या जीवनाचे एक अविभाज्य अंग होती. लग्न-प्रसंग, लांबच्या प्रवासासाठी सामानासह गाडीवर जायला, खरेदी, क्वचित सिनेमा या सगळ्यांसाठी आणि हो, गावाहून येताना बोजे मोजून उतरवून घेतल्यानंतर टॅक्सी ही हवीच. आणखी एका गोड प्रसंगी टॅक्सी हमखास लागायची - साखरपुडा झाल्यानंतर लग्नाआधीच्या मधल्या काळात आपल्या वाग्दत्त वधूला चित्रपटाला वा फिरायला चौपाटीवर न्यायला. म्हटले तर चैन आणि तेवढाच जरा एकांत. तो जमाना टॅक्सीच्याही परिवर्तनाचा होता. स्वातंत्र्य मिळून दशक लोटले होते. इंग्रजी जमान्यातल्या व इंग्रजी बनावटीच्या डॉज, प्लिमथ, वॉक्जॉल, मॉरिस वगैरे गाड्या हळूहळू सरत आल्या होत्या. त्यांनी लोणावळा, पांचगणी-महाबळेश्वरचा रस्ता धरला होता. जमाना होता तो बेबी हिंदुस्थान, अँबेसेडर आणि फियाटचा. फियाट मध्ये पुन्हा दोन प्रकार - नेहमीची फियाट आणि मागून त्रोटक दिसणारी डुक्कर फियाट. (फियाटमध्ये डकर हे मॉडेल मागून डिकी लहान असलेले होते. डिकीचे झाकण शेवटपर्यंत जाऊन सरळ रेषेत संपण्याऐवजी ते टोकाकडे उतरते होते. याला लोक डुक्कर फियाट म्हणायचे. ) फियाटचा आकारही वेगळा, जरा कमानदार आणि चेहरा थोडा हसतमुख. मग नकळत एक दिवस नवी फियाट आली आणि सत्तरच्या दशकात एके दिवशी वर्तमानपत्रात अर्धे पानभरून जाहिरात झळकली - ’जुन्या दोस्तांनो, रामराम’. फियाट ११०० डी चालली होती आणि प्रीमिअर पद्मिनी रुबाबात प्रवेश करत होती. मात्र बनविणारे हात बदलले, मालकी बदलली तरी फियाट ही फियाटच राहिली.

टॅक्सी या प्रकाराचा पगडा मुंबईकरावर आणि अर्थातच चित्रपट सृष्टीवरही होता. अनेक चित्रपटात या टॅक्सीने भूमिका केल्या आणि अनेक दिग्गज नायकांना आपलेसे करून घेतले. साधू और शैतान, आरपार, टॅक्सी ड्रायव्हर, हसते जख्म, जानेमन, वॉरंट, खुद्दार असे अनेक चित्रपट या काळी-पिवळीने गाजवले. मात्र डोळ्यांपुढे उभा राहतो ’आर पार’ मधला टोपीच्या पुढची झाप खाली आलेला आणि व्ही के मूर्तींनी दरवाजाच्या चौकटीत बंदिस्त केलेला गुरुदत्तचा चेहरा. गाडीतून पळणाऱ्या खलनायकाचा पाठलाग करायला नायकाने टॅक्सीला हात करून घाईघाईने आत शिरत ’ड्राईवर, सामने वाली गाडी का पिछा करो, चलो, जल्दी चलो’ हा संवादही नित्याचा झाला होता. एकूण काय तर टॅक्सीचा एक रुबाब होता. चकचकीत गाडी, आतल्या मऊ गाद्या, वर छतावर सामान बांधायला फलाट आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुढे झाकणावर उजवीकडे असलेली चकचकीत घडीची नळकांडी - त्या टॅक्सीत आकाशवाणीवरची गाणी ऐकायची सोय असल्याची निदर्शिकाच जणू. सगळ्या टॅक्सींचा रंग एकसमान, काळा आणि पिवळा. पिवळा सुद्धा ठरलेला, किंचित केशरी छटा असलेला. पुण्यातल्या टॅक्सी मात्र फिकट पिवळा रंग वापरायच्या. पुढे ऐंशीच्या दशकात जेव्हा दिल्ली वा कलकत्ता येथे जावे लागले तेव्हा कलकत्त्याच्या डबड्या अँबॅसेडर गाड्या पाहून आणि दिल्लीतले लुच्चे टॅक्सीवाले पाहून मुंबईकर आपल्या टॅक्सीची आठवण मनोमन काढायचा. परगावाहून येणाऱ्या कचेरीतल्या सहकाऱ्याला वा नातेवाइकाला मुंबईकर छातीठोकपणे सांगायचा, "अरे मुंबई सेंट्रलला उतर, टॅक्सी पकड आणि ये इथे. आमचे टॅक्सीवाले सरळ आहेत, आणि मुंबईत टॅक्सी मापकावर चालतात, इथे मापात पाप नाही. "

मुंबई नगरी मायानगरी. आलेल्या प्रत्येकाला काम देणार. बघता बघता लांबच्या राज्यांतून आलेल्या लोकांनी टॅक्सीचा व्यवसाय स्वीकारला आणि वाढत्या गर्दी बरोबर टॅक्सीही वाढल्या. वडाळा, गुरू तेग बहादूर नगर म्हणजे तेव्हाचे कोळीवाडा, वरळी, गोवंडी, चेंबूर, मुंबई सेंट्रल ही जणू टॅक्सींची माहेरघरे. टॅक्सी दुरुस्ती म्हटली म्हणजे एकतर कोळीवाडा नाहीतर मोरलॅंड रोड. पसारा वाढत गेला, मुंबई विस्तारत गेली आणि चाकरमानेही वाढले, घराघरातून स्त्रिया अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आणि मध्यमवर्गीय संसारगाडीला दुसरे इंजीन लागल्यावर टॅक्सी परवडू लागली. अशीच एक दिवस भागीदारी सेवा सुरू झाली. सुरुवात कुठे झाली ते सांगणे कठिण आहे पण तेव्हाचे व्हीटी/ चर्चगेट ते कुलाबा/ नरिमन पॉइंट, दादर - पारपत्र कचेरी- लोटस, मुलुंड - अंधेरी - गोरेगाव ह्या त्या सेवा. गाडीसारखे या भागीदारी टॅक्सीचे प्रवासी गट आपोआप झाले आणि एखादा/एखादी जर एखाद्या दिवशी दिसला/दिसली नाही तर एकमेकांकडे पाहत व क्रम लागल्यावर नाईलाजाने रांगेतून येईल तो चौथा प्रवासी घेत टॅक्सीत शिरायचे. मुलुंड - अंधेरी माणशी पाच रुपये असे सुरू झाले तेव्हाचे भाडे होते आणि तरीही ते जास्त होते, लोक ३९६ च्या रांगेत विनातक्रार पाऊण एक तास उभे राहत होते. बदलत्या काळाबरोबर टॅक्सीचे हे बदलते आणि भावलेले रूप होते. याच कल्पनेने मोठी झेप घेतली आणि मुंबई/ठाणे - पुणे, दादर- नाशिक-शिर्डी, मुंबई सेंट्रल-सुरत असा लांबचा पल्ला गाठला. प्रवासी नेताना दादर पुणे टॅक्सी हमरस्त्यावर असलेल्या बजाज, थर्मॅक्स यांच्या फाटकावर टपाल वा किरकोळ सामानही नेऊ लागल्या. आणि एके दिवशी सर्वांना सुखावणारी गारेगार निळी - रुपेरी वातानुकूलित टॅक्सी आली आणि मुंबईकर सुखावले. टॅक्सीचा रुबाब होता आणि क्वाड्रोससाहेबाचा दरारा होता.