धुमसती गात्रे चितेवर, राख माझी शांत नाही

धुमसती गात्रे चितेवर, राख माझी शांत नाही
दग्ध केले वासनांनी, हा खरा देहान्त नाही

 पाहिले चाटीत जिभल्या एकवस्त्रेला परंतु
भुक्त डोळ्यांना हरीचा भावला दृष्टांत नाही

 देह जाता शोक करण्याचा जगी संकेत आहे
स्वप्न सरता, आस मरता का इथे आकांत नाही?

 जन्मता होतो सुरू अभ्यासक्रम जो जीवनाचा
ह्या महाविद्यालयी पण आमरण दीक्षान्त नाही

 भौतिकाच्या लालसेचा नक्र जेव्हा पाय धरतो
इंचही अध्यात्मरस्ता होत पादाक्रांत नाही

 पापकर्म्यांना दिली जाते म्हणे नरकात शिक्षा
सज्जनांना भूतलावर रौरवांची भ्रांत नाही

 माणसांना काय देता सोसण्याचे षंढ सल्ले?
तत्त्व नाही, ज्ञान नाही, वेदना वेदान्त नाही

 नित्य पदरांना तिच्या फेडून सौंदर्यास पाही
'भृंग', कवितेला विचक्षण वाचकाहुन कांत नाही


- मिलिंद फणसे