छोट्या मुली...

छोट्या मुली, कुठून आलीस?
मी कोण? मी एक ओलीस.

छोट्या मुली, तुझं हसणं
माझ्या डोळ्यांना, बांधून टाक.
माझं रडणं, दुःखाची वात
छोट्या मुली, पावसात टाक.

ऊन बघ, पाऊस बघ
मला एक गोष्ट, सांगून बघ.
दे मला तुझी रिबीन,
बांधून घेईन, आभाळ नवीन.

छोट्या मुली, तुझी सावली
माझ्यासाठी ठेवून जा.
शपथ, कुणाला सांगणार नाही
चांदोबा तुला हसणार नाही.

छोट्या मुली, येऊन जा...
पालवीचं औषध, देऊन जा...


- उत्पल चंदावार