भरीव गोड व तिखट आप्पे

 

 

साहित्य:

आवरण:

तांदूळ - दोन वाट्या
जाड पोहे - एक वाटी
मीठ - चवीनुसार

गोड सारण:

एका ओल्या नारळाचा चव
गूळ - एक वाटी
दूध पावडर - दोन चमचे
वेलदोडा पूड - एक चमचा

तिखट सारण:

किसलेला कोबी व गाजर - प्रत्येकी एक वाटी
भाजलेल्या दाण्याची भरड - पाव वाटी
मीठ, साखर - चवीनुसार
बारीक चिरलेल्या मिरच्या - दोन
कोथिंबीर
बेसन - दोन चमचे (वरील सगळे जिन्नस मिळून येण्यासाठी)

कृती:

गोड सारण मोदकाच्या सारणाप्रमाणे शिजवून घ्यावे. सर्व जिन्नस मिसळून तिखट सारण करून घ्यावे. तांदूळ धुऊन सहा तास भिजत ठेवावे. हे तांदूळ वाटण्यापूर्वी पंधरा मिनिटे आधी त्यात पोहे टाकावे. हे मिश्रण बारीक वाटून घेऊन आठ तास आंबवण्यासाठी ठेवून द्यावे. आप्पेपात्र शेगडीवर गरम करण्यास ठेवावे. गरम झाल्यावर त्यात साजूक तूप टाकावे. चवीनुसार मीठ टाकून पीठ हालवून घ्यावे. एक चमचा पीठ पात्रात टाकून लिंबाएवढा सारणाचा गोळा मधोमध ठेवावा. परत सारण झाकण्यासाठी एक चमचा वरून पीठ ओतावे. झाकण ठेवून शिजवून घ्यावे. तूप सोडून दुसऱ्या बाजूनेही तांबूस भाजून घ्यावे. ह्याच प्रमाणे तिखटाचे आप्पे तेलात करावे व ओल्या नारळाच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

टीप:

पीठ भज्यांच्या पिठाइतपत सैलसर असावे.


- मंजूषा लागू