सुप्त गुणांच्या शोधात
अध्यात्म माणसाला अंतर्मुख करते हे आम्हाला माहीत होते, पण हल्ली दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येणारे हे ’रिअलिटी शोज’ पण अंतर्मुख करतात हे प्रथमच जाणवले. आपण कुठल्या ’शो’ मध्ये फिट बसतो याचा आम्ही विचार करू लागलो. नाच, गाणे, अभिनय यापैकी कुठल्या गोष्टी आपल्याला येतात याचा आम्ही मनाच्या तळाशी जाऊन शोध घ्यायला सुरुवात केली. हे असे मनाच्या तळाशी जाऊन शोध घेणे म्हणजे आम्हाला उगीचच एखाद्या तळ्याच्या बुडाशी खोल खोल पाण्यात सूर मारल्यासारखे वाटू लागले होते. पोहणे येत नसल्यामुळे नाकातोंडात पाणी जाऊन गुदमरल्यासारखी अवस्था होते तशी आमची अवस्था होऊ लागली.
जगाच्या पाठीवर निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी निरनिराळे शोध लावले, पण सुप्त गुणांचा शोध ही काय भानगड आहे ते आम्हाला बरेच दिवस कळले नाही. किंबहुना असा काही शोध घ्यायचा असतो आणि तो कुणालाही घेता येतो याचीही आम्हाला आत्तापर्यंत कल्पना नव्हती. गणपतीबाप्पांच्या मेळ्यांमध्ये किंवा शाळा-कॉलेजच्या स्नेहसंमेलनात हे असले काही तरी चालत असेल अशी आपली आमची कल्पना.
बराच विचार केल्यानंतर आम्हाला असे वाटले की 'भाऊजींना' आपल्या घरी बोलवावे. पण, भाऊजींना बोलवायचे म्हणजे काही साधेसुधे काम नाही. ते भलभलते प्रश्न विचारणार! 'वहिनी, घरात शेंगदाणे कोणत्या डब्यात आहेत? ' काय सांगणार कपाळ? रोजची वस्तू इथे दहादा हुडकावी लागते. शिवाय घर अगदी चकचकीत असायला हवे. तेव्हा आपली डाळ काही तिथे शिजणार नाही. बरे आपल्याला काय कुणी असेही म्हणणार नाही की 'मनूची आई, आता डाळ शिजायला वेळ लागणार नाही बरे का! ' एवढेच काय, पण आपल्याला काही खुपते का हे सुद्धा कुणी विचारणार नाही. घरातली माणसेच काही खुपते का ते विचारणार नाहीत, तिथे दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार? या गोष्टीवर आम्ही बराच विचार केला आणि असे ठरवले की आपल्यात काय काय सुप्त गुण आहेत ते आपले आपणच शोधून काढायचे आणि एकदा का ते गुण आपल्याला कळले की मग त्याप्रमाणे पुढची पावले टाकायची.
तर अशा एका दिवशी आम्ही अंतर्मुख होऊन मनाच्या तळाशी खोल बुडी मारली, ते आम्ही थेट आमच्या चौथीच्या वर्गात पोचलो. एका खेड्यातली आमची शाळा. त्या वेळेस शाळेत स्नेहसंमेलन वगैरे काही नसायचे, पण १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम असायचे. आम्ही या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचे ठरवले आणि नागनाथराव म्हणून आमचे एक गुरुजी होते त्यांच्याकडे गेलो. ते कुणाशी तरी बोलत होते. तर आम्ही त्यांना म्हटले "गुरुजी, आम्ही एक गाणं म्हणणार आहोत, " त्यावर त्यांनी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. मग काय झाली आमची जोरदार तयारी सुरू. 'जो आवडतो सर्वाला... तोची आवडे देवाला... ' घरी, दारी, जळी (पाणी भरायला तेव्हा आम्हाला नदीवर किंवा विहिरीवर जावे लागे), स्थळी, काष्ठी, पाषाणी मनाला एकच ध्यास लागला. 'जो आवडतो सर्वाला... तोची आवडे देवाला... ' कुणी भेटेल त्याला आमचे हे गाणे ऐकावे लागे. आमच्या मातोश्रींचा जीव तर आम्ही अगदी नकोसा करून टाकला होता. त्यावेळी बायकांना घरातील कामांपुढे मुलांचे हे असले फालतू चोचले पुरवायला वेळ नसायचा. तिला वाटायचे केव्हा एकदा तो २६ जानेवारीचा दिवस येतो आणि आमचे गाणे पार पडते.
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. कार्यक्रम सुरू झाला. एक एक जण स्टेजवर येऊन आपापली कला दाखवत होता आणि इकडे आमच्या छातीत धडधडत होते. मनातल्या मनात शंभरदा गाण्याची उजळणी झाली. आपला नंबर कधी येतो याची आम्ही अधीरतेने वाट बघू लागलो आणि एकदम गुरुजींनी कार्यक्रम संपत आल्याचे जाहीर केले. आम्ही एकदम रडायलाच लागलो. वाटले, आपली एवढी मेहनत वाया गेली. शेवटी आमची एक मैत्रीण पटकन त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली की गुरुजी, हिचे गाणे म्हणायचे राहिले. हिचे नाव तुम्ही घेतलेच नाही. आमचा रडका आणि कावराबावरा चेहरा बघून त्यांनी आम्हाला परवानगी दिली. आम्ही पटकन स्टेजकडे धाव घेतली. उठायला तयार असलेल्या लोकांना गुरुजींनी बसण्याची विनंती केली आणि आमचे नाव पुकारले. रडका चेहरा घेऊन आम्ही तसेच स्टेजवर गेलो आणि आमचे गाणे सादर करायला सुरुवात केली. दोन्ही डोळ्यांना पाण्याच्या धारा लागल्या होत्या आणि आम्ही तसेच जीव तोडून गात होतो. 'जो आवडतो सर्वाला... तोची आवडे देवाला... ' गाणे बरे झाले असावे असे आम्हाला वाटले, पण देवाला आमचे गाणे आवडले नसावे. तेव्हापासून आम्ही गाण्याची धास्तीच घेतली आणि आपला महाराष्ट्र एका महान गायिकेला मुकला.
पुढच्या वर्षी काहीतरी करण्याची ऊर्मी आम्हाला गप्प बसू देईना. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आमच्या मुंबईच्या आणि नागपूरच्या आत्याची मुले यायची. शिवाय आम्ही सगळी चुलत भावंडे मिळून पंधरावीस जण असायचो. सगळी मिळून नुसता जल्लोष करायचो. नदीवर जाणे, आंब्याच्या रसाचे जेवण, पत्ते खेळणे, नाच, गाणे, पुस्तके वाचणे असे बरेच प्रकार चालायचे. मुंबईच्या आमच्या आत्तेबहिणीकडून शिकलेले नाच आम्ही शाळा सुरू झाल्यावर शाळेत करून दाखवायचो आणि भाव खायचो.
आम्ही पाचवीत होतो तेव्हा शिक्षक दिनानिमित्त शाळेत एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. विशेष म्हणजे या वेळी नागनाथराव गुरुजी नव्हे तर एक बाई कार्यक्रमाचे नियोजन करणार होत्या. आमच्या मुंबईच्या शिकलेल्या नाचाची कीर्ती बाईंपर्यंत गेली होती आणि त्यांनी आपणहून आम्हाला नाचासाठी पाचारण केले. आमच्या शाळेत त्याच वर्षी एक उत्तरा नावाची कलेक्टरची मुलगी आली होती. बाईंचे लक्ष साहजिकच तिच्याकडेच जास्त होते. त्यांनी तिचा एकटीचा एक स्वतंत्र नाच बसवला होता आणि आमचा दहाजणींचा समूहनाच. त्यातही आम्ही उंच असल्यामुळे सर्वात शेवटी. पण काहीही असले तरी आपण आपले चांगलेच नाचायचे असे आम्ही ठरवले.
शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला. कार्यक्रमाला खूप गर्दी जमली होती. शाळेसमोरच्या मोठ्या पटांगणात तो कार्यक्रम होता. आधी उत्तराचा नाच झाला. तो कसा झाला आम्हाला माहीत नाही कारण आम्ही आमच्याच नादात होतो. आमच्या समूहनृत्याची वेळ झाली, आमची सर्वांची नावे पुकारली गेली आणि बाहेर लोकांमध्ये एकदम गर्दी उसळली. काय झाले काही कळलेच नाही. कुठेतरी साप-साप असा ओरडा सुरू झाला आणि सगळे लोक इकडे तिकडे पळायला लागले. सगळीकडे गोंधळ सुरू झाला. बाई-गुरुजी सगळ्यांना 'शांत राहा' असे सांगत होते. कुणीतरी म्हणाले की तुम्ही कार्यक्रम सुरू करा, लोक शांत होतील आणि आमचा नाच सुरू झाला. तो कुणी बघितला अन कुणी नाही, काही माहीत नाही. उत्तराच्या नाचाची मात्र खूप प्रशंसा झाली. आमच्या आयुष्यातला तो स्टेजवर केलेला पहिला आणि शेवटचा नाच.
आमचे सुप्त गुणांचे उत्खनन चालूच होते. गाणे झाले, नाच झाला. आता राहिले नाटक. ती संधी पण आम्हाला मिळाली होती. आमच्या बाईंनी एक तीन अंकी नाटक बसवले होते, ज्यात एका लहान मुलीची भूमिका आम्हाला मिळाला होती. रोज नियमित सराव होत होता, नाटक छान बसले होते. रंगीत तालीमही छान झाली. आणि नाटकाचा दिवस उजाडला.
निमंत्रित पाहुण्यांना यायला उशीर झाला, त्यामुळे नाटकही उशिरा सुरू झाले. नाटक मस्त रंगले. सुरुवातीच्या अंकातले आमचे काम देखील खूप छान झाले. पण मधल्या अंकात आमचे काहीच काम नव्हते. एकदम शेवटच्या अंकात शेवटी आमची एंट्री होती. आम्ही मेकअप रूममध्ये बसलो होतो. आमच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते. रोज बघून आणि सराव करून आम्हाला ते नाटक बघायची इच्छा नव्हती. आम्ही आपले बसल्या बसल्या एक डुलकी घेऊ म्हटले आणि आम्हाला गाढ झोप लागली. त्यावेळी म्हणजे आम्ही लहान असताना रात्री लवकर झोपत असू. थोड्या वेळाने आम्ही दचकून उठलो. कुणीतरी आम्हाला धरून गदागदा हलवत होते. आमच्या एंट्रीची वेळ झाली होती. आम्ही तसेच डोळे चोळत स्टेजवर गेलो. कसाबसा आमचा प्रवेश पार पडला आणि नाटक संपले. अजूनही त्या प्रसंगाची आठवण झाली की आम्हाला कसे लाजल्यासारखे होते.