सत्यार्थप्रकाश परिचय

स्वामी दयानंद सरस्वती आणि मराठी माणूस

स्वामी दयानंदांच्या कार्याची आणि विचारांची समस्त मराठी जनांस ओळख करून देण्याची विशेष आवश्यकता आहे. याचे मुख्य कारण हे की दयानंदांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचा प्रभाव नर्मदेच्या उत्तरेकडील प्रदेशापुरताच मर्यादित आहे. मुंबईमध्ये स्थापना होऊनसुद्धा महाराष्ट्रात त्याचा प्रचार आणि प्रसार फारसा झाला नाही. अपवाद केवळ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा, जिथे हैदराबाद मुक्ती संग्रामातील आर्य समाजाच्या बहुमोल योगदानामुळे सर्वसामान्य लोक आर्य समाजाकडे आकृष्ट झाले. महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच दयानंदांविषयी उदासीनता आणि अनभिज्ञता आहे. तुलनाच करायची झाली तर स्वामी विवेकानंदांच्या रामकृष्ण मिशनच्या कार्यात मराठी माणसाचा जितका सहभाग दिसून आला आहे तितका आर्य समाजाच्या कार्यामध्ये जाणवत नाही. रामकृष्ण मिशन आणि आर्य समाज एकाच काळामध्ये उदयास आले आहेत. दयानंदांच्या विचारांचा प्रभाव मराठी माणसावर का पडला नाही हा चर्चेचा स्वतंत्र विषय होऊ शकेल. परंतु प्रस्तुत लेखाचा तो मुख्य उद्देश नाही.


ऐतिहासिक पार्श्वभूमी

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिशांनी संपूर्ण भारत देश पादाक्रांत केला. १८५७ साली भारतीयांनी या राजकीय दास्याविरुद्ध अयशस्वी पण जोरदार संघर्ष केला. त्यानंतर मात्र काही दशके ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळणार नाही अशी सर्वसामान्यांची धारणा झाली होती. परंतु या परवशतेच्या 'अंधारयुगा'ला एक रुपेरी किनार लाभली होती. ती म्हणजे त्या काळात उदयास आलेली देदीप्यमान आणि तेजस्वी नररत्नांची एक मालिका जिच्यामुळे या देशाचे सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक विश्व उजळून निघाले. राजा राममोहन रॉय, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दादाभाई नौरोजी, न्या. महादेव गोविंद रानडे, इ. महापुरुषांनी भारतीयांचे स्वत्व आणि स्वाभिमान, दोन्ही जागृत ठेवले. याच काळामध्ये 'वेदांकडे परत चला' असा नारा देणाऱ्या एका आधुनिक ऋषीचा उदय झाला, त्या ऋषीचे नाव होते स्वामी दयानंद सरस्वती. आपले अंध गुरू, मथुरेचे स्वामी विरजानंद सरस्वती यांचा आदेश शिरसावंद्य मानून त्यांनी प्राचीन वैदिक संस्कृतीच्या पुनरुत्थानासाठी संपूर्ण भारतभ्रमण केले. "वादे वादे जायते तत्त्वबोधः" या उक्तीस प्रमाण मानून शंकराचार्य - मंडनमिश्र यांच्या शास्त्रार्थपरंपरेशी नाळ जोडत त्या काळातील धर्ममार्तंडांशी हिरिरीने वादविवाद केला. जे जे वेदसंमत त्याची पुनर्स्थापना आणि जे जे वेदविरुद्ध त्याचे समूळ उच्चाटन हे त्यामागील मुख्य सूत्र होते.

दयानंदांनी वेदविचारांच्या प्रसारासाठी आर्यसमाजाची स्थापना केली. आपले वेदांविषयीचे विचार समस्त मानवजातीस समजावेत म्हणून त्यांनी विपुल ग्रंथलेखन केले. त्यामध्ये 'ऋग्वेदभाष्य', ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका’आणि आर्य समाजाचा आधारग्रंथ 'सत्यार्थप्रकाश' यांचा समावेश होतो. प्रस्तुत लेखामध्ये आपण 'सत्यार्थप्रकाश' या ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत आणि त्या निमित्ताने दयानंदांच्या विचारांचे आणि कार्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य वाचकांसमोर येईल अशी अपेक्षा आहे. परंतु असा परिचय करून देताना संपूर्ण ग्रंथाचे अवलोकन करणे हे लेखाच्या मर्यादेमुळे अशक्य आहे. त्यामुळे 'सत्यार्थप्रकाश'च्या निर्मितीमागील त्यांची नेमकी भूमिका जाणून घेणे आणि प्रचलित हिदू धर्मातील तत्त्वज्ञान, चालीरीती, श्रद्धास्थाने आणि पूजापद्धती याविषयी त्यांची मते तपासणे इतकेच आपण करणार आहोत. सनातनधर्मीयांचे आणि आर्य समाजाचे मूळ श्रद्धास्थान वेद असताना दोघांच्या धार्मिक आचारविचारांत भिन्नता का आहे हे पाहणे उद्बोधक ठरेल.


सत्यार्थप्रकाश निर्मिती मागील भूमिका

दयानंदांच्या मते महाभारतीय युद्धापूर्वी वैदिक धर्माशिवाय दुसरा कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता. हे त्यांचे प्रतिपादन भारतवर्षापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगाला लागू आहे. आर्य भारताबाहेरून आले आणि त्यांच्यात व एतद्देशीयांमध्ये काही संघर्ष झाला ह्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या आधुनिक इतिहासकारांच्या मताचे त्यांनी 'सत्यार्थप्रकाश'मध्ये खंडन केले आहे. तसेच वैदिकधर्माच्या विश्वव्यापकतेचे अनेक पुरावे दिले आहेत. महाभारतीय युद्धानंतर वेदांच्या मूळ शिकवणीचा विसर पडल्यामुळे जगामध्ये अज्ञानरूपी अंधार पसरला. त्यानंतर अनेक धर्म आणि पंथांचा उगम झाला. या सर्व धर्म आणि पंथांमध्ये अनेक वेदविरूद्ध मतांची सरमिसळ झाली. या सर्व धर्म-पंथांमधले प्रमुख म्हणजे पौराणिक मत, बौद्धमत, जैनमत, ख्रिस्ती व इस्लामी मत. दयानंद आधुनिक हिंदू धर्मास पौराणिक असे संबोधतात. या प्रमुख धर्म-पंथांच्या अनुयायांना तसेच इतरांना खऱ्या वैदिक विचारांची ओळख करून द्यावी आणि बुद्धी व विवेक भ्रष्ट करणाऱ्या थोतांडांपासून दूर न्यावे हा त्यांचा ’सत्यार्थप्रकाश’ लिहिण्यामागील मुख्य उद्देश होता.

ग्रंथनिर्मितीमागील उद्देश स्पष्ट करताना ते असेही म्हणतात की मला कोणतीही नवी शिकवण वा सिद्धांत सांगायचा नाही. तसेच कोणताही नवीन पंथ वा संप्रदाय स्थापन करून त्याचे मठाधिपती व्हायचे नाही. अनेक शतके दुर्लक्षित राहिलेल्या आणि शेकडो पंथांच्या परस्परविरोधी मतमतांतरांच्या कोलाहलामध्ये जिचा विसर समस्त मानवजातीस पडला त्या शुद्ध वेदविद्येचे स्मरण करून द्यायचे आहे.

सत्यार्थप्रकाशाचे अंतरंग

सत्यार्थप्रकाश हा ६१६ पृष्ठांचा ग्रंथराज आहे. तो मुख्यत्वेकरून खंडनमंडनात्मक आहे ज्यामध्ये शुद्ध वेदविचारांचे मंडन आणि वेदविरूद्ध मतांचे खडंन केलेले आहे. ग्रंथातील पहिल्या दहा समुल्लासांमध्ये १) ईश्वरनाम व्याख्या २) शिक्षण विचार ३) अध्ययन आणि अध्यापन ४) विवाह गृहस्थाश्रम ५) वानप्रस्थ संन्यासाश्रम ६) राजधर्म ७) ईश्वर ८) सृष्टिउत्पत्ती ९) विद्या-अविद्या, बंधन, मोक्ष १०) आचार-अनाचार व भक्ष्याभक्ष्य इ. विषयांवरील दयानंदांचे, चार वेदसंहिता आणि त्यांनी प्रमाण मानलेल्या प्राचीन ग्रंथांच्या आधारे केलेलेसखोल चिंतन आपणास वाचायला मिळते. उत्तरार्धातील समुल्लास ११ ते १४ मध्ये भारतातील अनेक पंथ आणि संप्रदाय, तसेच ख्रिस्ती आणि इस्लामी मतांचे खंडन केले आहे. 'सत्यार्थप्रकाश'मधील हा खंडनात्मक उत्तरार्ध गेल्या १५० वर्षांत अतिशय वादग्रस्त ठरला आहे. आपले हे सर्व लेखन वादग्रस्त ठरणार याची कल्पना असल्यामुळे दयानंदांनी असे म्हटले आहे की, कुणाचे मन दुखवावे अथवा नुकसान करावे असा आमचा हेतू नाही. मानवाने सत्यासत्य ओळखून सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग करावा या हेतूने हे लिखाण केलेले आहे. सत्याशिवाय मानवजातीची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती होणार नाही यावर दयानंदांची अढळ निष्ठा होती. सत्याच्या स्थापनेसाठी केवळ सत्यकथन करून भागत नाही तर असत्याचे समूळ उच्चाटन देखील अपेक्षित असते. त्यासाठी कोणतीही बोटचेपी भूमिका न घेता आणि लोकभावना दुखावतील याचा बाऊ न करता कठोरपणे त्यांनी आपली मते मांडली आहेत.


दयानंद आणि प्रचलित हिंदू धर्म

प्रचलित हिंदूधर्माविषयीची दयानंदांची मते आपण मुख्यत्वेकरून तपासणार आहोत. तत्त्वज्ञानाची तुलना करायची झाली तर एकाच मुख्य मुद्द्यावर प्रचलित हिंदू धर्म आणि आर्य समाज यांचे संपूर्ण एकमत आहे. तो म्हणजे कर्मविपाक व पुनर्जन्माचा सिद्धांत आणि आस्तिकता. बाकी सर्व बाबतीत किरकोळ वा तीव्र मनभिन्नता आहे अथवा परस्परविरोधी मते आहेत. दोघेही वेदप्रामाण्य मानत असले तरी वेद म्हणजे काय याबाबत मतभेद आहेत. दुसरे असे की दयानंद केवळ वेदांना स्वप्रमाण मानतात, तर प्रचलित हिंदू धर्म श्रुतिस्मृतिपुराणोक्त आहे. दयानंदांनी पुराणांचे प्रामाण्य संपूर्णपणे नाकारले आहे. स्मृतिप्रामाण्य त्यांच्या मते वेदांवर अवलंबून आहे. श्रुतिप्रामाण्य ते मानतात. परंतु दयानंदांच्या मते श्रुती किंवा वेद म्हणजे संहिता ग्रंथ. ब्राह्मण आणि उपनिषदांना ते श्रुती मानत नाहीत, तर ऋषिप्रणितग्रंथ मानतात. वेदांचे कर्मकांडात्मक आणि ज्ञानकांडात्मक असे जे भेद केले जातात ते दयानंदांना अमान्य आहेत. आज देखील हिंदू अध्यात्माचे चिंतन हे केवळ 'प्रस्थानत्रयी' म्हणजे उपनिषदे, वेदांतसूत्रे आणि भगवद्गीता यांच्या आधारे केले जाते आणि संहिता ग्रंथाकडे दुर्लक्ष केले जाते हे दयानंदांना अमान्य आहे. वेदपाठशाळेमध्ये अर्थ न समजता वेदसंहितांची घोकंपट्टी करून पठण करणे हे योग्य नाही, तर प्रत्येक वैदिक मंत्राचा आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही अंगांनी अर्थ जाणणे आवश्यक आहे असे त्यांना वाटते.

दयानंदांना शंकराचार्यप्रणित अद्वैतवाद मान्य नाही. परमेश्वर, जीव आणि प्रकृती या तिघांना ते अनादी व स्वतंत्र मानतात. ‘प्रज्ञानम ब्रह्म’, ‘अहं ब्रह्मास्मी’, ‘तत्त्वमसी‘ आणि ‘अयमात्मा ब्रह्म‘ या चार महावाक्यांच्या आधारे केले जाणारे अद्वैतवादाचे समर्थन त्यांनी नाकारले आहे. प्रत्येक हिंदुधर्मीयाचे जन्ममरणाच्या चक्रातून सुटका करून घेऊन मोक्षप्राप्ती करणे हे परमोच्च ध्येय मानले गेले आहे. याबाबत दयानंदांचे विचार भिन्न आहेत. मोक्षप्राप्तीनंतर देखील जीव ब्रह्मामध्ये संपूर्णपणे विलीन होत नाही आणि तो स्वतंत्रपणे व्याप्य-व्यापक संबंधाने ईश्वरामध्ये वास करीत असतो असे ते म्हणतात. दयानंदांच्या मते जीवाला जन्ममरणातून कायमची मुक्ती मिळत नाही. मुक्त जीव हा सततच्या जन्ममरणाच्या चक्रातून सुटला तरी एका महाकल्पापर्यंत मुक्तावस्थेत राहिल्यानंतर मात्र असे जीव पुन्हा जगामध्ये परत येतात.

"यदा यदा हि धर्मस्य" हे गीतावचन दयानंदांना अमान्य आहे. ते ईश्वराच्या अवतारवादाचे खंडन करतात. त्यांच्यामते श्रीराम आणि श्रीकृष्ण हे महान धर्मात्मे होते ज्यांनी सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन केले. परंतु त्यांना अवतार समजणे वेदांविरुद्ध आहे. त्यांच्या मते भक्तजनांच्या उद्धारासाठी वा दुष्टांच्या नाशासाठी परमेश्वराला मानवी देहामध्ये अवतारित व्हावे लागते असे समजणे वेदविरुद्ध आहेआणिहा त्यासर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वसामर्थ्यवान परमेश्वराचा उपमर्द आहे.

दयानंदांचा मूर्तिपूजेला असलेला विरोध सर्वपरिचित आहे. सर्वसामान्य जन निर्गुण निराकार परमेश्वरावर आपले ध्यान केंद्रित करू शकणार नाहीत. आध्यात्मिक प्रगतीच्या प्राथमिक अवस्थेत त्यांना त्यासाठी कोणत्या तरी मूर्तीची वा प्रतिमेची आवश्यकता असते या मताचे त्यांनी जोरदार खंडन केले आहे. तीर्थक्षेत्री गेल्याने वा पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते हे त्यांना अमान्य आहे. तसेच ईश्वर आपल्या भक्तांच्या पापांना क्षमा करतो की नाही? असे विचारले असता त्यांचे उत्तर ’नाही’ असे आहे. "जर परमेश्वर पापांना क्षमा करील तर त्याचा न्याय नाश पावेल आणि सर्व मानवजात महापापी होईल" असे त्यांचे म्हणणे आहे.

तीर्थमाहात्म्यासोबत नाममाहात्म्य देखील त्यांनी नाकारले आहे. केवळ यांत्रिकपणे परमेश्वराचे नाव उच्चारत राहिल्याने पापक्षालन होत नाही वा पुण्यप्राप्ती होत नाही तर परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आपले गुणकर्मस्वभाव बनविण्याची धडपड करणे हेच परमेश्वराचे खरे नामस्मरण होय असे ते मानतात.

दयानंदांच्या मते 'गरुडपुराण' साफ खोटे आहे. त्यामुळे श्राद्ध, तर्पण, पिंडदान यांचे त्यांच्यामते काहीही औचित्य नाही. त्यांनी फलज्योतिषाला तीव्र विरोध केला कारण त्यांच्यामते नवग्रहांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही.

वैदिक धर्म हा वर्णाश्रमप्रधान आहे. दयानंद चार आश्रम मानतात. परंतु वर्ण हे जन्माधिष्ठित नसून कर्माधिष्ठित आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. अस्पृश्यता त्यांनी नाकारली आणि स्त्री-शूद्रांचा वेदाध्ययन अधिकार मान्य केला.

उपसंहार

ज्या एका ग्रंथाने एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताचे सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण

ढवळून काढले, तो म्हणजे दयानंदांचा एकमेवाद्वितीय असा सत्यार्थप्रकाश होय. स्वातंत्र्यपूर्व काळात सिंध प्रांतामध्ये या ग्रंथावर बंदी घालण्यात आली होती. तसेच स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देखील धर्मवेड्या मुस्लिमांकडून याच्यावर बंदी आणण्याचे निष्फळ प्रयत्न झाले. स्वातंत्र्यलढ्यातील अनेक योद्ध्यांना या ग्रंथाने स्फूर्ती दिली. वेदांवरील निष्ठा अढळ ठेवून आधुनिक काळास अनुरूप अशी वैदिक संस्कृतीची पुनर्घटना करण्याचे कार्य या ग्रंथाने केले. धर्मविचारांकडे परंपरागत 'बाबावाक्यम प्रमाणम’ ह्या पद्धतीने न बघता त्यांची तार्किक चिकित्सा करण्याची नवी दृष्टी आपणा सर्वांस दिली. सर्व पंथांतील धर्ममार्तंडांना त्यांच्या श्रद्धांची नव्याने उजळणी आणि पुनर्मांडणी करण्यास भाग पाडले. परंतु या सर्वांपलीकडे, सत्यार्थप्रकाशाची खरी कामगिरी म्हणजे ह्या ग्रंथाने वेदांची आधुनिक विचारवंताकडून होत असलेली हेळसांड आणि विटंबना रोखली.

दयानंदांच्या वेदभाष्यावर टिप्पणी करताना योगी अरविंद म्हणतात,

"In the matter of Vedic interpretation, I am convinced that whatever may be final interpretation, Dayanand will be honoured as the first discoverer of the right clues. "


- हरीश कृष्ण देशपांडे