पुडाच्या वड्या
साहित्य :
३ वाट्या बेसन + १ वाटी मैदा
२ मोठ्या जुड्या कोथिंबीर
सुक्या खोबऱ्याच्या २ वाट्यांचा कीस
आले-लसूण पेस्ट - पाऊण वाटी
खसखस-तीळ - अर्धी वाटी
धणे पूड - ४ चमचे
गरम मसाला - १ चमचा
काळा मसाला - १ चमचा
लाल तिखट - ६ चमचे (आवडीनुसार कमी-जास्त)
मीठ चवीप्रमाणे
लिंबाचा रस - २ चमचे
तळण्यासाठी तेल
कृती :
बेसन व मैदा एकत्र करून चवीपुरते मीठ, १ चमचा तिखट व मोहन (गरम तेल) घालून घट्ट पीठ मळावे व २ तास ठेवावे. वड्या करताना पीठ थोडे कुटून घ्यावे किंवा तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे म्हणजे ते मऊ होईल व चांगले लाटले जाईल. कोथिंबीर स्वच्छ धुऊन कागदावर पसरावी व कोरडी झाल्यावर तळून घ्यावी. तळल्यानंतर पुन्हा कागदावर पसरून ठेवावी म्हणजे तेलकटपणा कमी होईल. सुक्या खोबऱ्याच्या २ वाट्यांचा कीस मंद आचेवर भाजून घ्यावा. आले-लसूण बारीक कुटून (शक्यतो मिक्सरमध्ये वाटू नये) तेलावर परतून घ्यावे. तीळ-खसखस भाजून भरड वाटावे. खोबऱ्याचा कीस, आले लसूण, तीळ-खसखस, ५ चमचे लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड व मीठ एकत्र करावे व हाताने चांगले मिसळून घ्यावे. तळलेली कोथिंबीर चुरून घ्यावी. जितका इतर मसाला असेल तितकीच तळलेली कोथिंबीर असावी. कोथिंबीर व मसाला चांगला मिसळावा. वड्या करायला घेताना मसाल्यात थोडे लिंबू पिळावे.
पिठाचा भाकरीच्या गोळ्याएवढा गोळा घेऊन मैद्यात घोळवून मोठी थोडी लंबगोलाकार पोळी लाटावी. पोळपाटावर ती आडवी ठेवावी. वाटीत थोडे पाणी घेऊन त्यात काळा मसाला कालवावा व ती पेस्ट पोळीला लावावी. त्यावर वरील मसाला हाताने सारखा पसरावा. पोळीच्या कडा चारी बाजूने मसाल्यावर थोड्या थोड्या दुमडून घ्याव्यात. असे केल्याने पोळीचा आकार लांबट चौकोनी होतो. त्यानंतर दोन्ही बाजूने घड्या घालत पोळीची चपटी गुंडाळी करावी. गुंडाळी चिकटू नये म्हणून पोळपाटाला थोडा मैदा लावावा. हाताने दाबून गुंडाळी आणखी चपटी करावी. सुरीने त्याच्या शंकरपाळ्यासारख्या पण थोड्या मोठ्या आकाराच्या वड्या कापाव्यात. त्या हाताने दाबून कडेने तोंडे बंद करावीत. म्हणजे सारण बाहेर येणार नाही. वड्या मोदकपात्रात ठेवून वाफवून घ्याव्यात व थंड झाल्यावर हव्या तेवढ्याच वड्या तळून घ्याव्यात. बाकीच्या वड्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवाव्यात व हव्या असतील तेव्हा काढून तळाव्यात. म्हणजे ताज्या, गरमागरम पुडाच्या वड्या खायला मिळतील
टीपा :
१. हा पदार्थ झणझणीतच चांगला लागतो. तरीही तिखट व गरम मसाला आवडीप्रमाणे कमी-जास्त करावा.
२. वरील साहित्यात साधारण २५ पुडाच्या वड्या तयार होतात.
-छाया राजे