खेड्यामधले घर कौलारू!

क्लेम्सनमधल्या कॉलेज ऍव्हेन्युच्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये संध्याकाळच्या सुमारास आम्ही राहायला आलो. स्टुडिओ अपार्टमेंट म्हणजे सर्व सुखसोयीने सज्ज असलेली फक्त एकच खोली! त्या खोलीमध्ये आमच्या मोठाल्या बॅगा व काही सामान ठेवले आणि तिथेच असलेल्या एका खुर्चीवर बसल्या बसल्या संसाराला लागणारे सर्व सामान एकाच खोलीत कसे काय लावायचे याचा विचार डोक्यात चालू झाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि त्या खोलीत चौफेर नजर फिरवली. सुरुवाततर करू म्हणजे आपोआप सुचेल असा विचार करत कामाला लागले. सर्वात प्रथम नव्या कोऱ्या गादीवर नवी कोरी चादर अंथरली व बेडरूम तयार केली. उशांना अभ्रे घातले. या चादर व अभ्र्यांचे उद्घाटन या स्टुडिओमध्ये होणार होते तर! या नव्या कोऱ्या गादीचा योगही आमच्याकडेच होता. क्लेम्सनमध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा एका भारतीय कुटुंबाकडे आठ दिवस राहिलो होतो. त्या मैत्रिणीचे घर मोठे होते. त्या जागेत आधीचा राहणारा कुणीतरी ही आकाशी रंगाची गादी अशीच सोडून गेला होता. ती मैत्रीण म्हणाली, "ही गादी आम्ही वापरत नाही तर तुम्ही घेऊन जा. चांगली आहे. तुम्हाला नवीन घरात उपयोगी पडेल. " गादी नवीकोरी दिसत होती म्हणून घेऊन आलो. त्याचप्रमाणे या स्टुडिओमध्ये एक खुर्ची अशीच कोणीतरी सोडून गेले होते. विद्यापीठात फर्निचर असेच फिरत असते. एक तर कोणी विकत घेत नाही, घेतले तर मित्रमैत्रिणींना फर्निचर देऊन जातात. ते बरोबर घेऊन जाण्यासाठीचा खर्च इथे जास्त असतो. तेव्हा बसायला खुर्ची आणि झोपण्यासाठी गादी तयार झाली.

आमच्याकडे पहिलावाहिला खरेदी केलेला जो टेलिव्हिजन होता तो ठेवण्याकरता स्टूलवजा काहीतरी घ्यायला हवे होते. काय घ्यावे आणि कोणत्या दुकानात जावे ते ठरवून तिसऱ्या दिवशी दुकानात जायला बाहेर पडले. त्या दिवशी अगदी मनासारखी खरेदी झाली. एक छोटा लाकडी टीपॉय घेतला आणि प्लॅस्टिकचे तीन ड्रॉअर असलेला कपाटवजा स्टँड घेतला. टीपॉयवर एक अभ्रा अंथरला आणि त्यावर आमचा १३ इंची टिल्लू टीव्ही ठेवला. त्या टीपॉयच्या खाली एक कप्पा होता, तिथे आमचा व्हिसीआर ठेवला व त्यावरती सिनेमांच्या कॅसेटी ठेवल्या. टीव्हीच्या आजूबाजूला रिकामी असलेली जागा ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांसाठी निश्चितकेली. टीव्ही विराजमान झाल्यावर त्या खोलीला थोडे रूप आले. त्या खोलीत जी खुर्ची होती तिचे पाय अर्धगोलाकार होते त्यामुळे ही खुर्ची खूपच आरामदायी होती. ज्याला झोपून टीव्ही बघायचा आहे तो गादीवर आडवा व्हायचा व ज्याला बसून टीव्ही बघायचा आहे तो खुर्चीवर बसायचा आणि हो, मला टीव्ही नसलेल्या स्वयंपाकघरातूनही बघता यायचा बरं का! पोळी भाजी करताना मागे वळून मी टीव्ही वर काय चालू आहे ते पाहत असे. "वन बीएचके इन वन रूम" साकार होत होते. भारतामध्ये काही जणांचे एका खोलीतले संसार पाहिले होते आणि ते नीटनेटके होते. आमची एका खोलीत संसार करण्याची ही पहिलीच वेळ होती. नवीन अनुभव होता. प्लॅस्टिकचा कपाटासारखा दिसणारा स्टँड आवडला म्हणून आणला पण याचे काय करायचे, काय ठेवायचे यामध्ये, काही सुचत नव्हते आणि एकदा अशीच गादीवर आडवी पडलेली असताना एकदम सुचले. चटदिशी उठले आणि जे सुचले होते ते लगेच करूनही टाकले. त्या प्लॅस्टिकच्या छोट्या कपाटात पहिल्या कप्यात मी महत्त्वाची बिले ठेवण्याकरता जागा केली. दुसऱ्यात नेलकटर, स्टेप्लर, कात्री, पट्टी, पत्रावर चिकटवण्याचे स्टँप असे सर्व काही ठेवले. सर्वात खालच्या कप्यात भारतातून आणलेल्या जुन्या हिंदी गाण्यांच्या कॅसेट ठेवल्या. सर्वात वरती भारतातून आणलेले छोटे घड्याळ ठेवले आणि शिवाय फोनही ठेवला. या छोट्या कपाटाची जागा मी टीपॉयच्या बाजूला केली व त्याच्या बाजूला आमचा बेड. सकाळी उठताना घड्याळात किती वाजले हे सहज दिसायचे. त्या स्टँडचा रंग निळा होता. त्याचे मी मनातल्या मनात खूप कौतुक केले. ध्यानीमनी नसताना आवडले आणि घेतले, आणि त्याचा इतका छान उपयोग होत आहे ते पाहून खूप आनंद झाला.

या जागेत मला सर्वात जे काही आवडले असेल ते म्हणजे या खोलीचे दार आणि या दाराला लागूनच असलेले दुसरे जाळीचे दार! या जाळीच्या दाराला एक मोठा आडवा हूक होता तो मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूला छोट्या गोल हुकामध्ये अडकवला की मुख्य दार सताड उघडे ठेवले तरी चालायचे. जागेत हवा यायला हेच दार होते. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद होती. मी अनेकदा हवा खेळती राहण्यासाठी हे दार उघडे ठेवायचे व जाळीच्या दारातून समोर असलेली हिरवळ बघायचे. याच जाळीच्या दारातून रपारप पडणाऱ्या पावसाकडे बघायला मला खूप छान वाटायचे. या घराच्या दरवाज्याला लागूनच एक ओसरी होती. पाऊस पडताना ओसरीच्या बाहेर पावसाच्या पागोळ्या पडायच्या. ओसरीवर उभे राहिले की अगदी कोकणातले वातावरण तयार व्हायचे. सर्व बाजूंनी हिरवीगार झाडी, ओसरी, मुसळधार पाऊस, पाऊस पडत असताना छतावरचे पाणी ओघळून बनलेल्या असंख्य पागोळ्यांकडे बघत बसावेसे वाटायचे. काही वेळेला पावसाचा अधिक आनंद लुटण्यासाठी आले घातलेल्या गरम चहाचा कप हातात असायचा. मन आपोआप गाणे गुणगुणायचे - खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू! या खोलीच्या एका भिंतीला एक भली मोठी खिडकी होती. पूर्ण काच असलेल्या खिडकीला जाळ्या होत्या व काचेची सरकती दारे होती. या सरकत्या दारातून हवा येण्यासाठी मी खिडकी काही वेळा अर्धी उघडी ठेवायचे. या खिडकीला पडदे मी घरीच शिवले. दुकानातून नाजूक फुले असलेले कापड आणले व सुई-दोऱ्याने टिपा घालून छान पडदे शिवले. दुपारचे जेवण झाले की गादीवर बसून मी काही वेळा काहीतरी लिहीत बसले की मधूनच नजर खिडकीबाहेरच्या उंच व काटकुळ्या झाडांकडे जायची. लिहायचा कंटाळा आला की पडदे लावून अंधार करून थोडा वेळ आडवी व्हायचे. थोडी डुलकी लागायची. झोपताना जाळीचे दार लावून मुख्य दार थोडे किलकिले करून ठेवायचे. बाहेरून कोणी आले की दरवाज्यावरची बेल वाजवायचे. जेव्हा उठून दार उघडायला जायचे तेव्हा मैत्रीण आलेली असायची व हळू आवाजात विचारायची "सो रहे थे क्या? ". काही वेळेला मैत्रिणीला बोलावून घ्यायचे व आम्ही दोघी पडदे लावून अंधार करायचो. बाहेरचा प्रकाश अंधुक होऊन घरात पसरायचा व व्हिसीआरवर एखादा हिंदी चित्रपट बघायचो. जणू काही थिएटर मध्ये चित्रपट बघत आहोत असेच भासायचे. तो बघून झाला की आम्ही दोघी मिळून चहा प्यायचो. ती बरेच वेळा काहीतरी खायला आणायची.

या चौकोनी घराला स्वयंपाकघर असे नव्हतेच. एका भिंतीला लागून एक ओटा, त्यातच इलेक्ट्रिकच्या शेगड्या, आणि भांडी धुण्याकरता एक भले मोठे सिंक होते. इलेक्ट्रिक शेगडीच्या खाली ओव्हन, ज्यामध्ये मी भांडी एकात एक घालून ठेवली होती. ओट्याला लागून जे ड्रॉवर होते तिथे भांडी, वाट्या, झारे, कालथे, सुऱ्या ठेवल्या. त्या ओट्याशेजारी फ्रीज आणि त्याला लागूनच बंद एक छोटी खोली ज्यामध्ये बाथ-टब वगैरे होते. स्वयंपाकघराच्या वरच्या दोन फळकुटांवर काही डबे, बरण्या व जास्तीचे तेल साखर ठेवली. चहा साखरेचे डबे ओट्यावरच ठेवले. भांडी घासायला जे सिंक होते त्यात भांडी जमा झाली रे झाली की लगेच घासून पुसून ठेवायला लागायची. ओट्यावरच जुनी चादर घालून घासून विसळलेली भांडी उपडी घालायचे. उपडी घातल्याने भांडी लगेचच कोरडी व्हायची व ती परत जागेवर ठेवायला लागायची. पसारा घालण्यासाठी अजिबात वाव नव्हता. घराच्या चार भिंतींच्या कडेने एकेक खोली तयार झाली. सुरवातीच्या भिंतीला प्रवेशाचे दार आणि खिडकी. समोरच स्वयंपाकघर. आता उरलेल्या समोरासमोरच्या दोन भिंतींमध्ये एकाला तर लागूनच गादी होती आणि उरलेल्या भिंतीला जे अनेकविध खोलगट कप्पे होते त्यात बाकीचा संसार मावायचा होता.

हे कप्पे तीन भागांमध्ये बसवले होते. डाव्याउजव्या बाजूचे जे भाग होते त्यांना दारे होती, म्हणजे आत जे काही ठेवले असेल ते दिसायचे नाही. उजव्या बाजूला जो भाग होता तो तर चक्क कपाटासारखाच होता, त्यामुळे त्यात सर्वच्या सर्व कपडे राहणारच होते. तिथे हँगर ठेवायला एक दांडा होता. त्यावर नेहमी वापरातले कपडे हँगरला लटकवले. आणि त्या खाली जी रिकामी जागा होती तिथे आमची भली मोठी बॅग ठेवली. ज्याप्रमाणे ऋतू बदलतील त्यानुसार योग्य ते कपडे बाहेर काढून हँगरला लटकवायचे व बाकीचे अनावश्यक कपडे बॅगेत ठेवायचे. बाजूला असणाऱ्या जागेत जास्तीची पांघरुणे, रग व चादरी ठेवल्या. सर्वात वरच्या कप्प्यात टिशू पेपर, पेपर टॉवेल असे ठेवले. खाली एका कडेला व्हॅक्युम क्लीनर ठेवला.

डाव्या बाजूच्या भागात जे कप्पे होते त्यात उरलेल्या दोन बॅगा ठेवून सर्वात खालचा कप्पा बूट, चपला ठेवण्यासाठी केला. मधला एक कप्पा रिकामा होता तोही पुढे उपयोगात आला. संसाराला लागणाऱ्या सर्व गोष्टी एकेक करत मांडत गेले आणि माझी मीच थक्क झाले. एवढे सर्व सामान लागून सुद्धा मधली चौकोनी जागा घरातल्या घरात फेऱ्या मारायला रिकामी होती. त्या भिंतीत आता उरला होता तो मधला भाग! हा भाग स्वयंपाकघरात रांधा-वाढा यासाठी लागणाऱ्या किराणामालासाठी लागणार होता. खूप नाही तरी दोन तीन महिने पुरेल इतके सामान आणायला झाले होते. आमच्यासारखीच दोन तीन भारतीय कुटुंबे या स्टुडिओ अपार्टमेंट संकुलामध्ये राहत होती. आम्ही तिघी मैत्रिणी एकमेकींकडे जायचो तेव्हा एकमेकींच्या खोल्यांचे कौतुक करायचो. प्रत्येकीची मांडणी वेगवेगळी. त्यातल्या त्यात खोलीची केलेली सजावटही छान होती. त्यातल्या एका मैत्रिणीने मला विचारले की "आपण दोघी मिळून ऑनलाईन भारतीय किराणामाल आणायचा का? ". लगेच किराणामालाची एक यादी बनवली. ऑनलाईन किराणा मागवल्याने आमचा फायदा झाला. एक म्हणजे सामान घरपोच आले आणि दुसरे म्हणजे ज्या खोक्यातून सामान आले ती खूप उपयुक्त ठरली. उरलेला मधला कप्पा जो रिकामा होता त्यात सर्व कसे बसवायचे याचा विचार सुरू झाला. स्टुडिओ अपार्टमेंटमधला हा नवीन अनुभव खूप छान वाटत होता. असे वाटत होते की आपण जितकी जागा वापरू तितकी ती आपल्याला कमीच पडते!