चारोळ्या
क. : विदेश (विजयकुमार देशपांडे)
१) बिचारे फूल
सकाळी फुलाशी गुलुगुलू बोलून
फुलपाखरू भुर्र उडून गेले -
दिवसभर त्याची वाट बघून
फूल शेवटी झोपी गेले!
२) साक्ष
मी पुन्हा भेटणार नाही
तू खुशाल म्हणत राहा -
वाटेवर ठिबकणाऱ्या अश्रूंची
साक्ष तेवढी घेत राहा!
३) पाऊस
कितीदा ऐकवशील तू मला
"पावसात भिजायची हौस मला"-
तू नसताना, माझ्या आसवांचा
कसा दिसणार पाऊस तुला!
- विदेश (विजयकुमार देशपांडे)