बाप रे बाप

डाळतांदळाची खिचडी, ताकाची कढी आणि जोडीला पापड किंवा सांडगी मिरची हे माझे संकष्टीचा उपास सोडतानाचे आवडते जेवण. आद्यगुरू, आद्यदैवत तसे आद्यखाद्य म्हणा हवे तर! त्यातून बायकोचा मंगळवारचा उपास असल्याने 'त्या दिवशीही रात्री जेवायला हेच करू', असा स्वार्थी बेत लग्न झाल्यापासूनच केलेला! गेल्या वर्षीच्या डिसेंबरामधल्या एका छान मंगळवारी संध्याकाळी बायकोला वाचनालयातून परत घेऊन येताना 'पापड आहेत ना गं घरी' म्हणून विचारणा केली आणि जे उत्तर आले, ते ऐकून जी 'कढी पातळ' झाली, ती अवस्था आज आठवली, तर हसू आल्याशिवाय राहवत नाही. हिला त्या दिवशी चक्क भेळपुरी, शेवपुरी, खस्ता कचोरी वगैरे खायची इच्छा! आणि इतकी तीव्र की काकुळतीला येऊन 'चाट खायला जाऊया ना', अशा लाडिक विनवण्या! गणपतीबाप्पावरचे निस्सीम प्रेम इतक्या आडवळणाने आधी कधी गेले नव्हते. खरे तर मला तेव्हाच काय ते कळायला हवे होते; पण प्रेम, संसार, लग्न, मुलेबाळे या विषयांमध्ये मुलींना जास्त कळते, या नियमावर अस्मादिकांचा दृढ विश्वास! आणि (कधी नव्हे तो) बायको लाडात आली आहे हे पाहिल्यावरसुद्धा न विरघळणारा नवरा या व्यक्तिरेखेशी फटकून वागणारा स्थितप्रज्ञ मी नाही. पक्षी खिचडी-कढीच्या नैवेद्यावर (तो दाखवायच्याही आधीच) पाणी सोडून चाट हाणले आणि नेहमीची किराणा मालाची खरेदी करायला दुकानात शिरलो. तिकडे हिने 'होम प्रेग्नन्सी टेस्ट किट' घेतले रे घेतले आणि तिकडून पुढे जे काही झाले, ते - आयुष्यातला सुंदर अपघात, हसीन खता, सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा इतिहास काही म्हणा - तुम्हां जाणकारांच्या लक्षात आले असेलच!

सगळ्यात पहिल्यांदा भारतात दोन्हीकडच्या आई-बाबांना 'बातमी' सांगून झाली; 'होम प्रेग्नन्सी टेस्ट' च्या निकालाची छायाचित्रे काढून पाठवली. त्या अनुभवी मंडळींची खात्री पटून त्यांनाही एकंदर परिस्थितीचा अंदाज आल्यावर, त्यांनी त्यांचा आनंदोत्सव साजरा केला आणि त्याच वेळी 'कशाला नको तिकडे परदेशात जाऊन बसलात, आता बास; या परत'चा गजरही झाला. काही हितशत्रूंकडून 'अरे वा, बाळ अमेरिकन होणार म्हणजे तुमचे'(!! )चे आहेरही मिळाले; पण असा आहेर मिळणारे आपण पहिलेच आणि एकमेव नाही, हे माहीत असल्याने तिकडे फारसे लक्ष दिले नाही. किंबहुना तितका वेळ सुद्धा नव्हता. कचेरीतली नियमित कामे, डॉक्टरांकडे तपासणीसाठी वाऱ्या, बायकोच्या तब्येतीकडे नि अभ्यासाकडे डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे, तिला वेळेवर चांगलेचुंगले खायलाप्यायला घालणे आणि 'डोहाळे पुरवणे' याअंतर्गत जे जे काही करायला पाहिजे, ते ते सगळे करणे यातच दिवस कसे जाऊ लागले, कळलेही नाही. 'दिवस जाणे' म्हणजे काय हे 'भावी आई'च्या भूमिकेतून ती आणि भावी पित्याच्या भूमिकेतून मी अनुभवत होतो. कलेकलेने वाढणाऱ्या चंद्रासारखा इंचाइंचाने वाढणारा हिच्या पोटाचा घेर, दर आठवड्याला त्याचे मोजमाप नि काढलेले फोटो, ते घेऊन स्त्रीरोग नि प्रसूतीतज्ज्ञाशी चर्चा, ठरवून दिलेले खास व्यायाम नि योगासने, इमानेइतबारे पुरवलेले डोहाळे आणि या सगळ्यातला माझा सक्रिय सहभाग हा माझ्या आयुष्यातल्या गेल्या दहा-एक महिन्यांचा सारांश म्हणता येईल.

अमेरिकन समाज भारतीय समाजाच्या तुलनेत तसा पुरोगामी. त्यामुळे गर्भलिंगनिदान चाचणी येथे कायद्याने संमत आणि 'बाप होणे' या प्रक्रियेतला महत्त्वाचा मुद्दा. अर्थात होणाऱ्या बाळाचे लिंग तुम्हाला माहीत करून घ्यायचे आहे की नाही ही निवड तुमची. आमच्याकडे मला ते जाणून घ्यायचे होते पण हिला नाही. तशीही हिने 'मैं तुम्हारे बच्चे की मां बननेवाली हूं", असे माझ्या शर्टाच्या बटणाशी खेळत वगैरे सांगितले नव्हतेच. त्यामुळे बच्चा की बच्ची ही उत्सुकता मला होतीच. पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे भविष्यकाळात सोफ्यावर पडून चहा-भजीच्या जोडीने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना बघायचे, गाडी चालवताना इतर कोणाशी झालेली बाचाबाची 'बा चा', 'बा ची' वर आली तरी तिची तमा न बाळगता मनातल्या सात्त्विक संतापाला तोंडाने वाट मोकळी करून द्यायचे, दाढी करायचा कंटाळा वाटून घ्यायचे पण त्याच वेळी गरज पडलीच तर "तुला फ्रेंच चांगली नाही दिसत; गोटी ठेव" असे हक्काने सांगायचे सुख आयुष्यात लिहिले आहे की नाही, हे जाणून घ्यायचे होते. तसे सुख वाढलेले नसते, तर किमानपक्षी घरात कोणा रणबीर, सलमान, हृतिकची किती पोस्टर्स लागणार आहेत किंवा झालेच तर ध्यानीमनी नसताना कधी संध्याकाळी "मैं आप की बेटी का हाथ मांगने आया हूं" म्हणून पायाखालची जमीन सरकवणाऱ्या उपटसुंभाचे स्वागत कसे करायचे, कोपरभर लांबीची असल्यापासून जिचे डायपर बदलण्यात, अभ्यास घेण्यात आयुष्य वेचले तिला 'दिल्या घरी तू सुखी राहा' सांगताना स्वत:चा गदगदलेला स्वर कसा काबूत ठेवायचा, हे आणि इतर सगळे बेत करायला लागणार आहेत की नाही, हे जाणून घ्यायचे होते. हिच्यासाठी मात्र 'शेवटच्या क्षणापर्यंत 'सरप्राईज' ठेवायचे आहे आणि तो आनंद अनुभवायचा, ते मातृत्व अनुभवायचे आहे', यापलीकडे काही गाडी सरकत नव्हती. हो नाही करताकरता, हिच्या विरोधाला न जुमानता मी बाळाचे लिंग माहीत करून घेतले खरे; पण ते सुद्धा हिच्यासह इतर कोणालाही ते अपघातानेही कळू देणार नाही, या बोलीवर! अर्थात लग्नवेदीवर घेतलेल्या असंख्य आणाभाकांप्रमाणे मी याही वचनाला जागलो - डोहाळजेवणावेळी हिने बर्फी काढली की पेढा, अंगठी काढली की पैसा, यावरून चेहऱ्यावरचा एकही भाव तसूभरही न बदलता! - हे वेगळे सांगायलाच नको.

बाळाच्या आगमनाचे दिवस जवळ येऊ लागले तसे माझे कमी होणारे वजन नि दिवसाचे तास, आणि वाढत असलेली करावयाची कामे आणि रक्तदाब यांच्याशी एकाकी झुंज देत, सासू-सासऱ्यांच्या आगमनाची तयारी करत, ते इकडे आल्यावर डिंकाचे नि मेथीचे लाडू, बाळंतकाढा नि इतर घरगुती औषधे यासाठी लागणारे साहित्य, बाळाला पहिल्या चार-एक महिन्यांत लागणारे कपडे, लंगोट, गोधड्या, दुधाच्या बाटल्या वगैरे जामानिम्याची व्यवस्था करण्यात दिवस जाऊ लागले आणि सगळे काही आलबेल असताना एका मंगळवारी, दिलेल्या वेळेच्या बारा दिवस आधीच आमच्या बाळाने आईच्या पोटात टकटक केले!! घरी येऊन, जेवून परत कचेरीत निघालेल्या माझ्या फोनवर ही टकटक झाल्याचा भोंगा वाजवण्यात आला आणि मग मी, येणारे बाळ, त्याची मम्मी आणि त्याच्या मम्मीचे मम्मा-पप्पा, जोडीला कंगव्यापासून ते तात्काळ जोडता येणाऱ्या बाबागाडीपर्यंत सगळे सामान असणारी मोठी सूटकेस असा सगळा लवाजमा घेऊन लांबच्या प्रवासाला निघाल्यागत इस्पितळात दाखल झालो. त्या क्षणापासून जवळजवळ सत्तावीस तासांच्या प्रतीक्षेनंतर आमचे पुत्ररत्न पदरात पडले! त्याच्या पहिल्यावहिल्या दर्शनाने कृतकृत्य झाल्याचे, मागच्या नऊ महिन्यांचे त्याच्या आईबापाचे परिश्रम सुफळ संपूर्ण झाल्याचे नि जीवन सार्थक झाल्याचे समाधान देणारे भाव मनात उमटले खरे; पण चिरंजीवांच्या खणखणीत रडण्याने भानावर आलो आणि पुढच्या सततच्या प्रवासाची, पितृत्वाच्या हमालीची ही केवळ नांदी आहे, याची जाणीव झाली. सासरेबुवांसोबत चहा पिऊन आगाऊ श्रमपरिहार केला खरा; पण तो बाप म्हणून पार पाडायच्या कर्तव्यांची नि प्रेमाच्या डबोल्याची ओझी उचलण्यासाठीच! हिच्या डोळ्यांत तरळलेल्या आनंदाश्रूंनी 'स्त्री ही क्षणाची पत्नी नि अनंत काळाची माता असते', याची खात्री पटली आणि मग या ना त्या कारणाने झालेली अनंत खरेदी, बाळाची औषधे, डायपर बदलणे, बाळ झोपेल ती रात्र नि उठेल तो दिवस असे नवे कालचक्र मागे लागल्यापासून बदललेल्या कामाच्या, जेवाखायाच्या, झोपा-उठायच्या वेळा यावरून 'पुरुष हा क्षणाचा पिता आणि अनंत काळाचा घरगडी' असतो, याचीही.

गेल्या काही महिन्यांच्या या प्रवासाचे हे सरकचित्रदर्शन तयार करण्याच्या निमित्ताने कित्येक महिन्यांचा लेखनसंन्यास संपला, हे बाकी बरे झाले. सांगायचा मुद्दा हा, की बाप होऊ घातल्यापासून आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, याची कल्पनाच नव्हती. सुरुवातीचे काही दिवस बायकोचे (जास्त) लाड करण्यात मश्गूल असल्याने आणि बाळ झाल्यानंतर बाळाचे आणि आईचे असे दोघांचे लाड करण्यात वेळ जात असल्याने या आणि इतर अनेक गोष्टींचा विचार करण्यासाठी वेळच मिळाला नाही. आणि तो मिळाला, तेव्हा विचार करण्याची वेळ निघून गेली होती. हाती उरले होते ते - मनोगताच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने का होईना - फक्त हा आनंदानुभव टंकणे आणि इतकेच सांगणे -

आता उरलो नुसता

डायपर बदलण्यापुरता!!


- चक्रपाणि चिटणीस