काव्यतरंग
क. : हर्षवर्धन देशपांडे


॥श्री ॥
तरंग उठता कल्पसागरी मंथन जेव्हा होते
सृजन भावना जागृत होउन चिंतन तेव्हा होते
अक्षय सिंचन नील नभी मनि विचारघन हे करती
काव्यकुसुमिता अनेकरंगी सजवुन मग ही धरती
साद घालते अनामिकेला सुंदर विवेक वेणू
दिव्यत्वाचा अनुभव घेती कणाकणातिल रेणू
मातीमधुनी मूर्ती बनवी जसे मानवी हात
अमूर्त आशय तसा जन्मुनी शब्दांच्या देहात
नादब्रह्म पण वंदित होतो तालामधुनी आणि
इंद्रधनुपरी यमक करुनिया कविता लोभसवाणी
ताम्र केशरी हरित कधी तर कधी गुलाबी काया
राग हर्ष अन करुणा अथवा कधी विनोदी छाया
निसर्ग मानव संवादाची कवन होउनी भाषा
व्यक्त कराया अनंतवर्णी आशा अन अभिलाषा
भावस्थितीचे दर्शन घडवी कलाकृती हे दर्पण
गजाननाला अखेर होते विनम्रभावे अर्पण
- हर्षवर्धन देशपांडे