मराठी भाषेचे देशीकार लेणे : म्हणी-वाक्संप्रदाय
लेखिकेविषयी थोडेसे :- डॉ. घांडगे ह्या औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठीच्या सहयोगी प्राध्यापिका आहेत. डॉ. घांडगेंनी लिहिलेली अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यातील १९९८ साली अक्षय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'दत्तवरद विठ्ठल विरचित महाभारत (वाङ्मयीन व ऐतिहासिक मूल्य)' ह्या ग्रंथास १९९८ मधील उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्या संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या बाकी ग्रंथसंपदेमध्ये पुढील ग्रंथांचा समावेश होतो - मराठी नाट्यवाङ्मयातील वास्तवता : एक मूल्य (मूळ लेखक डॉ. वि. ब. बनारसे, सहकार्याने संपादन, डॉ. वि. ब. बनारसे सेवा प्रतिष्ठान, पुणे, १९९५), स्वामी : एक शोध (प्रस्तावना आणि संपादन, मेहता पब्लिकेशन, पुणे, २००१), अनुष्टुभ (द्वैमासिक सूची, जुलै-ऑगस्ट १९७७ - मे-जून २००२, रौप्य महोत्सवी वर्षाअखेर) (पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००३), महाराष्ट्र साहित्य पत्रिका : सूची (१९१३-२००४) (महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २००६), अस्मितादर्श : सूची (१९६६-२००७) (प्रतिमा प्रकाशन, पुणे, २००८), अवचिता परिमळू (चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद, २०१२), शोध लोकयात्रेचा (श्रीवामनराज प्रकाशन, पुणे).
माझा मराठीची बोलू कौतुकें | परी अमृतातेही पैजासी जिंके ||
ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन || १४ || (ज्ञाने. अ. ६).
बाराव्या शतकात अशा स्वरूपाची मराठीची थोरवी गाणाऱ्या संत ज्ञानदेवांनी मराठीचे सामर्थ्य जाणले होते, म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायात गुरुकृपादृष्टीला आवाहन करताना,
मऱ्हाठियेचां नगरी | ब्रह्मविद्येचा सुकाळू करी ||
घेणे देणे सुखचिवरी | हो देई या जगा || १६ || (ज्ञाने. अ. १२)
असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
संस्कृत भाषेत बंदिस्त असलेले ज्ञान, अध्यात्म, कृष्णाने सांगितलेला उपदेश या सर्वांपासून, संस्कृत न येणारे वंचित राहत आहेत. ते पाहून ज्ञानदेवांनी ते ज्ञान मराठीत आणून जनसामान्यांवर, मराठी भाषेवर व काव्यावर फार मोठे उपकार केले आहेत. संतांनी सामान्य लोकांच्या रोजच्या बोलीभाषेत, त्यांच्या परिचयाच्या लोकगीतसदृश कवितेत, त्यांना रुचतील-पटतील अशा व्यवहार्य जीवनातील दृष्टांत देऊन काव्यरचना केली. याचे कारण समाजाच्या तळागाळातील लोकांची दु:खे, अडचणी, दारिद्र्य हे त्यांनी तीर्थयात्रेच्यावेळी अनुभवलेले होते. शारीरिक, मानसिक, कौटुंबिक पातळीवरील वेदना सर्वच संतांनी अनुभवलेली होती. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांसह त्यांच्या समकालीन सर्वच संत प्रभावळीतील संतांच्या रचनेतील ज्ञान मराठीतून असल्याने स्त्री-शूद्रादी जनसामान्यांच्या जाणिवेच्या कक्षेत येणारे आहे. त्याचबरोबर या रचनांमधून लोकमानसाची भाषा उद्धृत झालेली दिसते. लोकमनाच्या प्रतिबिंबातून, लोकपरंपरेतून आलेल्या अलौकिक जाणिवा प्रतीकांमधून संतांच्या अभंगांमधील अनुभवाच्या पातळीतून आलेल्या अनेक रचना म्हणी-सुभाषितांसारख्या अक्षरओळख नसलेल्या समाजातील लोकांच्या जगण्याचा घटक झालेल्या दिसतात. उदा. संत तुकारामांच्या अभंगांमधील -
पुण्यपर उपकार, पाप ते परपीडा || (अ. क्र. १२८३)
आलिया भोगासी असावे सादर | देवावरी भार घालूनिया || (अ. क्र. १२९२)
भिक्षापात्र अवलंबणे | जळो जिणे लाजिरवाणे || (अ. क्र. ९१२)
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा || (अ. क्र. ७१६)
मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास | कठिण वज्रास भेदू ऐसे || (अ. क्र. ६२१)
शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी || (अ. क्र. ३७)
महानुभाव संप्रदायाची भाषा ग्रांथिक भाषेपेक्षा बोलीभाषेच्या जवळची आहे. लहान प्रवाही छोटी वाक्ये नादमय वाटतात. महंत चक्रधरांनी सांगितलेली कावळ्या-चिमणीची कथा, माळेकराचा दृष्टांत यासारख्या लीळाचरित्रातील अनेक दृष्टांताच्या माध्यमातून आलेल्या कथा पाहता बाराव्या शतकातील महानुभाव संप्रदायाची गद्य भाषाही लोकवाणीच्या स्वरूपाची म्हणींच्या-वाक्प्रचाराच्या जवळची वाटते.
समाजात रूढ असलेले विधी, आचारविचार, शुभाषुभ, शकुनापशकुनाच्या कल्पना या ललित वाङ्मयात विखुरलेल्या दिसतात. त्यामुळे ललित वाङ्मयातील अशा शब्दांमागील लोककल्पना स्पष्ट झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने ललित वाङ्मयही समजू शकत नाही. म्हणी-वाक्प्रचारांचा ललित वाङ्मयात अपरिहार्यपणे अंतर्भाव झालेला दिसतो. काही वाक्प्रचार विशिष्ट अर्थाने लोकजीवनात वापरले जातात. ती अर्थवलये लोकपरंपरेमुळेच त्या वाक्प्रचारांना प्राप्त होतात. वाक्प्रचारांप्रमाणेच म्हणींच्या संदर्भातही असेच म्हणता येते. म्हणी व वाक्प्रचार या लोकोक्ती पूर्णपणे समजल्याशिवाय अशा वाङ्मयाचा आस्वाद घेणे शक्य होत नाही.
भाषा ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आनुवंशिकतेने संक्रमित होत असते. विशेषत: बोलीच्या बाबतीत हा प्रत्यय प्रकर्षाने येतो. ज्या लोकसमूहाची ती बोली असेल त्या लोकसमूहातील सांस्कृतिक परंपरा आणि बोलीभाषेची वैशिष्ट्ये शब्दांमधून आविष्कृत होत असतात. जीवनाचे, संस्कृतीचे वेगळेपण बोलीतून व्यक्त होत असते. अनेकवेळा व्यापक जीवनाशयही प्रकट होतो.
भारतीय विशेषत: महाराष्ट्र संस्कृतीत पुराणे, रामायण, महाभारत यासारखी आर्ष महाकाव्ये, त्यातून आलेल्या सीता, सावित्री, द्रौपदी यांच्या कथांना विशेष महत्त्व आहे. धर्मराज, कर्ण, राम, रावण, अर्जुन, कुंती, अहिल्या इ. सारख्या व्यक्तिरेखा माणसाच्या मनावर भुरळ पाडून संस्कारास मदत करतात. स्त्रियांपुढील आदर्श सीता-सावित्रीचा असतो. नवऱ्यापेक्षा शिरजोर आणि दुष्ट स्वभावाच्या स्त्रीला 'कैकेयी' म्हणतात. फार आळशी, झोपाळू व खादाड अशा माणसाला उपहासाने 'कुंभकर्ण' म्हणतात. यक्षांचा अधिपती व देवांचा धनाध्यक्ष कुबेर. त्यावरून अतिशय संपत्तिवान पुरुषास कुबेराची उपमा देतात. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद. इकडच्या गोष्टी तिकडे सांगून देवांत कलह लावून देणारे. यावरून आपापसात कलह माजविणाऱ्यास हे नाव देतात. दानशूरांमध्ये श्रेष्ठ म्हणून कुंतीपुत्र कर्णाची प्रसिद्धी होती. म्हणून एखाद्या दातृत्व दाखविणाऱ्या व्यक्तीस 'कर्ण' हे संबोधन दिले जाते. दुर्योधनाचा मामा शकुनी हा कपटकर्मात व दुष्टपणात पटाईत होता. यावरून अशी कृत्ये करणाऱ्यास हा शब्द वापरतात. भगीरथाने महत्प्रयासाने स्वर्गलोकीची गंगा मृत्युलोकी आणली. अतिशय मोठे प्रयत्न या अर्थाने भगीरथ प्रयत्न म्हटले जाते. याचप्रमाणे भीष्मप्रतिज्ञा, सुदाम्याचे पोहे, लक्ष्मण रेषा, रामराज्य इ. मधून काही घटना-प्रसंग वा वृत्ती साकार होतात व भाषेत वाक्प्रचाराप्रमाणे रुजतात. एकूणच आपल्या गुण-स्वभाव वैशिष्ट्यांनी पुराण-इतिहास काळातील अशी व्यक्तिचित्रे एक शब्दात्मक संप्रदाय बनलेली दिसतात. यासारखीच बिरबल, नाना फडणीस, कांचन भट, अहिल्याबाई, आनंदीबाई यासारखी इतिहासातील पात्रे, सरस्वती, सुभद्रा, द्रौपदी, हिडिंबा इ. सारखी महाकाव्यातील पात्रांची उदाहरणे सांगता येतील. यासारख्या काही म्हणीदेखील समाजात रुळलेल्या दिसतात. उदा. पाचामुखी परमेश्वर, पिंडी ते ब्रह्मांडी, कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभट्टाची तट्टाणी. यामागील कथा, संकल्पना, रीतिरिवाज समजणे गरजेचे असते.
या सर्वांमधून पातिव्रत्य, त्याग, प्रेम, मैत्री, पुरुषार्थ, आदर, सेवा इ. सारखी आदर्श वा वैविध्यपूर्ण जीवनमूल्ये शर्करावगुंठित होऊन अंगीकारली जातात. त्यामुळे जीवनाला वळण, आकार येतो. जगण्याचे ज्ञान, धडे या कथांमधून मिळते. म्हणूनच सामान्यत: निरक्षर, अशिक्षित, अलिप्त असलेल्या लोकांच्या व्यवहारी जीवनात मात्र अनेक पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ, कथा, दृष्टांत त्यांच्या बोलण्यातून जगण्याचा अविभाज्य घटक बनलेल्या असतात.
काही म्हणी व वाक्प्रचार लोकजीवनात नेहमी विशिष्ट अर्थानेच वापरले जातात. काही म्हणींचा संबंध बऱ्याचवेळा अलिखित दंतकथेशी, धर्मविषयक समजुतींशी, आचारविचारांशी, समाजाच्या प्रकृतीविशेषांशी किंवा अनेक शास्त्रीय सिद्धांतांशी जोडलेले असतात. उदा. साडेसातीचा फेरा, स्वर्गास हात पोहोचणे, सटवाईची अक्षरे, सतीचे वाण, संक्रांत येणे, पाप्याचे पितर, बांगड्या वाढणे यासारखे धर्मसंस्कृतीविषयक; तर लष्कराच्या भाकरी भाजणे, मूग गिळणे, मिरच्या झोंबणे, लावालावी करणे, लांडे कारभार करणे, बिब्बा घालणे, टाळूवर मिरे वाटणे, डांगोरा पिटणे यासारखे वाक्प्रचार समाजातील आचारविचार किंवा प्रकृतिविशेषांवर प्रकाश टाकतात. या स्वरूपांच्या काही म्हणीही दिसतात. उदा. दैव देते कर्म नेते, खाण तशी माती, पालथ्या घागरीवर पाणी, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा अशांसारख्या म्हणी बोलण्यात वा साहित्यात येतात. त्यांचा अर्थ पूर्णपणे समजल्याशिवाय त्यांचा आस्वाद घेणे शक्य नसते. याचाच अर्थ वाङ्मयातून वा बोलीतून ज्या म्हणी वा वाक्प्रचार येतात ते लोकजीवनाच्या लोकसंस्कृतीचे वाहक असतात.
माणूस हा समाजशील आणि समाजप्रिय प्राणी आहे. ज्या समाजपरिसरात व्यक्ती वाढते त्या समाजाचे प्रतिबिंब त्याच्या संस्कारातून परावर्तित होते. एका पिढीकडील अनुभवातून आलेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या पिढीला होत असतो. सामान्यजनांच्या व्यवहारज्ञानात भर पडण्यासाठी 'म्हणी-वाक्प्रचार'च्या माध्यमातून शेती-भाती, पीक-पाणी, सणवार, श्रद्धा-विश्वास, खाणे-पिणे, वस्त्रालंकार इ. सह मानवीजीवन संक्रमित होते. उदा. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य, असेल ते दिवस दिवाळी नसेल ते दिवस शिमगा, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी, घरात नाही दाणा हवालदार म्हणा, वरातीमागून घोडे, भरवशाच्या म्हशीला टोणगा, दुभत्या गाईच्या लाथा गोड, बाप दाखीव नाहीतर श्राद्ध घाल, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, ताकाला जाऊन भांडे लपवणे इ.
पशू-पक्षी-प्राणी हे माणसाच्या जीवनाचे अविभाज्य अंग असतात. अशा मुक्या जीवांच्या स्वभावगुणांवरून आलेल्या म्हणी ज्ञानात भर घालतात. उदा. उंदराला मांजर साक्ष, कसायाला गाय धार्जिणी, वासरात लंगडी गाय शहाणी, शेळी जाते जिवानिशी खाणार म्हणतो वातड कशी, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर इ.
बोलण्याच्या ओघात आपले म्हणणे अधिक पटवून देण्यासाठी म्हणी-वाक्प्रचारांचा वापर केला जातो. मग त्यासाठी इतर भाषांतील सुभाषितरूपी म्हणी वापरल्या जातात. नेहमीच्या बोलण्यातून येण्याने त्या रुजतात आणि समाजमनात स्थान निर्माण करतात. उदा.
संस्कृत - अजापुत्रं बलिं दद्यात्, अतिपरिचयादवज्ञा, अति सर्वत्र वर्जयेत, न भूतो न भविष्यती, परोपदेशे
पांडित्यम्, प्रथमग्रासे मक्षिकापात:, येनेकेनप्रकारेण, राजा कालस्य कारणम्, वचने किं दरिद्रता, वादे वादे जायते तत्त्वबोध:.
हिंदुस्थानी - अकिंचन व्यक्तीस 'कफल्लक' म्हणतात, घी देखा पण बडगा नही देखा, दर्या में खसखस, दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए, बापसे बेटा सवाई, बुढ्ढी घोडी लाल लगाम, मियाँ मूठभर दाढी हातभर, पानी तेरा रंग कैसा । जिसमे मिलावे वैसा, अल्लाची गाय, बूंदसे गई तो हौदसे नहीं आती.
गुजराथी - जेनुं काम तेनुं थाय बीजा करे सो गाता खाय.
यासारख्या अनेक परभाषीय म्हणी मराठीत सहजतेने वापरल्या जातात. त्यांचे अर्थ न सांगताही अशिक्षित, अडाणी माणसासही सहज समजतात.
म्हणी सर्वतोमुखी आणि समाजप्रिय असतात. त्यांचा वारंवार वापर होतो. म्हणींच्या वापरामुळे श्रोत्यांच्या मनावर आपल्या बोलण्याचा सखोल आणि योग्य तो परिणाम होईल याची वक्त्याला खात्री असते. याचे कारण म्हणी आशयघन असतात. अतिशय कमी शब्दात फार मोठा आशय, फार मोठे तत्त्वज्ञान सांगण्याचे सामर्थ्य म्हणीत असते. ही कुवत सुभाषितांमध्येही असते; पण ही सुभाषिते जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली नसतात. ती ग्रंथात आणि विद्वान पंडितांपर्यंतच मर्यादित असतात. काही सुभाषिते त्यांची आशयसंपन्नता आणि रचनासौंदर्य यामुळे लोकप्रिय होतात. समाजात वारंवार उच्चारली जातात. लोकप्रियता आणि सार्वत्रिकता या दोन कसोट्यांतून पुढे येणारी सुभाषिते लोकोक्ती होतात व त्यांना म्हणींचा दर्जा प्राप्त होतो. थोडक्यात आशयघनता व लघुत्व म्हणींचे प्राणतत्त्व आहे.
अनेक म्हणी या गद्य आणि पद्याच्या सीमारेषा मोडून टाकतात. त्यामुळे म्हणीत, काव्यात असलेल्या प्रतिभा, कल्पना, रस, अलंकार, नादमयता या गुणांसह जीवनाचे गूढ उकलणारे तत्त्वज्ञानही आहे. म्हणी साध्या-सोप्या आणि नीटनेटक्या असतात; पण तरीही त्यांच्यात रूक्षपणा नसतो. त्यातून व्यक्त होणारा आशय रोखटोक, स्पष्ट, नि:संदिग्ध असतो, तर आशयघन शब्द कोरडे नसतात. जीवनातील सारे शहाणपण पुढील पिढ्यांना शिकविणाऱ्या त्या समाजातील चालत्याबोलत्या 'पाठशाळा' असतात.
म्हणींच्या शैलीचा विचार करता ती 'लोकशैली' असते. द्विरुक्ती, रूपांचा सैलपणा, नियमांची शिथिलता, क्रियापदांचा लोप, उद्गारवाचके यासारख्या लोकशैलीच्या गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव झालेला असतो. त्याशिवाय विचारसौंदर्य, भावनासौंदर्य, रसात्मकता, व्यक्तित्त्व, वक्तृत्व, सुबोधता, परंपरा साहचर्य, जीवनानुभूतीविषयक आवेश, संयम, उदात्तता, पारिभाषिक शब्द यासारखी खास वैशिष्ट्येही म्हणींमधून दिसतात. कारण म्हणींची निर्मिती लोकसमूहातून झालेली असते.
अनुभवी वयोवृद्ध माणसे जे शिकवतात तेच म्हणीही सांगतात. त्यातून व्यक्त होणारी नीतिमूल्ये समाजस्वास्थ्य निकोप, उत्तम ठेवतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे म्हटले जाते; पण मागच्या पिढ्यांनी जीवनाच्या वाटेवर जे खाचखळगे पाहिलेले आहेत, जी वळणे आणि चढ- उतार अनुभवले आहेत त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, आपण खाल्लेल्या ठेचा पुढील पिढीस खाव्या लागू नयेत ही ह्या म्हणी व्यवहारात वापरण्यामागील भूमिका असते. ही सदिच्छाच काही अंशी म्हणींच्या निर्मितीमागे असते.
कित्येक पिढ्यांच्या अनुभवातून, शहाणपणातून आशय शब्दात साठविलेला, ओतलेला असतो. एखाद्या शिकल्या-सवरलेल्या विद्वान पंडिताला वेद-उपनिषद पठणाचे जितके महत्त्व असते तेच ग्रामीण, अडाणी, निरक्षरांना म्हणीत जाणवते. खऱ्या अर्थाने अशिक्षित लोकांना सुशिक्षित करण्याचे फार मोठे काम ह्या म्हणी करीत असतात. त्यांना जीवनाच्या वाटेवरील ही ज्ञानाच्या खुणांची चिन्हे सतत मार्गदर्शन करीत असतात. म्हणूनच म्हणी-वाक्प्रचार भाषेची सुंदर लेणी आहेत हेच सत्य. संस्कृतीचा प्रवाह न आटता तो नितळ व
खळाळत ठेवण्याचे कार्य म्हणी करतात.
वाक्प्रचार-म्हणींमधील आशयघनता, भावनिकता लक्षात घेता, बहिणाबाई म्हणतात त्याप्रमाणे -
देवा असं कसं मन । असं कसं रे घडलं?
कुठं जागेपणी तुले । असं सपन पडलं
हे स्वप्न म्हणीतून साकार होताना दिसते.
- डॉ. मीरा घांडगे