मुंबईचे दिवस : गॅसचे दिवे आणि ट्रॅम
येणार! येणार!! येणार!!! मुंबईत लौकरच मेट्रो येणार. मेट्रो म्हटले की ट्रॅम आठवते. पण ट्रॅमच्या आठवणी गॅसच्या दिव्यांशी जोडलेल्या आहेत. या आठवणींशी जोडले गेले आहे ते मुंबईचे एकेकाळी देखणे, दिमाखदार असलेले लोभस रूप. त्यातून या आठवणी आहेत बालपणच्या. हळव्या मनाच्या कोऱ्या पाटीवरच्या जरा जास्तच ठसठशीत अशा. आपले बाबा जगातील सर्वात श्रेष्ठ माणूस आहेत असे वाटते त्या वयातल्या. वयोपरत्वे मन निबर होते. निरागस बालमनातल्या आठवणींना मात्र हे निबरपण धक्का लावू शकले नाही. हीच तर बालमनातली गंमत आहे. त्यामुळे आठवणी माझ्या मलाच जरी जास्तच हळव्या, अवाजवी उदात्तीकरण झालेल्या, वगैरे वाटत असल्या तरी त्यांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता जशा आहेत तशाच प्रामाणिकपणे मांडल्या आहेत.
आजोळापासून आमचे घर जवळच होते. त्यामुळे शाळेच्या सुटीत आजोळी गेलो तरी दर शनिवार रविवारी आमच्या घरी येत असू. मग शनिवारी संध्याकाळी अण्णा, म्हणजे आमचे तीर्थरूप आम्हा दोघांना (म्हणजे मी आणि माझा थोरला बंधू) दादरच्या जुन्या पुलावर विजय नगर बिल्डिंगसमोरच्या वा आजच्या फुलबाजाराजवळच्या पुलावर रेलवे गाडी बघायला घेऊन जात. जसा शनिवारचा दिवस रेलवेचा तसा रविवार ट्रॅमगाडीचा. रेलवे फक्त बघायला तर ट्रॅममधून फिरायला पण मिळत असे. वर्ष-सहा महिन्यांनी अधेमध्ये कधीतरी पण हट्ट केल्यावरच ट्रॅमची सफर घडत असे. दादर टी. टी. म्हणजे दादर ट्रॅम टर्मिनस. इथून व्हिक्टोरिया गार्डन, पायधुणी, म्युझियम, फोरास रोड इ. ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅमगाड्या सुटत.
रस्त्याच्या मध्ये फूटपाथएवढा उंच आणखी एक रस्ता असे. फ्लोरा फाउंटनच्या (आता हुतात्मा चौक) जुन्या प्रकाशचित्रातला ट्रॅमचा मार्ग मात्र उंचवट्यावर नसून रस्त्याच्या सपाटीवरच आहे. या रस्त्यात रूळ पुरून बसवलेले असत. रुळांच्या दोन जोड्या असत. एक जाणारी एक येणारी. मध्ये मध्ये रूळांचे दुर्मिळ असे क्रॉसिंग. या रूळांवरून ट्रॅम चालत असे. काही ठिकाणी एखाददुसरी जोडी जास्त. ट्रॅम उभी करून ठेवायला. वरून विजेच्या तारा. रेलवेच्या वर असतात तशा. ठराविक अंतरावर ट्रॅमचे थांबे होते. तिथे कधीही रांग नसे. नेहमी घोळकेच असत. या ट्रॅमच्या रस्याच्या दोन्ही बाजूंना मस्त नक्षीचे बिडाचे (कास्ट आयर्न) चंदेरी रंग दिलेले खांब असत. या खांबांवर गॅसचे दिवे असत. आता हुतात्मा चौक म्हणून ओळखला जात असलेल्या फ्लोरा फाउंटनच्या चौकाचे विहंगम कृष्णधवल प्रकाशचित्र पुढे दिले आहे. त्यात गर्दी नाही हे पाहून आता धक्काच बसतो.
मध्यभागातल्या गोलाभोवती आठ दिव्यांपैकी सात दिवे वरील चित्रात (चित्र १) दिसताहेत. ते दिव्यांचे खांब आहेत. इतर खांब दिव्यांचे, विजेचे की टेलिफोनचे ते कळत नाही. दिव्यांचे खांब दूरवर दिसताहेत त्यामुळे त्यांचा घाट, सौंदर्य दिसतच नाही. या खांबांच्या मनोहर नक्षीचा, त्यांच्या रुपेरी रंगाचा रुबाबच वेगळा होता.
वरील चित्रात (चित्र २) रस्त्याकडेच्या गॅसच्या दिव्याचा खांब साधाच आहे पण रस्ता दुभाजकावरच्या दिव्याचे खांब कसे सुरेख आहेत पाहा.
वरील चित्रात (चित्र ३) ट्रॅमच्या डावीकडे दोन वेगवेगळ्या आकाराचे गॅसचे दिवे सुंदर घाटाच्या खांबांवर दिसताहेत. परंतु चित्रात पुरेशी स्पष्टता नसल्यामुळे नीट कल्पना येत नाही. काही दिवे देव आनंदच्या नवकेतन प्रॉडक्शनच्या दिव्यासारखे पाश्चात्त्य धाटणीचे (प्रकाशचित्रातला उजव्या बाजूचा दिवा) तर काही पेशवाईतल्या हंड्यांच्या घाटाचे (प्रकाशचित्रातला डाव्या बाजूचा दिवा). दिव्याच्या काचेचा पेशवाईतल्या हंड्यांसारखा आकार त्या खांबाचा रुबाब आणखी वाढवी. त्यावर एक तिरकी तरफ असे. ही तरफ वरखाली करून दिवा चालू वा बंद करता येई. ही तरफ म्हणजे जणू त्या खांबाच्या मुकुटातला तुराच! या मनोहर दिव्याचे स्पष्ट आणि मोठे प्रकाशचित्र जालावर शोधले पण सापडले नाही. हे दिवे रोज संध्याकाळी सहा साडेसहाला बी. ई. एस. टी. चा माणूस एका लांबलचक बांबूला लावलेल्या आकड्याने - हुकाने लावी व सकाळी सहासाडेसहाला बंद करी. दिव्याचा प्रकाश पेट्रोमॅक्सएवढाच. पेट्रोमॅक्ससारखाच त्यालाही जाळीदार मॅंटल असे. प्रसंगी तो बदलावा लागे.
मग उंच शिडीचा घोडा घेऊन बी. ई. एस. टी. चा माणूस तो बदली. हा मॅंटल बदलायचा सोहळा पाहाण्यासारखा असे. बी. ई. एस. टी. चा माणूस प्रथम जुना फुटलेला मॅंटल हाताने चोळून साफ करी. पांढरा रंग दिलेल्या नाजूक तारेचा आहे असे वाटणारा हा मॅंटल राखेचा असावा हे खरे वाटतच नसे. मँटल राखेचाच बनलेला असल्यामुळे लगेच नाहीसा होत असे. मग रेशमासारख्या दोऱ्याचा अर्धपारदर्शक पांढऱ्या गुलाबी रंगाचा नवीन मँटल तो दिव्याच्या लोंबणाऱ्या जाळीदार बोंडाला चड्डी घालावी तसा बांधीत असे. हा दोऱ्याचा मॅंटल पिशवीसारखा चुरगळलेला असून साधारणपणे चारेक इंच लांबीचा मँटल रिकाम्या पिशवीसारखा लोंबे. मग माणूस तो मँटल आगपेटीने पेटवी. रेशमी दोऱ्याचा चार इंची मॅंटल जळल्यावर त्याची राख दीडदोन इंच व्यासाच्या गोल जाळीचा आकार धारण करीत असे. तो आकार पांढऱ्या नाजूक तारेचाच बनलेला आहे असे वाटत असे. हे सर्व होताना डोळ्यांवर विश्वासच बसत नसे. अजूनही बसत नाही.
या मनोहर दिव्याचे स्पष्ट आणि मोठे प्रकाशचित्र जालावर शोधले पण सापडले नाही. सरस्वतीने जेव्हा चित्रकलेचे वर दिले तेव्हा मी बहुधा रांग वगैरे मोडून घुसलो असणार. त्यामुळे चित्रकला न देता तिने माझ्या कानफटातच वाजवली होती. त्या सुंदर दिव्याचे रेखाचित्र काढायचा मी प्रयत्न केला तो पुरता फसला त्यामुळे, वाचकहो, क्षमस्व. खालील प्रकाशचित्रातला (चित्र ४) खांब हा स्वातंत्र्यानंतरच्या काळातला आहे आणि तेवढा आकर्षक नाही.
पण किशोरचा "चलती का नाम गाडी" व देव आनंद आणि राज कपूरच्या अनेक जुन्या कृष्णधवल चित्रपटात हे देखणे ब्रिटिशकालीन खांब आणि त्यावरचे डौलदार असे गॅसचे दिवे दिसतात.
असो.