दुधी कोफ्ता


वाढणी - ४/५ जणांना भरपूर

साहित्य :

दुधी - १ मध्यम आकाराचा
कांदा - १ मध्यम
टोमॅटो - २ (खूप मोठे असतील तर १ वा दीड पुरावा)
आले - अर्धा इंच
लसूण - १-२ पाकळ्या
हिरव्या मिरच्या - २
धनेजिरे पूड - १ चमचा
काजू - अर्धी वाटी
दूध - १ वाटी
बेसन
गरम मसाला
लाल तिखट
मीठ, साखर - चवीनुसार
तेल
जिरे - अर्धा चमचा
बडीशेप - अर्धा चमचा
फोडणीचे साहित्य
कोथिंबीर



कृती :

एक वाटी दूध गरम करून त्यात काजू भिजत टाकावेत.

मिक्सरच्या भांड्यात जाड चिरलेला कांदा, जाड चिरलेला टोमॅटो, लसूण पाकळ्या व आल्याचे तुकडे घालून सगळ्याची एकत्र पेस्ट करावी. एका जाड बुडाच्या भांड्यात वा कढईत तीन चमचे तेल तापवत ठेवावे. त्यात मोहरी घालून ती तडतडली की जिरे व बडीशेप घालावी. त्यात हळद व हिंग घालून त्यावर मिक्सरमधील पेस्ट ओतावी व मिश्रण परतावे. मिक्सरच्या भांड्यात थोडे पाणी घालून भांड्याला लागलेली पेस्ट काढून तीही घालावी. मिक्सरचे भांडे बाजूला ठेवून द्यावे, लगेच धुवायला टाकू नये. मंद आचेवर हे मिश्रण झाकण ठेवून शिजत ठेवावे व अधूनमधून ढवळत राहावे.

दुधीवर डाग नसतील तर न सोलता दुधी धुवून व किसून घ्यावा. डाग असतील तर सोलून घेतलेला बरा. किसलेला दुधी हलक्या हाताने दाबून त्यातील पाणी एका वाटी काढून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. दुधीच्या किसात बारीक चिरलेल्या मिरच्या, धनेजिरे पूड, चवीपुरते मीठ व गोळे करता येतील इतपत बेसन घालून सर्व एकत्र करावे. ह्या मिश्रणाचे साधारण दोन इंच व्यासाचे चपटे गोळे करून (हे गोळे फार घट्ट दाबून करू नयेत, सैलसरच ठेवावेत. ) ते कोफ्ते तापलेल्या तेलात खरपूस तळून घ्यावेत.

आधी वापरलेल्या मिक्सरच्या भांड्यात दूध आणि त्यात भिजवलेले काजू घालून काजूची दुधातील पेस्ट करून घ्यावी. आतापर्यंत कांदा-टोमॅटोचे मिश्रण शिजले असेल. त्यात काजू-दुधाची पेस्ट घालावी. त्यात थोडी साखर, चवीपुरते मीठ व गरम मसाला घालून ही ग्रेवी ढवळावी. ग्रेवी फार दाट असेल तर त्यात किसलेल्या दुधीचे पाणी घालावे व ग्रेवीला एक उकळी आणावी.

ह्या ग्रेवीत तळलेले कोफ्ते घालून आणखी एक उकळी आणावी. वरून चिरलेली कोथिंबीर घालून पोळी वा पराठा वा नानसोबत गरमागरम वाढावे.


- वरदा व. वैद्य