डॉ.निरुपमा भावे : एक संवाद: पृष्ठ (२ पैकी) २

ह्या सर्व सायकलसहलींपैकी कोणती तुमच्या जास्त लक्षात राहिलेली आहे? आणि का?

आता आपण ज्याबद्दल बोललो तीच मनाली-खार्दुंगला ही सर्वांत जास्त लक्षात राहिलेली आहे. कारण तो परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. आम्ही रोज एक एक शिखर सर करायचो. नदीकाठी तंबू ठोकून राहिलो होतो. सर्व ग्रुप एका कुटुंबासारखाच बनला होता. माझ्या वयामुळे सर्वजण मला मासाहेब म्हणत, आजही म्हणतात!

दुसरी लक्षात राहिलेली रॅली मध्य प्रदेशाची. त्यात खजुराहोहून परतताना प्रचंड थंडी होती, अंधार होता, धुकेही खूप होते. त्यातच चष्म्यावरही दव, धुके साठल्याने पुढचे दिसत नव्हते. हाताची बोटे गारठली होती. पण आम्ही तसेच एकामागे एक असे राहून ११ किमी सायकल चालवून हमरस्त्यावर आलो. मग तिथल्या एका हलवायाच्या दुकानातील सगळी जिलबी आणि सगळे सामोसे आणि त्यानंतर गरमागरम चहा याचा यथेच्छ समाचार घेतला. फार मजा आली तेव्हा!

तुमच्या सारख्या जिद्दीच्या आणि खंबीर मासाहेबांचा ग्रुपला आधारच वाटत असेल! एका वेगळ्या कारणासाठी मला तुमच्या वाघा बॉर्डर-आग्रा रॅलीबद्दल उत्सुकता आहे. वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर कसे वाटले?

वाघा बॉर्डरला रोज संध्याकाळी जी विशेष परेड असते त्याबद्दल खूप ऐकले होते. त्यामुळे त्याबद्दल उत्सुकता होतीच. आम्ही खूप धावपळ करून परेडची वेळ गाठली आणि धावपळीचे सार्थक झाले! ती परेड पाहायला मला फार आवडले. आम्हीही "वंदे मातरम" अशा घोषणा दिल्या, तिरंगा घेऊन फडकवला आणि नाचलो सुद्धा!

गोवा-कोची हीही रॅली एका वेगळ्या कारणासाठी तुमच्या लक्षात राहिली असेल. त्यावेळी तुम्हाला एक अपघात झाला होता, आणि मला वाटते लगेचच तुमची गंगासागर-गोमुख ही २४०० किमी ची पदयात्रा होती. मग पदयात्रेत तुम्हाला भाग घेता आला नसेल!

छे छे! असे अजिबात नाही. ती रॅली संपण्याच्या दोनच दिवस आधी मला अपघात झाला. माझ्या घोट्याला फ्रॅक्चर झाले होते. मग मला विमानाने पुण्याला पाठवले. त्यानंतर १५ दिवसाच्या आतच ही पदयात्रा सुरू होणार होती. मी प्लॅस्टरमधील पाय आणि कुबड्या यांसह पदयात्रेत सामील झाले! पदयात्रेबरोबर बसही होती. पहिले तीन/चार आठवडे मी बसमधून प्रवास केला. पण एकदा प्लॅस्टर काढल्यावर मात्र काठी घेऊन चालण्याचा सराव केला आणि पुढील पदयात्रा चालू केली.

धन्य आहे तुमची! पण आता पदयात्रेचा विषय निघालाच आहे तर त्याबद्दल जरा सांगा. ही पदयात्रा एका विशिष्ट सामाजिक उद्देशाने काढली होती असे मला पुसटसे आठवत आहे.

हो. जवळजवळ चार महिने चालणारी ही पदयात्रा ’फेडरेशन ऑफ गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया’ने आयोजित केली होती. भारताच्या लोकसंख्येमध्ये गंगेकाठी राहणाऱ्या लोकांचे प्रमाण खूपच मोठे आहे आणि त्यात निरक्षर किंवा अशिक्षित अशा लोकांची संख्या प्रचंड आहे. गंगेकाठचा बराच भाग असा मागासलेला आहे. आमच्या पदयात्रेचा उद्देश अशा भागातील गरोदर महिलांचे प्रबोधन करणे हा होता. डॉ. शिरीन वेंकट ह्या त्याच्या प्रमुख होत्या. आम्ही रोज सकाळी साडेसहाला सुरुवात करून दुपारी अकरा/साडेअकरापर्यंत चालत असू. वाटेत लोकांना, विशेषत: महिलांना गोळा करून कोपऱ्याकोपऱ्यावर आम्ही भाषणे देत असू. त्यात मुलींचे शिक्षण, लग्नाचे वय लांबवणे, एक किंवा दोनाहून अधिक मुले होऊ न देणे, मुलांमध्ये अंतर ठेवणे, गरोदर महिलेची काळजी घेणे ह्या सगळ्याचे महत्त्व पटवून देत असू. आमच्याबरोबर डॉ. शिरीन वेंकट तर होत्याच पण आणखीही काही डॉक्टर होते. आम्ही मधूनमधून आरोग्य शिबिरेही घेत असू. त्यात गरोदर महिलांची तपासणी करून त्यांना औषधे देणे, त्यांचा आहार कसा असावा याविषयी माहिती देणे हे आम्ही करत असू. आम्ही पायी चालत असल्याने त्या महिलांशी प्रत्यक्ष भेट होऊन गप्पाही मारता येत असत. त्या भागातील दारिद्र्य, अस्वच्छता, एकेका बाईला असलेली आठ-आठ, दहा-दहा मुले हे पाहून तिथे प्रबोधनाची अत्यंत गरज आहे हे लक्षात आले.

हे सर्व काम करताना मोडलेल्या पायाने काही त्रास दिला नाही का?

हो, दिला तर! त्रास म्हणजे सुरुवातीला पाय प्लॅस्टरमध्ये होता तेव्हा मला खुर्चीवर बसून बोलावे लागत असे. व्याख्यान देणे ही गोष्ट मी गेली कित्येक वर्षे करत आहे, पण ते उभे राहून. इथे मात्र ह्या पायामुळे बसून बोलावे लागले एवढाच त्रास!

तुम्ही कैलास मानससरोवर हा ट्रेक केला त्यावेळी फिटनेसच्या संदर्भात काहीतरी अडचण आली होती असे मला आठवत आहे. ती काय आणि तिच्यावर तुम्ही कशी मात केली?

खरे म्हणजे माझ्या ह्या साहससहलींची सुरुवात कैलास मानससरोवर ट्रेक पासून झाली. बहीण चल म्हणाली म्हणून मी तयार झाले. त्यावेळी माझे वय होते पन्नास. ट्रेकिंगबद्दल मला काहीच माहीत नव्हते. हा ट्रेक भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे होता. त्यांच्या नियमानुसार त्यांनी काही वैद्यकीय चाचण्या करायला सांगितल्या होत्या. त्यात माझी स्ट्रेस टेस्ट व आणखी काही टेस्टस पॉझिटिव आल्या आणि मला ट्रेकला जायला मिळणार नाही असेच जवळजवळ झाले. मला वाईट वाटले. मग मी एक दिवस एकटीच सिंहगडावर गेले. स्वत:ला अजिबात दमू न देता हळू हळू गड चढले. मग आत्मविश्वास वाढला. पुन्हा चाचण्या केल्या, अँजियोग्राफीसुद्धा केली. त्याचे निकाल पाहून डॉक्टरांनी ट्रेकला हिरवा कंदिल दाखवला आणि माझा कैलास-मानससरोवर ट्रेक झाला!

म्हणजे तुम्ही जिद्दीने ’अनफिट’ चे ’फिट’ करून दाखवले. साधारण ३/४ वर्षांपूर्वी तुम्ही एन्ड्यूरो३ (enduro-3) ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?

एंड्यूरो-३ ही एक साहस स्पर्धा आहे. स्वत:ची सहनशक्ती पडताळून पाहण्याची शर्यत. ह्यात प्रत्येक टीम ३ जणांची असते. दोन पुरुष, एक स्त्री किंवा एक पुरुष, दोन स्त्रिया. हौशी(अमॅच्युअर), खुला(ओपन) आणि चाळीसच्या पुढे अशा तीन विभागात ही स्पर्धा घेतली जाते. चाळीसच्या पुढील स्पर्धेत सायकलिंग व ट्रेकिंग असते. सायकलिंगमध्ये कच्चा रस्ता, चढ असलेला रस्ता इ. अवघड रस्त्यांवरून सायकल चालवावी लागते. ट्रेकिंगमध्ये रस्ता शोधणे, आपल्याला लागणारे सर्व सामान म्हणजे पाणी, खाद्यपदार्थ, प्रथमोपचार पेटी, सायकल दुरुस्तीचे सामान हे सर्व स्वत:च वाहून न्यायचे असते. एकूण अंतर साधारण ३५/४० किमी असते. ’हौशी’ विभागात सायकल, ट्रेकिंग याबरोबरच छोटी बोट (kayak) चालवणे, सायकल उचलून डोंगरावरून अवघड वाटेने नेणे, नदी ओलांडणे ह्याचा समावेश असतो. एकूण अंतर १४०/१५० किमी असते. ’खुल्या’ विभागात वरील सर्व गोष्टी, तसेच आणखीही अधिक अवघड गोष्टी असतात आणि अंतर २२५/२४० किमी असते.

आमच्या टीमने गेल्या वर्षी (२०११) ’हौशी’ मध्ये भाग घेतला होता. आम्हाला सर्व पूर्ण करण्यास ३० तास लागले. मी एकूण दोन वेळा हौशी, दोन वेळा ४०+ आणि एकदा टीचर्स अशा विभागात भाग घेतला होता आणि त्यापैकी ३ वेळा बक्षिस मिळवले.

हे सर्व करताना तुमचे वय साठीच्या आतबाहेर असेल नाही का? म्हणजे तुमचे वय वाढत गेले तशा तुम्ही तरुण होत गेला! मग आणखीही काही केले की काय?

हो. केले नं! अगदी अलीकडे, म्हणजे २०११ च्या सुरुवातीला मला रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंगची संधी मिळाली. मला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते पण माझ्याबद्दल कोणाकडून तरी माहिती मिळाल्यामुळे असेल कदाचित, गिरिप्रेमी ह्या संस्थेने मला त्यांच्या ह्या मोहिमेसाठी आमंत्रण दिले. लोणावळ्याजवळ एक तैलबैला नावाचा अडीचशे/तीनशे फूट उंचीचा सुळका आहे. तो दोराच्या साहाय्याने चढणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप होते. तर मी त्यात भाग घेतला.

कंबरेला दोर वगैरे बांधून सुळका चढण्या-उतरण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला. हा सुळका चढण्यास अत्यंत अवघड समजला जातो असे नंतर कळले! माझे वय त्यावेळी साधारण ६३ वर्षे होते. आमचा पाच जणांचा ग्रुप होता. त्यापैकी तिघे जण माझ्याहून मोठे आणि एक जण लहान असे होते! खेरीज ह्या मोहिमेचा उद्देश होता पुण्यातून २०१२ मध्ये एव्हरेस्टला जाणाऱ्या टीमला प्रोत्साहित करणे. हे आम्ही करत असताना एव्हरेस्ट मोहिमेचे काही लोकही आमच्या बरोबर होते. आम्ही साठीच्या पुढील पाच जणांनी तैलबेला सर केल्यावर त्यांचा उत्साह तर वाढलाच पण आमचा आशीर्वाद त्यांना मिळाला असेही त्यांना वाटले.

हे ऐकून तुम्ही सुद्धा एव्हरेस्ट सर करून याल अशी मला खात्री वाटते! आता थोड्या वेगळ्या विषयावर बोलू. काही वर्षांपूर्वी तुम्ही अनाथाश्रमातील मुलींना गणित शिकवण्याचे आणि तेही अर्थातच विनामूल्य, कार्य केले होते. ते तुम्ही कसे केले आणि त्यात कितपत समाधान मिळाले?

माझ्या घराजवळ कुसुमबाई मोतीचंद महिलाश्रम आहे. तिथे गरीब, अनाथ, असहाय अशा मुलींना प्रवेश दिला जातो. आश्रमातर्फे त्यांना शाळेत घातले जाते. तिथल्या मुलींना मी एक वर्षभर रोज संध्याकाळी गणित शिकवायला जात असे. त्यांना गणित काहीही येत नसे. माझ्या शिकवण्यामुळे त्यांच्यात १५/२०% तरी फरक पडला. पण आश्रमात आलेल्या मुलींची अवस्था फारच वाईट असे. काही काही कुमारी गर्भवती असत. इतकेच नव्हे तर काहींवर त्यांच्या वडिलांनीच बलात्कार केलेला असे! असे काही कळले की आतडे अगदी पिळवटून जात असे. कधी कधी वाटे, अशा परिस्थितीत ह्या मुली काय शिकणार? पण तरीही मी नेटाने माझे काम पुरे केले.

त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे काही सामाजिक कार्य केले का?

सामाजिक कार्य म्हणून नाही पण छंद म्हणून मी एक गोष्ट करते. हल्ली मुले परदेशात व आईवडील भारतात अशी उदाहरणे खूप दिसतात. आपले कोणी जवळ नसल्याने ही वृद्ध जोडपी एकाकी पडतात. त्यातही दोघांपैकी एक गेल्यास दुसरा फारच एकटा पडतो. अशा लोकांना मी आवर्जून भेटते, त्यांच्याशी मैत्री करते, त्यांच्याशी गप्पा मारते, त्यांचे मन रिझवते. आवश्यकता असेल तिथे त्यांची कामेही करते. हे करण्यात मला खूप समाधान मिळते.

तुमचे हे विचार फार उच्च आहेत! पण मला पुन्हा साहससहलींबद्दल विचारायचे आहे. ह्या वयात ह्या सहली करण्यासाठी तब्बेत ठणठणीत असायला हवी. तर त्यासाठी तुम्ही काय करता?

रोज पहाटे उठून ४०/४५ मिनिटे योगासने, नंतर लिंबू-पाणी-मध घेऊन आमच्या घरापासून साधारण दोन-तीन किमी असलेल्या टेकडीच्या पायथ्यापर्यंत सायकलने जाणे, नंतर टेकडी चढणे, टेकडीवरून आल्यावर जिममध्ये जाऊन व्यायाम व नंतर १६ सूर्यनमस्कार हा माझा सकाळचा कार्यक्रम असतो. शिवाय आमचा एक दहा-पंधरा जणांचा ग्रुप आहे. आम्ही दर शनिवारी १०८ सूर्यनमस्कार घालतो.

१०८ सूर्यनमस्कार?! हे ऐकून मी तुम्हालाच एक साष्टांग नमस्कार घालते! बरं ते असो, आता मला हे सांगा. सायकल रॅली, ट्रेकिंग, एंड्यूरो ह्यात सर्वांत जास्त आनंद तुम्हाला कशात मिळतो?

हे सांगणे कठीण आहे कारण प्रत्येक आनंद वेगळा आहे. पावसाळ्यात सर्व डोंगर हिरवेगार झालेले असतात तेव्हा सायकल चालवायला फार मजा येते. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग हे चित्तथरारक अनुभव होते. एंड्युरो हा एक आगळावेगळा अनुभव होता. सुरुवातीला काही दिवस तर आपण हे केले ह्यावर माझाच विश्वास बसत नव्हता!

तुम्ही गणिताच्या प्राध्यापिका आहात. गणिताच्या अध्यापनातूनही आनंद मिळत असेल. साहससहलींमधील आनंद त्यापेक्षा उजवा वाटतो का? आणि का?

हे दोन्ही आनंद वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामुळे त्यात डावे-उजवे करणे कठीण आहे. अध्यापन करताना आपण सांगितलेले विद्यार्थ्यांना समजले की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्याने फार समाधान मिळते. त्यासाठी आजही अभ्यास करावा लागतो. संशोधनासाठीही अभ्यास करावा लागतो, तो मला एखाद्या ट्रेकसारखा वाटतो. भरपूर कष्ट पण अपेक्षित रिझल्ट मिळाला की शिखर गाठल्याचे समाधान! साहससहलींमध्ये शारीरिक क्षमतेचा आणि मनाच्या निर्धाराचा कस लागतो. पण ह्या दोन्ही गोष्टी -एखादा ट्रेक किंवा एखादे संशोधन- पूर्ण झाल्यावर ’आपण या वयातही हे करू शकतो’ ह्याचा आनंद होतो आणि मनातल्या मनात ’अजून यौवनात मी’ असे म्हणावेसे वाटते!

तुम्ही खरेच अजून यौवनात आहात! तुमच्या साहससहलींबद्दल वाचणे, तुमच्याकडून त्याबद्दल जाणून घेणे हे तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी आहे. तुमच्या विविध कामातून तुम्ही ह्या मुलाखतीसाठी वेळ काढलात ह्याबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार आणि तुमच्या पुढील सर्व सहलींसाठी, उपक्रमांसाठी, सामाजिक कार्यासाठी दिवाळी मनोगतातर्फे हार्दिक शुभेच्छा.


- मीरा फाटक