खेड्यामधले घर कौलारू!: पृष्ठ (२ पैकी) २
किराणामालाच्या खोक्यांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगेत पूर्ण सामान आले. त्यातले रोजच्या रोज वापरात काय काय सामान लागते याची एक यादी बनवली व परत दुकानामध्ये डबे बरण्या खरेदीसाठी गेले. प्लॅस्टिकच्या बरण्या पारदर्शक व दिसायलाही छान दिसतात त्याच खरेदी केल्या. खोलगट, उभट, चौकोनी असे वेगवेगळे बरण्यांचे आकार घेतले व त्यात सामान भरले. तांदूळ, डाळ, पोहे, रवा, साबुदाणा, दाणे एकेकात भरले व ओळीने त्या कप्यात लावले. वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांकरता उभट आकाराच्या बरण्या छान व सुबक दिसत होत्या. खोक्यांमधली जी प्लॅस्टिकची बॅग उघडायचे ती उभी करून ठेवायचे म्हणजे त्यातले काही सांडायचे नाही. रबर बॅंडने पिशव्याही बंद करून घ्यायचे. सर्वात वरचा कप्पा होता त्यात मिक्सर, बल्ब, इस्त्री असे ठेवले व बाथरूम मध्ये धुणे धुण्याची व भांडी घासण्याची साबणे, एअर फ्रेशनर असे ठेवले. शिवाय तिथे लाँड्री बॅगही ठेवली. स्टुडिओमध्ये वॉशर ड्रायर नसल्याने धुणे बाहेर असलेल्या लाँड्रोमॅटमधून धुऊन आणायला लागायचे.
आतापर्यंत सर्व सामानाची व्यवस्था लावली ती मनाजोगती लावली गेली होती. सर्व काही जिथल्या तिथे वेळच्या वेळी ठेवायला लागत होते. पसारा घालण्याकरता वावच नव्हता. भांडी रोजच्या रोज दोन वेळेला घासायलाच लागायची. भांडी विसळून उपडी करून लगेचच्या लगेच जागेवरही ठेवायला लागायची. सकाळची पोळी भाजी झाली की मी घराबाहेर येऊन बसायचे. हे घर जंगलात होते. सर्व बाजूने हिरवीगार झाडीच झाडी होती. या झाडांचे बरेच ओंडके घराच्या बाहेरच्या बाजूला होते. त्यातल्या एका ओंडक्यावर सकाळच्या गार हवेत बसले की छान वाटायचे. समोरचा रस्ता दिसायचा. विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, काही चालत तर काही बसला उभे राहिलेले दिसायचे. हिरव्यागार झाडीतून जांभळ्या व नारिंगी रंगांची ’कॅट’ बस दिसायची. असा सर्व निसर्गरम्य देखावा पाहताना असे वाटायचे की या ओंडक्यावरून उठूच नये. या घराच्या भोवती जी उंच उंच झाडे होती त्यामुळे कायम सावली असायची. पानगळीमध्ये पूर्ण अपार्टमेंटच्या सभोवताली रंगीबेरंगी पानांचा मोठा ढिगारा साठायचा. त्यावरून कोणी चालत आले की सळसळ असा आवाज यायचा. हिवाळ्यामध्ये सकाळच्या कोवळ्या उन्हात ओंडक्यावर बसले की कोवळ्या उन्हाची तिरीप पर्णहीन झाडांतून यायची.
आमच्या शेजारी एक अमेरिकी विद्यार्थी राहायचा. फावल्या वेळात तो ’कॅट’ बस चालवायचा. आमचे बसने नेहमी येणे जाणे असल्याने ओळखीचा झाला होता. घरी असला की तो ओसरीवर एक खुर्ची टाकून बसलेला असायचा. एकदा मी त्याच्या घरी सहज म्हणून भजी द्यायला गेले आणि सांगितले ही खाऊन बघ तुला कदाचित आवडतील. त्याच्या घरात मी प्रथमच जात होते. तो क्वचितच घरी असायचा. त्याच्या घरी गेले आणि बघतच राहिले. तो एकटा राहत होता तरी त्याच्या घरी सर्व सामान होते आणि तेही एकाच खोलीत. त्याच्याकडे सोफा होता, शिवाय टेबल, खुर्ची, पलंग, डायनिंग टेबल व त्याच्या चार खुर्च्या होत्या. मोठा टीव्ही व त्याखाली एक छोटे कपाटही होते. सर्व सामान असूनही टापटीप ठेवलेली ही खोली मला खूपच आवडली. आतापर्यंत आमच्याकडे असलेले थोडे सामान एका खोलीत कसे काय बसवायचे या चिंतेत होते आणि इथे तर सर्व सामान होते. आता मला आमच्या खोलीत सर्व काही असावे असे वाटू लागले. आमच्याकडे असलेल्या आरामदायी खुर्चीत बसून मी विचार करायला लागले. सोफा, टेबलखुर्च्या, जेवणाचे टेबल, पलंग, कुठे बसेल व कसे बसेल, विकत आणावे की नकोच अशी विचारचक्रे सुरू झाली. बसल्या बसल्या सर्व फर्निचर असलेले कल्पनाचित्र रंगवू लागले. परत वाटायचे नकोच काही, आहे ते सर्व काही व्यवस्थित आणि छान लागले आहे. एकाच खोलीत राहायचे आणि ते सुद्धा दोन वर्षाकरताच म्हणून आम्हाला जास्तीचे सामान घ्यायला नको असे वाटत होते. खूपच गिचमीड होईल म्हणून साधा डेस्कटॉपही घेण्याच्या विचारात नव्हतो. पण म्हणतात ना, निर्जीव वस्तूचेही ऋणानुबंध असतात! काही दिवसांनी आमच्या शेजारी राहणारा तो अमेरिकी राहते घर सोडून निघून चालला होता. त्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला जे सामान हवे आहे ते घेऊन जा. त्यातले माझे जे काही आहे ते मी थोडेफार घेऊन जाणार आहे. बाकीचे सामान मित्रांनी दिले होते आणि तेही आता इथे राहत नाहीत. माझ्यात परत उत्साह संचारला व थोडाफार तरी बदल आपण आपल्या जागेत करूच म्हणून त्याच्याकडचे टेबल, व चार फोल्डिंगच्या खुर्च्या असलेले फोल्डिंग डायनिंग टेबल आणले. त्याच्याकडचे सामान आमच्याकडे हालविल्याने त्याचा भारही कमी झाला. त्या अमेरिकन विद्यार्थ्याकडून सामान आणल्यावर परत सामानाची पुनर्रचना केली. ओट्याच्या बाजूला जेवणाचे टेबल ठेवले व पलंगाच्या दुसऱ्या बाजूला खिडकीशेजारी लाकडी टेबल ठेवले. टेबल आल्याने संगणक खरेदी करायचा ठरवला व खरेदी केला. पहिलावहिला डेस्कटॉप घरी आला. तारांची जुळवाजुळव झाली व संगणक सुरू झाला. आमचा संगणक यायला आणि मनोगत संकेतस्थळाची ओळख व्हायला एकच गाठ पडली. चार फोल्डिंग खुर्च्यांपैकी दोन खुर्च्या भिंतीमधला जो रिकामा कप्पा होता त्यात अगदी सहजपणे मावून गेल्या. दोन खुर्च्यांपैकी एक ह्या टेबलासमोर ठेवली व एक जेवणाच्या टेबलाशेजारी ठेवली. जेवणाच्या टेबलावर आमचा पहिलावहिला खरेदी केलेला रेडिओ कम टेपरेकॉर्डर पण दिमाखात बसला. संगणकावर म्युझिक इंडियावर हवी तितकी आणि हवी तशी गाणी ऐकणे सुरू झाले. झालेला स्वयंपाक डायनिंग टेबलावर झाकून ठेवून तिथेच ताट वाढून खुर्चीवर बसून जेवायला मजा यायला लागली. या चार फोल्डिंग खुर्च्या व दुसरी आरामदायी खुर्ची असल्याने मित्रमंडळींना गप्पा मारण्यासाठी बोलावू लागलो. अनेक जेवणावळी होऊ लागल्या. याच घरात होळीच्या दिवशी केलेला पुरणपोळीचा बेत गाजला. त्या दिवशी आम्ही दहा जण जेवायला बसलो होतो.
आणि एके दिवशी हे राहते घर सोडून जायची वेळ आली. साधारण दोन वर्षे या घरात आम्ही राहिलो. सामानाची बांधाबांध झाली. आमचे नसलेले फर्निचर मित्रमंडळींना देऊ केले. एकेक करत सर्व सामान हालले. निघण्याच्या दिवशी एका मैत्रिणीने आमच्या घरात शेवटची कॉफी केली. कॉफी घेताना रिकाम्या घराकडे बघवत नव्हते. डेस्कटॉप, टीव्ही व काही सामान कारमध्ये घातले आणि निघालो नव्या शहराकडे! कारमध्ये बसणार तितक्यात मी परत एकदा घराला पाहून घेते म्हणून शेवटचे डोळे भरून घराला पाहिले. एकेक करत सर्व आठवत होते आणि टचकन डोळ्यात पाणी आले. घराची किल्ली मैत्रिणीला दिली आणि सांगितले की अपार्टमेंटच्या ऑफीसमध्ये नेऊन दे. तिला टाटा केले. नव्या शहराच्या वाटेवर या घरात घडलेल्या गोष्टींची सारखी आठवण येत राहिली.
अजूनही जेव्हा जेव्हा मला त्या घराची आठवण होते तेव्हा तेव्हा नकळत मी गुणगुणायला लागते "खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू!! " या घरामध्ये आम्हाला का यायला लागले ते पुढील दुव्यावर वाचा.ते तीन महिने!
- रोहिणी गोरे