सुप्त गुणांच्या शोधात: पृष्ठ (२ पैकी) २
आताही हे सगळे आठवले आणि लक्षात आले की ते प्रांत आपले नव्हतेच. तरी पण आमचे उत्खनन चालूच होते. नाच, गाणे, नाटक झाले. नंतर आम्ही आमचा मोर्चा लिखाणाकडे वळवला. आम्ही आठवीत होतो तेव्हाची गोष्ट. आमच्या शाळेत दरवर्षी एक हस्तलिखित निघत असे. म्हणजे, मुलांनी लिहिलेल्या कविता, गोष्टी, विनोद, चुटके संकलित करून, एकसारखे कागद घेऊन ज्यांचे अक्षर छान आहे, त्यांच्याकडून ते लिहून घ्यायचे आणि मग त्याला बाइंड करून ते सर्वांना वाचायला द्यायचे. परीक्षा झाल्यावर ते सर्वांना वाचायला मिळत असे. आपणही एखादी कविता लिहावी असे आमच्या मनाने घेतले. त्यावेळी भारत चीन युद्ध सुरू होते. त्यामुळे सगळीकडे तोच एक चर्चेचा विषय होता. आम्ही पण त्याच विषयावर एक कविता लिहिली. ती अजूनही आम्हाला आठवते.
‘लाल चिन्यांनो भारताच्या वाटेस जाऊ नका
तुम्हाला हो कुठुनी सुचलाय हा धंदा? ’
आणि पुढे बरेच काही... अशा प्रकारची ती कविता होती. आमच्या मैत्रिणींना पण ती कविता खूप आवडली. दातार नावाच्या आमच्या एक बाई होत्या. त्यांच्याकडे आम्ही ती दिली. काही दिवसांनी बाईंनी आम्हाला वर्गात उभे केले आणि विचारले,
‘काय गं कविता तूच लिहिली आहेस ना..? ’
आम्ही म्हटले. ’हो’.. आम्हाला वाटले की बाईंना पण आपली कविता आवडली असावी.
‘खरे ना..? ’ त्यांनी पुन्हा विचारले.
‘हो खरेच! ’ आम्ही ठासून म्हणालो, पण आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच. ‘काय झालं बाई..? ’ आम्ही विचारले.
‘काही नाही, माझ्या मुलाने ती वाचली आणि तो म्हणाला की त्याच्या मित्राने पण अगदी तशीच कविता केली आहे. ’ आम्हाला एकदम याचा धक्काच बसला. बाईंचा तो मुलगा, त्याचा तो कोण मित्र, कुणाकुणालाच आम्ही ओळखत नव्हतो. अजूनही आमचे तेच ठाम मत आहे. आम्ही अगदी प्रामाणिकपणे बाईंना सांगू लागलो की ती कविता आम्हीच लिहिली आहे, पण बाई मानायला तयारच नव्हत्या. अर्थातच त्या हस्तलिखितामध्ये आमची कविता समाविष्ट होऊ शकली नाही. (आताही आम्ही कुठे काही लिहून पाठवले आणि ते साभार परत आले तर आम्ही एवढे मनाला लावून घेत नाही. आमच्या मनाची अशी तयारी करणाऱ्या त्या बाईंचे आभार मानावे तेवढे थोडेच. ) त्यानंतर बरेच दिवस आम्ही काही लेखन करण्याचा धसका घेतला होता. हातात पेन घेतले की मनात विचार यायचा, हे आणखी असेच कुणी लिहिले असेल तर?
आमच्या सुप्त गुणांच्या शोधाच्या या उत्खननाला आणखी जोर चढला. हे सगळे शाळेतले झाले. त्यानंतर आम्ही आमचा मोर्चा कॉलेजकडे वळवला. कॉलेजचे वारे काही वेगळेच. काय करू अन काय नको असे आम्हाला झाले होते. पहिल्याच वर्षी आम्ही वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. ती स्वयंस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा होती. वेगवेगळया विषयांच्या चिठ्ठ्या टाकलेल्या होत्या, त्यातीलच एक चिठ्ठी उचलून त्यात जो विषय असेल त्यावर आपण बोलायचे अशी ती स्पर्धा होती. जो काय विषय येईल त्यावर आम्ही उत्कृष्ट बोलू असा अति आत्मविश्वास आम्हाला होता. आमचे नाव पुकारले गेले आणि आम्ही एखाद्या जेत्याच्याच आवेशात स्टेजवर गेलो. चिठ्ठी उचलली. सरांनी आमची चिठ्ठी उलगडली आणि विषय वाचून दाखवला - ‘मी प्रेमविवाह करणार’ आता बोला! अहो, या विषयावर काय बोलणार? आणि तेही कॉलेजमध्ये? पुन्हा पहिल्याच वर्षी? नुसता विषय ऐकताच मुलांनी बाके बडवायला सुरुवात केली. या विषयावर मैत्रिणींमध्ये बोलणे वेगळे आणि कॉलेजच्या स्टेजवर बोलणे वेगळे. आता प्रेमविवाह करणार म्हणावे तरी पंचाईत आणि नाही म्हणावे तरी पंचाईत. पुढची चार वर्षे काकूबाईचा शिक्का बसणार. आम्ही काय बोलणार ते ऐकायला सगळ्यांचे कान टवकारलेलेच होते. एकदम आमच्या हातापायाला घाम फुटला, घशाला कोरड पडली आणि खाली मान घालून मुकाट्याने आम्ही आमच्या जागेवर येऊन बसलो. मग तर मुलांना बाके बडवायला आणखीच जोर आला. काय काय एकेक प्रसंग आले आमच्यावर! या उत्खननात आमच्या हाती काय काय रत्ने लागत होती! अंतर्मुख होऊन शोध घेण्याचा आमचा उत्साह आणखीच वाढला.
लहानपणीच्या नाटकाची आठवण असूनही कॉलेजमध्ये सरांनी जेव्हा नाटकात काम करशील का म्हणून आम्हाला विचारले तेव्हा नाही म्हणायचे आमच्या जीवावर आले. जणू काही आम्ही सरांवरच फार मोठे उपकार करतो आहोत असे आम्हाला वाटायला लागले कारण त्या वेळी नाटकात काम करायला मुली जास्त तयार नसत. शिवाय असाही विचार केला की काय हरकत आहे आणखी एकदा नशिबाची परीक्षा बघायला? अशा दुटप्पी धोरणाने आम्ही सरांना आमचा होकार कळवला. पु. लं. चे ‘तुझे आहे तुजपाशी’ हे नाटक बसवले होते आणि त्यातला गीताची भूमिका आम्हाला मिळाली होती. आता तर जणू काही आम्ही हवेतच उडत होतो. आत्तापर्यंतची सगळी कसर भरून काढायची असा निश्चय करून आम्ही कामाला लागलो. आमच्या मेहनतीत कुठेही कसूर ठेवली नाही. नाटकाचा दिवस उजाडला. पहिले दोन अंक खूपच छान झाले. तिसऱ्या अंकासाठी पडदा वर झाला आणि एकदम काय झाले कुणालाच काही कळले नाही. तिसऱ्या अंकात घात झाला. (हा तिसरा अंक आमच्या मुळावर होता हे आम्हाला तेव्हा जाणवले, पण पुढे दोन अंकी नाटकात काम करायची संधीच मिळाली नाही. ) आमचे नाटक खूप छान होत आहे हे बघून प्रतिस्पर्धी लोकांनी (हे प्रतिस्पर्धी कोण, कशासाठी त्यांनी हे सर्व केले, हेही आम्हाला त्यावेळी कळले नाही. ) आमच्या नाटकात शामचे काम करणाऱ्या मुलाला भरपूर दारू पाजली. त्यामुळे शाम त्याचे संवाद ओव्हरऍक्टिंग करत म्हणू लागला. प्रेक्षकांमधून जोरजोरात हशा, टाळ्या, शिट्ट्या, आरडाओरड ऐकू येऊ लागली. शेवटच्या अंकामधले गंभीर संवाद कुणी गंभीरपणे ऐकूनच घेतले नाहीत. कसेबसे नाटक एकदाचे पार पडले. आमचे गीताचे काम छान झाले (असे लोक म्हणत होते), पण त्याला शामची साथ अशी मिळाल्यामुळे आमचा मूड गेला. शिवाय कितीतरी दिवस मुलांचे चिडवणे चालू होते. पुन्हा नाटकात काम करणे तर सोडाच पण नाटक बघायला जायचे म्हटले तरी आमच्या हातापायाला घाम फुटायला लागे.
तर असा हा आमच्या सुप्त गुणांच्या शोधातल्या प्रवासाचा पहिला टप्पा. दुसरा टप्पा सुरू झाला तो लग्नानंतर. प्रेमविवाह वगैरे नाही तर सरळ आईवडिलांनी बघून दिलेल्या मुलाशीच लग्न लागले. सासरच्या माणसांना आपली हुशारी दाखवावी, म्हणजे त्यांना आपण कोणी आहोत हे कळेल, आपल्यात जे काही गुण असतील त्याची काही तरी कदर होईल ही अपेक्षा. त्याप्रमाणे आमचा पहिला मोर्चा वळला तो स्वयंपाकघराकडे. (नाही तरी हातात दुसरे काय होते म्हणा! ) पण काहीही केले तरी प्रत्येक वेळी यांचे आपले एकच पालुपद, ‘आईच्या हाताची चवच काही वेगळी. आईसारखं तुला जमणारच नाही. ’ ‘थालीपीठ करावं तर आईनेच! ’ आणि ह्यांनी असे काही म्हटले की त्यावर पुन्हा सासूबाईंची लांबलचक पेरणी. 'मला असे आवडत नाही अन तसे आवडत नाही', 'नुसता पदार्थ बघूनच मला कळते हो तो पदार्थ कसा झाला ते. ', 'माझ्यासारखा स्वयंपाक कुणालाच जमत नाही’, 'चैत्र गौरीसमोर फराळाचं ठेवलं तर त्याला दृष्ट लागायची’, ’एकदा पारण्याला लाडू बिघडले तर (तुमच्या हातचे लाडू बिघडलेच कसे? ) ऐन वेळेला मी एकटीने पन्नास माणसांसाठी जेवणात साखरभात केला होता. ’ (साखरभात करायलासुद्धा दोघीजणी लागतात हे आम्हाला माहीत नव्हते हो! ) काही बोलायला जावे तर हे म्हणायचे 'भाषणबाजीत तुझा हात कुणी धरावा? ' शंभर शब्द सासूबाईनी बोलल्यानंतर आपण क्वचित तोंड उघडायला जावे तर लगेच त्या म्हणणार ‘तुझ्याशी कुणी वाद घालावा बाई! ’.
तर असे हे सगळे रहाटगाडगे सुरू होते. पुढे मुली मोठ्या झाल्या. त्यांना काहीबाही करून खाऊ घालावे म्हटले तर त्यांचे कधी खाण्यात लक्षच नसायचे. सारखे आपले अभ्यास, मैत्रिणी, फिरणे हेच चालू असायचे. त्या सासरी गेल्या आणि आपापल्या संसारात रममाण झाल्या.
मनात विचार यायला लागले, झाले! आता आपले काय राहिले आहे? पण हळूहळू एक गोष्ट लक्षात यायला लागली की स्वयंपाकावरचे टोमणे बंद झाले होते. मध्ये खोड घालायला सासूबाई नव्हत्या. ह्यांना माझा स्वयंपाक आवडू लागला होता. (पण त्यांनी तसे कधी बोलून दाखवले नाही कारण आईची शिकवण! 'बायकांची तारीफ केली की त्या शेफारून जातात! ' (ह्या कोण होत्या मग? बुवा? ) मग आम्ही न बोलण्याचे व्रत एकदा घेतले ते कायम ठेवले.
माझी फिरकी घेण्यासाठी हे म्हणत ‘रोज रोज एकाच बायकोच्या हातचा स्वयंपाक खाऊन कंटाळा कसा येत नाही गं माणसाला? ’ आम्ही पण आता संसारात चांगल्याच मुरलो होतो. आम्ही म्हटले, 'हो खरंच बरोबर आहे तुमचं म्हणणं. खरंच कंटाळा येत असेल, पण रोजरोज तसं करून घालणारं कुणी तरी हक्काचं मिळायला पाहिजे. नाही तर मग त्यासाठी दुसरं लग्न करावं लागेल. आणि एवढं करूनही पुन्हा तिच्या हातचं नाही आवडलं तर? कारण पहिलीच्या हातचं खायची सवय झालेली असते! ’ असे काही तरी बोलून त्यांना निरुत्तर केले म्हणजे मग सासूबाईंवर सूड उगवल्याचा आनंद आम्हाला मिळत असे.
खरे तर आम्ही या शोधात अजूनही मग्न झालो असतो, पण हाती काहीच लागत नव्हते. आमच्या या गुणांचा निखारा काही फुलत नव्हता. आता काय? दहा गेले, पाच राहिले असे आपले आयुष्य! मुली त्यांच्या संसारात गर्क, माहेरी यायला त्यांना कुठला वेळ? पण फोन मात्र येतात. 'आई, तू पिठल्याच्या वड्या कशा करतेस गं? मी करून बघितल्या, पण तुझ्यासारख्या जमतच नाहीत. ' ’तुझ्या हातच्या आंबट वरणाची चव जिभेवरून अजून जात नाही बघ. खूप दिवस झाले तसं वरण खाल्लंच नाही. ’ ’आई, मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते की बेसनाचे लाडू करावे तर आमच्या आईनेच! आणि कांद्याचे थालीपीठ तर.. वा.. वा.. ’ ’आई, तू येताना चकल्या घेऊन ये आणि खूप दिवस राहायला ये. तुझ्या हातचं जेवण जेवायचंय पोटभर. केव्हा एकदा तुझ्या हातचं जेवीन असं झालंय. ’
आम्ही मग मुलींकडे जायची तयारी करतो. कधी हिच्याकडे तर कधी तिच्याकडे. तिथे आणखी एक आकर्षण असते. आमची दुधावरची साय, आमची नातवंडे. त्यांच्यामध्ये मग आम्ही रंगून जातो. त्यांना तर प्रत्येक गोष्टीला आजीच हवी असते. झोपताना गोष्ट आजीनेच सांगायला हवी. कधी कधी त्याच त्या गोष्टीचा कंटाळा आला तर नवीन काहीतरी जोडून सांगावे लागे. अंगाई गीत आजीनेच म्हणायला हवे आणि...
असे करत असतानाच अचानक आम्हाला आमच्या सुप्त गुणांचा शोध लागला आमच्या नातवंडांच्या डोळ्यांत! त्यांच्या दृष्टीने त्यांची आजी म्हणजे जगातील सगळ्यांत सुंदर गायिका, लेखिका आणि हावभाव करून गोष्ट सांगणारी सर्वात चांगली अभिनेत्री! जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आम्हाला तरी आयुष्यात याशिवाय आणखी काय हवे होते?
- नंदिनी देशमुख