'शब्दानंदो'त्सव: पृष्ठ (२ पैकी) २

डॉ. दवे यांच्या ग्रंथानुसार 'शारंग' व 'सारंग' हे एकमेकांचे पर्यायवाची असून (little)bustard व (grey)heron असे त्याचे दोन अर्थ आहेत. मी त्या दोहोंमध्यें भेद करून, 'शारंग' म्हणजे (little)bustard व (grey) heron  असे त्याचे दोन अर्थ आहेत. मी त्या दोहोंमध्यें भेद करून, 'शारंग' म्हणजे (little) bustard व 'सारंग' म्हणजे (grey)heron अशी सोईस्कर व्यवस्था केली. 'भरद्वाज' आणि 'भारद्वाज' या दोन शब्दांच्या वापरांत बराच ढिलेपणा व स्वैरपणा आहे. सर्वसाधारणपणें पक्षीतज्ज्ञ मंडळी greater coucal किंवा crow-pheasant म्हणजे 'कुक्कुडकुंभा' याला उद्देशून 'भरद्वाज' व 'भारद्वाज' असे दोन्ही शब्द वापरतात. मराठी काव्यसृष्टीत मात्र वेगवेगळ्या कवींनी वेगवेगळ्या वेळीं कधीं 'कुक्कुडकुंभा' म्हणून तर कधीं skylark या पक्ष्याला अनुलक्षून हे शब्दप्रयोग केले आहेत. 'कुक्कुडकुंभा' हा पक्षी शुभशकुनाचा मानला जातो. 'माझ्या भारद्वाज राजा' या कवितेत बा. भ. बोरकर म्हणतात -

".......

खुणाविसी शब्दाविणें शुभसूचक शकुन... "

तर 'भारद्वाजास' या शीर्षकाच्या कवितेत बालकवी म्हणतात -

"भारद्वाजा विहगा माझ्या, धन्य जगीं तू मज गमसी
फुलल्या बागा या तरुरांगा त्यांवरतीं भरभर फिरसी, "

हे वर्णन निःसंशय कुक्कुडकुंभ्यालाच लागू पडतें; पण तेच बालकवी 'फुलराणी'च्या विवाहसोहळ्याच्या निमित्ताने--

'..... नाचुं लागले भारद्वाज, --वाजविती निर्झर पखवाज'

असं वर्णन करतात. तसंच, त्यांच्या 'अरुण' कवितेंतला 'भारद्वाज' हा lark सारखा गायक पक्षी दिसतो -

ऊठ कोकिळा! भारद्वाजा! ऊठ गडे आतां
मंगल गानीं टाकीं मोहुनी जगताच्या चित्ता!

ह्या 'भरद्वाज/भारद्वाज' संभ्रमामुळे माझ्या मनाची द्विधा स्थिती झाली. त्यावेळीं दोन शास्त्रीय कोशांचं मला साहाय्य झालं. जैन मुनी हंसदेव-विरचित 'मृगपक्षिशास्त्र' या ग्रंथात (संपा. मारुती चितमपल्ली- प्रका. साहित्य संस्कृती मंडळ) आणि 'अमरकोशात'हि 'भरद्वाज' म्हणजे 'कुक्कुडकुंभा' असा अर्थ दिलेला असून, कै. वा. शि. आपटे यांच्या संस्कृत-इंग्रजी कोशात 'भारद्वाज' म्हणजे skylark असा अर्थ दिलेला आहे. म्हणून अखेरीस मीं 'भरद्वाज'= crow-pheasant अथवा greater coucal आणि भारद्वाज = skylark असे अर्थ निश्चित केले.

chiffchaff नांवाच्या पक्ष्याला मला कुठेंतरी 'पाणफुटकी' असा प्रतिशब्द सांपडला. 'फुटकी' म्हणजे चिमणीसारखा पक्षी. पण हा पक्षी जलचर नसतानाहिं त्याला 'पाणफुटकी' असं कां म्हणतात असा विचार माझ्या मनात आला. पण ही बहुतेक अपसंज्ञा/ चुकीची संज्ञा (misnomer) असेल असं म्हणून मीं माझं समाधान करून घेतलं आणि हिंदीत मला स्वतंत्र पर्याय सांपडला नाही म्हणून मीं 'जलफुटकी' असा प्रतिशब्द तयार केला. त्याच सुमारास कधींतरी सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ श्री. किरण पुरंदरे माझ्या घरीं आले होते. त्यांना मीं ती शंका विचारली. ते उत्स्फूर्तपणें उद्गारलें -"अहो, ती 'पानफुटकी' असेल. " क्षणभर मी स्तंभित झालें आणि काय आश्चर्य त्या पक्ष्याचं शास्त्रीय नांव (Phylloscopus collybita) पाहिल्यावर तर किरण पुरंदरेंच्या विधानात पुरेपूर तथ्य असल्याबद्दल माझी खात्रीच पटली. कारण ग्रीक Phyllo- ह्या उपसर्गाचा अर्थ 'पान' (leaf) असाच आहे. अक्षरशः मी घोडचूक करतां करतां पुरंदऱ्यांमुळे बचावलें. अखेरीस मीं chiffchaff ला 'पातफुटकी'(हिं. ) व 'पानफुटकी' (म. ) असे प्रतिशब्द घेतले. भाषिक व्याकरणाचा बाऊ कशासाठीं करायचा असं म्हणणाऱ्यांची सध्या चलती आहे. पण 'पाण' आणि 'पान' या आवळ्याजावळ्यांमधलं महदंतर पाहिल्यावर तर मला व्याकरणमाहात्म्य सांगणारं संस्कृत वचनच आठवलं-

यद्यपि बहु नाधीषे तथापि पठ पुत्र व्याकरणम्।
स्वजन: श्वजनो माऽभूत्सकलं शकलं सकृत् शकृत् (सकृच्छकृत्)॥

ह्या शाब्दिक वनसृष्टीतून हिंडत असताना अनेकदा पशुपक्ष्यांचे आवाज कानांवर पडत होते. 'कावकाव' करणारा कावळा व 'चिवचिव' करणारी चिमणी सर्वांनाच माहीत आहे. पण त्याहिव्यतिरिक्त 'हुप्या वांदर', 'कारव', 'पेर्तेव्हा', 'घुमण', 'हुमण ' अशीं काही नादानुकारी प्राणीनामं सांपडलीं, तेव्हा खूप मजा वाटली.

पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या संवेदना शब्दबद्ध करणं हा मानवी शब्दव्यवहाराचा प्रधान हेतू असतो. 'बोलीं अरूपाचे रूप दावीन' ही तर ज्ञानेश्वरांची प्रतिज्ञाच होती. नादानुकारी शब्दांचा मागोवा घेत मी जेव्हा या शब्दसृष्टीत वावरलें तेव्हा इंग्रजी, हिंदी व मराठी -- ह्या तीनही भाषांतून मला विपुल शब्दसंपदा लाभली. त्यामुळे जिवंत प्राण्यांचे आवाज व निर्जीव वस्तूंचे ध्वनी हे दोन्ही दर्शवणारे दोन उपविभाग करतां आले. विशेष म्हणजे एखाददुसरा अपवाद वगळतां, मला तीनही भाषांतील नादानुकारी शब्दांत विलक्षण साधर्म्य आढळलं--

उदा. cooey (of jackal) : (सियार की) कूक : (कोल्ह्याची) कुईकुई,  gurgle (of hookah) (हुक्के की) गुडगुड :(हुक्क्याची) गुडगुड. एकंदरींत, मनुष्यस्वभाव आणि मानवी संवेदना ह्या जगाच्या पाठीवर सर्वत्र सारख्याच असतात म्हणायच्या!

अनेक शब्दांचे इंग्रजी शब्दकोशांतले अर्थ तपासत असता व्युत्पत्तीच्या अंगाने मला कित्येक रंजक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इंग्रजीतले कित्येक शब्द हे हिंदी-मराठी वा संस्कृत शब्दांचेच दूरचे आप्त असल्याचं आढळलं. एक लक्षणीय बाब म्हणजे इंग्रजी शब्दांची खरी व्युत्पत्ती वा त्याचा मूलस्रोत कुठलाही असला तरी इंग्रजी कोशकारांनी तो मोकळेपणाने कबूल केला आहे. (उदा. jungle हा मूळचा संस्कृत शब्द आहे, तर nocturnal व 'नक्तंचर' हे तर सरळसरळ एकमेकांचे भाईबंदच आहेत हें उघड दिसतं. )  talipot palm म्हणजे संस्कृतमधला 'तालपत्र वृक्ष' होय. 'घरटें' याचा इंग्रजी प्रतिशब्द nest हा nidus (नायडस) ह्या लॅटीन शब्दावरून आलेला असून, त्याचं संस्कृत 'नीड' म्हणजे 'घरटें' याच्याशीं नातं आहे. ('वसुधैव कुटुंबकम'च्या धर्तीवर रवींद्रनाथांनी स्थापन केलेल्या 'विश्वभारती'चं ध्येयवाक्य आहे - यत्र विश्वं भवती एकनीडम|) व्यावहारिक इंग्रजीत nidus हा स्वतंत्र शब्द नसला तरी, त्यावरून nidicolous व nidifugous असे शब्द सिद्ध झालेले आहेत. इंग्रजी equestrian म्हणजे 'अश्वारोही' हा संस्कृतच्या 'अश्व'कुळातीलच आहे. फारसी 'मुष्क'वरून इंग्रजी musk तयार झाला. संस्कृत 'हस्त' म्हणजे फारसी 'दस्त'. (त्यावरूनच 'दस्तकारी' म्हणजे handicraft. ) संस्कृत 'आदर्शपाषाण' हा 'आरसपान' कसा झाला? ('आदर्श' => आरसा व 'पाषाण' -> पाहन -> पान. )

प्राणिकी - उपविभागात केव्हातरी chorus frog असा शब्द आला. वेब्स्टरच्या शब्दकोशात मला पुढील अर्थ दिल्याचें आढळलें - any of several small North American frogs of the genus Pseudacris having a loud call commonly heard in the spring. तो वाचल्यावर ऋग्वेदातील 'मंडूकसूक्ता'तील बेडकांची आठवण झाली. पावसाळ्यात अनेक बेडकांचें सामूहिक डराँवगान ऐकून सूक्तकाराला यज्ञयागप्रसंगीं सामूहिक ऋचापठण करणाऱ्या याज्ञिकांची उपमा द्यावीशी वाटली. त्यावरून सामगायन करणारे ऋषी आठवले आणि संस्कृत कोशात मला 'सामग' असा शब्द सांपडला. म्हणून मी chorus frog यासाठीं 'सामग दर्दुर' असा प्रतिशब्द तयार केला.

हिंदी व मराठी भाषांना संस्कृत शब्दांची परंपरा असल्याने, बहुतेक वेळां एकच प्रतिशब्द दोन्ही भाषांत चालूं शकतो. असं असलं तरी कांही अपवादात्मक बाबतींत खूप सावधगिरी बाळगावी लागते. 'पेशी' हा एकच शब्द मराठीत cell या अर्थाचा, तर हिंदीत muscle या अर्थाचा द्योतक आहे. 'तंत्र' हा मराठी शब्द technique या इंग्रजी शब्दाशीं निगडित असला तरी, हिंदीत त्याला 'अभिचारविद्या' किंवा 'जादूटोणा' असा अर्थ आहे. 'वहम' ह्या फारसी शब्दाचा मूलार्थ 'संशय' असा आहे. पण त्यावरून हिंदीत आलेल्या 'वहमी' या शब्दाला 'संशयखोर' (शक्की) असा, तर मराठीतील 'वहिमी' शब्दाला 'संशयित' (suspect) असा अर्थ प्राप्त झाला आहे. (विविधतेतून एकता की एकतेतून विविधता? )

विश्वामित्राने आपल्या तपोबलाने प्रतिसृष्टी निर्मिली अशी पुराणकथा सांगतात. मानवनिर्मित शब्दसृष्टी ही एक प्रतिसृष्टीच आहे.

'आता वंदू कवेश्वर। शब्दसृष्टीचे ईश्वर' असं रामदासस्वामी म्हणतात. पण ह्या कवीश्वरांनी निर्मिलेली शब्दसृष्टी भावी पिढ्यांना पुरून उरावी म्हणून शब्दकोशाचं प्रयोजन असतं -

अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात्॥

भाषिक कोशाचा लोकांनी वापर केला तर तो वृद्धिंगत होत जातो व तसा वापर केला नाही तर तो क्षय पावतो असा हा विलक्षण कोश (खजिना) आहे. अशाच एका कोशात मी गेलीं बारा वर्षं स्वतःला गुंतवून घेतलं होतं व प्रदीर्घ काळ मी त्या 'शब्दानंदा'त डुंबत होते. पण कोशावस्था संपल्यावर मी बाहेर आले तेव्हा बाह्य जगाचं भान आलं आणि डॉ. सॅम्यूएल जॉन्सन ह्या कोशपितामहाचे शब्द आठवले -
"I am not yet so lost in lexicography as to forget that words are the daughters of the earth, and things are the sons of heaven."
(Dictionary - Preface)


सत्त्वशीला सामंत