काळी - पिवळी: पृष्ठ (२ पैकी) २

कुठून आणि कसा पण कली शिरला. टॅक्सीवाल्यांनी आपला नेम सोडला आणि लबाडी, अरेरावी सुरू झाली. मापक बिघडविणे वा गतिमान करणे, यायला नकार देणे, अवाजवी भाडे मागणे हे प्रकार सर्रास घडू लागले. पाऊस व पावसाने पाणी भरल्यावर रेल्वे वाहतूक कोलमडताच दाम दुपटीने पैसे मागण्याची वृत्ती बळावली. इकडे पैसा मोठा होत होता, मुंबईकर हळू हळू टॅक्सी गरजेची करून बसला होता, नाइलाजाने सगळे सहन करीत होता. विमानतळावरून घेतलेले भाडे म्हणजे टॅक्सीवाल्यांना पर्वणी झाली होती. तेव्हा आगाऊ पावतीची सोय विमानतळावर नव्हती. गाडी निघाल्यापासून सुरुवात व्हायची "साब, छे घंटे बाद नंबर लगा है, समझके दे देना". मग पोचल्यावर हुज्जत. प्रवाशाने दाराला हात घातल्यावर उर्मटपणे "किधर जानेका है? " असे विचारत व मग मान हालवत "नही जाना है" असे त्रस्त चेहऱ्याने सांगायला सुरुवात झाली होती. एकीकडे टॅक्सी व्यवसाय मेहनती आणि प्रामाणिक लोकांच्या हातातून लबाड व झटपट पैसा कमावू पाहणाऱ्यांच्या हातात जात असतानाच उपनगरांमध्ये रिक्षासुर प्रकटला. दिवसागणिक पेट्रोलचे दर वाढत होते. पेट्रोल ऐवजी डिझेल वा इंधनवायूवर चालणारी यंत्रे आली. मात्र नवे यंत्र म्हणजे अधिक पैसा. तो घातला नाही तर चाकाला खीळ ही बसणारच. मुळात टॅक्सी हा व्यवसाय केवळ मेहनतीचा न राहता ती गुंतवणूक झाली, धनिकांनी टॅक्सी खरेदी केल्या आणि त्या चालवायला द्यायला सुरुवात केली. बदलत्या परिस्थितीने टॅक्सीवाला गांजू लागला. खरा फटका दिला तो रिक्शाने. जवळपास अर्ध्या किमतीत जाणाऱ्या त्या वाहनाने टॅक्सीला टक्कर दिली आणि जेरीसही आणले. जनतेची सहानुभूती गमावलेली होती. बघता बघता उतरतीची कळा लागली आणि टॅक्सीची उतरण सुरू झाली. मुंबईकराचा तोरा मावळू लागला. इथल्या कोऱ्या करकरीत टॅक्स्या वाढत्या वयाबरोबर जराजर्जर होऊ लागल्या.

एकीकडे रिक्षा, दुसरीकडे बेस्टने सुरू केलेल्या सीएसटी(तेव्हाचे व्हीटी)/चर्चगेट ते नरिमन पॉइंट अथक सततच्या फेऱ्या आणि दिवसागणिक वाढणारे भाडे यामुळे धंद्यावर परिणाम झाला. मुळात लोकांचा विश्वास उडाला. टॅक्सी म्हणजे मापात पाप हे मुंबईकराच्या मनात पक्के बसले आणि तो पर्याय शोधू लागला. जे शहरात तेच लांबच्या प्रवासात. फियाटच्या मागच्या बाकावर तिघांची गिचमीड अव्वाच्या सव्वा पैसे देऊनही सहन करायला नाखुष असलेल्या प्रवाशांना प्रथम एशियाड आणि नंतर शिवनेरीचा पर्याय सापडला. भरीला खाजगी बसेसही वाढता राबता हाताळायला उतरल्या. दुसरीकडे रेल्वे गाड्याही वाढल्या. बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती टॅक्सीवाल्यांची झाली. निळी - रुपेरी गारवा घेऊन आली आणि धनिकांची लाडकी झाली. मुलुंड घाटकोपरचे शेअरबाजारवाले गाडी घेण्यापेक्षा रोज टॅक्सीने जा ये करू लागले. टॅक्सीवाला रोजचा बांधलेला. त्यालाही नक्कीचे काम मिळाले. टॅक्सीवाल्यांचे दुसरे खास गिहाईक म्हणजे सरकारी अधिकारी. संध्याकाळी बॅलार्ड पियरला वणवण करूनही सीएसटीसाठी टॅक्सी मिळायची नाही. बेटे रांगेने उभे असायचे पण बघायचे देखील नाहीत. कशाला बघतील म्हणा? ओल्ड कस्टम हाऊसमधली, दिवसभरात कमावलेला पैसा घेऊन, वाटेत ’देवळात तीर्थप्राशन’ करून मग घरी जाणारी रोजची बडी गिऱ्हाइके बांधलेली होती!

मात्र हे भाग्य १-२ टक्के टॅक्सीवाल्यांपुरतेच. बदलत्या काळाबरोबर टॅक्सीवाल्यांनी हिंमत करून कर्जे उचलली आणि मारुती, सॅंट्रो वगैरे नव्या गाड्या काळ्या पिवळ्या केल्या आणि गिऱ्हाईकाला खेचायचा प्रयत्न केला. काळ हा जालीम असतो. तुम्ही त्याच्याबरोबर बदला नाहीतर तो तुम्हाला कालबाह्य करतो. २००७ साल उजाडले आणि चकचकीत फिकट हिरव्या रंगाच्या आणि ’टॅक्सी’ असा प्रदीप्त मुकुट धारण केलेल्या मेरू मुंबईत दाखल झाल्या आणि मुंबईकरांनी पसंतीची मान डोलवली. टॅक्सीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली, विरोध केला, निषेध केला पण ते सगळे मेरुला थांबवू शकले नाही. आगाऊ दूरध्वनीद्वारे बोलावताच इच्छीत वेळी दारात गारेगार गाडी उभी राहणार, अचूक भाडे, चालकांचे स्वच्छ रुपडे आणि नम्र वर्तन, नव्या गाड्या यांनी मुंबईकराला जिंकून घेतले. मुळात नावडती असलेली काळी पिवळी आणखी गर्तेत गेली. यशाला वाटेकरी हे असतातच. मेरूच्या पावलावर पाऊल ठेवून गोल्ड, मेगा कॅब आल्या. महिलांनी महिलांसाठी चालविलेली प्रियदर्शिनी आली, मग मोठ्या आकारात स्टार कॅब अवतरली. मग ईझी आणि अखेर टॅब कॅब आल्या. उत्तम सेवा व चांगल्या मोटारी आणि चोख माप देणाऱ्या सेवेला लोक अधिक दाम मोजायला स्वखुशीने तयार झाले, नुसते तयार झाले नाहीत तर. हौसेने तयार झाले! दिसताना भाडे अधिक दिसले तरी गाड्या मापावर चालतात आणि प्रत्यक्षात काळी - पिवळीहून कमी रक्कम मोजावी लागते हे ग्राहकराजा समजून चुकला.

आवडतीची नावडती झालीच होती. आता तिला राजवाड्यातून रस्त्यावर यावे लागले. आई जेवू घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही अशी वेळ आली. असलेली गाडी विकली तर पाच दहा हजाराहून अधिक मिळणार नाहीत हे पक्के माहीत असलेल्या टॅक्सीवाल्यांना आता असेल तशी आणि रोज डागडुजी करून आहे तीच गाडी चालविणे भाग पडले. आज एकेकाळी दिमाखाने फिरणारी काळी पिवळी वृद्धापकाळात मुलांनी घराबाहेर काढलेल्या म्हाताऱ्यागत जगते आहे. हात दाखवून रिक्षा थांबत नाही तेव्हा नाईलाजाने तिला काम मिळते. हात पाय थकले तरी काम चालू आहे. अनेकदा दुसरे काही करता येत नाही तेव्हा मुलगा वडिलांची तीच गाडी पुढे चालविताना दिसतो. मिळणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा मेळ दिवसेंदिवस कठीण होत आहे नव्हे झालाच आहे. निराश झालेला टॅक्सीवाला जेव्हा इरेला पेटून बेदरकारपणे गाडी हाकत नव्या कोऱ्या गाड्यांना छेदत जातो तेव्हा त्याचा राग न येता दया येते. साफ खचलेले टॅक्सीवाले आता अखेर होण्याची वाट पाहत आहेत. भाड्यासाठी एकमेकांशी भांडत आहेत. साम्राज्य लयाला गेले आहे. ज्या दादर टीटी ला ती रुबाबात उभी राहायची त्याच दादरला आता काळी पिवळी अंग चोरून कोपऱ्यात उभी आहे, आणि तिचा मालक शहरात नव्याने आलेला बकरा शोधत भाडे लुटायला फलाटावर गिऱ्हाईक शोधत आहे. पुढच्या खणातले संगीत ऐकविणारे ध्वनिफीतयंत्र कधीच हरपले आहे, उरला आहे तो रिकामा कोनाडा - ’काप गेले आणि भोके राहिली’ या म्हणीचा प्रत्यय आणून द्यायला. एकेकाळी मुंबईची ओळख असलेली काळी पिवळी आता कष्टाने अखेरचे दिवस मोजत आहे. रुंद हातावर कडे वागविणाऱ्या अक्कडबाज मिशांना पीळ देणाऱ्या हसतमुख सरदारजींची जागा आता हडकलेल्या भैय्यांनी घेतली आहे. डाव्या हाताने लीलया चक्र पेलत उजवा कोपरा दारावर घातलेल्या रंगीत रेक्जीनवर विसावता उजव्या हाताने दारावरच्या पन्हळीची पकड घेणारी बोटे काळाच्या पडद्या आड गेली आहेत, उरले आहेत ते पोटासाठी जड चक्र प्रयासाने वागविणारे कृश हात. एखाद दिवशी वर्तमानपत्रात कुणाचे तरी पत्र येते आणि समजते की या मुंबापुरीत एक नव्वद वर्षाचा म्हातारा आजही काळी पिवळी ओढतोय आणि ती त्याच्या संसाराचा गाडा ओढतेय. काळजात गलबलून येते. यांना भविष्य काय? चकचकीत नव्या गाड्या यांना का नकोत? हातावर पोट असलेले हे हात थकल्यावर पोट कोण भरेल? ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांना वाहिले, त्यांचा भार पडत्या काळात कोण वाहणार? मग अचानक विचार येतो, की ते वैभवाचे दिवस कुणी घालविले? त्याला जबाबदार कोण? लोकांपासून दूर ते का गेले? यांना पुन्हा बरे दिवस आले तर पुन्हा हे असेच करतील का?

वस्तू असो वा वास्तू, व्यक्ती असो वा संस्था असो, शंभरी म्हणजे विशेष सोहळा हा असणारच! मोठा समारंभ, आरास, सोहळा, रोषणाई, जल्लोष........ मात्र हे सगळे संपन्न वार्धक्य असलेल्या म्हाताऱ्यांसाठीच! या दुर्दैवी काळी - पिवळीच्या नशिबी हे सुख नव्हते. १९११ साली मुंबईत पहिली टॅक्सी धावली त्याला गेल्या वर्षी १०० वर्षे पुरी झाली. ना कुणी दखल घेतली ना कुणाला त्याचे काही नवल वाटले, ना त्या टॅक्सीच्या रडकथेत काही फरक पडला. पण वयाच्या १०१ व्या वर्षी अशा अनेक प्रश्नांचा भार वाहत काळी- पिवळी आपल्या अखेरच्या क्षणाची वाट पाहत अजूनही जीवाच्या आकांताने धावत आहे.


- सर्वसाक्षी