सगळे आहेत तरी कुठे?: पृष्ठ (३ पैकी) ३
-
तर्क एक - पृथ्वीव्यतिरिक्त प्रगत समाज अस्तित्वात आहेत.
मग आता प्रश्न उभे राहतात की ते कुठे असतील? आजवर आपल्याला त्यांचा वेध का घेता आला नसेल? अशा समाजांना आपला वेध घेणे का जमू शकले नसेल? किंवा त्यांनी आपला वेध घेतला आहे हे आपल्याला माहीतच नसेल का? असे समाज पृथ्वीवर पूर्वीच येऊन गेले असतील का? सध्याही ते लपून आपल्याला न्याहाळत असतील का? वगैरे वगैरे.
-
तर्क दोन - आपली पृथ्वी हा सजीव सृष्टीला जगवणारा, टिकवणारा व प्रगत करणारा असा एकमेव वैशिष्ट्यपूर्ण ग्रह आहे.
त्यामुळे इतरत्र जीवसृष्टी अस्तित्वात असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता तशी ती अस्तित्वातच नाही म्हटल्यावर तिच्या खाणाखुणा सापडणे अशक्यच आहे.
ह्या दोन्ही तर्कांवर उलटसुलट विचार करता आपल्याला अनेक शक्यता सापडतात. अनेकांनी मांडलेल्या अशा विविध शक्यतांचे संकलन अगदी रोचक आणि उद्बोधक ठरावे.
-
परग्रहवासी पृथ्वीवर आहेतच. -
-
आपल्याला ते दिसत नसले तरी ते इथे आहेत.
उडत्या तबकड्या, खोदकाम करताना सापडलेल्या पुरावशेषांवरील चित्रे (उदाहरणार्थ, कोलो (टांझानिया), तस्सिली (सहारा वाळवंट), तोरो म्युएर्तो (पेरू), क्वेरातो (मेक्सिको), सेगो कॅन्यन (यूटा, यूएसए) येथील अश्मचित्रे), गुहांतील भिंतींवर सापडलेली चित्रे (उदाहरणार्थ, पेच मर्ल गुहा (फ्रान्स) वाल कामोनिका (इटली), किएव (युक्रेन) येथील भित्तिचित्रे आणि कोरीवकाम) आणि जगभरातील जुन्या ग्रंथांमधून आलेले उडत्या तबकड्या आणि परग्रहवासीयांचे उल्लेख हा त्यांच्या अस्तित्वाचा ढळढळीत पुरावा आहे. आतापर्यंत परग्रहवासी अनेकवेळा पृथ्वीला भेट देऊन गेले आहेत.
पेरू देशात सापडलेले सचित्र दगड. सौजन्य - http://www.nephilimskulls.com/Articles.asp?ID=151
-
मानवाचे पूर्वज परग्रहवासी होते.
अनेक पिढ्यांपूर्वी ते पृथ्वीवर आले. (पण मग हे मूळ लोक कुठे आहेत? )
-
परग्रहवासीयांना आपण सापडले आहोत. मात्र त्यांनी आपल्याशी अजून संपर्क केलेला नाही.
नव्या, तरूण वंशांशी संपर्क करण्याचे त्यांचे काही नियम असतील (Prime Directive). सध्या ते आपल्याला लपून न्याहाळत असतील (प्राणीसंग्रहालय तर्क वा Zoo Hypothesis). आपल्या योग्यतेची खात्री पटताच योग्यवेळी ते प्रकट होतील (First Contact).
-
-
ह्या जगात पृथ्वीवरच केवळ सजीव सृष्टी आहे आणि मानवसमाज हाच एकमेव प्रगत समाज आहे. परग्रहवासी अस्तित्वातच नाहीत. अर्थात ही अतिशयोक्ती वाटते. पण असे का असेल ह्याबाबतचे तर्क पाहू -
-
जीवांच्या निर्मितीसाठी पोषक परिस्थिती असणारे ग्रह अगदीच दुर्मिळ आहेत.
प्रत्येक ताऱ्याभोवती ग्रह फिरत नाहीत. ताऱ्यांभोवतीचे वसतीयोग्य प्रदेश फार अरुंद असतात. तेव्हा त्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह नेमका ह्या अरुंद पट्ट्यात असणे फार दुर्मिळ आहे.
(मात्र, ताऱ्यांची आणि ग्रहांची एकूण संख्या पाहता हे अजिबात अशक्य नाही. आपला सूर्य अगदी सामान्य तारा आहे. सूर्याहून वयाने आणि आकाराने मोठे आणि लहान, असंख्य तारे विश्वात आहेत. तेव्हा त्यातले काही ताऱ्यांच्या वसतीयोग्य प्रदेशात असणे अगदीच शक्य आहे. )
-
पृथ्वीवर योग्य परिस्थिती होती म्हणून जीव निर्माण झाले. सजीव निर्माण होणे फार सोपे नाही.
(मात्र, रसायने ही रसायने असतात. पृथ्वीवर पाण्याच्या एका रेणूत हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू असतो तसेा विश्वात कुठेही पाणी असेच असते. तेव्हा पृथ्वीवर जर योग्य रसायने एकत्र येऊन आदिसूप (Primordial Soup) तयार होऊन जीवनिर्मिती होऊ शकते तर अशी परिस्थिती इतरत्र उद्भवणेही सहज शक्य आहे. )
-
दीर्घिकांमध्ये सतत घडामोडी चालू असतात. तिथे गॅमा किरणांचे उत्सर्जन काय होते, अशनी ग्रहांवर काय आदळतात (आठवा डायनसॉर कसे नष्ट झाले ते). तेव्हा जीवसृष्टी निर्माण झाली तरी ती टिकणे फार दुर्मिळ असते.
-
पृथ्वीचा मोठा चंद्र हे एकमेवाद्वितीय संयोजन (combination) आहे.
-
आकाशगंगेतील आपणच पहिले प्रगत जीव आहोत.
उत्क्रांतीचा वेग खूपच मंद असतो. उत्क्रांतीसाठी योग्य परिस्थितीची आवश्यकता असते. तेव्हा सजीव निर्माण झाले आणि जगले-तगले तरी त्यांची बुद्धी उत्क्रांत होऊन प्रगत समाज तयार होतीलच असे नाही.
-
-
परग्रहवासी अस्तित्वात आहेत, पण त्यांना आपल्याशी वा आपल्याला त्यांच्याशी संपर्क करणे जमलेले नाही. का? त्याची संभाव्य कारणे पाहू -
-
इतरत्र जीवसृष्टी तांत्रिकदृष्ट्या पुरेशी प्रगत नसावी.
-
समजा असली, तरी प्रकाशाच्या वेगाला मर्यादा आहे. आपण अजून प्रकाशाच्या वेगानेही प्रवास करू शकत नाही. जरी विद्युतचुंबकीय लहरींद्वारे संपर्क करायचा झाला तरी लाखो प्रकाशवर्षांचे अंतर कापण्यासाठी लाखो वर्षे लागतात. तोवर इथे पिढ्यानपिढ्या जगून मरतील.
-
प्रगत जीवसृष्टी अस्तित्वात आहेत, पण त्यांना त्यांचे व्याप आहेत, प्राधान्यक्रम आहेत. इतरत्र जीवसृष्टी आहे का ह्याचा विचार करण्याला आणि त्यांचा शोध घेण्याला ते प्राधान्य देत नसावेत. आपणही इतरत्र सृष्टी आहे का हे शोधण्याचा असा कितीसा प्रयत्न करतो? त्यावर पैसा खर्च करण्याला आपण तरी प्राधान्य देतो का? आपल्याला लोकसंख्या विस्फोट, अन्नटंचाई, महागाई, दहशतवाद वगैरे वगैरे अनेक प्रश्न आहेत. त्यांनाही असतील.
-
लहान मुलांना अनेक गोष्टींचे कुतूहल असते. मोठा झाल्यावर मी झुकझुकगाडी चालवीन, वैमानिक होईन, वगैरे वगैरे स्वप्ने तो पाहतो. लहानपणी त्याला ह्या गोष्टी करण्याला मर्यादा असतात आणि ते शक्य होत नाही. पण ट्रेन चालवणाऱ्याचा अपुरा पगार, वैमानिकाला असलेली जिवाची भीती, कामाच्या अनियमित वेळा आणि इतर नाना कटकटी पाहता मोठेपणी ट्रेन चालवणे, विमान उडवणे शक्य असले तरी आता त्याच प्रौढाला त्याची ही स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा राहात नाही. तसाच मानव समाज अजून बाल्यावस्थेत आहे, त्यामुळे आपल्याला आपण विश्वात एकटेच का वगैरे प्रश्न पडतात आणि अनेक मर्यादा असूनही त्यांची उत्तरे शोधण्याचे स्वप्न आपण पाहतो. इतर जीवसृष्टी आता प्रौढावस्थेत असतील आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या शक्य असले तरी इतर ग्रहांवरील जीवसृष्टी शोधण्याची त्यांना इच्छाच उरली नसेल.
-
जसे आपण करत आहोत तसे प्रगत परग्रहवासीयांनी इतरत्र जीवसृष्टी शोधण्याचे प्रयत्न केलेही असतील आणि अजून करतही असतील. पण आपण त्यांना अजून सापडले नसू. आपल्याला तरी ते कुठे सापडले आहेत?
जेव्हा आपण परग्रहवासीयांचा शोध घेऊ पाहतो तेव्हा आपण रेडिओ दुर्बिणींद्वारे अवकाशातून मिळणाऱ्या रेडिओ व इतर स्रोतांचा वेध घेतो. मग त्या लहरींचे विश्लेषण करतो आणि पडताळणी घेतो. ह्या रेडिओ लहरींचा स्रोत प्रत्येकवेळी परग्रहवासीच असतील असे नाही. असला, तरी ह्या रेडिओ लहरी एक तर त्यांच्या अस्तित्वाची खूण म्हणून त्यांनी मुद्दाम प्रसारित केलेल्या असतील किंवा त्यांच्या ग्रहांवर ते एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत असलेल्या रेडिओ लहरींचा अवकाशात फेकला गेलेला तो अंश (leakage) असेल. ग्रहांकडून येणाऱ्या रेडिओ लहरी हा परग्रहवासीयांना शोधण्याचा एक उत्तम मार्ग असला तरी तो सोपा नाही. जसजसे आपण तांत्रिकदृष्ट्या प्रगत होत गेलो तसतसे आपल्या दळणवळणासाठी वापरात असलेल्या रेडिओ लहरींचा अवकाशात फेकला जाणारा अंश कमी करण्यात आपण यश मिळवले. त्यामुळे आपल्या दळणवळणाची प्रत सुधारली हा आपला फायदा झाला. मात्र, परग्रहवासी पृथ्वीकडून येणाऱ्या अशा अंशात्मक रेडिओ लहरींचा वेध घेऊ पाहत असतील तर आता त्यांना मिळाणारा अंश पूर्वीपेक्षा क्षीण झाला. म्हणजे जोवर कोणी आपला वेध घ्यावा ह्या दृष्टीने आपण मुद्दाम असे रोडिओ लहरींचे अवकाशात प्रक्षेपण करत नाही, तोवर आपला वेध घेण्याचे इतरांना जमणे अवघड. शिवाय हे प्रक्षेपणही नेमके कोणत्या दिशेने करावे हे ठरवता येत नसल्यामुळे ते अंदाजाने करावे लागते. म्हणजे बाहेर कुणी असतील तरी आपण त्यांच्या दिशेने प्रक्षेपण केले नसल्याचा संभव खूपच. हे प्रक्षेपण केले तरी ह्या लहरींनी कापलेल्या अंतराबरोबर त्या क्षीण होत जाणार. तेव्हा दूरवर कोणी असले तरी आपल्या लहरी त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड. थोडक्यात काय, तर आपण कुणाचा वेध घेऊ शकणे वा कुणी आपला वेध घेऊ शकणे ही गोष्ट अगदीच अवघड आहे. तेव्हा अजून आपल्याला कुणी सापडले नाही ह्यात काही नवल नाही. तरीही आपला प्रयत्न चालू आहे. न जाणो कधीकाळी सापडतीलही कोणी.
-
आकाशगंगेचे वय आहे १० अब्ज वर्षे. आपल्या पृथ्वीचे वय आहे सुमारे साडेचार अब्ज वर्षे आणि आता आपण ज्याला आधुनिक मानव म्हणतो तो २ लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे. आपली तांत्रिक प्रगती तर गेल्या काही शतकांपासूनची आहे. वैश्विक कालमापनश्रेणी पाहता आपण वयाने आणि पुढारलेपणात फारच तान्हे आहोत. तेव्हा आपल्याला शोधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळच मिळालेला नाही. किंवा, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात प्रवास करत करत परग्रहवासीयांचा संकेत (signal) आपल्यापर्यंत पोहोचायला अजून वेळ असेल.
-
कदाचित ते इतरांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असतीलही. सध्या आपली धाव विद्युतचुंबकीय लहरी, गुरुत्व लहरी, असाधारण गुणधर्म असलेले भौतिक कण (exotic particles) ह्यांच्यामार्फत ते संपर्क साधतील असा विचार करण्यापर्यंत गेली आहे. परग्रहवासी कदाचित ह्यापेक्षा वेगळी संपर्कपद्धत वापरत असतील.
-
आपण गणिताला वैश्विक भाषा समजतो. पण आपले मानवी गणित परग्रहवासीयांच्या गणिताहून फार भिन्न, एकमेवाद्वितीय असेल आणि त्यामुळे त्यांनी पाठवलेले संकेत आपल्याला समजतच नसतील, म्हणजे ते संकेत पाठवत आहेत हेच आपल्याला उमगत नसेल.
-
प्रत्येक समाजाला कालमर्यादा असते. सजीव प्रगत होतात, समृद्धीच्या शिखरावर जातात आणि मग त्यांना उतरती कळा लागून ते नष्ट होतात. हाच निसर्गनियम असेल. त्यामुळे आपल्याआधी उत्क्रांत झालेले प्रगत परसमाज आता नष्ट झाले असतील. आपणही त्याच दिशेने चाललो आहोत. जागतिक तापमानवाढ, वाढती समुद्रपातळी, मानवनिर्मित कारणांमुळे निसर्गाचा ढासळलेला समतोल, विविध देशांचे घातक अणुकार्यक्रम, स्फोटके; आपला समाज नष्ट होण्यासाठी जरा कुठे खुट्ट होण्याचा तेवढा अवकाश आहे. परसमाजांचेही असेच झाले असू शकेल.
-
तांत्रिक प्रगतीच्या पुढचा टप्पा कदाचित अशारीर उत्क्रांतीचा असेल. शारीर मर्यादा ओलांडून प्रगत जीव अशारीर स्वरूपात उत्क्रांत होत असेल. शरीराला स्थळकाळाच्या मर्यादा असतात. एकदा अशारीर स्वरूपात गेले की स्थळकाळाचे बंधन राहत नसेल. प्रगत "जीव" असे अशारीर स्वरूपात असतील तर त्यांचा वेध तरी कसा घेणार?
-
कदाचित हे परसमाज वेगळ्या मितीत असतील. आपल्या जडवादापलीकडचे त्यांचे विश्व असेल. तिथे प्रकाशाचा वेग आपल्या विश्वापेक्षा कितीतरी जास्त असेल आणि दोन ग्रहांदरम्यानचा वा दोन ताऱ्यांदरम्यानचा प्रवास चुटकीसरशी होत असेल.
-
कदाचित प्रगत परसमाज दूरसंवेदनेद्वारा (telepathy) संपर्क साधू शकत असतील. एका परसमाजाची एकत्रित (collective) दूरसंवेदनलहर स्वीकारून त्यांना दुसरा परसमाज अशाच लहरींद्वारा उत्तर देऊन ते दळणवळण साधत असतील. अशा दूरसंवेदनतंत्रात आपण फार मागासलेले असल्यामुळे आपल्याशी त्या परसमाजांना काही देणेघेणे नसेल. किंवा, त्या तंत्रात आपण एवढे मागासलेले आहोत की आपण अस्तित्वात असल्याची त्यांना कल्पनाही नसेल.
-
थोडक्यात काय तर तर्क करावे तेवढे थोडकेच आणि शक्यता मांडाव्या तेवढ्या कमीच पडतील. यथावकाश, यदाकदाचित परग्रहवासीयांनी आपल्याशी संपर्क साधलाच तर आपण त्यांना कसे प्रत्युत्तर देऊ, आपली काय प्रतिक्रिया होईल, ते सुष्ट असतील की दुष्ट, ते त्यांच्यासोबत आपल्याला प्रगतीप्रत नेतील की आपल्यावर हल्ला करून आपल्याला नष्ट करतील, त्यांना आपण सापडण्याऐवजी आपल्याहून अप्रगत परसमाज आपल्याला सापडले तर आपली वसाहतवादी मानसिकता आणि इतिहास पाहता आपण त्यांना कसे वागवू, वगैरे वगैरे प्रश्न आपण चित्रपट लेखकांच्या कल्पनाभरारीवर सोडून द्यावे आणि उडत्या तबकड्या पाहिल्याचे शपथेवर सांगणाऱ्यांच्या मुलाखती दूरचित्रवाणीवर पाहत पुन्हा आपल्या उद्योगाला लागावे हेच बरे. तुम्हाला काय वाटते?
संदर्भयादी -
http://www.fermisparadox.com/
http://abyss.uoregon.edu/~js/cosmo/lectures/lec28.html
https://en.wikipedia.org/wiki/Fermi_paradox
http://www.duntemann.com/fermiqsn.htm
http://www.seti.org/seti-institute/project/details/fermi-paradox
- वरदा व. वैद्य
Pages
- « first
- ‹ previous
- 1
- 2
- 3