काही काळ-वेळ आहे की नाही?: पृष्ठ (३ पैकी) २

बर्गसन २: चहाची वेळ

घड्याळाचा शोध लागण्यापूर्वी लोकांचे वेळेचे आकलन आपल्या दैनंदिन कामकाजानुसार होते. उदाहरणार्थ शेती. ऋतूंच्या बदलानुसार उजेडाचे प्रमाण बदलते. त्यामुळे दिवसाची लांबी बदलते. "मला वाटतं, चोवीस तास; की बारा?"२२ उन्हाळ्यात शेतकरी शेतात पंधरा तास काम करेल, तर हिवाळ्यात फक्त दहा. आपण घड्याळे वापरू लागल्यानंतर आपली कालिकत्वाची बहुजिनसी व गुणात्मक जाणीव बदलली. एकजिनसी व संख्यात्मक झाली. बर्गसनच्या मते सर्व अस्तित्व मानवी संवेदननिरपेक्ष खरे बदल व अवधी ध्वनित करते. वस्तू अवकाशाला सक्रीयपणे पार करत नसल्या तरी त्या सतत बदलत असतात.

हॅटर म्हणाला, "माझं जेमतेम पहिलं कडवं म्हणून झालं तेवढ्यात राणी ओरडली, 'वेळेचा खून करत आहे तो! मुंडकं उडवा त्याचं!' "

"शी! काय हा रानटीपणा!" - ऍलिस.

"तेव्हापासून हा माझं काही ऐकत नाही. कायम सहा वाजलेले असतात", हॅटर विषण्ण सुरात म्हणाला.

ऍलिसच्या डोक्यात एक विचार आला. "म्हणून इथे चहाचा एवढा सरंजाम मांडून ठेवला आहे का?"

"हो", निश्वास सोडत हॅटर म्हणाला. "कायम चहाची वेळ झालेली असते, त्यामुळे मध्ये भांडी घासायला वेळ मिळत नाही आम्हाला."

"मग तुम्ही टेबलाभोवती पुढे सरकत राहता, हो ना?" - ऍलिस.

"अगदी बरोबर. एका जागेच्या कप-बशा वापरल्या गेल्या की पुढे सरकतो." - हॅटर. २३

कायम सहा वाजले असल्यामुळे हेअर व हॅटरसाठी काळ थांबला आहे का? अर्थातच नाही. ते अशा जगात परतले आहेत जिथे वेळेचा संदर्भ चहापानासारख्या क्रियांशी आहे.

घड्याळाच्या संदर्भात वेळेचा विचार केल्यास आपण वर्तमानाला गणिती संज्ञेत रेषेवरील बिंदूसदृश एक क्षण समजतो. पण बर्गसन म्हणतो की हे एक अवास्तव अमूर्तीकरण आहे. "अशा क्षणांपासून वेळ तयार होणे हे गणिती बिंदूंपासून रेष तयार होण्यासारखेच अशक्य आहे."२४ 'अ' आणि 'ब' ह्या दोन बिंदूंमध्ये असंख्य इतर बिंदू असतात. घड्याळी वेळ ना बिंदूंमधील संबंध हिशेबात घेते, ना अचलास चल करणाऱ्या क्रिया-प्रेरकाला. पुन्हा सांगतो, वेळ आणि अवकाश ह्यांच्यात घोळ घातल्यामुळे असे होते.

वर्तमानाविषयी आपण काय म्हणू शकतो? वर्तमानाविषयी बर्गसनची संकल्पना ऑगस्टिनीय वर्तमानात लक्षणीय फेरबदल करते. वर्तमान अस्तित्वात आहे, पण भूतकाळ आता अस्तित्वात नाही आणि भविष्यकाळ अजून अस्तित्वात आलेला नाही, असे तो मानतो. ऑगस्टिनच्या मते भूत आणि भविष्य वर्तमानात टिकून असते. बर्गसन ठामपणे सांगतो की भूतकाळ वर्तमानावर परिणाम करून आपोआप स्वत:चे जतन करतो. सशाच्या बिळात पडली नसती तर ऍलिस हॅटरला भेटली नसती. एकदा हॅटरला भेटल्यावर तिचे बिळात पडणे नाहीसे होत नाही, तर ते वर्तमानात समाविष्ट होते. बर्गसनच्या मते, माणूस अनुभवाकडे कसे लक्ष देतो ह्यावर वर्तमान अवलंबून असते. आपल्यावर आपला भूतकाळ सतत कोरला जात असतो. "आपण वर्तमानाकडे तात्कालिक लक्ष देणं बंद केलं की तो वर्तमानकाळ भूतकाळात जमा होतो."२५ - बर्गसन. एका परीने, वर्तमानकाळावर आपण जेव्हा लक्ष केंद्रित करतो तेव्हाच तो आपल्याला दिसतो. वर्तमान म्हणजे केवळ एकच क्षण नाही; तो आपला संवेदित अनुभव आहे. "माझं वर्तमान मी उच्चारत असलेलं वाक्य आहे कारण मला माझं लक्ष माझ्या वाक्यावर केंद्रित करायचं आहे. हे अवधान लहान-मोठं करता येतं."२६ उदाहरणार्थ पियानोवर वाजवलेली एखादी चाल घ्या. असे समजा की तुम्ही ती संपूर्ण चाल ऐकलीत. तो तुमचा अनुभव झाला. त्या चालीचे तुम्ही तुकडे केलेत तर अनुभव वेगळा - सुरांचा - असेल.

चेशायर कॅटने ऍलिसचा घेतलेला निरोप आठवा:

"तू मला तिथे पाहशील", मांजर म्हणाले, व अदृश्य झाले.

ऍलिस फारशी आश्चर्यचकित झाली नाही; विचित्र गोष्टींची तिला सवय होऊ लागली होती. मांजर होती त्या जागेकडे ती पाहत असताना ते परत दिसू लागले.

"बरं, त्या बाळाचं काय झालं? मी विचारायला विसरलो. " - कॅट.

"त्याचं डुकरात रूपांतर झालं. ", ऍलिस शांतपणे म्हणाली, जणू मांजराचे परतणे नैसर्गिक होते.

"वाटलंच होतं मला, " असे म्हणून मांजर पुन्हा अदृश्य झाले...

"मी 'डुक्कर' म्हणाले; आणि कृपा करून असे अचानक अदृश्य होऊ नका, व दिसू लागू नका. माझं डोकं गरगरायला लागतं! " - ऍलिस२७

मांजर आता हजर नाही हे आपण नक्की कोणत्या वेळेस म्हणू शकतो? आपण पाहतो की मांजर भूतकाळात विलीन झाल्यासारखे हळूहळू नाहीसे होत जाते. कधी ना कधीतरी ते ऍलिससमोरून हटणारच होते. (मांजर काय किंवा ऍलिस काय, कोणीही अमर नसते. ) ह्या वेळेस ते अपेक्षेपेक्षा पटकन नाहीसे झाले इतकेच.  

भविष्यकाळाच्या स्वरूपाविषयी काही सांगणे हे ह्याहून फार अवघड आहे. आपण त्याचे वर्णन खुला व मुक्त असे करू शकतो असे वाटते. ऍलिसप्रमाणे, पुढे काय होणार आहे ते आपल्याला कधीच ठाऊक नसते. आपण एवढेच निश्चित जाणतो की आपण होतो तसेच राहणार नाही.