काही काळ-वेळ आहे की नाही?: पृष्ठ (३ पैकी) ३

डल्यूझ: आज जॅम

शेवटी, जाइल्स डल्यूझ(इ. स. १९२५-१९९५) ह्याने द लॉजिक ऑफ सेन्समध्ये कालिकत्वाचे केलेले वर्णन पाहू. डल्यूझवर बर्गसनचा विशेष प्रभाव होता. तो म्हणतो वेळेला दोन प्रकारे समजून घेता येते: क्रोनॉस आणि एयॉन. क्रोनॉसच्या अनुसार, "भूत, वर्तमान, व भविष्य ह्या काळाच्या तीन मिती नाहीत; केवळ वर्तमान काळास व्यापून असते, भूत व भविष्य वर्तमानाच्या दोन मिती असतात."२८ वर्तमान ह्या दोन्ही मितिंना आपल्यात शोषून घेतो. जगलेल्या वर्तमानांतर्गत भूत व भविष्य अतिरिक्त आहेत. घड्याळी वेळेच्या संदर्भात त्यांच्यावर वर्तमानाचे नियंत्रण आहे, व त्यामुळेच ते दोन्ही मापनक्षम आहेत. गोष्टी अचल व अपरिवर्तनीय आहेत असे मानले तरच हे मापन शक्य होते. गोष्टींना अचल, आणि सममूल्य एककांनुसार मापनक्षम मानले की आपण घड्याळी वेळेपाशी येऊन ठेपतो.  

एयॉनच्या अनुसार वर्तमान असे काही नसते. वर्तमान म्हणजे घटनेची, अनुभवाची वेळ. केवळ भूतकाळ व भविष्यकाळ अस्तित्वात असतात.

"जॅम उत्तम आहे, " राणी म्हणाली.

"मला निदान आज नको आहे. "

"तुला हवा असता तरी मिळाला नसता. नियमानुसार काल जॅम आणि उद्या जॅम—पण आज कधीही जॅम नाही. " - राणी

"कधी तरी 'आज जॅम' असं होणारच", ऍलिसने आक्षेप घेतला.

"नाही होणार. एक दिवसाआड जॅम. आज काही एक दिवसाआड नाही. समजलं?"२९ - राणी

राणीच्या म्हणण्यानुसार आपल्याला कधीच जॅम मिळणार नाही. डल्यूझच्या मते आज कधीही येत नाही. आज म्हणजे काल व उद्या एकत्रित. ज्याला आपण "वर्तमानकाळ" म्हणतो तो कालिकत्वाचा गतिक भंग असतो. तो भूतकाळ व भविष्यकाळास स्वत:त सामावून घेत नाही; तर अमर्यादपणे प्रसरण पावणाऱ्या भूत व भविष्याने दोन्ही दिशांना तो एकाच वेळी विभाजित होत असतो. वर्तमानकाळ अस्तित्वात नसतो असे म्हणणे जास्त बरोबर आहे. भूतकाळ व भविष्यकाळ ह्यांच्या मिलनात होणाऱ्या अविरत फाटाफूटीत ते एकमेकांवर कमी-अधिक जोराने आदळत असतात, व त्यामुळे अवधीचे गुणात्मक स्वरूप शक्य होते. डल्यूझ म्हणतो, "एयॉन हे भूत-भविष्य आहे. अमूर्त क्षणाच्या अमर्याद उपविभाजनामुळे एयॉनचे दोन्ही बाजूंनी एकाच वेळी निरंतर विघटन होते, व ते वर्तमानास बगल देते."३० वर्तमानाचा अमूर्त क्षण "येत-जात" असल्यामुळे आपल्याला वर्तमानात प्रवेश नसतो. तो सतत निघून गेलेला असतो, आणि सतत येत असतो, पण आता नसतो.  

ऍलिसप्रमाणे आपल्या अस्तित्वातही अविरत बदल होत असतात. आपल्यात, आपल्या व्यक्तित्वात सतत वृद्धिंगत होणारे आमूलाग्र बदल होत असतात. तिच्या साहसांनंतर ऍलिस होती तशी राहूच शकणार नाही. पण आपली साहसे कधी संपतात का? संपू नयेत अशी मी आशा करतो. आयुष्य नावाच्या साहसी अद्भूत दुनियेत जगणे थांबवण्यापेक्षा "मी चहा संपवणं पसंत करीन."३१

संदर्भ
1. Augustine, Confessions, trans. F. J. Sneed (Indianapolis: Hackett Publishing Company, Inc., 1993), XI. Xiv, 219.
2. Augustine, Confessions, XI. xiii, 218.
3. Ibid., XI. xiv, 219.
4. Lewis Carroll, Alice's Adventures in Wonderland and Through the Looking- Glass (New York: Barnes and Noble Classics, 2004), 55. Subsequent references to the Alice stories are to this text.
5. Carroll, Alice's Adventures, 61.
6. Augustine, Confessions, XI. xx, 223.
7. Carroll, Alice's Adventures, 119.
8. Ibid., 13.
9. Immanuel Kant, Critique of Pure Reason, trans. J. M. D. Meiklejohn (Amherst, NY: Prometheus Books, 1990), 30.
10. Carroll, Through the Looking-Glass, 257.
11. Carroll, "What the Tortoise Said to Achilles," in Alice's Adventures in Wonderland and Through the Looking-Glass, 270.
12. Henri Bergson, Time and Free Will, trans. F. L. Pogson (Mineola, NY: Dover Publications, Inc., 2001), 106.
13. Carroll, Through the Looking-Glass, 175.
14. See Bergson's "The Perception of Change" in The Creative Mind, trans. Mabelle L. Andison (New York: Citadel Press, 2002).
15. Bergson, Time and Free Will, 113.
16. Carroll, Through the Looking-Glass, 173.
17. Carroll, Alice's Adventures, 81.
18. Bergson, Time and Free Will, 108.
19. Carroll, Through the Looking-Glass, 159.
20. Bergson, "The Perception of Change," 145.
21. Ibid.
22. Carroll, Alice's Adventures, 71.
23. Ibid., 83.
24. Bergson, "The Perception of Change," 151.
25. Ibid., 152.
26. Ibid., 151.
27. Carroll, Alice's Adventures, 75-76.
28. Gilles Deleuze, The Logic of Sense, trans. Mark Lester (New York: Columbia University Press, 1990), 162.
29. Carroll, Through the Looking-Glass, 205.
30. Deleuze, The Logic of Sense, 77. 31. Carroll, Alice's Adventures, 131.
31. Carroll, Alice’s Adventures, 131.


- मिलिंद फणसे