मुंबईचे दिवस : गॅसचे दिवे आणि ट्रॅम: पृष्ठ (३ पैकी) २
लालबागला बॉंबे गॅस कंपनी होती. त्या कंपनीची गॅसची टाकी रस्त्याने जाताना, तसेच मध्य रेलवेने करी रोडवरून आणि पश्चिम रेलवेने लोअर परेलवरून जाताना दिसे. इंग्लंडमध्ये ओव्हलवर क्रिकेट सामना सुरू असला की तसलीच गॅसची टाकी दिसते व पुन्हा बालपणीच्या स्मृती जाग्या होतात. हाच गॅस अख्ख्या मुंबापुरीत ठिकठिकाणच्या या खांबावरच्या दिव्यांना जमिनीखालच्या लोखंडी पाईपातून पुरवला जाई. घरगुती स्वैपाकाच्या वापराला पण हा गॅस पुरवला जाई. माझ्या एकदोन मित्रांकडे होता. इराण्याच्या हॉटेलात तर पाकसिद्धीसाठी सर्रास हाच गॅस वापरलेला असे. कीर्ती, रूपारेल कॉलेजमध्ये प्रयोगशाळांत हाच गॅस आम्ही वापरला. माहीमच्या भेंडे डॉक्टरांच्या दवाखान्यात एक गॅसचा पण दिवा होता. त्याचा मॅंटल अखंड व्यवस्थित असे पण तो पेटवलेला मी कधी पाहिला नाही. हा गॅस पेटवला की मस्त खरपूस वास येई. यापैकी बरेचसे पाईप अजून चांगल्या स्थितीत आहेत. काही पाईपलाईन्स डागडुजी करून आता महानगर गॅसने वापरल्या आहेत. पण तो होता कोळशापासून बनवलेला कोल गॅस (CO + H2) आणि सध्याचा आहे खनिज गॅस. पाईपलाईन मात्र काही अंशी तीच. मीटरचे घड्याळवाले डबे जवळजवळ तसेच दिसणारे. कालांतराने १९७२-७३ साली केव्हातरी लालबागच्या बॉंबे गॅस कंपनीत मोठा संप झाला आणि ती कंपनीच बंद झाली. रस्त्यावरचे गॅसचे दिवे, पाईपातला गॅस वगैरे सारे इतिहासजमा झाले. मुख्य म्हणजे दिव्याचे सुंदर खांब नाहीसे झाल्यामुळे मुंबईचा दिमाख पण कमी झाला. गेल्या दहापंधरा वर्षात मात्र महानगर गॅसच्या कृपेने निदान मुंबईत पाईपातला गॅस पुन्हा घरोघरी दिसू लागला आहे. महानगर गॅस कंपनी रस्त्याकडेला गॅसचे दिवे बसवते की नाही हे पाहायचे.
पण ते सुंदर दिव्यांचे खांब हा माझ्या बालमनाचा एक हळुवार कोपरा होता. आमच्या इमारतीसमोरच अशाच एका सुंदर रुपेरी खांबावर ऐटदार असा गॅसचा दिवा होता. मी नववी-दहावीत असताना म्हणजे ६५-६६ साली कधीतरी त्याच्या बाजूला एक सरळसोट उंच खांब महापालिकेने रोवला. त्यावर विजेवर चालणारा झगझगीत पिवळसर प्रकाशाचा फ्लडलाईट लागला. शीतल चंद्रप्रकाशासारखा रुपेरी प्रकाश गेला आणि तो नवीन दिवा रस्त्यावर कडक उन्हासारखा झगझगीत प्रकाश भळभळा ओतायला लागला. चारसहा महिन्यांनी मग तो जुना सुंदर खांबही महापालिकेने उचलून नेला. आमचा लपालपीचा भोज्ज्या गेला आणि त्यापाठोपाठ लपालपी खेळायचे वयही निघून गेले. आताची मुले जरा जास्तच लौकर लपालपीचे वय ओलांडतात. त्याच खांबावर नवा विजेवरचा दिवा का बसवला नाही ते एक महापालिकाच जाणे. घराबाजूचा छाया देणारा एखादा वृक्ष गेल्यासारखे वाटले. निरागस बालविश्वाला मिळालेला कठोर वास्तवाचा पहिला धडा. पण जुन्या मुंबईचे मोहक रुपडे खुलवणारे खांब एकामागून एक गेले ते गेलेच.
ट्रॅमरस्त्याच्या डावीकडून व उजवीकडून नेहमींचा मोटर रस्ता असे. बसप्रमाणे ट्रॅमही बी. ई. एस. टी. च चालवे. बसपेक्षा ट्रॅमची नवलाई जास्त होती. बस एकाच दिशेने जाऊ शकते. बससारखीच लालचुटुक दिसणारी ट्रॅम मात्र रेलवे लोकलगाडीसारखी दोन्ही बाजूंनी प्रवास करू शके. खालील प्रकाशचित्रातला (चित्र ५) काळा दिसणारा भाग मुळात लालचुटुक तर पांढरा भाग मुळात पिवळसर होता. बस जाडीभरडी प्रौढा तर ट्रॅम नाजूक तरुणीसारखी चवळीची शेंग. बसला कित्त्येक वेळा वरचा मजला नसे. ट्रॅम बहुधा दुमजलीच असे. हुतात्मा चौकाच्या वरील जुन्या प्रकाशचित्रात (चित्र १) मात्र दोन ट्रेलर ट्रॅम्स दिसत आहेत. त्यापुढून वळणारी दुमजली बसदेखील दिसत आहे. तर चित्रात वरच्या बाजूला म्यूझियमच्या दिशेने जाणारी दुमजली ट्रॅम पण आहे. पण ते फार पूर्वीचे. बस अवखळ वारूप्रमणे उधळे तर ट्रॅमची चाल एखाद्या सौंदर्यवती गजगामिनीची. बस धूर सोडत प्रदूषण करीत जाईतर ट्रॅम प्रदूषणमुक्त. ट्रॅमची पुढची मागची बाजू सारखीच. ट्रॅमच्या वर एक मागच्या बाजूला झुकलेली उभी दांडी असे. त्या दांडीला एक कप्पी असे. या कप्पीचे चाक वरून जाणाऱ्या विजेच्या तारेवर खालून वर जोराने दाबून चालत असे. ट्रॅम चालू झालीं कीं तिच्या मोटरचा झ झ झ झ असा आवाज येई तर चाकांचा रेलवेसारखा पण सौम्य खडखडाट. बससारखा घरघराट फरफराट नाहीं. वरच्या विजेच्या तारांचा सांधा जिथे असे तिथे ट्रॅम जाताना हिरव्या निळ्या पिवळ्या ठिणग्या पडत.
बसला, मोटारगाड्यांना पुढच्या बाजूला दोन डोळ्यांसारखे दोन दिवे - हेडलाईटस असतात. ट्रॅमला रेलवेगाडीसारखा एकच दिवा.
वरच्या प्रकाशचित्रातली (चित्र ५) ट्रॅम मी कधी पाहिली नाही. ट्रेलर ट्रॅम पाहिल्याचे पण आठवत नाही. पण पन्नासएक वर्षांनंतर ती स्मृती पुसली गेली असावी. ५६-५७ सालच्या एका दृकश्राव्यचित्रात ती दिसते. सध्या स्पष्ट आठवत आहे ती ट्रॅम मात्र खालच्या चित्रातली (चित्र ६). चकचकीत पितळी बटणे लावलेल्या, पांढरे कपडे घातलेल्या ट्रॅमच्या ड्रायव्हरला उभे राहून ट्रॅम चालवावी लागे. त्याच्या समोर एक रेलवेच्या लोकलगाडीत असते तसे हॅंडल असे. ते तो डावीउजवीकडे हलवून खेचून वा ढकलून ट्रॅम चालवी.
त्याच्या पायाखाली जवळजवळ चार इंच व्यासाचे धातूचे एक भलेमोठे चकचकीत बटण असे. समोर मार्गात कोणी मध्ये आल्यास तो लोकांना सावध करायला त्या बटणावर पाय आपटे. त्या बटणाला ट्रॅमच्या खालच्या बाजूने दुसरी बाजू घंटेला जोडलेली एक तरफ जोडलेली असे व बटणावर पाय आपटताच ट्रॅमखालून ठण असा आवाज येत असे. हाच ट्रॅमचा हॉर्न वा भोगा, ठण ठण, ठण ठण असा घंटेचा. तो वेगळ्या स्वरांतील वेगळ्या ठेक्यातला आवाज माझ्या मनात पन्नास वर्षांनंतर देखील अजून निनादत आहे. ना आगीच्या बंबाएवढा घनगंभीर ना सायकलच्या घंटीएवढा किनरा. त्या आवाजावरून कुणीही ओळखत असे की ही ट्रॅमची घंटा. बसला मात्र रबराच्या फुग्याचे बॉं बॉं करणारे भोंगे असत. ट्रॅम धीम्या गतीने जाई. तिचा वेग अंदाजे ताशी १५ ते २० किमी असेल. चांगला धावणारा असल्यास पूर्ण वेगातली ट्रॅम धावत पकडता येई वा ट्रॅममधून उतरताही येई. त्यामुळे बऱ्याच वेळा सायकली, टांगे, ट्रॅमच्या रस्त्यावरून जात. कधी अपघातही होत. पण ट्रॅमचा वेग जरी कमी असला तरी ट्रॅमच्या अपघातात सापडलेले कुणी सहसा वाचत नसे. वाचलेच तर पुरते विकलांग होत.
बसमध्ये गुबगुबीत गाद्यांची हिरवी बाके असतात तर ट्रॅममध्ये लाकडी बाके असत. एका लोखंडी सांगाड्यात सहा - आठ इंच रुंदीची, बदामी छटेचा पिवळसर तैलरंग दिलेली फळी बसायला असे. दोन बाजूंना जोडलेल्या लोखंडी पट्ट्यांनी जोडलेली तशीच फळी पाठीला. या लोखंडी पट्ट्या बसायच्या पट्टीच्या बाजूने सरकत. पण एक खुबी होती. ट्रॅम कधी उलट वळत - यू टर्न मारीत - नसे. फक्त ड्रायव्हर उतरून विरूद्ध टोकाला यायचा. तिथेही तसेच हॅंडल, तशीच घंटा तसेच ब्रेक्स, हेड लाईटस वगैरेंची बटणे असत. ते हॅंडल वापरून तो त्या दिशेने ट्रॅम चालवी. मग आपण फक्त आपल्या त्या लाकडी सीटच्या पाठीची फळी ढकलून विरूद्ध बाजूला न्यायची. तसे केले की सीटचे तोंड विरुद्ध दिशेला होई. या खुबीमुळेच ट्रॅम बाळगोपाळांत फारच लोकप्रिय. बस, टांगा, टॅक्सी, रेलवे, कुणाचीही ऐट नसे तिच्यापुढे. आपल्या रेलवेच्या रुळांना फाटा असला तर पुढच्या कोणत्या फाट्यावर जायचे हे मोटरमनच्या हातात नसते. पण ट्रॅमच्या रूळांचा फाटा मात्र ड्रायव्हरला ऐच्छिक असे. डावीकडे वा उजवीकडे की सरळ हे ड्रायव्हर ठरवी. रूळ जमिनीत पुरलेले असत व रेलवे रूळांची जशी होते तशी त्यांची फाट्यावर हालचाल होत नसे. आजही खणले तर कैक ठिकाणी रस्त्याखाली पुरले गेलेले ट्रॅमचे रूळ मिळतील. पूर्ण तिकीट सात पैसे तर अर्धे पाच पैसे. नंतर पूर्ण तिकीट दहा पैसे झाले तर अर्धे सात पैसे. कोणत्याही अंतराला भाडे एकच. पण ट्रॅम बदलली तर मात्र नवे तिकीट काढायचे.