मुंबईचे दिवस : गॅसचे दिवे आणि ट्रॅम: पृष्ठ (३ पैकी) ३
आम्ही दादर टी. टी. हून प्रिंस ऑफ वेल्स म्युझियमला जात असू. एकदम पुढच्या बाजूची ड्रायव्हरच्या वरची सीट पकडायची. रस्त्यावरचे सारे दृश्य मस्त दिसे. मुंबईचा त्यावेळचा विशेष म्हणजे त्या सीटवर कोणी बसले असेल तर लहान मुले असलेल्या कुटुंबाला त्वरित उठून जागा करून देत. मग त्यांना उभे राहून प्रवास करावा लागत असे. भाडे स्वस्त असल्यामुळे कष्टकरी, अतिशय गरीब वर्गातले लोक ट्रॅमचा वेग कमी असला तरी ट्रॅमने प्रवास करीत. ट्रॅमही खचाखच भरलेली असे. ट्रॅममध्ये सगळीकडे कळकट कपड्यातले सतत वचावचा बोलणारे प्रवासीच दिसत. घामाचा उग्र दर्प ट्रॅमला कायम चिकटलेलाच असे. साहाजिकच पांढरपेशे अर्थात व्हाईट कॉलर्ड लोक चुकूनही ट्रॅमच्या वाटेला जात नसत. गेलेच तर बालहट्टामुळेच. पण त्या दरिद्री प्रवाशांच्या या सौजन्याची श्रीमंती अतुलनीय आहे. दादर टी. टी. च्या गोलात ट्रॅम्स शिस्तीत उभ्या असत. या गोलाला दुभागून किंग्ज सर्कलवरून येणाऱ्या म्युझियम इ. ठिकाणी जाणाऱ्या ट्रॅमचे रूळ. त्यांवर आकाशातून जाणाऱ्या विजेच्या तारा. आणि रूळाशेजारी ट्रॅमचा थांबा. गोलाच्या परिघावर तेच नक्षीदार खांबांवरचे गॅसचे दिवे. तरीही गोलाला दुभागणारी एक तार विजेच्या तारांच्याही वर असे. गोलाच्या बरोबर मधोमध या तारेला टांगलेला आणखी एक गॅसचा दिवा. असेच दृश्य किंग्ज सर्कल, परेल टी. टी., बोरीबंदर (व्ही. टी. /छ. शिवाजी टर्मिनस), म्युझियम, इ. ठिकाणी असे. दादर किंवा परेल टी. टी. म्हणजे दादर किंवा परेल ट्रॅम टर्मिनस. अजूनही दादर टी टी म्हणजे दादर पूर्व, व दादर बीबी म्हणजे दादर पश्चिम असेच विभाग ओळखले जातात.
काही ठिकाणांची नावे विचित्रच. एका थांब्याचे नाव उभा पारशी. दादरहून बोरीबंदरला जातांना भायखळा पूल ओलांडला की उजव्या हाताला एक ब्रॉंझचा काळा पडलेला पुतळा होता. कोणाचा ठाऊक नाही. कदाचित अजूनही असेल. तो उभा पारशी. काही लोक बैलघोडा सांगायचे आणि भारतमातासमोर उतरायचे. तिथे आतल्या रस्त्याला लागून एक पशू इस्पितळ आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर बैल आणि घोडा अशी दोन चित्रे आहेत म्हणून तो प्रदेश बैलघोडा. आता अंधेरी पूर्वेहून कुर्ल्याकडे जाताना एका प्रदेशाचे नाव बैल बाजार आहे. पूर्वी पेशवेकाळात व त्यानंतर काही वर्षे तिथे बैल बाजार भरत असे. या उभ्या पारशाच्या समोर काही दगडी तर काही लोखंडी कुडे वा टाक्या होत्या. आकार आंघोळीच्या मोठ्या टबासारखा. अंदाजे चार फूट बाय दहाबारा फूट, दोनतीन फूट खोल आणि जमिनीपासून दोनतीन फूट उंच. त्या एकदा मी ट्रॅममधून जाताना पाहिल्या. पावसाळा होता व त्यात पावसाचे पाणी पण साचले होते. ते काय म्हणून मी अण्णांना विचारले. मोठ्यांना वैताग देणाऱ्या माझ्या चांभारचौकशा तेव्हा अशा अखंड चालू असत. पूर्वी जेव्हा घोड्यांच्या ट्रॅम्स होत्या तेव्हा घोड्यांना त्यातले पाणी पाजत अशी माहिती एका वृद्ध प्रवाशाने दिली.
सुप्रसिद्ध साहित्यिका कै. दुर्गाताई भागवतांनी ’लहानी’ नावाचे एक छोटेसे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांच्या लहानपणच्या आठवणी आहेत. छोटी दुर्गा शाळेत होती. लहानी म्हणत तिला. तिच्या दुसरी-तिसरीतल्या वर्गातल्या बाकाशेजारी एक खिडकी होती. त्या खिडकीतून रस्ता, रस्त्यावरील रहदारी, ट्रॅम वगैरे दिसे. त्यावेळी घोड्यांची ट्रॅम (चित्र ७) होती. तेव्हा एकदा घोड्यांचा साथीचा रोग आला होता. तो रोग झाला की साथ पसरू नये म्हणून रोगी घोड्याला गोळी घालून ठार मारीत. एकदा अशीच घोड्याला पाय बांधून रस्त्यावर झोपवून गोळी घालून ठार मारायची तयारी चालू असलेली छोट्या दुर्गाला दिसली. तिची घालमेलझाली. त्या छोट्या दुर्गेच्या मनात तेव्हा काय चालले असेल या कल्पनेने माझा जीव अजूनही एवढासा होतो.
रात्री ट्रॅममध्ये पिवळसर प्रकाशाचे बल्ब पेटत. बाहेरून गॅसच्या दिव्यांच्या मंद उजेडात ती आतून प्रकाशित झालेली, सावकाश मार्गक्रमणा करणारी ट्रॅम अथांग महासागरातून ऐटीने जाणाऱ्या एखाद्या प्रकाशमान बोटीसारखी दिसे. अशी ही ट्रॅम १९६४ साली बंद झाली. कमी वेगाने जाते, म्हणून इतर वाहनांच्या रहदारीत अडथळा निर्माण करते, खडखडाट करते, इ. आरोप या स्वस्त सार्वजनिक वाहतुकीवर झाले. खरे कारण हे असावे की वाहतुकीत जगभरात ट्रॅमला अग्रक्रम होता आणि क्रॉसिंग्ज, वळणे वगैरे काही नव्हतेच. म्हणजे थोरामोठ्यांच्या गाड्या सिग्नलला थांबवून बहुजनांची ट्रॅम राणीसारखी दिमाखात पुढे जात असे. म्हणून काही वेळा ट्रॅम हळू चालूनही मोटारीच्याही अगोदर मुक्कामाला पोहोचे. तथाकथित थोरांच्या पोटात दुखले नाही तरच नवल. शेवटी राजकीय दबावामुळे ती बंदच पडली. मुंबईला ब्रिटिशांच्या काळात पडलेले एक सुंदर स्वप्न भंग पावले. त्याच रस्त्याने आज दादर टी. टी. हून म्युझियमला जायला मर्सिडीजने वा बी. एम. डब्ल्यूने जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात, तीस चाळीस मिनिटांत ती ट्रॅम जाई. कारण मोटारींसाठी भेंडी बाजार, महमद अली रोड, इ. ठिकाणी रहदारीचा मुरांबा असतोच. सुप्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार व साहित्यिक कै. श्री. ना. पेंडसे तेव्हा बी. ई. एस. टी. चे जनसंपर्क अधिकारी होते. १९६४ सालीं ट्रॅमने जी अखेरची फेरी केली त्या अखेरच्या फेरीने त्यांच्याबरोबर इतर अनेक मान्यवरांनी प्रवास केला. ही बी. ई. एस. टी. बसची सख्खी बहीण या महानगरीच्या विकासात आपला अमीट ठसा उमटवून कायमची काळाच्या पडद्याआड गेली. अशा तऱ्हेने ब्रिटिश साम्राज्यातल्या देखण्या, ऐटबाज मुंबईची उरलीसुरली खूण देखील अस्तंगत झाली. आताची बकाल मुंबई पाहून मुंबई एवढी देखणी होती हे खरे पण वाटत नाही.
तरी युरोपात फिरून आल्यावर कोणी तिथल्या स्वप्नवत सुंदर परिसरातून ऐटीने हिंडणाऱ्या नाजुक ट्रॅमचे, त्या ट्रॅमच्या सेकंदात मोजल्या जाणाऱ्या वक्तशीरपणाचे कौतुक केले की मग ट्रॅम अस्तंगत झाल्याची जखम भळाळून वाहायला लागतेच.
नंतरची काही वर्षे ट्रॉली बस (चित्र ८) म्हणून विजेवर चालणारी बस मुंबई सेंट्रलमधून जाणाऱ्या एका मार्गावरून चालत असे.
बहुधा भायखळा पूल ते गोवालिया टॅंक मार्गावर. हिच्या डोक्यावर एक नाही तर दोन दांड्या असत, ज्यावरून जाणाऱ्या दोन वीजतारांना जोडणाऱ्या असत. पण ही ट्रॉली बस होती मात्र लठ्ठ, अवजड, अनाकर्षक व्यक्तिमत्त्वाची. तिने जाण्याचा ना कधी प्रसंग आला, ना कधी जावेसे वाटले.
आता मेट्रो कशी दिसते आणि मुंबईचे बकालपण वाढवते की कमी करते हे पाहायचे. सध्या मात्र मेट्रोच्या नव्या पुलांमुळे त्या पुलाखालील रस्त्यावर असे बकालपण आले आहे की विचारू नका. पुलाखालचे रस्ते या मेट्रोने पार उखडून टाकले आहेत आणि रस्ता-वाहतुकीची पार वाट लावली आहे. अंधेरी ते लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट या तीन-चार किमी अंतराला बसला जिथे पाच रुपये पडत तिथे थेट रस्ता न राहिल्याने बस सेवा जवळजवळ नाहीच. शेअर रिक्षाने दूरवरून फिरून जायला माणशी तब्बल तीस रुपये पडतात. अर्थात म्हणून नवीन काही आणायचे नाही असे होत नाही. मूळ रस्ता निष्काळजीपणे उखडून बकाल न करता, रस्ता वाहतुकीचे व्यवस्थित पर्यायी नियोजन करून देखील हे होऊ शकले असते. पण परिसरावर लोभ ठेवायला मुंबई मेट्रो म्हणजे कोकण रेलवे नाही वा टाटाही नाही. शिवाय रस्ता वाहतूक व्यवस्थित चालली तर मग महागड्या मेट्रोने जाणार कोण? कालाय तस्मै नमः! दुसरे काय!
१९२० सालची मुंबई इथे दिसते. १९५६-५७ सालची मुंबई इथे दिसते. नाजूक ट्रॅम हा बालमनातला दुसरा हळवा कोपरा होता. या दृक्श्राव्यचित्रणातली मुंबई पाहिली आणि हरखून गेलो. मी बालपणी पाहिलेली मुंबई ती हीच. ती देखील रंगीत दृकश्राव्यचित्रणात. असे रंगीत दृकश्राव्यचित्रण कधी पाहायला मिळेल असे वाटलेही नव्हते. पाहिले आणि सार्थक झाले. मधली पन्नास वर्षे अचानक नाहीशी झाली आणि भूतकाळातली ती गॅसच्या दिव्यांची, त्यांच्या मनोहर खांबांची, त्याबाजूने जाणाऱ्या कष्टकरी जनतेच्या ट्रॅमची सृष्टी पुन्हा सजीव झाली. ट्रॅमला मी चवळीची शेंग का म्हटले ते इथे कळते. मासिकातल्या रेमी स्नो आणि रेमी पावडर यांच्या जाहिरातीतल्या तरुणीचा या ध्वनिचित्रात न दाखवलेला चेहरा पण अचानक डोळ्यांसमोर तरळून गेला. इथे तर १९४२ सालची कराची शहरातही बी. ई. एस. टी. ची ट्रॅम दिसते.
- लेखक : सुधीर कांदळकर
Pages
- « first
- ‹ previous
- 1
- 2
- 3