अफानासी निकीतिनचा हिंदुस्थान: पृष्ठ (३ पैकी) २
हा हिंदुस्थानचा देश. येथील लोक अंगावर थोडेच कपडे घालतात, त्यांची डोकी झाकलेली नसतात आणि छात्याही उघडयाच असतात. त्यांच्या डोक्यांवरचे केस बांधलेले असतात. ते अनवाणीच चालतात. दरवर्षी त्यांना मुले होतात आणि त्या सर्वांना भरपूर मुले असतात. पुरुष आणि स्त्रिया अर्धनग्न आणि कृष्णवर्णी असतात. मी जेथे जेथे जातो तेथे तेथे माझ्या गोऱ्या कातडीचे आश्चर्य करीत मोठा घोळका फिरत असतो. इथला राजा डोक्यावरती एक कापडी वस्त्र बांधतो आणि दुसरे कमरेभोवती. सरदार लोक खांद्यावरती एक वस्त्र वापरतात आणि दुसरे कमरेभोवती. राजाच्या स्त्रियाही एक वस्त्र खांद्याभोवती आणि दुसरे कमरेला बांधतात. राजा आणि सरदारांचे नोकरचाकर कमरेभोवती एक वस्त्र बांधतात आणि त्यांच्या हातात ढाली आणि काठ्या असतात, काही जण धनुष्यबाण तर दुसरे काही जण खंजीर आणि तलवारीही बाळगतात. सगळेच अर्धनग्न आणि अनवाणी पायाचे पण बळकट असतात. बाहेर हिंडणाऱ्या बायका डोकी आणि स्तन उघडेच ठेवतात. वयाच्या सातव्या वयापर्यंत मुलगे आणि मुली नागव्याच हिंडतात, त्याची त्यांना काहीच लाज वाटत नाही.
चौलपासून जमिनीवरच्या प्रवासाने ८ दिवसांनंतर आम्ही हिंदुस्थानी पर्वताखाली पाली नावाच्या गावी पोहोचलो, तेथून दहा दिवसांनी उंब्रे (तळेगाव दाभाडेजवळचे सध्याचे नवलाख उंबरे - हे एकेकाळी आजच्यापेक्षा बरेच मोठे गाव होते) नावाच्या शहरात आणि त्यानंतर ७ दिवसांनी जुन्नरला पोहोचलो.
येथे मलिक-अत-तुझाराचा सरदार असद खान ह्याचा अंमल आहे. (मलिक-अत-तुझार ही पदवी महमूद गावानला मिळाली होती कारण तो मूळचा इराणी व्यापारी होता.) त्याचे सर्व सैन्य मलिक-अत-तुझाराचेच आहे आणि ते ७०,००० इतके असावे असे म्हणतात. मलिक-अत-तुझारापाशी एकूण २ लाखांचे सैन्य आहे आणि गेली २० वर्षे काफिरांशी त्याचा झगडा चालू आहे. त्यांनी त्याचा अनेकदा पराभव केला आहे आणि त्यानेही त्यांच्यावर अनेक विजय मिळविले आहेत. असद खान जेव्हा बाहेर पडतो तेव्हा हत्ती-घोडे आणि खोरासानी लढाऊ सैनिकांच्या गराडयात असतो. त्याचे घोडेही खोरासान आणि अरबस्तानातून येतात, तसेच ते तुर्कस्तानातून आणि चगताई प्रदेशातूनही येतात. ते सगळे समुद्रमार्गे हिंदुस्थानी होडयांतून येतात. मी पापी माणसानेही एक घोडा हिंदुस्थानात आणला आणि त्याला बरोबर घेऊनच मी जुन्नरला आलो होतो.
’ट्रिनिटी’च्या दिवसापासून हिंदुस्थानात हिवाळा सुरू झाला. हिवाळ्याचे दोन महिने मी जुन्नरात काढले. हे चार महिने दिवसरात्र हा देश पाणी आणि चिखलाने भरलेला असतो. (निकीतीन पावसाळ्यालाच हिवाळा असे म्हणत आहे असे वाटते.) ह्या दिवसांत हिंदुस्थानी लोक जमिनीची नांगरट करून गहू, तांदूळ, कडधान्ये आणि अन्य भाजीपाला लावतात. ते नारळापासून मद्य आणि ताडी बनवितात. घोडयांना कडधान्य (हरभरा?) खाऊ घालतात. साखर आणि लोणी वापरून ते खिचडी बनवितात आणि ती घोडयांना खाऊ घालतात. मात्र सकाळी त्यांना गवतच देतात.
हिंदुस्थानात घोड्यांची उपज केली जात नाही, तेथे आहेत बैल आणि रेडे. लोक त्यांचा उपयोग प्रवास, मालवाहतूक आणि अन्य अनेक बाबींसाठी करतात.
जुन्नर गाव एका कड्याच्या टोकाला आहे, त्याला तटबंदी नाही, केवळ ईश्वरच त्याचे रक्षण करतो. त्या डोंगरावर जायला एक दिवस लागतो आणि तेथे जाण्यासाठी एकामागोमाग दुसरा असेच जावे लागते. दोन माणसे एकमेकांना ओलांडून जाऊ शकत नाहीत.
हिंदुस्थानात प्रवासी व्यापाऱ्यांना घरांच्या पडव्यांमध्ये राहायला जागा देतात. मालकीण त्यांना जेवण पुरवते, त्यांची झोपायची व्यवस्था बघते आणि त्यांची शय्यासोबतही करते. तिच्याशी जवळीक हवी असेल तर दोन नाणी द्यावीत, अन्यथा एकच नाणे द्यावे. ठराविक मुदतीच्या बायका येथे सर्रास असतात आणि जवळिकीच्या संबंधांना फार पैसाही लागत नाही कारण गोरे लोक त्या बायकांना फार पसंत असतात. (निकीतिनने ’तात्पुरत्या काळाच्या’ - मुता पद्धतीच्या - असा स्पष्ट उल्लेख केला आहे.)
थंडीच्या दिवसांत सर्वसामान्य प्रजा कमरेभोवती एक कपडा बांधते, दुसरा खांद्यांभोवती आणि तिसरा डोक्यावर. राजे आणि सरदार अंगरखे, सदरे आणि पायघोळ झगे वापरतात, खांद्यावर एक कपडा टाकतात, दुसऱ्या कपडयाने शरीर झाकून घेतात आणि एक कपडा डोक्याभोवती गुंडाळतात.
जुन्नरमध्ये खानाला जेव्हा कळले की मी मुसलमान नाही, रशियन आहे, तेव्हा माझा घोडा त्याने ताब्यात घेतला. मला तो म्हणाला, "मी तुझा घोडा परत करीन आणि तुला वरती एक हजार सोन्याची नाणीही देईन, मात्र त्यासाठी तू आमचा धर्म ’इस्लाम’ स्वीकारला पाहिजेस. जर तू तसे केले नाहीस तर मी तुझा घोडा घेईनच आणि वर तुला एक हजार सोन्याच्या नाण्यांचा करही लावेन." मला विचार करण्यासाठी त्याने चार दिवस, ६ ऑगस्टपर्यंत, दिले. येशूच्या ह्या पवित्र दिवशी येशूने मला आधार दिला, मी पापी असलो तरी माझ्याकडे त्याने पाठ फिरविली नाही आणि अपवित्र लोकांमध्ये आयुष्य संपविण्यासाठी त्याने मला जुन्नरमध्येच सोडून दिले नाही. त्या दिवशी खानाचा खजिनदार, खोरासानी मुहम्मद हा माझ्याकडे आला. मी त्याला लवून मुजरा केला आणि विनंती केली की त्यांच्या धर्मात मला सक्तीने जायला लावू नये. तो गावान असद खानाकडे गेला आणि त्याला विनंती केली की मला (निकीतिनला) धर्म बदलायची सक्ती करू नये आणि त्याने खरोखरीच माझ्यापासून हिरावून नेलेला माझा घोडा मला परत दिला. त्याच्या (येशूच्या) दिवशीच हा दैवी चमत्कार दिसला. माझ्या रशियन ख्रिश्चन बंधूंनो, जर तुम्हाला हिंदुस्थानात जायचे झाले तर आपला धर्म येथेच रशियात सोडा, मुहम्मदाचा स्वीकार करा आणि मगच हिंदुस्थानाकडे निघा. ह्या अधर्मी कुत्र्यांनी मला फसविले, "आमच्याकडे व्यापार करण्याजोग्या खूप चिजा आहेत, " असे ते म्हणाले होते खरे, पण त्यातली कोणतीच चीज आपणा रशियनांना विकत घ्यायला उपलब्ध नाही. जे आहे ते सगळे मुसलमान देशांसाठी आहे. त्यांना रंग आणि मसाले स्वस्तात मिळतात. मुसलमान देशांकडे पाठविण्यासाठी जो माल ते समुद्राकडे पाठवितात त्यावर काही कर नसतो. आपल्याला मात्र कर भरल्याखेरीज काहीच पाठविता येत नाही. कर भरपूर आहे आणि समुद्रात चाचेही भरलेले आहेत. हे चाचे सगळे काफिर आहेत, ते मुसलमानही नाहीत आणि ख्रिश्चनही नाहीत. ते दगडी खांबांची पूजा करतात आणि ना मुहम्मदावर विश्वास ठेवतात ना येशूवर.
१५ ऑगस्टच्या दिवशी आम्ही जुन्नर सोडले आणि त्यांचे राजधानीचे शहर बिदरकडे निघालो. बिदरला पोहोचायला आम्हाला एक महिना लागला. बिदरपासून कुलोनगिरी (हे कोणते गाव असावे हे कळत नाही.) पाच दिवसांवर आहे आणि कुलोनगिरीपासून गुलबर्गा अजून पाच दिवस. ह्या दोन शहरांमध्ये अनेक गावे आहेत. काही दिवशी आम्ही तीन गावे ओलांडली आणि काही दिवशी चार. जितके कोव तितकी गावे. (रशियातील अंतरांचे जुने परिमाण, सुमारे १० कि.मी.) चौल ते जुन्नर २० कोव अंतर आहे, जुन्नर ते बिदर ४० कोव, बिदर ते कुलोनगिरी ९ कोव आणि कुलोनगिरी ते गुलबर्गा ९ कोव.
बिदरमध्ये घोडे, जरीचे कापड, रेशमी कापड, इतर वस्तू आणि काळ्या गुलामांचा व्यापार चालतो. ह्याशिवाय अन्य काही नाही. सर्व गोष्टी हिंदुस्थानातच बनतात. खाण्याच्या बाबी म्हटले तर फक्त भाज्याच मिळतात, रशियन देशाला योग्य असे काहीच नाही. येथील सगळे लोक कृष्णवर्णी आहेत आणि कपटी आहेत, स्त्रिया बाजारबसव्या आहेत. जिकडे पाहावे तिकडे जादूटोणा आणि खोटेपणा. नोकर मालकाला विष घालून मारतात.
हिंदुस्थानात राज्य करणारे सगळे आणि त्यांचे सरदार खोरासानी आहेत. हिंदू पायी असतात आणि घोडयांवर बसलेल्या खोरासानींच्या पुढे चालतात. बाकी सारे पायी असतात. काहींच्या एका हातात ढाल तर दुसऱ्यात तलवार, काहींच्या हातात लांब बाण आणि धनुष्ये असतात. त्यांच्यामध्ये लढाया हत्तींच्या पाठींवरून लढल्या जातात. सर्वात पुढे असते पायदळ, त्यांच्यामागे चिलखते घातलेले खोरासानी घोडेस्वार असतात. हत्तींच्या गंडस्थळांवर आणि सोंडांवर मोठे, ओतीव आणि अदमासे एक कंतार (रशियन माप) वजनाचे खिळे असतात. हत्तींवरही जाड चिलखत आणि त्यांच्या पाठींवरती हौदे असतात. त्यांमध्ये चिलखत घातलेले आणि, बंदुका आणि बाण बाळगणारे सुमारे बारापर्यंत सैनिक असतात.
येथे अळंद नावाचे एक गाव आहे जेथे शेख अल्लाउद्दीन(Makhdoom Shaikh Alauddin Ansari Dargah) नावाच्या साधुपुरुषाचा दर्गा आहे. तेथे वर्षातून एकदा उरूस भरतो. उरसामध्ये व्यापार करण्यासाठी सगळीकडून लोक येतात. उरूस दहा दिवस चालतो. अळंद गाव बिदरपासून १० कोव अंतरावर आहे. सुमारे २०,००० घोडे येथे विकण्यासाठी येतात. अन्यही अनेक गोष्टी येतात. हिंदुस्थानातील हा उरूस सर्वात मोठा आहे, येथे प्रत्येक गोष्टीची खरेदी-विक्री होऊ शकते.
ह्या देशात रात्री उडणारा एक पक्षी आढळतो. तो ’हूक-हूक’ असा आवाज करीत उडतो आणि जर तो एखाद्या घरावर बसला तर तेथील कोणी ना कोणी मनुष्य मरतो. त्याला मारायचा कोणी प्रयत्न केलाच तर आपल्या चोचीतून ज्वाळा टाकून तो त्याला भाजून काढतो. तसेच येथे कोल्हेही आहेत, ते रात्री कोंबडया पळवतात आणि डोंगर-कडयांत राहतात. रानामध्ये वानरे राहतात, त्यांचा एक राजाही आहे जो वानर-सैन्याला बरोबर घेऊन फिरतो. एखाद्या वानराला कोणी त्रास दिला तर तो आपल्या राजाकडे ती तक्रार नेतो आणि राजा आपले सैन्य गावावर पाठवितो. ते सैनिक घरांची तोडमोड करतात आणि माणसांना मारून टाकतात. असे म्हणतात की वानरांचे सैन्य खूप मोठे आहे आणि त्यांची स्वत:ची भाषाही आहे. त्यांना खूप संतती होते. एखादे वानर अनाथ निपजले तर त्याला ते रस्त्यावर सोडून देतात. अशा वेळी काही हिंदू त्याला संभाळतात आणि त्याला नाना प्रकारची कामे करायला शिकवितात. त्याला विकायची वेळ आली तर तसे रात्रीच करतात, ज्यामुळे त्याला परत मूळ घरी परतता येत नाही. कधीकधी इतरांची करमणूक करण्यासाठी त्याला काही खेळही शिकवितात.
ऑक्टोबरपासून वसंत ऋतू सुरू होतो. शेख अलाउद्दिनचा उरूसही वसंताच्या सुरुवातीसच असतो आणि ८ दिवस चालतो. येथे वसंत ऋतू, उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा प्रत्येकी तीन महिने असतात.