अफानासी निकीतिनचा हिंदुस्थान: पृष्ठ (३ पैकी) ३
बिदर हे मुसलमानी हिंदुस्थानचे राजधानीचे शहर आहे. ते खूप मोठे आहे आणि त्यात खूप मोठी वस्ती आहे. सुलतान २० वर्षांचा तरुण आहे. राज्याचा कारभार सरदारांच्या हातात आहे. ते सगळे खोरासानी आहेत. युद्धावरही तेच जातात. प्रमुख खोरासानी सरदार आहे मलिक-अत-तुझार. त्याचे स्वत:चे २ लाखांचे सैन्य आहे, मलिक खानाजवळ १ लाख, फरहात खानाजवळ २० हजार आणि इतर अनेक खानांपाशी १० हजारांपर्यंत स्वत:चे सैनिक आहेत. सुलतानाजवळ ३ लाख सैनिक आहेत.
देश दाट वस्तीचा आहे पण खेड्यातील प्रजा अतिशय दरिद्री आहे. खानांपाशी अमर्याद सत्ता आहे आणि ते फार धनाढ्य आहेत. ते चांदीच्या पालख्यांमधून फिरतात आणि ते बाहेर पडले की जरीच्या झुली घातलेले वीस घोडे, त्यांच्यामागे ३०० घोडेस्वार, ५०० पायदळ, १० तुतारीवाले, १० ताशेवाले आणि १० गाणारे त्यांच्यापुढे चालतात.
आपल्या आई आणि बेगमेबरोबर सुलतान जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यामागे १०, ००० घोडेस्वार, ५०, ००० पायदळ, २०० जरीच्या झुली घातलेले हत्ती आणि त्याच्यापुढे १०० तुतारीवाले, १०० नर्तक, जरीच्या झुली घातलेले ३०० घोडे, १०० माकडे आणि १०० जनान्यातला मुली - त्यांना ’गौरिका’ (हा शब्द भारतीय वाटतो पण ’दासी’ अशा अर्थाने कोठे सापडला नाही) असे म्हणतात - चालत असतात.
सुलतानाच्या राजवाडयाला सात दारे आहेत आणि प्रत्येक दारावर शंभर पहारेकरी आणि शंभर काफिर कारकून बसलेले असतात. वाड्यात कोण गेले आणि कोण बाहेर आले ह्याची ते नोंद ठेवतात. परदेशी माणसांना वाड्यात प्रवेश मिळत नाही. सुलतानाचा वाडा फार देखणा आहे - त्याच्या दगडी भिंतींवर सोन्याच्या मुलाम्याची चित्रे आहेत. वाड्यात अनेक शोभेची भांडी मांडलेली आहेत.
बिदर शहरात रात्रीच्या वेळी कोतवालाच्या हाताखाली एक हजार राखणदार गस्त घालतात. ते घोडयांवर बसलेले असतात आणि प्रत्येकाचा हातात चूड असते.
बिदरमध्ये मी आपला घोडा ६८ फुतून (?) ह्या किंमतीला विकला. त्याला मी वर्षभर पोसले होते. बिदरमध्ये रस्त्यांमधून दोन साज्झेन लांबीचे (सुमारे सवाचार मीटर) साप फिरताना दिसतात. कुलोनगिरीहून बिदरला मी १४ नोव्हेंबरच्या सुमारास पोहोचलो आणि घोडा नाताळच्या सुमारास विकला.
येथे म्हणजे बिदरमध्ये मी जानेवारी अखेरपर्यंत मुक्काम केला आणि पुष्कळ हिंदुस्थानी लोकांशी माझा परिचय झाला. मी त्यांना माझा धर्म समजावून सांगितला आणि हेही सांगितले की मी मुसलमान नसून येशूवर विश्वास ठेवणारा ख्रिश्चन आहे, माझे खरे नाव अफानासी आहे, जरी मला खोजा युसुफ खोरासानी म्हणून ओळखतात. हिंदुस्थानी लोकांनीही माझ्यापासून काही दडविले नाही, आपले जेवणखाण, व्यापार, पूजापाठ आणि अशा अनेक गोष्टींबाबत त्यांनी मला सांगितले. आपल्या स्त्रियाही ते माझ्यापासून घरात लपवून ठेवत नसत.
मी त्यांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले आणि त्यांनी मला सांगितले की आमचा आदम आणि मूर्तींवर विश्वास आहे आणि सर्व आदमापासून निर्माण झाले आहेत. हिंदुस्थानात एकूण ८४ धर्म आहेत आणि सगळ्यांची मूर्तींच्यावर श्रद्धा आहे. निराळ्या धर्माचे लोक एकमेकांबरोबर खातपीत नाहीत आणि एकमेकांत लग्नेही करीत नाहीत. त्यांच्यापैकी काहीजण बकरी, कोंबडी, मासे आणि अंडी खातात पण गाईचे मांस कोणीच खात नाही.
मी बिदरमध्ये चार महिने राहिलो आणि काही हिंदूंच्याबरोबर ’पर्वत’ नावाच्या जागी जायचे ठरविले. (पुढील वर्णनावरून हे श्रीशैलम असावे असे वाटते पण त्याला ’पर्वत’ असे का म्हटले आहे कळत नाही.) येथे त्यांचे मोठे देऊळ आहे. ही जागा म्हणजे त्यांचे जेरुसलेम किंवा मुसलमानांची मक्का. हिंदूंबरोबर त्या देवळापर्यंत जायला मला एक महिना लागला. त्या देवळात जत्रा असते जी पाच दिवस चालते. देऊळ मोठे आणि दगडी बांधकामाचे आहे. दगडांवर देवांच्या केलेल्या गोष्टी कोरलेल्या आहेत. बारा गोष्टी देवळाभोवती कोरल्या आहेत - देवांनी काय चमत्कार केले, वेगवेगळ्या रूपांत देव कसा प्रकट झाला - प्रथम एक माणूस, नंतर माणूसच पण हत्तीच्या तोंडाचा, तिसरा माणूस पण माकडाच्या तोंडाचा, चौथा अर्धा माणूस आणि अर्धा पशू शेपटासकट. हे सर्व दगडावर कोरलेले आणि एक साज्झेन (१ मीटर) लांबीची शेपूट त्याच्या छातीवरून टाकलेली.
मूर्तीच्या उत्सवाच्या दिवशी सर्व हिंदुस्थान देवळात गोळा होतो. देवळात म्हातारे आणि तरुण, स्त्रिया आणि मुली, सगळे डोक्यावरचे केस काढतात, दाढ्या काढतात आणि डोकी साफ करतात आणि मगच देवळात जातात. देवळात प्रत्येकाकडून देवासाठी दोन नाणी घेतात आणि प्रत्येक घोड्यामागे चार. देवळात असे वीस हजार लाख लोक जमतात, कधीकधी ही संख्या शंभर हजार लाखांपर्यंत जाते. (ही फार अतिशयोक्ती दिसते.)
देवळामध्ये काळ्या दगडात कोरलेली देवाची मोठी मूर्ती आहे, त्याच्या शरीराभोवती त्याचे शेपूट गुंडाळले आहे आणि कॉन्स्टॅंटिनोपलमधील जस्टिनियन सम्राटासारखा त्याने आपला उजवा हात वर धरला आहे आणि त्याच्या डाव्या हातात भाला आहे. (कॉन्स्टॅंटिनोपल हे रशियन ख्रिस्ती धर्माचे उगमाचे गाव, त्यावरून ही निकीतिनची ऐकीव माहिती दिसते. हा पुतळा एका स्तंभाच्या वर ऑटोमन विजेत्यांनी त्याचा नाश करेपर्यंत सुमारे १००० वर्षे होता.)
(जस्टिनियन स्तंभाविषयी अधिक माहितीसाठी इथेपाहा) त्याच्या शरीरावर कमरेभोवतीच्या एका वस्त्राशिवाय अन्य काही कपडा नाही. त्याचा चेहरा माकडाचा आहे. अन्य देवही असेच उघडे आहेत आणि लज्जारक्षणासाठी त्यांनी काही घातलेले नाही. देवांच्या पत्न्याही तशाच उघड्या आहेत आणि बरोबर त्यांची मुले आहेत. देवासमोर काळ्या दगडामधून कोरलेला आणि सोनेरी रंगात रंगविलेला मोठा बैल आहे. लोक त्याच्या खुराचे चुंबन घेतात आणि त्याच्यावर फुले वाहतात. देवावरही फुले वाहतात.
हिंदू लोक गाय, बकरी, कोंबडी, मासे, डुक्कर ह्यांपैकी कोणाचेच मांस खात नाहीत. मात्र त्यांच्या येथे डुकरे खूप दिसतात. दिवसातून दोनदा जेवण करतात, रात्री जेवत नाहीत, मद्य वा मीड ह्यांपैकी काहीच पीत नाहीत. त्यांचे खाणे अगदी साधे असते. एकमेकांबरोबर खात-पीत-जेवत नाहीत, अगदी बायकोबरोबर सुद्धा. त्यांचे खाणे म्हणजे भात, लोण्याबरोबर खिचडी. लोणी आणि दुधाबरोबर शिजवून नाना प्रकारच्या भाज्या आणि फळे खातात. खाणे उजव्या हाताने करतात, डाव्याने काहीही घेत नाहीत. सुऱ्या-चमचे त्यांना ठाऊक नाहीत. प्रवासात स्वयंपाकासाठी एक भांडे बरोबर घेऊन जातात. मुसलमानांपासून दूर राहतात, अशासाठी की कोणा मुसलमानाने आपल्या भांड्याकडे किंवा स्वयंपाकाकडे पाहू नये. कोणी मुसलमानाने पाहिलेच तर ते अन्न खात नाहीत. आपले अन्न कोणाच्या नजरेस पडू नये म्हणून ते रुमालाने झाकून खातात.
रशियन लोकांप्रमाणेच ते पूर्वेस तोंड करून प्रार्थना करतात. दोन्ही हात उंच उचलून आपल्या कपाळावर ठेवतात आणि जमिनीवर आडवे पडतात. हा त्यांचा नमस्कार. बसायच्या वेळी हात पाय तोंड धुतात. त्यांच्या देवळांना दरवाजे नसतात आणि ती पूर्वेकडे तोंड करून असतात. देवही पूर्वेकडेच तोंड करून असतात. मेलेल्या माणसाला जाळतात आणि राख पाण्यात सोडतात. मूल जन्मते तेव्हा बाप त्याला उचलून घेतो. बाप मुलाचे नाव ठेवतो आणि आई मुलीचे. दयाळू स्वभाव त्यांच्यात नसतो आणि त्यांना लाज म्हणजे काय हे माहीतच नाही. कोणी घरात येतो किंवा बाहेर जातो तेव्हा तो वाकून नमस्कार करतो आणि न बोलता जमिनीवर दोन्ही हात टेकवतो.
बैरामच्या मुस्लिम सणाच्या दिवशी सुलतान आणि २० सरदारांनी (विजयानगरविरुद्ध) कूच केले. बरोबर हत्ती होते आणि हत्तींवरील हौद्यात सहा किंवा बारा सैनिक, तोफा आणि बंदुकांसह बसले होते. प्रत्येक हत्तीवर दोन झेंडे होते आणि हत्तींच्या दातांना मोठ्या वजनदार तलवारी लावल्या होत्या. हत्तीच्या कानामध्ये बसलेला माणूस मोठ्या लोखंडी अंकुशाने हत्ती चालवत होता. ह्याशिवाय बरोबर जरीच्या झुली घातलेले एक हजार घोडे, ताशे वाहणारे शंभर उंट, तीनशे तुतारीवाले, तीनशे नर्तक आणि तीनशे दास्या होत्या. सुलतानाच्या अंगरख्यावर माणके बसविली होती आणि पागोट्यावर मोठा हिरा होता. त्याची शस्त्रे सोन्यामाणकांनी मढविली होती. त्याच्या पुढे एक काफिर चाकर छत्र घेऊन चालला होता आणि त्याच्या मागे पायदळ चालत होते. पुढे एक सोन्याची झूल पांघरलेला मस्तवाल हत्ती चालला होता. त्याच्या सोंडेत एक वजनदार लोखंडी साखळी होती जी वापरून तो सुलतानासाठी रस्ता मोकळा करत होता. सुलतानाचा भाऊ २० चाकरांनी उचललेल्या सोनेरी पालखीत बसला होता आणि त्याच्या मस्तकावर सोनेरी छत्री धरलेली होती. मखदूमही (महमुद गावानची पदवी) ४ घोड्यांनी ओढलेल्या सोनेरी रथात बसला होता. त्याचे छत्र रेशमी आणि सोन्याचा कळस असलेले होते. त्याच्या पुढे गायक आणि नर्तक चालले होते. सर्वसामान्य लोक उघडेच होते.
विजयानगरच्या राजापाशी तीनशे हत्ती, एक लाख पायदळ आणि पन्नास हजार घोडे आहेत. तो मोठा सामर्थ्यवान राजा आहे आणि त्याचे सैन्यही विस्तृत आहे. त्याचा किल्ला एका डोंगरावर आहे आणि राजधानी विजयनगर हे मोठे शहर आहे. नगराभोवती तीन खंदक आहेत आणि नगरामधून एक नदी वाहते. राजधानीच्या एका बाजूस दाट अरण्य आहे. राजधानी कोठल्याही बाजूने जिंकता येत नाही.
सुलतानाचे सैन्य राजधानीपुढे एक महिना तळ देऊन उभे होते आणि पुष्कळ सैनिक भुकेने आणि तहानेने मरून गेले. त्यांना समोर पाणी दिसत होते पण ते पाणी ते मिळवू शकत नव्हते.
मलिक-अत-तुझारने दुसरे एक हिंदू गाव जिंकले. वीस दिवस आणि वीस रात्री त्याच्या सैन्याने गावावर तोफांनी हल्ला चढविला. त्याचे स्वत:चे पाच हजार उत्तम लढवय्ये लढाईत मेले. गाव जिंकल्यावर वीस हजार स्त्रीपुरुषांची कत्तल करण्यात आली आणि अजून वीस हजारांना कैदी करून गुलाम म्हणून विकण्यात आले. तरीही त्याला राजधानी जिंकता आली नाही.
आता माझी रशियाला परतायची वेळ झाली आहे आणि माझ्या मनात हा विचार आहे की मी आपला धर्म सोडला आहे, मी मुसलमानांच्याबरोबर उपास केलेले आहेत. मार्च महिना आल्यावर मी मुसलमानांबरोबर एका रविवारी उपास सुरू केला, पण हा महिनाभर मी मांस खाल्ले नाही, कसलेही मुसलमानी अन्न खाल्ले नाही, केवळ दिवसातून दोनदा भाकरी आणि पाणी एवढ्यावर राहिलो, स्त्रीसंग केला नाही आणि स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माता येशू त्याची प्रार्थना केली.
गुलबर्ग्याहून अळंदमार्गे मी दाभोळ बंदराला पोहोचलो आणि रशियाला परतण्यासाठी सोन्याची दोन नाणी देऊन होर्मुझपर्यंत जायला जहाज मिळविले.
- अरविंद कोल्हटकर
Pages
- « first
- ‹ previous
- 1
- 2
- 3