एक दुपार - हरवलेली!: पृष्ठ (३ पैकी) २
''गार्गीऽऽ, ए गार्गीऽऽ.... '' दारातून बाहेर पडताच चैत्रानं आपल्या आवाजातला हलकासा कंप दाबत जोरात हाका मारायला सुरुवात केली. अंगण रिकामं होतं. बंगल्याच्या आवारात, मागच्या बाजूला कसलीच हालचाल नव्हती. बंगल्याला कुलूप लावून ती रस्त्यावर आली. रश्मीच्या घरी जाण्यासाठी दोन रस्ते होते. एक रस्ता शेजारच्या बंगल्याच्या कुंपणाला लगटून जाणारा. छोटीशी पायवाटच होती ती! तर दुसरा रस्ता म्हणजे चार बंगले ओलांडून त्यांना वळसा घालून जाणारा. अगोदर चैत्राने पायवाटेचा रस्ता धुंडाळायचे ठरवले. तो रस्ता गार्गीचा नेहमीचा रस्ता होता. पायवाट असल्यामुळे वाहनांची भीती नव्हती. शिवाय शेजारच्या झुडपांत एखादी भटकी मांजर विसाव्याला असायची त्याचेही आकर्षण होतेच! चैत्रा पायवाटेच्या आजूबाजूची झाडेझुडपेही न्याहाळत होती. पण तिच्या भिरभिरत्या नजरेला गार्गीची छोटी मूर्ती काही दिसेना! पोटात उठणारा भीतीचा गोळा दाबत ती गार्गीच्या नावाचा पुकारा करत त्या रस्त्याने दोनदा - तीनदा फिरली. गार्गीचा पत्ता नाही. तिच्या छातीतील धडधड वाढत चालली होती. मोठ्या आशेनं तिनं पुन्हा एकदा रश्मीच्या घरचा फोन लावला.
''आजी, तुम्ही पुन्हा एकदा बघता का गार्गी खरंच तुमच्या घरून गेली आहे का ते? जरा हाका मारून बघा ना! जवळच खेळत असेल ती कुठंतरी! ''
''अहो चैत्राताई, मी स्वतः दार बंद केलं तिच्या माघारी! वाटलं तर तुम्ही येऊन खात्री करताय का? ''
''अं, असं नव्हतं मला म्हणायचं हो, पण प्लीज बघाल का परत एकदा? ''
''मी असं करते, आमच्या अंगणात पुन्हा बघते. आणि तुम्ही पाठकांच्या बंगल्याजवळचा रस्ता पाहिलात का? ''
''आजी, मी तिथेच आहे हो आता! दोन-तीनदा चकरा मारल्या, तिला हाका मारल्या... पण गार्गी कुठंच दिसत नाहीये! '' घशाशी दाटून येणारा आवंढा गिळत चैत्रा उत्तरली.
''मी असं करते, मी ठेवते फोन. तुम्ही बघा आणि मला कळवा प्लीज. ''
रश्मीच्या आजींशी बोलून झाल्यावर क्षणभर चैत्राला काय करावं ते काहीच सुचेना! कुठं गेली असेल ही पोर? कुठं पडली तर नाही ना? तिला लागलं, खरचटलं तर नसेल ना? कुठं जिव्हारी मार तर बसला नसेल ना?....
रश्मीच्या बंगल्याकडे जाणारा दुसरा रस्ता चैत्राने मोठ्या आशेने पालथा घातला, पण रस्त्यात गार्गीचा कोठेच पत्ता नव्हता. दुपारच्या वेळेमुळे सगळीकडे सामसूम होती. तो रस्ता दोनदा फिरून ती पुन्हा आपल्या बंगल्यापाशी आली.
''गार्गीऽऽ.... '' एक नाही की दोन नाही. ''गार्गी बेटा कुठं आहेस तू? लपली आहेस का? बाहेर ये बरं! '' आवाजातली थरथर लपवत चैत्रा हाका मारत होती. पण कोणीच तिच्या हाकेला ओ देत नव्हतं. सारं काही स्तब्ध होतं! गार्गीचं लाडकं जास्वंदीचं आणि कण्हेरीचं झाड, त्या शेजारचा जाईजुईचा वेल.... वारा पण जणू श्वास रोखून होता... काही घडायची वाट बघत.
एकीकडे आभाळात कृष्णमेघांची गर्दी दाटत चालली होती तर दुसरीकडे चैत्राच्या मनात विचारांचा नुसता कल्लोळ माजला होता. कुठं गेली असेल गार्गी? तिला तर या भागातले रस्तेही नीट माहीत नाहीत! पलीकडच्या कॉलनीतल्या बागेत गेली असेल का? पण छे! एवढ्या लांबवर ती एकट्यानं कधीच नाही जाणार! शिवाय दुपारी ती बाग बंद असते हे तिला चांगलंच माहीत आहे! कोणी रस्त्यात तिला काही.... छे छे! असा विचार करून चालणार नाही. गार्गीला काही होणार नाही. तिला माहीत आहे रस्त्यात कोणा अनोळखी माणसाशी बोलायचं नाही ते! आपणच किती वेळा तिला पढवलंय, कोणी काही बोललं, काही दिलं तर ते घ्यायचं नाही. कोणी त्रास देऊ लागलं तर जोरात ओरडायचं..... अरे देवा! कोणी तिला काही केलं तर नसेल ना? आजकाल वर्तमानपत्रात कसल्या भलभलत्या बातम्या येतात... ते टी. व्ही. वरचे बातम्यावाले पण काही कमी नाहीत! आपण तिला एकटीला सोडायलाच नको होतं! किमान तिला आणायला तरी जायला हवं होतं. गेल्याच आठवड्यात प्रद्युम्नचं आणि आपलं त्यावरून वाजलं होतं. त्याचं म्हणणं, तू तिला फार जपतेस. तिला एकटीला कुठं सोडत नाहीस. सगळीकडे तिला तिची मम्मा हवी असते. अशाने ती तुझ्यावर जास्त अवलंबून होत चालली आहे..... अरे, सहा वर्षांच्या मुलीला कधी एकटं सोडतं का कुणी? परवा परवा पर्यंत ती चालताना पाय दुखू लागले की माझ्या कडेवर बसायची. रस्त्यात कोणी भेटलं की माझ्या मागे लपायची! मला नाही का कळत तिला कधी एकटं सोडायचं ते.... आणि जसा काही तू कायम इथे तिची काळजी घ्यायला असतोस! तिला काही झालं तर ते मलाच निस्तरावं लागतं ना!... त्या वादात शब्दाला शब्द वाढत गेले होते नुसते! त्यातून निष्पन्न काहीच झालं नाही. मग तो काही न बोलता ऑफिसला निघून गेला होता आणि दिवसभर चैत्राची धुसफूस!
तेव्हाच तिनं ठरवून टाकलं होतं. गार्गीला थोडं एकटं सोडून बघायला हवं.... त्या नंतर तिने तीन-चारदा गार्गीला रश्मीच्या घरी एकट्यानं जाऱ्ये करण्याची परवानगी दिली होती.
हातातला मोबाईल वाजला तशी चैत्रानं तो उचलला.
''हॅलो, मी रश्मीची आजी बोलतेय. सापडली का गार्गी? ''
''नाही हो! मी दोन्ही रस्ते शोधले, आमच्या घरी जाऊन आले, तिला हाकाही मारल्या. असं आधी कधी झालं नव्हतं हो! तुम्ही पाहिलंत का तुमच्या अंगणात? '' चैत्राचा स्वर रडवेला झाला होता.
''बघितलं तर! सगळीकडे शोधलं हो मी पण! काय बाई या मुली एकेक! माझ्याबरोबर रश्मी पण आली होती शोधायला. कुठंच पत्ता नाही हो गार्गीचा! ''
''बघा ना! आता कुठं शोधू मी तिला.... '' चैत्राचा कावराबावरा आवाज.
''तुम्ही घाबरू नका चैत्राताई! मी असं करते शेजारच्या बंगल्यातल्या लोकांनाही विचारते. कुणी पाहिलं असेल गार्गीला तर ते सांगतील तसं. ''
''प्लीज.... '' चैत्राने फोन बंद केला आणि थरथरत्या हाताने प्रद्युम्नचा मोबाईल नंबर स्पीड डायल केला.
''उचल, उचल रे बाबा लवकर!... ''
''हं काय गं? मी उद्या निघतोय इथून. तरी मला घरी पोचायला रात्र होईल. काही काम होतं का? ''
''अरे, गार्गी.... ''
''काय केलं गार्गीनं? ''
''गार्गी सापडत नाहीये रे! रश्मीच्या घरी गेली होती ती खेळायला. एका तासापूर्वी तिथून ती आपल्या घरी यायला निघाली.... अजून ती घरी पोचली नाहीये रे! मी सगळीकडे शोधलं.... किती हाका मारल्या.... कुठंच दिसत नाहीये ती! '' प्रद्युम्नशी बोलताना चैत्राच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहत होते.
''तू पाहिलंस का नीट सगळीकडे? ''
''हो, हो, दोन्ही रस्ते चार-पाचदा पालथे घातले, रश्मीच्या आजीने त्यांचं अंगण शोधलं, कुठंच सापडली नाही रे ती! मी सगळीकडे शोधतेय पण ती कुठंच दिसत नाहीये. ''
''शेजाऱ्यांना... ''
''रश्मीची आजी विचारते आहे त्यांना... त्यांनाही काय करावं कळत नाहीये. कुठं असेल रे आपलं पिल्लू? '' चैत्रा एव्हाना स्फुंदू लागली होती.
''हे बघ, मी इथून ताबडतोब निघता येतंय का बघतो. पण आधी तू रडायचं थांबव बरं! चैतू, तू रडून कसं चालेल? मग आपल्या गार्गीला कोण शोधेल? मी असं करतो, सुभाषला आणि रजतला कळवतो. अं, हे बघ, दोघेही जवळच राहतात. तेही शोधायला मदत करतील. ''
''त्यांना म्हणावं लवकर या... आणि तूही असशील तसा निघून ये! मला काही ऐकायचं नाहीये या बाबतीत तुझं! ''
'' हो, हो, तू ठेव फोन. मी परतीची व्यवस्था करतोय लगेच! आणि काळजी करू नकोस. सगळं होईल नीट! ''
वाट फुटेल तशी चालत चैत्रा आता कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर आली होती. मनातले विचारही सैरावैरा धावत होते. कुठं गेली असेल गार्गी? तरी हजारदा तिला सांगितलंय... लपायची तर भारी हौस आहे तिला! काही झालं म्हणजे? नाही, नाही! तसं काही होणार नाही. तिचं सगळं काही नीट होऊ देत म्हणून रोज प्रार्थना करतो आपण! मग असं कसं बरं तिला काही होईल?
भिरभिरत्या, काळजीभरल्या नजरेने चैत्रा रस्त्याचा कोपरा अन कोपरा न्याहाळत होती. लॉटरीच्या दुकानाशेजारच्या बोळात गेली असेल का गार्गी? की मिठाईच्या दुकानाजवळ रेंगाळली असेल?
रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्यांना विचारल्यावर त्यांच्याकडे तरी गार्गीची काही माहिती नव्हती. समोरची फळवाल्याची टपरी... तिथं तर गेली नसेल ना ती??