एक दुपार - हरवलेली!: पृष्ठ (३ पैकी) ३

पुन्हा एकदा चैत्राचा मोबाईल वाजला. ''हॅलो, मी रश्मीची आजी. चैत्राताई, मी शेजारच्या पाठक, चौधरी, जाधव आणि रणदिव्यांच्या घरी फोन करून त्यांनाही गार्गीसाठी बघायला सांगितलंय. रणदिव्यांचा कॉलेजातला भाचा आलाय. तोही गार्गी कुठं दिसतेय का शोधतो म्हणालाय.... ''

त्यांचा कॉल संपेस्तोवर सुभाष आणि रजतचेही कॉल आले. दोघे आपापल्या ऑफिसात सांगून लगेच निघणार होते. सुभाषच्या ओळखीचा पोलिस इन्स्पेक्टर आहे, त्याची मदत घेऊ असे तो म्हणत होता.

पोलिस... इन्स्पेक्टर... तपास.... अरे देवा!

चैत्राच्या पायातले त्राण जाऊन ती मटकन एका बंद दुकानाच्या पायरीवर बसली. डोक्यातले विचार नुसते बेलगाम धावत होते. गार्गी.... दुकान.... आशेने तिने आजूबाजूच्या भाजी, किराणा मालाच्या दुकानांकडे पाहिलं. पण दुकानं दुपारच्या वेळेमुळे बंद होती.

अजून तासाभरात गार्गी सापडली नाही तर.... पोलिस?? की सुभाषच्या ओळखीचा इन्स्पेक्टर? छे छे! पोलिसांपर्यंत जायची वेळच येणार नाही. गार्गी सापडायलाच पाहिजे! आणि का सापडणार नाही? असं हिंमत हरून चालणार नाही... चैत्राने मनाला बजावलं आणि पुन्हा उठून ती गार्गीची काही खूण दिसते का ते शोधू लागली.

मोबाइलची रिंग! देवा रे... गार्गीची काही खबरबात मिळू दे! ती अडचणीत असेल तर सुचेल का तिला फोन करायला? तिला आपला मोबाईल नंबर पाठ आहे... मोबाईल कसा हाताळायचा हे आपल्यापेक्षा तिलाच जास्त चांगलं समजतं! पण तिला कसं कळणार की आपण तिला शोधतोय?

''हॅलो, चैत्रा? '' प्रद्युम्नचा काळजीभरला स्वर. ''हे बघ, मला संध्याकाळची गाडी मिळतेय. मी पोचेपर्यंत पहाट होईल. ''

''ठीक आहे. ''

''बरं, रश्मी काही म्हणाली का? गार्गी तिच्यापाशी काही बोलली का? ''

''अं, मी विचारलंच नाहीये रे! इथं मी वेड्यासारखी शोधते आहे गार्गीला... तिला कधी विचारणार? ''

''बरं, मी रश्मीशी आणि तिच्या आजीशी बोलतो, तू काळजी नको करूस. तिथेच जवळपास गेली असेल गार्गी! आणि एकदा खेळायला लागली की भान उरत नाही तिला..... '' बोलता बोलता प्रद्युम्नचा गळा दाटून आलेला तिला जाणवला. त्याने घसा खाकरला. काही क्षण असेच शांततेत गेले.

''बरं मी ठेवते फोन. ''

''काळजी घे. ''

''हो. '' चैत्राने फोन बंद करून डोळ्यांतून ओघळलेले चुकार अश्रू पुसले.

''मिसेस महाजन?... गार्गीची आई?? '' एक कॉलेजवयीन तरुण चैत्राच्या समोर उभा होता.

''हो... ''

''मी अजय. रणदिव्यांचा भाचा. तुम्ही गार्गीला शोधताय ना? मी पण येतो तुमच्याबरोबर. चला... आधी या उजवीकडच्या गल्लीत शोधायचं? ''

''अं... हो, चल... थँक्स! ''

दोघेही झपाझप चालू लागले.

''गार्गीने कोणत्या रंगाचा ड्रेस घातलाय? ''

''अं... पांढरा फ्रॉक आहे तिचा. त्यावर रंगीत गोळ्यांची नक्षी आहे. ''

''आणि वय काय असेल तिचं? पाच... सहा, बरोबर? ''

''हं.. ''

''आय अॅम सॉरी... ''

''इटस ओके. ''

एव्हाना आभाळात विजा कडाडू लागल्या होत्या. लवकरच पाऊस पडायची चिन्हं होती. अजय आणि चैत्राने नकळत आपल्या पावलांची गती वाढवली. जर पाऊस कोसळायला लागला तर गार्गीला शोधणं आणखी मुष्किल ठरणार होतं.

''अजय, तू समोरच्या बिल्डिंगच्या रखवालदाराला विचार, मी या बिल्डिंगमधल्या लिफ्टपाशी पाहून येते. ''

''ओके. ''

''काही कळलं? ''

''नाही रे! लिफ्टमन म्हणाला अशी कोणी मुलगी पाहिली नाही म्हणून! ''

''आता कुठं शोधायचं? ''

''ओह! मॅडम, आय मीन, मिसेस महाजन.... तुमचा मोबाईल वाजतोय! ''

प्रद्युम्नचा कॉल!

''काय रे? ''

''चैत्रा, '' प्रद्युम्नचा फोनवर किंचित चढलेला, उत्तेजित स्वर.

''आम्ही शोधतोय तिला. रणदिव्यांचा भाचा आहे माझ्या सोबत. ''

''अगं तेच सांगायला फोन केलाय... मी रश्मीशी बोललो आता! ती म्हणाली, त्या दोघी गोल्डफिशशी खेळत होत्या तेव्हा त्यांना पत्कींच्या बंगल्याजवळच्या हौदात सोडलेले मासे आठवले. तुला माहीत आहे ना पत्कींचा बंगला? तर त्या हौदातल्या माशांवरून त्या दोघी गप्पा मारत होत्या. तुम्ही गेला होतात का ते मासे पाहायला? ''

''अं, हो... गेल्याच आठवड्यात गेलो होतो तिथं आम्ही! ''

''मग मला वाटतंय आपलं पिल्लू तिथंच गेलं असणार हौदातल्या माशांशी खेळायला.... ''

''काय? म्हणजे तू म्हणतोयस... ओह.... ओके. मी बघते लगेच तिथं. ''

''काळजी घे. आणि लगेच कळव मला. ''

''हो, हो... ''

''गार्गीऽऽ.... '' पत्कींच्या घराजवळ आल्यासरशी चैत्राने हाकांचा सपाटा लावला होता.

पत्कींनी बंगल्याच्या आजूबाजूच्या झाडाझुडुपांना पत्कींनी तसंच वाढू दिलं होतं. चिखल, वाळूचा ढिगारा, माजलेलं काँग्रेस गवत आणि घाणेरीची झुडपं यांमुळे बंगल्याजवळच्या हौदाचा परिसर पुरता झाकला गेला होता. अजय जवळच पडलेल्या एका फांदीने गवत, झुडपांना बाजूला सारून अंदाज घेत होता.

''मिसेस महाजन.... इकडे बघा... समोर, त्या झाडाच्या रेषेत... तो पांढरा फ्रॉक दिसतोय का तुम्हाला? ''

''अजय... अरे देवा! गार्गी!! '' चैत्राला तो पांढुरका कपडा दिसताक्षणी ती त्या रोखाने धावतच सुटली. पावसाळ्यात माजलेल्या घोटाभर उंचीच्या गवतातून आणि झुडपांच्या पसरलेल्या फांद्यांतून मार्ग काढत ती हौदापाशी पोचली मात्र आणि तिचा श्वास घशातच अडकला.

एका हातात वाळलेली, चिखलानं लडबडलेली फांदी घेतलेल्या अवस्थेत गार्गी हौदाच्या भिंतीला टेकून पाय पसरून गाढ झोपली होती.

''गार्गी, ए गार्गी बेटा, ऊठ ना! '' चैत्राने गार्गीच्या खांद्याला धरून तिला हलकेच हालवले. दोन क्षण काहीच प्रतिसाद आला नाही. धडधडत्या हृदयाने तिने गार्गीच्या कपाळावर झेपावलेले केस सारखे केले. त्या ओळखीच्या, मायेच्या स्पर्शाने कमळाच्या पाकळ्या उलगडाव्यात तसे गार्गीचे डोळे हळूहळू उघडले. चैत्राला समोर पाहताच तिने स्वतःला आपल्या मम्माच्या गळ्यात झोकून दिलं.

''मम्मा... मम्मा.... अं अं... मला घरी जायचंय.... ''

चैत्राने गार्गीला आपल्या मिठीत घट्ट कवटाळलं. आपल्या लेकीचा तो ऊबदार स्पर्श आणि गंध अनुभवताना, तिच्या लहान गोजिऱ्या देहाचा भार पेलताना ती हळूच पुटपुटत होती,

''हो रे माझ्या पिल्ला. आता घरी जायचं हं.... मम्मा आणि गार्गी दोघी आता घरीच जाणारेत. आणि रात्री बाबा येणारे पिल्लाचा. मग पिल्लू आणि पिल्लाचा बाबा खूप दंगा करणारेत.... मम्माला रागावायला लावणार आहेत.... हो ना? '' बसल्या जागी गार्गीच्या केसांना कुरवाळत, तिला कुशीत घेऊन डोलताना चैत्राला भडभडून येत होतं. इतर कसलंच भान तिला उरलं नव्हतं. आपल्या लेकीचा हवाहवासा भार पेलताना एवढा वेळ सोसलेला मनावरचा असह्य भार मात्र हलका झाला होता.

मम्माच्या गळ्यात पडून झाल्यावर गार्गीने आश्वस्तपणे चैत्राच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि ती पुन्हा एकदा झोपेच्या अधीन झाली. आभाळातून ढगांच्या गडगडाटाबरोबर पावसाचे टपोरे थेंब वर्षू लागले होते. चैत्राच्या गालांवरच्या अश्रूंचे पाणी त्यांमध्ये मिसळून गेले होते.


- अरुंधती कुलकर्णी.