मस्ग्रेव्हांचा रिवाज: पृष्ठ (६ पैकी) २
"मी तुला ग्लोरिया स्कॉटबद्दल सांगितले होते, आठवतेय का तुला? ग्लोरिया स्कॉट बोटीवरच्या त्या दुर्दैवी माणसाशी मी बोललो तेव्हा सर्वप्रथम त्याने मला गुप्तहेर होण्याची प्रेरणा दिली आणि नंतर हाच माझा पोटापाण्याचा उद्योग झाला. आज माझे नाव सर्वतोमुखी झाले आहे आणि सामान्य लोकच नाही तर सरकारी अधिकारीही संदिग्ध परिस्थितीमध्ये अगदी विश्वासाने माझ्याकडे अंतिम निवाड्यासाठी येतात. आपली पहिल्यांदा भेट झाली ’स्टडी इन स्कार्लेट’च्या वेळी, तेव्हा माझा व्यवसाय अगदी खूप नफ्यात चालला नसला तरी माझे नाव बऱ्यापैकी झाले होते. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये मला किती कष्ट करावे लागले आणि किती वाट पाहावी लागली याची कल्पना तुला यायची नाही. "
"लंडनला राहायला आल्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये मी ब्रिटिश म्यूझियमच्या कोपऱ्यावर माँटेग्यू स्ट्रीटवर राहत असे. माझ्यापाशी चिकार मोकळा वेळ होता आणि हा सगळा वेळ मी माझ्या कामात अधिकाधिक अचूकता यायला मदत करतील अशा विज्ञानाच्या सर्व शाखांचा अभ्यास करण्यात खर्ची घालत होतो. माझे शिक्षण संपत आले त्यावेळेस आमच्या विद्यापीठात रहस्याची उकल करण्याच्या माझ्या तंत्राला बरीच प्रसिद्धी मिळालेली होती. त्यामुळे जुन्या वर्गमित्रांच्या ओळखीने काही काळाच्या अंतराने माझ्याकडे प्रकरणे येत राहिल्या. मस्ग्रेव्हांच्या रिवाजाचे हे प्रकरण म्हणजे माझ्याकडे आलेल्या केसेसपैकी तिसरी केस, मी आज ज्या ठिकाणी पोचलो आहे तिथे पोचण्यासाठी मी पहिली पावले टाकली ती या केसमधल्या वैचित्र्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय अशा घटनाक्रमामुळे. "
"रेजिनाल्ड मस्ग्रेव्ह आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकायला होतो. कॉलेजात आमची एकमेकांशी ओळख झाली होती. पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांमध्ये तो विशेष लोकप्रिय होता अशातला भाग नाही. पण मला मात्र नेहमी असे वाटत असे की त्याचा अभिमानी स्वभाव हा वरवरचा मुलामा होता. या मुलाम्याखाली तो आपला नैसर्गिक असा न्यूनगंड बेमालूमपणे लपवत असे, असा माझा अंदाज होता. मस्ग्रेव्ह अंगकाठीने सडसडीत होता. त्याचे नाक तरतरीत होते. डोळे टपोरे होते, तो वागायला बोलायला तसा संथ असला तरीही त्यात दरबारी अदब होती. एकूणच त्याचे व्यक्तिमत्व अस्सल सरंजामी होते. त्याचे घराणे देशातल्या सर्वांत जुन्या सरदार घराण्यांपैकी एक आहे. उत्तरेतल्या मस्ग्रेव्ह घराण्याचीच ही धाकली पाती असली तरीही मस्ग्रेव्हचे पूर्वज सोळाव्या शतकात केव्हा तरी ससेक्सच्या पश्चिमेकडच्या भागात आले. त्याचे घर म्हणजे हर्लस्टोनची गढी ही बहुतेक ससेक्स परगण्यातली सगळ्यात जुने राहते घर असावे. या जुनाट वास्तूचे अंगभूत गुणधर्म मस्ग्रेव्हच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग झाले आहेत असे मला नेहमी वाटते. कारण त्याच्या निस्तेज चेहऱ्यावरचे चौकस भाव असोत किंवा सदैव ताठ असणारी त्याची मान असो, या गोष्टींकडे पाहिले की मला करड्या रंगाच्या दगडांनी बांधून काढलेले प्रशस्त बोळ, जुन्या गढीच्या खिडक्या आणि मध्ययुगातल्या भव्य बांधकामांचे अवशेष यांची हटकून आठवण होते. कॉलेजात असताना आमची एक दोन वेळा अगदी प्रदीर्घ चर्चा झाली होती आणि त्या वेळी परिस्थितीचे निरीक्षण करून त्यावरून निष्कर्ष काढण्याच्या माझ्या हातोटीमध्ये त्याला अतिशय रस आहे, असे माझ्या लक्षात आले होते. "
"कॉलेज संपल्यावर चार वर्षे आमची काहीच गाठभेट नव्हती. अचानक एक दिवस सकाळी मस्ग्रेव्ह माँटेग्यू स्ट्रीटवरच्या माझ्या घरी आला. इतक्या वर्षांमध्ये त्याच्यात फारसा बदल झाला नव्हता. तो आपल्या कपड्यांच्या बाबतीत नेहमीच चोखंदळ होता आणि त्याचे कपडे तरुण माणसांच्या सध्याच्या फॅशनला साजेसेच होते. त्याचे वागणेही पूर्वीसारखेच शांत आणि नम्र होते. "
आम्ही अगदी मनापासून हस्तांदोलन केल्यावर मी त्याला म्हटले, "मस्ग्रेव्ह, कसे काय चालले आहे तुझे? "
"दोन वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे निधन झाले. तुला कळलेच असेल. त्यांच्यानंतर हर्लस्टोनची गढी आणि आमच्या सगळ्या जमिनींची व्यवस्था मीच बघतो. शिवाय आमच्या जिल्ह्यातून मी निवडून आलो आहे, त्यामुळे मला वेळ कसा तो पुरत नाही. पण ते असू दे. काय रे होम्स, मी असे ऐकले आहे की कॉलेजात असताना गंमत म्हणून निरीक्षण–निष्कर्षाचा जो प्रयोग करून तू आमचे मनोरंजन करायचास तोच वापरून तू हल्ली खऱ्याखुऱ्या केसेस सोडवतोस म्हणे? "
"होय. मी माझ्या बुद्धीचा वापर करून पैसे मिळवतो. "
"हे ऐकून मला खूप आनंद झाला. कारण तुझ्या सल्ल्याची आत्ता मला खूप गरज आहे. हर्लस्टोनला माझ्या घरामध्ये काही विचित्र घटना घडल्या आहेत आणि पोलिसही हा गुंता सोडवू शकलेले नाहीत. हे प्रकरण अतिशय गूढ आणि अनाकलनीय झाले आहे. "
"गेले कित्येक महिने नुसत्या रिकामपणात मी ज्या संधीची वाट पाहत होतो ती संधी आयतीच माझ्याकडे चालत आली होती. त्यामुळे मी किती उत्सुकतेने त्याचे बोलणे ऐकले असेल याची तू कल्पना करू शकतोस वॉटसन. मला मनातून असे वाटत होते की हे रहस्य उकलण्यात इतर लोक अपयशी ठरले असले तरीही मला नक्कीच यश मिळेल. "
"मला सगळे काही सविस्तर सांग पाहू! " मी अधीरपणे म्हणालो.
मी दिलेली सिगारेट घेऊन मस्ग्रेव्ह माझ्या समोर बसला आणि सांगू लागला -
"हर्लस्टोनच्या आमच्या घराची वास्तू बरीच जुनी आहे आणि ती काही काही ठिकाणी मोडकळीस आली आहे. एवढ्या मोठ्या आणि जुनाट गढीची व्यवस्था पाहण्यासाठी मला अनेक लोकांच्या मदतीची गरज पडते. त्यामुळे मी असा सडाफटिंग असलो तरीही मला बराच मोठा नोकरवर्ग पदरी बाळगावा लागतो. माझी मित्रमंडळी जेव्हा आमच्या मळ्यातल्या पक्ष्यांच्या शिकारीसाठी जमतात तेव्हा कामाला माणसे कमी पडू नयेत असाही उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. माझ्याकडे आठ मोलकरणी, एक स्वयंपाकीण, एक बटलर, दोन नोकर आणि एक पोऱ्या कामाला आहे. बागेची आणि तबेल्याची व्यवस्था बघायला या लोकांशिवाय वेगळी माणसे नेमलेली आहेत. "
"या सगळ्यांपैकी माझा बटलर ब्रुंटन हा आमचा सगळ्यात जुना सेवक आहे. माझ्या वडिलांनी त्याला नोकरीवर ठेवले तेव्हा तो अगदी तरुण होता आणि शाळामास्तराचे काम करत होता. पण लौकरच आपल्या स्वभावाने आणि कौशल्याने त्याने अशी जागा पटकावली की आमचे त्याच्याशिवाय पान हलेनासे झाले. ब्रुंटन चांगल्या घरातला आहे. दिसायला नीटस आहे. त्याचे कपाळ भव्य आहे. गेली वीसेक वर्षे तो आमच्याकडे कामाला आहे. पण त्याचे वय चाळिशीच्या जवळपास आहे. त्याला बऱ्याच भाषा बोलता येतात आणि जवळजवळ सगळी वाद्ये वाजवता येतात. या त्याच्या गुणवैशिष्ट्यांमुळे आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांसाठी हर्लस्टोनला येणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. विशेषतः हर्लस्टोनच्या बटलरची ते नेहमी आठवण काढतात. ब्रुंटनसारख्या अतिशय गुणी माणसाने इतकी वर्षे एकाच ठिकाणी टिकून राहावे ही खरे तर आश्चर्याचीच गोष्ट म्हणायला हवी. पण माझा असा अंदाज आहे की दुसरीकडे नोकरी शोधण्यासाठी जी काही खटपट करावी लागते ती करणे त्याच्या जिवावर येत असावे आणि म्हणून तो आहे त्या परिस्थितीमध्ये सुखासमाधानाने राहत असावा. "
"या सद्गुणांच्या पुतळ्यामध्ये एकच दोष आहे. तो स्त्रीलंपट आहे. आणि आमच्यासारख्या आडगावचे शांत वातावारण या गोष्टीला पूरक ठरलेले आहे. त्याची बायको जिवंत होती तोवर ठीक होते. पण ती वारल्यावर मात्र आम्हाला त्याच्यामुळे बराच त्रास होत आलेला आहे. रेचल हॉवेल्स, आमची मोलकरीण हिला लग्नाचे वचन दिल्यानंतर अखेरीस तो स्थिरावेल असे आम्हाला वाटले होते. पण तिला वचन दिल्यानंतर काही दिवसांतच तिला सोडून ब्रुंटन आमच्या गेमकीपरच्या लेच्या लेकीच्या जॅनेट ट्रेजेलिसच्या मागे लागला. रेचल ही एक अतिशय गुणी मुलगी आहे. पण ती आहे वेल्श. सणकी डोक्याची. ब्रुंटनने तिचा विश्वासघात केल्यापासून आजतागायत किंवा कालपर्यंत म्हणा, तिची जणू काही सावलीच आमच्या घरात वावरते आहे. हर्लस्टोनमध्ये घडलेली ही पहिली नाट्यपूर्ण आणि सनसनाटी घटना. पण नंतर अशा काही घटना घडल्या की मला ब्रुंटनला कामावरून काढावे लागले आणि त्या गोंधळात या गोष्टीकडे आमचे साफ दुर्लक्ष झाले. "
"त्याचे असे झाले, की मी मागे म्हटल्याप्रमाणे ब्रुंटन हा खूप हुशार माणूस आहे. पण या हुशारीनेच त्याचा घात केला. आपल्या हुशारीमुळे तो गरजेपेक्षा जास्त चौकस झाला आणि ज्या गोष्टींशी आपला संबंध नाही अशा गोष्टींमध्येही त्याने नाक खुपसायला सुरुवात केली. त्याचा हा आगाऊपणा कुठल्या थराला जाऊ शकतो याची मला एरवी कल्पना आलीच नसती. पण एक दिवस निव्वळ योगायोगाने ही गोष्ट माझ्या नजरेस पडली. "
"आमच्या घराची वास्तू मोठ्या भूभागावर पसरलेली आहे. त्यामुळे तिथे सतत काहीतरी खुडबूड सुरू असते. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री जेवण झाल्यावर माझी एक कपभर चांगली कडक कोरी कॉफी झाली होती. त्यामुळे खूप रात्र झाल्यावरही मला काही केल्या झोप लागेना. शेवटी रात्री दोन वाजता मी कंटाळून झोपेचा नाद सोडून दिला आणि माझ्या खोलीतली मेणबत्ती लावली. मी वाचत असलेले पुस्तक पूर्ण करून टाकावे असा माझा विचार होता. पण ते पुस्तक मी बिलियर्डचे टेबल ठेवलेल्या खोलीमध्येच ठेवून आलो होतो. मग मी माझा ड्रेसिंग गाऊन चढवला आणि ते पुस्तक आणायला म्हणून खोलीबाहेर पडलो. "