मस्ग्रेव्हांचा रिवाज: पृष्ठ (६ पैकी) ६

"वॉटसन, अशा वेळी मी काय करतो हे तर तुला ठाऊकच आहे. मी स्वतःला त्या माणसाच्या जागी ठेवतो आणि साधारणपणे त्याच्या बुद्धिमत्तेचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीमध्ये मी कसा वागलो असतो याचा विचार करतो. या प्रकरणामध्ये ब्रुंटन हा खरोखरच अतिशय हुशार माणूस असल्यामुळे गोष्टी जराशा सोप्या झाल्या होत्या. इथे काहीतरी मौल्यवान गोष्ट दडवून ठेवलेली आहे हे ब्रुंटनला ठाउक होते. तिथला दगड इतका जडजंबाळ होता की कुणाच्याही मदतीशिवाय एकट्या माणसाला तो दगड उचलणे अशक्य आहे हेही त्याच्या लक्षात आले होते. अशा वेळी तो काय करेल? पकडले जाण्याच्या भीतीने ब्रुंटन बाहेरच्या एखाद्या विश्वासातल्या माणसाकडून किंवा ओळखीतून मदत मिळवू शकत नव्हता. त्याऐवजी त्याला घरातूनच जर मदत मिळाली असती तर बरे झाले असते. कोणाला बरे विचारले असेल त्याने? एके काळी रेचल हॉवेल्स त्याच्या अगदी भजनी लागली होती. पण एखाद्या स्त्रीला कितीही वाईट वागणूक दिली असली तरीही आपण तिचे प्रेम कायमचे गमावून बसलो आहोत हे एखाद्या पुरुषाच्या लक्षात यायला बराच वेळ लागतो. ब्रुंटनने गोड बोलून हॉवेल्सचे मन वळवले असणार आणि तिला आपली हस्तक बनवले असणार. ते दोघे मिळून रात्री इथे आले असणार आणि त्यांच्या दोघांच्या प्रयत्नानंतर तो दगड जागचा हलला असणार. एवढ्या गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या असाव्यात इतक्या स्पष्ट होत्या. "

"पण ते दोघे जण जरी असले तरी त्यातील एक व्यक्ती स्त्री होती आणि तिच्यासाठी तो दगड उचलणे खूप अवघड गेले असणार. आम्हाला दोघांना – एक चांगला हट्टाकट्टा ससेक्समधला पोलिसगडी आणि मी - तो दगड उचलायला बरेच कष्ट पडले होते. मग त्या दोघांनी हे काम सोपे जावे यासाठी काय बरे केले असेल? अशा परिस्थितीमध्ये मी जे केले असते तेच बहुधा त्यांनीही केले असावे. मी जागेवरून उठलो आणि जमिनीवर पसरलेल्या लाकडाच्या ढलप्यांची बारकाईने तपासणी केली. मला अपेक्षित असलेली वस्तू मला तिथे सापडली. एका बाजूला विशिष्ट पद्धतीने चेपले गेलेले एक तीन फूट लांबीचे लाकडाचे कांडके आणि दोन्ही टोकांना चेपलेली इतर अनेक फळकुटेही तिथे होती. या लाकडांच्या मदतीने तो दगड उचलला होता. उचललेल्या दगडाच्या फटीत एकेका लाकडाची लांबीकडची बाजू घालून त्यांनी ती फट एक माणूस सरपटत तिच्याखालून जाऊ शकेल इतकी मोठी केली होती आणि त्या दगडाचे जवळजवळ सगळे वजन पडल्यामुळे ती फळकुटे अशी चेपली गेली होती. इथपर्यंत मी अगदी ठामपणे सांगू शकत होतो. "

"आता प्रश्न असा होता की मध्यरात्री इथे नेमके काय घडले असावे? दगडाखालची फट इतकी लहान होती की एकच माणूस त्यातून आत गेला असता. म्हणजे ब्रुंटन खाली गेला असणार आणि ती मुलगी वर उभी राहून त्याची वाट पाहत असणार. ब्रुंटनने पेटीचे कुलूप उघडले असणार आणि ज्या अर्थी आम्ही पोचलो तेव्हा पेटी रिकामी होती, त्या अर्थी ब्रुंटनने आतल्या चीजवस्तू वर दिल्या असल्या पाहिजेत. पण त्यानंतर काय झाले असावे? "

"ही मुलगी वेल्श होती, सणकी होती, शिवाय ब्रुंटनने तिला प्रचंड दुखावले होते. कदाचित आम्हाला सगळ्यांना वाटले होते त्यापेक्षाही ती जास्त दुखावली गेली असावी. त्याच माणसाचे भवितव्य अशा तऱ्हेने आपल्या हाती आलेले पाहून तिच्या मनात सूडाची ज्वाळा भडकून उठली की काय? का अचानक त्या दगडाखालचे लाकूड सटकले आणि ब्रुंटन आत अडकला आणि त्या गुप्त पोकळीचे रूपांतर त्याच्या थडग्यात झाले? या प्रकरणात ती मूग गिळून गप्प बसली एवढाच तिचा दोष होता की तिनेच आपल्या हाताने ते लाकूड काढून घेतले आणि तो दगड खाली पडला? कारण काहीही असले तरी ती मुलगी तो खजिना हातात घेऊन तिथल्या गोल जिन्याने धावत वर जाते आहे, त्या दगडामुळे दबलेले किंकाळ्यांचे आणि हातांनी दगडावर थापट्या मारल्याचे आवाज तिच्या कानावर पडत आहेत, आणि तिच्या त्या बेईमान प्रियकराचा कणाकणाने मृत्यू होत आहे, असे दृश्य माझ्या मनःचक्षूंपुढे उभे राहिले. "

"दुसऱ्या दिवशी सकाळी रेचलचा चेहरा पांढराफटक पडला होता, ती प्रचंड बावचळलेली होती आणि मधूनच भ्रमिष्ट झाल्यासारखी ती खदाखदा हसत सुटत होती त्यापाठीमागे हे कारण होते तर. पण त्या पेटीत होते काय? मस्ग्रेव्हला तळ्यात सापडलेल्या चकत्या आणि गोटे हाच तो खजिना असला पाहिजे. आपल्या अपराधाचे पुरावे नष्ट करण्याची पहिली संधी हाती येताच तिने तो खजिना तळ्यात फेकला असणार. "

"साधारण वीसेक मिनिटे मी या सगळ्याचा विचार करत बसलो होतो. मस्ग्रेव्ह मात्र अजूनही फिकुटलेल्या चेहऱ्याने त्या गुप्त पोकळीत कंदील सोडून आत डोकावून पाहत होता. "

"ही सगळी नाणी पहिल्या चार्ल्स राजाने पाडलेली आहेत. हा रिवाज सुरू झाला त्या काळाबद्दल आम्ही केलेला अंदाज अगदी बरोबर होता. "

"अचानक त्या प्रश्नोत्तरांमधले पहिले दोन प्रश्न आणि त्यांची उत्तरे मला आठवली आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. 'आपल्याला पहिल्या चार्ल्स राजाच्या आणखीही काही वस्तू मिळतील. तुला तळ्यात सापडलेली पिशवी पाहू बरे मला’ मी जवळजवळ ओरडूनच मस्ग्रेव्हला सांगितले. "

"आम्ही वर चढून त्याच्या अभ्यासिकेत गेलो आणि त्याने त्या पिशवीतला कचरा माझ्यासमोर मांडला. त्यातले धातूचे तुकडे काळे पडले होते आणि गोट्यांची चमक नाहीशी झाली होती. त्यामुळे त्या वस्तूंचे महत्त्व मस्ग्रेव्हच्या लक्षात आले नव्हते हे मी समजू शकत होतो. त्यातला एक तुकडा घेऊन तो मी माझ्या बाहीवर जोराने घासला तर माझ्या तळहाताच्या ओंजळीत तो एखाद्या ठिणगीसारखा तेजाने झळाळून उठला. त्यात एक धातूचे दुहेरी कडे होते पण ते ठिकठिकाणी वाकले होते आणि पिळवटले होते त्यामुळे त्याचा आकार बिघडला होता. "

"एक गोष्ट लक्षात घे, की पहिल्या चार्ल्स राजाचा मृत्यू झाल्यावरही त्याचा राजपरिवार इंग्लंडमध्येच होता आणि अखेरीस जेव्हा त्यांना इंग्लंड सोडून पळ काढावा लागला तेव्हा त्यांनी आपला बराचसा मौल्यवान खजिना इथेतिथे दडवून ठेवला होता आणि सगळे काही आलबेल झाल्यावर परत येऊन तो खजिना पुन्हा ताब्यात घेण्याचा त्यांचा मानस होता. "

"माझ्या पूर्वजांपैकी सर राल्फ मस्ग्रेव्ह दुसऱ्या चार्ल्सच्या प्रमुख सरदारांपैकी एक होते. ते अत्यंत कुशल घोडेस्वार होते आणि राजाचा उजवा हात असा त्यांचा लौकिक होता. दुसऱ्या चार्ल्सच्या बरोबर तेही रानोमाळ भटकलेले आहेत. " मस्ग्रेव्ह म्हणाला.

"खरे की काय? याचा अर्थ आपल्याला हवा असलेला या साखळीतला शेवटचा दुवाही आपल्या जागी अगदी अचूकपणे बसला आहे. एका अतिशय मौल्यवान आणि त्याहूनही जास्त मोलाचे असे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तूचा अशा दुर्दैवी पद्धतीने का होईना, पण तू मालक झाला आहेस याबद्दल मला तुझे अभिनंदन केले पाहिजे. "

"ही वस्तू आहे तरी कुठली? " आश्चर्याने त्याने विचारले.

"इंग्लंडच्या राजघराण्याचा जुना राजमुकुट आहे हा! "

"राजमुकुट! "

"हो राजमुकुट. असे बघ, त्या रिवाजातली प्रश्नोत्तरे काय सांगतात? ’ते कोणाचे होते? ’ ’जो निघून गेला आहे त्याचे’ यातला हा ’तो’ म्हणजे पहिला चार्ल्स आणि तो ’निघून गेला’ म्हणजे त्याचा शिरच्छेद करण्यात आला. ’कोणाला मिळेल ते? ’ ’जो येणार आहे त्याला’ यातला ’तो’ म्हणजे दुसरा चार्ल्स. त्याचा उदय होणार आहे ही गोष्ट आधीच ठाऊक होती. त्यामुळे हा वेडावाकडा झालेला किरीट एके काळी राजांच्या माथ्यावर विराजमान होत असे यात काही शंकाच नाही. "

"मग हा तळ्यात कसा काय येऊन पोचला? "

"हां, ते सांगायला जरा वेळ लागेल. " असे म्हणून मी त्याला सगळे पुरावे दाखवले आणि मी जुळवलेला सगळा घटनाक्रम समजावून सांगितला. माझे बोलणे संपले तेव्हा संधिप्रकाश लोप पावला होता आणि आकाशात चंद्र तेजाने झळाळत होता. "

"मग चार्ल्स राजाने आपला मुकुट परत का बरे नेला नाही? " त्याने सगळ्या वस्तू पुन्हा पिशवीत भरून ठेवता ठेवता विचारले.

"हां, या प्रश्नाचे उत्तर मात्र आपल्याला कदाचित कधीच मिळायचे नाही. कदाचित असे झाले असेल की या मुकुटाचे रहस्य ज्याला ठाउक होते तो मस्ग्रेव्हांचा पूर्वज दुसरा चार्ल्स परतून येईपर्यंतच्या काळात देवाघरी गेला असेल. त्याने आपल्या वारसाकडे हा कागद सोपवला असेल पण त्याचा अर्थ सांगितला नसेल. त्यानंतर वडिलांकडून मुलाकडे असा याचा प्रवास चालत राहिला. शेवटी एका बुद्धिमान माणसाने त्याचा अर्थ लावला आणि त्याच्या पाठीमागे दडलेले रहस्य शोधून काढले आणि या प्रयत्नात आपले प्राण गमावले. "

"तर वॉटसन ही आहे मस्ग्रेव्हांच्या रिवाजाची कहाणी. काही कायदेशीर बाबी पूर्ण केल्यानंतर आणि बरीच मोठी रक्कम भरल्यावर तो मुकुट आपल्याकडेच ठेवायला मस्ग्रेव्ह कुटुंबाला परवानगी मिळाली. आजही हर्लस्टोनला तो मुकुट ठेवलेला आहे. तू जर त्यांना माझे नाव सांगितलेस तर ते आनंदाने तुला तो मुकुट दाखवतील. त्या मुलीचे पुढे काय झाले हे मात्र कधीच कोणालाच कळले नाही. बहुतेक आपल्या अपराधाच्या आठवणी बरोबर घेऊन तिने इंग्लंडमधून पोबारा केला आणि समुद्रापलीकडल्या कुठल्या तरी खंडात आश्रय घेतला. "


अदिती