मस्ग्रेव्हांचा रिवाज: पृष्ठ (६ पैकी) ४

"वॉटसन, हा सगळा घटनाक्रम मी किती उत्कंठेने ऐकला असेल हे तुला वेगळे सांगायला नकोच, मी हा गुंता सोडवून या सगळ्या घटनांच्या मागचे सूत्र शोधून काढायच्या प्रयत्नात होतो. मस्ग्रेव्हच्या घरातली मोलकरीण गायब होती. बटलर निघून गेला होता. मोलकरणीचे बटलरवर प्रेम होते, पण नंतर त्याचा दुस्वास करायला तिच्याजवळ सबळ कारण होते. ती वेल्श होती, भडक माथ्याची आणि सणकी. बटलर दिसेनासा झाल्यावर लगेच ती प्रमाणाबाहेर उत्तेजित झाली होती. शिवाय तिने एका पिशवीत विचित्र वस्तू भरून ती पिशवी तळ्यात फेकली होती. हे सगळे मुद्दे लक्षात घ्यायला हवे होते, पण यातला एकही मुद्दा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी उपयोगाला येत नव्हता. या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठे झाली ते शोधून काढायला हवे होते, तरच हा गुंता सुटून एक सलग सूत्र हाती लागले असते. "

"मस्ग्रेव्ह, तुझ्या बटलरला आपली नोकरी पणाला लावावीशी वाटली, आपला वेळ खर्ची घालावासा वाटला असे त्या कागदात काय होते हे आपल्याला बघायलाच हवे. दाखव पाहू तो कागद मला, " मी म्हणालो.

"आमच्या घरात चालत आलेली ही प्रथा अगदी निरर्थक आहे. केवळ ती प्राचीन काळापासून चालत आलेली आहे एवढाच काय तो त्याला अर्थ. पण तुला बघायचे असेल तर ही पाहा. ती प्रश्नोत्तरे आहेत माझ्याजवळ, " मस्ग्रेव्ह म्हणाला.

"हा बघ हा इथे ठेवलाय ना तोच कागद त्याने माझ्या हातात ठेवला. मस्ग्रेव्ह कुटुंबातल्या प्रत्येकाला ज्या प्रश्नोत्तरांना तोंड द्यावे लागते ती ही इथे आहेत. थांब मी तुला वाचून दाखवतो.

"कोणाचे होते ते? "

"जो निघून गेला आहे त्याचे. "

"ते कोणाला मिळेल? "

"जो येणार आहे त्याला. "

"सूर्य कुठे होता? "

"ओक वृक्षाच्या शेंड्यावर. "

"सावली कुठे होती? "

"एल्म वृक्षाच्या खाली. "

"त्याची जागा कुठे आहे? "

"उत्तरेला दहा गुणिले दहा, पूर्वेला पाच गुणिले पाच, दक्षिणेला दोन गुणिले दोन, पश्चिमेला एक गुणिले एक आणि तेवढेच जमिनीच्या खाली. "

"आपण त्याच्यासाठी काय देणार आहोत? "

"जे आपल्याकडे आहे ते सगळे. "

"हे सगळे आपण का बरे देणार आहोत? "

"कारण आपल्यावर विश्वास ठेवला आहे. "

"मूळ कागदवर तो लिहिला गेला तेव्हाच्या सनाची काही नोंद नाहीत, पण लिहिण्याच्या पद्धतीवरून तो कागद साधारणपणे सतराव्या शतकाच्या मध्यात लिहिला गेला असणार. पण दुर्दैवाने याचा तुला हा गुंता सोडवायला फारसा उपयोग व्हायचा नाही, " मस्ग्रेव्ह म्हणाला.

"तू मला सोडवायला सांगितलेस त्यापेक्षा या कागदाचे रहस्य जास्त रंजक दिसत आहे. कदाचित एक रहस्य उलगडले की दुसरेही आपोआप उलगडेल. पण मस्ग्रेव्ह, तुझा बटलर खरोखरीच अतिशय हुशार माणूस होता आणि त्याच्या मालकांच्या गेल्या दहा पिढ्यांपेक्षाही जास्त सखोल विचारशक्ती त्याच्याकडे होती असे जर मी म्हटले तर तू राग मानू नकोस, " मी म्हणालो.

"तू काय म्हणतोयस ते आपल्या तर काही ध्यानात येत नाही बुवा. मला तर या प्रश्नोत्तरांमध्ये प्रत्यक्ष उपयोगी पडेल असे काहीच दिसत नाही, " मस्ग्रेव्ह म्हणाला.

"मला विचारशील तर ही प्रश्नोत्तरेच प्रत्यक्षात उपयोगाची आहेत आणि ब्रुंटनचेही असेच मत होते. तू त्याला पकडलेस त्यापूर्वीही हा कागद त्याने वाचलेला असणार. "

"सहज शक्य आहे. हा कागद लपवून ठेवायची आम्हाला कधी गरज वाटली नाही. "

"तू त्याला पकडलेस तेव्हा तो हा कागद उघडून त्याला उमगलेल्या अर्थाची उजळणी करत होता. तूच म्हणालास ना की त्याच्याकडे कसला तरी नकाशा होता आणि तो कागद त्याने आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिला म्हणून? "

"हो खरे आहे पण त्याचा आमाच्या घरातल्या या विचित्र प्रथेशी काय संबंध? आणि हे सगळे काय गौडबंगाल आहे? "

"आपण ते लवकरच शोधून काढू. तुला चालणार असेल तर आपण आत्ता लगेच रेल्वेगाडी पकडून ससेक्सला जाऊ या आणि प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊनच या प्रकाराचा बारकाईने विचार करूया. " मी त्याला सांगितले.

"त्या दिवशी दुपारी आम्ही हर्लस्टोनला पोचलो. हर्लस्टोनचे फोटो आणि तिथली वास्तुरचना याबद्दल तुला ठाऊकच असेल. त्यामुळे पुनरावृत्ती टाळून मी एवढेच सांगतो, की हर्लस्टोनच्या त्या प्रसिद्ध वास्तूचा आकार रोमन L एल अक्षरासारखा आहे. या एल आकारातला जो लांबट भाग आहे तिथे इमारतीचा तुलनेने नवा भाग आहे आणि जो आखूड भाग आहे तिथे जुन्या भागाचे केंद्रस्थान आहे. जुन्या केंद्रस्थानातून नवीन भाग फुटला आहे. या जुन्या भागात मध्यवर्ती ठिकाणी या इमारतीचे ठेंगणे पण चांगले भक्कम असे मुख्य दार आहे. त्या दारावर १६०७ हे सन कोरलेले आहे. पण ही इमारत बांधण्यासाठी वापरलेल्या तुळया आणि दगड सतराव्या शतकापेक्षाही कितीतरी जुने आहेत यावर सर्व वास्तुविशारदांचे एकमत झालेले आहे. या जुन्या भागात असणाऱ्या चांगल्याच रुंद भिंती आणि चिमुकल्या खिडक्या यांना कंटाळून गेल्या शतकात मस्ग्रेव्ह मंडळी नव्या भागात राहायला आली. सध्या जुन्या घराचा वापर करायचाच झाला तर कोठीच्या खोलीसारखा किंवा तळघरासारखा केला जातो. घराभोवती एक अतिशय उत्कृष्ट अशी अनेक जुन्या वृक्षांनी नटलेली बाग आहे आणि तिथून जवळच साधारण दोनशे यार्डांवर ते तळे आहे. "

"वॉटसन, मला अशी पूर्णपणे खात्री वाटत होती की या केसमध्ये तीन वेगवेगळे प्रश्न नसून प्रत्यक्षात एकाच मोठ्या प्रश्नाचे तीन भाग होते आणि मस्ग्रेव्हांच्या रिवाजाचा मी जर योग्य प्रकारे अर्थ लावू शकलो असतो तर या सगळ्याच्या मुळापर्यंत पोचणारे सूत्र माझ्या हाती लागले असते आणि मग बटलर ब्रुंटन आणि मोलकरीण हॉवेल्स यांचे काय झाले हेही लक्षात आले असते. त्यामुळे हे सूत्र शोधायच्या कामाला मी सर्व शक्तीनिशी सुरुवात केली. ब्रुंटन या रिवाजातल्या प्रश्नोत्तरांमध्ये इतका रस का बरे घेत असावा? नक्कीच त्यात त्याला असे काहीतरी दिसले होते जे सरदार मस्ग्रेव्हांच्या अनेक पिढ्यांच्या नजरांतून निसटलेले होते आणि त्यातून त्याचा स्वतःचा निश्चित असा फायदा होणार होता. त्याला नेमके काय दिसले होते आणि त्यामुळे त्याच्यावर नेमकी काय परिस्थिती ओढवली होती? "

"त्या प्रश्नोत्तरांमध्ये कुठल्या तरी जागेचे वर्णन केलेले होते ही गोष्ट तर अगदी उघड होती. ती जागा जर का आम्हाला सापडली असती तर मस्ग्रेव्हांच्या पूर्वजांनी तिथे इतक्या खुबीने दडवून ठेवलेले ते रहस्यही उलगडले असते. ती जागा शोधण्यासाठी मदत म्हणून दोन गोष्टींपासून सुरुवात करायला हवी होती. त्या गोष्टी म्हणजे ते ओक आणि एल्मचे वृक्ष. ओकच्या झाडासाठी मला मुळीच शोधाशोध करावी लागली नाही. हर्लस्टोनमध्ये शिरणाऱ्या वाटेवरच आमच्या उजव्या हाताला ओकवृक्षांचा पितामह म्हणावा असा एक मोठा घेरदार वृक्ष उभा होता. त्याच्यासारखे प्रचंड वृक्षराज मी फार पाहिलेले नाहीत. "

"ती प्रश्नोत्तरे लिहिली गेली तेव्हा हे झाड इथे होते असे दिसत आहे, " त्याच्या शेजारून आमची गाडी जात असताना मी मस्ग्रेव्हला म्हणालो.

"बहुतेक नॉर्मन विजयाच्या वेळीही हे झाड इथे असावे. त्याच्या बुंध्याचा घेर चांगला तेवीस फूट आहे. " तो म्हणाला.

"इथे जुनी एल्मची झाडे आहेत का रे? " मी विचारले.

"त्या तिथे एक प्राचीन एल्मचा वृक्ष होता खरा. पण दहा वर्षांपूर्वी त्याच्यावर वीज पडून तो जळाला आणि मग आम्ही त्याचा बुंधा कापला. " तो उत्तरला.

"ती जागा मला दाखवू शकशील का? "

"हो हो, का नाही? "

"त्याशिवाय इतर कुठली एल्मची झाडे आहेत का? "

"नाही एल्मची जुनी झाडे नाहीत पण बीचची बरीच झाडे आहेत, "

"तो एल्मचा वृक्ष जिथे होता ती जागा मला बघायची आहे. "

"आम्ही घोडागाडीतून आत आलो होतो. माझी ही मागणी ऐकताच घराकडे न जाता मस्ग्रेव्हने मला लगोलग बागेत जिथे तो एल्मचा एमचा वृक्ष एके काळी उभा होता त्या ठिकाणी नेले. ओकवृक्षापासून घरापर्यंत जेवढे अंतर होते त्याच्या साधारणपणे निम्म्या अंतरावर बागेतल्या हिरवळीवर जळालेल्या एल्म एमवृक्षाची खुणेची जागा होती. मी योग्य मार्गावरून पुढे जात होतो असे दिसले. "

"उंची किती होती रे या एल्मच्या झाडाची? सांगता येईल का? " मी विचारले.

"हो हो, सांगतो की. लगेच सांगतो. ते झाड चौसष्ट फूट उंच होते. "

"तू हे इतक्या अचूकपणे कसे काय सांगू शकतोस? " मी आश्चर्याने विचारले.

"माझे गणिताचे मास्तर त्रिकोणमिती शिकवायला लागल्यापासून मला कायम कसली ना कसली उंची मोजायला सांगायचे उदाहरण म्हणून. त्यामुळे मी आमच्या वाडीतल्या प्रत्येक इमारतीची आणि मळ्यातल्या, बागेतल्या प्रत्येक झाडाची उंची गणित वापरून काढलेली आहे. "

"एकुणात माझे नशीब जोरावर होते असेच म्हणायला हवे. माझ्याकडे माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त वेगाने माहिती गोळा होत होती. "

"मला सांग, तुमच्या बटलरने कधी याबद्दल तुला विचारले होते का? "

"रेजिनाल्ड मस्ग्रेव्ह आश्चर्याने माझ्याकडे बघायला लागला. ’आत्ता तू म्हणाल्यावर मला आठवले, की काही महिन्यांपूर्वी ब्रुंटनने मला हाच प्रश्न विचारला होता. त्याचा म्हणे तबेल्यात काम करणाऱ्या पोऱ्याशी यावरून काहीतरी वाद झाला होता. "