मस्ग्रेव्हांचा रिवाज: पृष्ठ (६ पैकी) ३
"एक जिना उतरून मी खाली आलो. तिथून एक बोळ ग्रंथालय आणि शस्त्रास्त्रे ठेवलेल्या खोलीकडे जातो. मला ग्रंथालयाच्या उघड्या दारातून उजेड बाहेर येताना दिसला. झोपायला जाण्यापूर्वी मी स्वतः ग्रंथालयातला दिवा मालवून खोलीचे दार लावून घेतले होते. त्यामुळे हे दृश्य पाहून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. मला वाटले घरात बहुतेक चोर शिरले असावेत. आमच्या घरात अशा बोळांच्या भिंतींवर पेंढा भरलेले प्राणी आणि वेगवेगळी शस्त्रे लावलेली आहेत. तिथून मी एक कुऱ्हाड हातात घेतली आणि माझ्या हातातली मेणबत्ती खाली ठेवून मी दबक्या पावलांनी ग्रंथालयाच्या उघड्या दारातून आत डोकावून पाहिले. "
"ब्रुंटन तिथे होता. त्याच्या अंगात अजून दिवसा घालायचेच कपडे होते. तो एक नकाशासारखे काहीतरी मांडीवर घेऊन आरामखुर्चीत बसला होता. आपले डोके त्याने दोन्ही हातांमध्ये गच्च धरले होते आणि तो कसल्यातरी विचारात अगदी गढून गेला होता. हे दृश्य पाहून मी आश्चर्याने थक्कच झालो. मी अंधारात उभा होतो आणि टेबलाच्या कडेला असलेल्या दिव्याच्या मिणमिण प्रकाशात मला दिसत होते की त्याने अजून कपडेही बदलले नव्हते. अचानक तो खुर्चीतून उठला. मी पाहत असतानाच तो भिंतीजवळच्या मोठ्या मेजापाशी गेला आणि एका खणाचे कुलूप काढून त्याने तो उघडला. आतून एक कागद बाहेर काढून त्याने तो सरळ केला आणि त्यात डोके खुपसून बारकाईने वाचायला सुरुवात केली. आमच्या खाजगी दस्तऐवजांमध्ये नाक खुपसण्याचा त्याचा भोचकपणा पाहून मला इतका वैताग आला की माझ्याही नकळत मी एक पाऊल पुढे टाकले. त्या आवाजाने दचकून ब्रुंटनने मान वर करून माझ्याकडे पाहिले. मला पाहताच तो ताडकन उठून उभा राहिला. त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला होता. मगाशी ज्या कागदात तो इतक्या एकाग्रतेने डोके खुपसून बसला होता तो कागद त्याने घाईघाईने आपल्या कोटाच्या आतल्या खिशात ठेवून दिला. "
"अच्छा! आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला त्याची ही अशी परतफेड करतोयस तू. छान! उद्यापासून तू कामावर येऊ नकोस. " मी त्याला म्हणालो.
"एखाद्या सर्वस्व उद्ध्वस्त झालेल्या माणसासारखा तो अवाक्षरही न उच्चारता तिथून चालता झाला. टेबलावरचा दिवा अजून जळत होता. त्याच्या उजेडात ब्रुंटनने मेजाच्या कपाटाच्या खणातून नक्की काय बाहेर काढले होते हे मी पाहू लागलो. त्या कागदामध्ये महत्त्वाचे किंवा कामाचे असे काहीच नव्हते उलट मस्ग्रेव्हांच्या जुनाट आणि विचित्र रिवाजात अंतर्भूत असणारी प्रश्नोत्तरे छापलेली होती हे पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो वर्षांपासून प्रत्येक मस्ग्रेव्ह मुलाला सज्ञान होताना एका खास समारंभामध्ये या प्रश्नोत्तरांना तोंड द्यावे लागते, त्याला मस्ग्रेव्हांचा रिवाज असे म्हणतात. खरे तर या गोष्टीला तसा काहीही अर्थ नाही. केवळ एक प्रथा म्हणून आम्ही ती पाळतो एवढेच. हां, एखाद्या पुरातत्त्वशास्त्रज्ञाला वा समाजवाद्याला त्यात काहीतरी कामाचे सापडेलही पण आमच्यासाठी मात्र तो सगळा प्रकारच निरर्थक आहे. "
"तुझी हकीगत सांगून झाली की आपण या कागदाकडे परत येऊ या, " मी मस्ग्रेव्हला म्हणालो.
"तो जरासा घुटमळला आणि म्हणाला, जर तुला तशी गरज वाटत असेल तर येऊ आपण त्याकडे परत, असो, तर ब्रुंटनने टेबलावर ठेवलेली किल्ली घेऊन मी मेजाच्या खणाला कुलूप लावले आणि माझ्या खोलीत जायला म्हणून मागे वळलो तर ब्रुंटन परतला होता आणि माझ्या मागेच उभा होता. "
तो दाटलेल्या कंठाने मला म्हणाला, "मस्ग्रेव्ह साहेब, आजवर मी माझ्या कीर्तीला अतिशय जपत आलो आहे आणि मला जर बदनामीला तोंड द्यावे लागले तर मला ते सहन होणार नाही, शरमेने मी मरून जाईन. आणि असे झाले तर ते पाप तुमच्या माथी बसेल, साहेब. घडल्या प्रकारानंतर मला नोकरीवर ठेवणे तुम्हाला मंजूर नसेल तर मला नोकरीवरून काढा पण जगाला असे दिसू द्या की मी तुम्हाला नोकरी सोडत असल्याची पूर्वसूचना दिली आणि माझ्या स्वतःच्या इच्छेने मी काम सोडून गेलो. त्यासाठी मला एक महिन्याची मुदत द्या. "
"तुझे वागणे तुझा सहानुभूतीने विचार करावा असे मुळीच नाही. तरी पण गेली अनेक वर्षे तू आमच्याकडे कामाला आहेस त्यामुळे तुझी जाहीर बदनामी करायची माझी इच्छा नाही. पण एक महिना खूप जास्त होतो. मी तुला एक आठवड्याची मुदत देतो. तुला काय हवे ते कारण देऊन एका आठवड्यात तू इथून जाऊ शकतोस. "
"साहेब, फक्त एकच आठवडा? मला निदान पंधरा दिवसांची तरी मुदत द्या हो, " तो निराश होऊन म्हणाला.
"एक आठवडा. मी तुझ्याशी फार नरमाईने वागतोय याबद्दल देवाचे आभार मान, " मी म्हणालो.
तो हताश होऊन मान खाली घालून तिथून निघून गेला आणि मीही तिथला दिवा मालवून माझ्या खोलीत परतलो.
"त्याच्या नंतर दोन दिवस तो अतिशय तत्परतेने आपली कामे करत होता. मीही घडल्या प्रकाराचा पुन्हा उल्लेखही केला नाही. पण आपली बदनामी टाळण्यासाठी तो नेमके काय कारण देतो हे जाणून घ्यायला मी उत्सुक होतो. तिसऱ्या दिवशी सकाळी मात्र, माझे सकाळचे खाणे झाल्यावर नेहमीसारखा आज दिवसभरात करायची कामे विचारायला म्हणून तो काही उपस्थित झाला नाही. मी जेवणघरातून बाहेर पडलो तर माझी गाठ रेचलशी, आमच्या मोलकरणीशी, पडली. ती नुकतीच आजारातून उठली होती आणि तिची चर्या अक्षरशः एखाद्या भुतासारखी पांढरीफटक आणि निस्तेज दिसत होती. ती पूर्ण बरी व्हायच्या आतच कामावर परत आल्याबद्दल मी तिला रागावलो. "
"तू अंथरुणातून का उठलीस? तुझ्यात पहिल्यासारखी ताकद आली की मग ये कामावर... " मी म्हणालो.
तिने माझ्याकडे अशा काही विचित्र नजरेने बघायला सुरुवात केली की मला शंका यायला लागली की हिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय.
"मस्ग्रेव्ह साहेब, मी बरी आहे आता, " ती म्हणाली.
"यावर डॉक्टरांचे काय म्हणणे आहे ते आपण पाहू या. तू आता हे काम करणे थांबव आणि खाली जाऊन वर्दी दे की मी ब्रुंटनला बोलावले आहे, "
"आपला बटलर निघून गेला आहे. "
"निघून गेला? कुठे निघून गेला? "
"कोणास ठाउक कुठे गेला ते. पण सकाळपासूनच तो कुठे दिसत नाहीये. तो आपल्या खोलीतही नाहीये. गेला तो. गेला, निघून गेला! " असे म्हणून ती भ्रमिष्ट झाल्यासारखी खदाखदा हसायला लागली. तिचे हसण्याचे उमाळे इतके जोरदार होते की तोल जाऊन ती मागच्या भिंतीवर आदळली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मी मात्र पुरता गडबडून गेलो आणि कोणाला तरी मदतीला बोलवायला म्हणून घंटेकडे मी धाव घेतली. मदतीसाठी माणसे आल्यावर किंकाळ्या फोडत असलेल्या आणि हमसाहमशी रडत असलेल्या अवस्थेतील रेचलला तिच्या खोलीत नेण्याची व्यवस्था करून मी ब्रुंटनबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. तो नाहीसा झाला होता ही गोष्ट खरीच होती. काल रात्री तो झोपायला म्हणून खोलीत गेला त्यानंतर त्याला कोणीही पाहिले नव्हते. त्याच्या बिछान्यात तो झोपल्याच्या काहीही खुणा नव्हत्या. त्याच्या खोलीची दारे खिडक्या सगळी बंद होती त्यामुळे तो नेमका कसा निघून गेला हे सांगणे खरोखरच कठीण होते. त्याचे कपडे, त्याचे घड्याळ, त्याच्याकडचे पैसे सगळे काही जागच्या जागी होते. त्याचे बूटही जागच्या जागी होते. पण त्याचा नेहमी घालायचा काळा कोट आंणी त्याच्या सपाता मात्र गायब होत्या. रात्री उठून हा माणूस कुठे गेला होता आणि आत्ता तो कुठल्या अवस्थेत होता? "
"आम्ही घराचा तळघरांपासून पार माळे–पोटमाळ्यांपर्यंत सगळीकडे कसून शोध घेतला पण व्यर्थ. आमच्या घराचा मुख्य भाग सगळ्यात जुना आहे आणि आता तिथे कोणीही राहत नाही. हा भाग एखाद्या भूलभुलैय्यासारखाच आहे. तरीही आम्ही त्या तिथला कोपरा न कोपरा धुंडाळला पण ब्रुंटनचे नखही आमच्या दृष्टीस पडले नाही. आपले सगळे सामानसुमान तसेच सोडून तो परागंदा होईल यावर विश्वास ठेवणे कठीण होते. पण मग तो नक्की कुठे गेला होता? मी पोलिसांनाही कळवले, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. आदल्या रात्री पाऊस झाला होता पण तरीही आम्ही घराभोवतालची बाग आणि सगळ्या पाऊलवाटा यांची कसून तपासणी केली. पण तीही व्यर्थ ठरली. हे सगळे घडत असताना अशी काही घटना घडली की या सगळ्या प्रकरणावरून आमचे लक्ष साफ उडाले.
"रेचल दोन दिवस अतिशय आजारी होती. मध्येच ती बेशुद्ध पडायची, मध्येच भ्रमिष्टासारखी वागायची. शेवटी रात्रभर तिच्याजवळ बसायला म्हणून आम्ही एका नर्सची नेमणूक केली. ब्रुंटन नाहीसा झाल्यापासून तिसऱ्या दिवशी रात्री, रेचलला शांत झोप लागलेली पाहून तिची नर्स खुर्चीत जराशी विसावली असताना तिचा डोळा लागला. पहाटे केव्हातरी तिला जाग आली तर खोलीची खिडकी सताड उघडी होती, रेचलचा पलंग रिकामा होता आणि रेचल तिथून गायब झालेली होती. मला तातडीने या गोष्टीची सूचना मिळाली आणि माझ्या दोन्ही नोकरांना बरोबर घेऊन मी रेचलला शोधायला बाहेर पडलो. तिच्या खिडकीखालच्या जमिनीवर तिची पावले स्पष्ट उमटलेली होती त्यामुळे तिचा मागोवा घेणे आम्हाला अजिबात अवघड गेले नाही. तिच्या पावलांचे ठसे बागेतून तळ्याच्या काठाने बागेच्या कडेला असलेल्या फरसबंदीपर्यंत गेलेले होते आणि मग तिथून गायब झाले होते. बागेतले तळे आठ फूट खोल आहे, त्यामुळे भ्रमिष्ट झालेल्या रेचलचा माग तळ्यापाशी येऊन नाहीसा झाल्यावर आम्हाला काय वाटले असेल याची तुला कल्पना येऊ शकते. "
"आम्ही दोराला आकडा बांधून तळे ढवळून काढले पण रेचलचा मृतदेह आम्हाला सापडला नाही, त्याऐवजी आम्हाला एक अनपेक्षित अशी एक भलतीच गोष्ट तळ्यातून बाहेर आली. एका कापडी पिशवीत जुनाट, गंजके धातूचे काही तुकडे, काही दगडगोटे आणि काचेचे तुकडे होते. काल दिवसभर अगदी कसून शोध घेतल्यावर आणि सगळीकडे चौकशी केल्यानंतरही रेचल हॉवेल्स आणि रिचर्ड ब्रुंटन यांचे नेमके काय झाले याचा पत्ता आम्हाला लागू शकलेला नाही. पोलिसांनीही आता हात टेकले आहेत आणि शेवटचा आशेचा किरण म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. "