मस्ग्रेव्हांचा रिवाज: पृष्ठ (६ पैकी) ५
"वॉटसन, ही गोष्ट फार उत्तम झाली होती कारण मी योग्य मार्गावर असल्याची आता तर माझी खात्रीच झाली. मी मान वर करून सूर्याचा अंदाज घेतला. सूर्य माथ्यावर होता आणि मी असा हिशोब केला की साधारणपणे एक तासाभरात तो ओकाच्या झाडाच्या शेंड्यावर आला असता. म्हणजेच त्या प्रश्नोत्तरांमध्ये सांगितलेली एक गोष्ट पूर्ण झाली असती. त्या एल्मच्या झाडाची सावली म्हणजे तिचे समोरचे टोक असणार कारण तसे नसते तर एल्मच्या खोडाचा खूण म्हणून वापर केला गेला असता. त्यामुळे, सूर्य ओकाच्या शेंड्यावर आल्यावर एल्मची सावली कुठे संपत असे हे आता शोधायला हवे होते. "
"होम्स, एल्मचे झाडच जागेवर नाही म्हटल्यावर हे काम बरेच अवघड गेले असेल ना? "
"ज्या अर्थी ब्रुंटनला जमले होते त्या अर्थी मलाही ते जमायला काही अडचण आली नसती. प्रत्यक्षातही ती गोष्ट काही खास अवघड गेली नाही. मी मस्ग्रेव्हबरोबर त्याच्या अभ्यासिकेत गेलो आणि तिथून ही खुंटी पैदा केली. मग या खुंटीला एकेक यार्डावर एकेक गाठ मारलेली ही लांब दोरी बांधली. मग मी नेहमीपेक्षा दुप्पट लांबीचा एक मासे पकडायचा एक गळ घेतला आणि मस्ग्रेव्हबरोबर मी एल्मचे झाड जिथे उभे होते त्या ठिकाणी पोचलो. सूर्य आता ओकच्या शेंड्यावर येऊन पोचला होता. मी तिथे माझ्या गळाची दांडी उभी केली आणि त्याच्या सावलीची दिशा तपासून मग तिची लांबी मोजली. गळाच्या दांडीची उंची सहा फूट होती. सावलीची लांबी नऊ फूट भरली. "
"आता यापुढचे गणित अगदीच सोपे होते. जर सहा फुटाच्या काठीची सावली नऊ फूट लांबीची असेल तर चौसष्ट फूट उंचीच्या झाडाची सावली शहाण्णव फूट लांब पडली पाहिजे आणि ज्या दिशेने माझ्या काठीची सावली पडली त्याच दिशेने झाडाचीही सावली पडत असली पाहिजे. मी त्या जागेपासून शहाण्णव फूट अंतर मोजले तर मी घराच्या भिंतीपाशी येऊन पोचलो. त्या ठिकाणी मी माझी खुंटी ठोकून बसवली. माझ्या खुंटीपासून अवघ्या दोन इंच अंतरावर मला जमिनीला पडलेला शंक्वाकृती खळगा दिसला. माझ्या लक्षात आले की तो खळगा ब्रुंटनने जेव्हा या जागेची शोधाशोध केली तेव्हा पाडला पडला असला पाहिजे. वॉटसन, मी त्याचा अचूक माग पकडला आहे हे कळल्यावर मला किती आनंद झाला असेल याची तुला सहज कल्पना येऊ शकेल. "
"मी माझ्याकडचे होकायंत्र बाहेर काढले आणि त्याच्या मदतीने मोजून पावले टाकायला सुरुवात केली. भिंतीला समांतर रेषेत दहा पावले चालल्यावर मी पुन्हा एकदा जमिनीत एक खुंटी ठोकली. मग मी काळजीपूर्वक पूर्वेकडे पाच पावले चालत गेलो आणि मग दक्षिणेकडे दोन पावले टाकली. आता मी जुन्या घराच्या उंबऱ्यापाशी येऊन पोचलो. पश्चिमेला दोन पावले चालायचे म्हणजे त्या दारातून आत जाणाऱ्या दगडी बोळकांडीत प्रवेश करायला हवा होता. त्या प्रश्नोत्तरांमध्ये वर्णन करून सांगितलेली जागा ती हीच होती. "
"वॉटसन, तिथे पोचल्यावर नैराश्याने माझे हातपाय गारठूनच गेले. मला वाटले माझ्याकडून काहीतरी चूक होत आहे. मावळतीच्या तिरक्या सूर्यकिरणांनी त्या दगडी बोळकांडीची फरशी उजळून निघाली होती. वर्षानुवर्षे वापरात असल्यामुळे गुळगुळीत झालेल्या त्या करड्या रंगाच्या दगडी फरश्या आपापल्या जागी अगदी घट्ट होत्या. शेकडो वर्षांमध्ये त्यातली एकही फरशी आपल्या जागेवरून हललेली नव्हती. जमिनीवर कुठेही खळगा किंवा भेगा दिसत नव्हत्या. मी सगळ्या फरश्या हाताने वाजवून पाहिल्या पण कशाच्या खाली एखादी पोकळी वगैरे आहे असे वाटले नाही. याचा अर्थ ब्रुंटनने इथे काहीच शोधाशोध केली नव्हती. पण एव्हाना मस्ग्रेव्हच्या डोक्यात उजेड पडायला लागला होता. मी नेमके काय करायचा प्रयत्न करत होतो हे लक्षात आल्यामुळे त्याच्या अंगातही उत्साह संचारला होता. त्यामुळे त्यानेही ती प्रश्नोत्तरे लिहिलेला कागद बाहेर काढला. "
"जमिनीच्या खाली! आपण यातली ’खाली’ची खूण विसरलो की, " तो एकदम म्हणाला.
"जमिनीच्या खाली म्हणजे काहीतरी खणाखणी करावी लागेल असे मला वाटले होते पण इथे पोचल्यावर ती शक्यता मावळली. ’मस्ग्रेव्ह, इथे खाली तळघर असले पाहिजे’ मी ओरडलो. "
" हो! हो! तळघर आहे. तेही या घराइतकेच जुने आहे! चल या दारातून तिथे जायला वाट आहे. "
"आम्ही एका गोल जिन्याने खाली गेलो. मस्ग्रेव्हने तिथे कोपऱ्यात एका पिंपावर ठेवलेला एक मोठा कंदील पेटवला. उजेड पडल्यावर आम्ही अखेरीस योग्य जागी येऊन पोचलो आहोत हे माझ्या लक्षात आले. शिवाय तिथल्या खुणांवरून गेल्या काही दिवसांत तिथे येणारे आम्हीच एकटे नव्हतो हेही अगदी उघड होते. "
"त्या तळघरात लाकूडफाटा साठवून ठेवला जात होता. त्यामुळे जमिनीवर सगळीकडे पसरलेल्या लाकडाच्या कपच्या आता एका कोपऱ्यात ढीग करून ठेवल्या होत्या आणि मधली जागा स्वच्छ केलेली होती. त्या मोकळ्या जागेवर एक चांगला लांबरुंद आणि जडजंबाळ असा दगड होता, त्याला मधोमध बसवलेल्या धातूच्या गोल हॅंडलला चौकड्या चौकड्यांचा एक मफलर बांधलेला होता. "
"अरेच्चा! हा तर ब्रुंटनचा मफलर आहे कितीतरी वेळा मी त्याला हा मफलर गुंडाळलेला पाहिला आहे. मी अगदी शपथेवर सांगतो. पण हा हलकट माणूस इथे काय करत होता? "
"मी मस्ग्रेव्हला सुचवल्याप्रमाणे त्याने पोलिसांना पाचारण केले. दोन पोलिस हवालदार आमच्याबरोबर त्या तळघरात आल्यावर मी तो दगड उचलायच्या खटपटीला लागलो. माझ्या एकट्याच्या जोराने तो दगड जरासा हलला पण उचलला गेला नाही. मग त्या हवालदारांपैकी एकाची मदत मला घ्यावी लागली. त्याच्या मदतीने अखेरीस तो दगड जागेवरून हलवून आम्ही उभा केला. त्याच्या खाली एक खोल आणि अंधारा खड्डा आमची वाट पाहत होता. आम्ही सगळेच आत डोकावलो आणि मस्ग्रेव्हने एका बाजूने त्याचा कंदील आत सोडला. "
"सात फूट खोल आणि चार चौरस फूट क्षेत्रफळाची एक खोली आमच्याकडे आ वासून बघत होती. आत एका बाजूला एक ठेंगणी, पितळेच्या कड्यांनी मढलेली लाकडी पेटी होती. तिचे झाकण उतासलेले होते आणि एक जुन्या धाटणीची किल्ली पेटीच्या अंगच्या कुलुपातून बाहेर डोकावून पाहत होती. पेटीच्या बाहेरच्या बाजूला वर्षानुवर्षे साठलेला धुळीचा प्रचंड थर होता. जमिनीला आलेली ओल आणि वाळवी यांनी लाकडाची पुरती वाट लावलेली होती आणि आता त्या पेटीमध्ये कुरूप बुरशीचे साम्राज्य पसरलेले होते. या इथे माझ्याकडे आहेत तशा अनेक गंजक्या चकत्या - जुनी नाणी असणार ती - त्या पेटीत होत्या पण तिथे या नाण्यांशिवाय दुसरे काहीच नव्हते. "
"पण आम्हाला त्या पेटीकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता कारण त्या पेटीशेजारच्या एका गोष्टीवर आमचे डोळे खिळून राहिले होते. त्या पेटीच्या झाकणावर डोके टेकलेल्या अवस्थेत एक माणूस ओणवला होता आणि त्याचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही बाजूंना लांब केलेले होते. त्याच्या अंगावर काळा कोट होता. त्याच्या अंगातले आता वाहायचे थांबलेले सगळे रक्त त्याच्या चेहऱ्यात गोळा होऊन साखळले होते. त्याचा चेहरा अगदी काळपट लाल झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला ओळखणे अशक्य होते. त्याचा मृतदेह वर काढल्यावर त्याची उंची, त्याचे केस, त्याचे कपडे या सगळ्यावरून तो मस्ग्रेव्हचा नाहीसा झालेला बटलरच आहे अशी त्याची खात्री पटली. त्याचा मृत्यू होऊन काही दिवस लोटले होते पण त्याचा इतका भयंकर मृत्यू नेमका कसा झाला हे दर्शवणारी एकही जखम त्याच्या अंगावर नव्हती. त्याचा मृतदेह त्या तळघरातून बाहेर नेल्यावर माझ्या असे लक्षात आले की हा प्रश्न सोडवायला मी जिथून सुरुवात केली होती तिथेच अजूनही होतो आणि आता हे रहस्य आणखीच गडद झाले होते. "
"वॉटसन, आत्तापर्यंत माझ्या शोधमोहिमेत मला अपयश आले होते हे कबूल केलेच पाहिजे. कारण माझा असा अंदाज होता की एकदा मी त्या खुणेच्या जागी पोचलो की हे रहस्य उलगडेल. पण आता आम्ही तिथे पोचलो तरीही मस्ग्रेव्हांच्या त्या इतक्या खुबीने दडवलेल्या रहस्याचा पत्ता लागायची चिन्हे दिसतच नव्हती. जमेची बाजू एवढीच होती की ब्रुंटनचे काय झाले हे शोधून काढण्यात मला यश आले होते. पण त्याच्यावर असा प्रसंग नेमका कसा ओढवला याचे गूढ अजूनही तसेच होते. शिवाय, नाहीशा झालेल्या मोलकरणीचे काय झाले आणि ब्रुंटनच्या मृत्यूप्रकरणात तिचा काय हात होता हे शोधून काढायचे होते. मी एका कोपऱ्यात एका पिंपावर बसून या सगळ्या प्रकरणाचा पुन्हा एकदा नीट विचार केला. "