रिक्त: पृष्ठ (८ पैकी) २
दारावर पाय मारत प्रणवने दार उघडले. त्याच्या मागून अमिता होतीच.
"खायला काय आहे? भूऽऽऽक लागली आहे. "
उषाताई खाली यायच्या आत त्याने आइसक्रीमवर ताव मारला.
"हांडवो केलाय, देऊ? कशी झाली शाळा? नवीन काय? आणि खाऊन झालं की धोपटी उचला तिथून. चप्पल जागेवर जाऊ देत. " उषाताईंची सरबत्ती सुरू झाली.
"नवीन काहीही नाही. थांब, तू किती प्रश्न विचारलेस एका वाक्यात ते मोजू दे मला, " हाताची बोटं मोडणाऱ्या प्रणवकडे त्या कंटाळून पाहत राहिल्या.
"तू का चिडलेली दिसतेस? बाबांनी कटकट केली माझ्या पसाऱ्याबद्दल? "
"मी नाही रे, बाबा चिडलेले आणि कुणीही कटकट केलेली नाही पसाऱ्याबद्दल, पण खरंच माझी कामं आटपत नाहीत तुमच्या पसाऱ्यामुळे. " प्रणवने न बोलता बसण्यासाठी खुर्ची मागे सरकवली. अमिताही बाजूच्या खुर्चीवर टेकली. उषाताईंनी इंटरकॉमचे बटण दाबले. आकाशभाईंसाठी लाडू, हांडवो बशीत काढून प्रणवच्या बाजूला बशी ठेवली. प्रणव पटकन उठून दुसऱ्या खुर्चीवर बसला. एक तीक्ष्ण कटाक्ष उषाताईंनी फेकला पण काही बोलणे टाळले. आकाशभाई येऊन बसल्यावर मुले गप्प झाली.
"आणखी काय नवीन? " बाबांचा प्रश्न ऐकूनही न ऐकल्यासारखे केले त्याने.
"मी तुझ्याशी बोलतोय प्रणव. "
"काही नाही. "
"काही नाही हे काय उत्तर झालं? "
"मग काय उत्तर देऊ? " प्रणवच्या आवाजातला तुसडेपणा लपत नव्हता.
"एऽऽऽ नीट बोलायचं नसेल तर बोलूच नको एक अक्षरही. शिंगं फुटत चालली आहेत नुसती. " प्रणव तसाच बसून राहिला. उठले तर बाबांना चालणार नाही हे ठाऊक होते त्याला. किती वेळ जाणार कुणास ठाऊक. उषाताईंच्या मनात तिथेच बसायचे असूनही त्यांनी मन आवरले. आकाशभाईंच्या मदतनिसाला उरलेले काम समजावून देणे भाग होते. नाहीतर परत तासांचे गणित, कामचुकार लोकांना विनाकारण दिलेल्या पैशांचा हिशोब, त्या फंदात त्यांना अडकायचे नव्हते. आकाशभाईंना हिशोबी-गुज्जू म्हणून खिजवले तरी नाही म्हटले तरी त्या देखील त्या आकडेमोडीत दंग होतात हे त्यांना माहीत होते. त्यांनी तिसऱ्या मजल्यावरचे कार्यालय गाठले.
"वैद्यकीय अभ्यासक्रमातली कुठलीही शाखा निवड. आत्तापासून त्या दृष्टीने तयारी सुरू करायला हवी. " उपदेश करायचा नाही ठरवूनही आकाशभाई बोललेच.
"अमिता पण डॉक्टरच होणार बाबा? " प्रणवला बाबांचा रोख स्वतःवरून दुसरीकडे वळवायचा होता.
"तिची आई बघेल तिच्याबाबत काय ते. आपल्यात मुलींना स्वयंपाक उत्तम करता आला की अर्धं जग जिंकल्यासारखं असतं. "
"बाबा, आजकाल आयत्याचा जमाना आहे. अमिता मोठी होईल तेव्हा कोण करणार आहे घरात? " बाबा गप्प बसलेले पाहून त्याला चेव चढला.
"तिला आपण संशोधक करूया. "
"बघू वेळ आली की. आता गणिताच्या अभ्यासाचं बघा. "
"बरं, " बाबांचा बोलण्यातला रस संपला आहे हे त्याच्या लक्षात आले. तो तिथून उठला.
"मला जायचं नाही आज एच. एस. एस. ला. आधी संस्कारवर्ग झाले, आता हे, " पॅनकेकचे तुकडे काट्याने तोंडात घेता घेता अमिता कुरकुरली.
"रविवारची सकाळ फुकट घालवू नकोस. आपली संस्कृती, तिचा अभिमान सुरू होईल बाबांचं. " फाफडयाचा तुकडा तोंडात टाकत प्रणवने तिला थांबवले.
"काय रे, काय कुचूकुचू चाललंय? माझ्याबद्दल की बाबांबद्दल? " उषाताईंनी विचारले.
"बाबांबद्दल, " अमिताने सांगून टाकले. प्रणव वैतागला.
"मूर्ख कुठची. आता बस ऐकत बाबापुराण. "
"शांत हो प्रणव. जायचं नाही का आज संस्कारवर्गाला? "
"अमिताची इच्छा नाही. "
"तुझं काय? "
"मला नाही माहीत मला काय वाटतं ते, तुम्ही जा म्हणालात तर जातो, नाही तर नाही... पण आम्ही काही आता लहान नाही. "
"खरं आहे रे. बघ अजून एक दोन वर्षच. एकदा कॉलेजला गेलास की बंदच होईल आपोआप. "
"मला नाही आवडत. दर रविवारी संस्कृतीवर भाषणं, भारतीय खेळ, रामायण, महाभारत, योगासनं आणि श्लोक. जबरदस्ती का करता तुम्ही? आम्ही सांगितलेलं का तुम्हाला इथे यायला? सारखं कशाकरता तरी मागे लागलेले असता. हिंदी गाणी वाजव पियानोवर, गुजराथी गरब्यात भाग घे, देवळात जायचं आहे, गुजराथी पुस्तकं वाच.... संपतच नाही काही. घरात आलो की ह्या गोष्टी करायच्या. बाहेर पडलं की जग आमचा रंग विसरू देत नाही. देवळंबिवळं बंद करून पुढच्या वेळेस मी चर्चमध्येच जाणार आहे.... " आपण काय बोलून गेलो ते प्रणवच्या लक्षात आले आणि तो एकदम गप्प झाला. आईकडे बघण्याचे धाडस होईना त्याचे. समोरच्या फुलपात्रावर नजर खिळवून तो तिथेच बसून राहिला. उषाताईंनाही पटकन काही सुचेना. अमिता तिच्या खोलीत निघून गेली. त्या तिकडेच पाहत राहिल्या. या गोष्टींचा इतका कडवटपणा साचलेला असेल मुलांच्या मनात याची त्यांना कल्पनाच नव्हती. त्यात प्रणव वर्णभेदावर का घसरला तेही लक्षात येईना. दार वाजल्याचा आवाज झाला तसे त्यांना एकदम मोकळे वाटले. प्रणवचा मित्र आला होता. सलीलला पाहिल्यावर प्रणव सगळे विसरला.
"तू काय रे सांगत होतास लाराबद्दल? कोण ही नवीन मुलगी? आणि काल वर्णाबद्दल काही तरी भडकून बोलत होतास. " सकाळी चहाचे घुटके घेत आकाशभाईंनी अचानक प्रश्न टाकला. मागे कधीतरी पुसटसा उल्लेख केला होता त्याने लाराचा. तो या दोघांच्या लक्षात आहे याचेच त्याला आश्चर्य वाटले.
"ती चिडवते मला. स्मेली आणि ब्राऊन बॉय म्हणून. "
"कधी ऐकलं नाही लाराचं नाव. गुजराथी आहे? "
"लारा आणि गुजराथी? अमेरिकन आहे. आपल्या शेजारीच राहते. तीन घरं सोडून कोपऱ्यावर. पण या गोष्टीलाही खूप महिने झाले आहेत. "
"तीच का? तिच्या अंगणात खेळू नको सांगणारी? " आईच्या तो प्रसंग लक्षात आहे हे पाहून तो सुखावला. पण त्या सुखावलेपणाची जाणीव होण्याआधीच आकाशभाई बोलले, "जाऊ दे रे, दुर्लक्ष करायला शीक. आहोत आपण त्यांच्यापुढे सावळे. काय करणार? "
"दुर्लक्ष कर कसं सांगता? मी काही लहान नाही आता. दोन लगावून देऊ शकतो मी तिला. ".
"नको रे बाबा असलं काही करूस. " आईने त्याला थोपवले. बाबा अशा गोष्टी जाऊ दे करून सोडून देतात ह्याचा त्याला भयंकर राग यायचा. त्यात आईचे हे काही तरी. सतत कसली तरी काळजी नाही तर धास्ती. आजचे नव्हते हे. पुन्हा असे काही झाले तर घरात सांगायचे नाही हे ही त्याने ठरवले. वर्ष उलटल्यावर काही तरी विचारतात एकदम.
त्याच्या खोलीत शिरल्यावर हलकेच प्रणवने दार लावून घेतले. त्याला एकटेपणा हवा होता. लाराबद्दलची चीड व्यक्त करायला दोघांनीही त्याला संधी दिली नव्हती. विषय निघाल्यावर बरेच दिवस दाबून ठेवलेल्या भावनांवर त्याला काबू ठेवता येत नव्हता. खसकन कोरे कागद ओढून त्याने चित्र काढायला सुरुवात केली. समोर उठणाऱ्या एकेका रेषेने त्याचे मन शांत होत होते. हळूच त्याने गादीखाली जपून ठेवलेली सगळी चित्रे काढली. प्रत्येक चित्राखाली चित्र का काढले त्याची लिहिलेली माहिती बऱ्याच दिवसांत वाचली नव्हती. किती सुंदर चित्रे होती. त्याच्या भावना व्यक्त करणारी. पण आज काढलेले चित्र... चित्रातली लाराची झडलेली जीभ. तो अस्वस्थ झाला. लारामुळेच होते आहे हे... काळ्या खडूने लाराचे तोंड तो बरबटत राहिला. विक्षिप्त हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटले. आज शाळेतून परत येताना लाराने त्याला नको नको त्या शिव्या घातल्या होत्या. मध्यंतरी हे थांबले होते. आज अचानक काय झाले पुन्हा हिला? वर्णावरून काही तरी पचकण्याचा या वेळेस तिने कहर केला तेव्हा त्यानेही तिचा हात रागाने पिरगळला. ती बिचकली पण क्षणात स्वत:ला सावरून काहीच न झाल्यासारखी तिथून पळालीच. त्याचा मात्र भडका उडाला. आता काढलेल्या त्या चित्राकडे पाहताना स्वतःच्या मनातल्या विचाराची त्याला आतून आतून शरम वाटली पण अंतर्मनावर वर्तमानाने मात केली. अनामिक आनंदाने सगळा पसारा प्रणवने पलंगाखाली सरकवला. पलंगाला पाठ टेकत तो विसावला तेवढ्यात अमिता धाडकन दार उघडून खोलीत आली. त्याच्या छातीचे ठोके वाढले.
"माझ्या खोलीत का आलीस? बाहेर हो, आधी. हो बाहेर. " अमिता समोरच्या कागदाला हात लावणार हे दिसताच प्रणवने तिला जवळजवळ ढकललेच. ती अपेक्षेप्रमाणे दणदण पाय आपटत खाली निघून गेली तेव्हाच आता आई वर येणार याचा त्याने अंदाज बांधला. भराभर त्याने खोलीची अवस्था नीटनेटकी केली. अमिताच्या अंगावर ओरडायला नको होते हे मान्य करत तो आईला बोलण्यात गुंतवत राहिला. त्यालाही मित्रांच्या नादात अमिताला सारखे आपण कटवत राहतो, बऱ्याचदा एकदम तोडून टाकतो ते थांबवायला हवे असे वाटायला लागले. उद्या तिच्या खेळाच्या तासाला जमले तर जायचे हे प्रणवने मनाशी नक्की केले.