रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ८

उषाताईंनी त्यांची चिंता मानसोपचारतज्ज्ञाकडे व्यक्त केली. पण असे चढउतार होतच राहतात आणि जोपर्यंत ती नियमितपणे घरी येत आहे तोपर्यंत काळजीचे कारण नाही हाच दिलासा त्यांच्याकडून मिळाला. आता यापलीकडे काय केले की शांती मिळेल जिवाला हे त्यांना समजेना. कॉलेजच्या जवळ घर घेणे हा पर्याय मांडला तरी तो दोन्ही मुले स्वीकारणे निव्वळ अशक्य होते. असे घरी राहून कुणी शिकते का इथे हाच प्रश्न आला असता दोघांकडून. प्रणवच्या भरवशाशिवाय पर्याय नव्हता.

नेहमीसारखाच तोही शुक्रवार. कपड्यांचा ढीग धुवायला टाकला आणि कधी नव्हे ते अमिता सोफ्यावर आईबाबांच्या मध्ये येऊन बसली. आश्चर्य लपवीत उषाताईंनी तिच्या गळ्याभोवती हात टाकला. तीही लहान मुलीसारखी त्यांच्या मांडीवर डोके टेकून पडून राहिली. त्या तिला थोपटत बराच वेळ टीवीवरचा कार्यक्रम पाहत राहिल्या. आकाशभाईही मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिले. अमिताचा डोळा कधी लागला ते उषाताईंच्या लक्षातही आले नाही. आकाशभाईंनी पटकन जाऊन चादर आणली. हळुवार हाताने अंगावर पांघरूण घालत दोघे तिच्याकडे एकटक नजरेने पाहत राहिले. तिला उठवून वर झोपायला लावणेही त्यांच्या जीवावर आले. अमिता गाढ झोपल्यावर तिचे डोके मांडीवरून अलगद उचलून त्या तिथून उठल्या.

सकाळी तिला जाग आली ती आकाशभाईंच्या घाबरलेल्या हाकेने.

"अमिता कसंतरी करतेय. बहुधा झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्या. " प्रणव जीवाच्या आकांताने शाळेत शिकवलेल्या प्रथमोपचाराने तिचा श्वास चालू करण्याचा प्रयत्न करत होता. धावत खाली आलेल्या उषाताई ते दृश्य पाहून कपाळावर हात मारून मटकन खाली बसल्या. आकाशभाईंनी हात पुढे केला.

"हातपाय गाळायची ही वेळ नाही. " आवाजाबरोबरच उषाताईंना आधार देण्यासाठी पुढे केलेला त्यांचा हात थरथर कापत होता.

रुग्णालयातल्या पलंगावर पडलेल्या अमिताच्या देहाकडे तिघेही व्याकुळ नजरेने पाहत राहिले. ती शुद्धीवर कधी येणार या काळजीने सर्वांचाच जीव दडपून जात होता. आईचा श्वास कोंडताना बघून प्रणवने बाबांना तिला मोकळ्या हवेत न्यायला लावले. डॉक्टरांनी त्यालाही बाहेर जायला सांगितल्यावर नाईलाजाने प्रणवही बाहेर येऊन बसला. तिघेही वाट पाहत राहिले.

"हार्ट अटॅक! "

"हार्ट अटॅक? ती फक्त एकोणीस वर्षाची आहे डॉक्टर. "

"हो, पण एनोरेक्सिक आहे पेशंट. झोपेच्या गोळ्या घेतल्यामुळे एकेक यंत्रणा निकामी झाली आहे शरीराची.

"पण तिच्या डॉक्टरांनीच दिल्या होत्या झोपेच्या गोळ्या. " गडबडून आकाशभाईंनी उत्तर दिले.

"शक्य आहे. पण त्या सतत घेतल्यामुळे किडनी खराब झाली आहे. मेंदूलाही रक्त पुरवठा होत नाही असं वाटतंय. दोन दिवस वाट पाहून ठरवावं लागेल. "

"काय ठरवावं लागेल? "

"तिला इथे आणल्यापासून ती कृत्रिम श्वसनावरच आहे. शरीराकडून प्रतिसाद नाही"

"आम्ही हात फिरवतो तेव्हा तो स्पर्श तिला कळतो. "

"हो, पण त्याला पूर्णार्थाने प्रतिसाद म्हणता येत नाही.... " डॉक्टर काय सांगत आहेत ते प्रत्येकजण आपापल्या परीने समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.

"किती दिवस कृत्रिम श्वसनावर पेशंटला ठेवायचं ते तुम्हीच ठरवायचं आहे. निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल. यातून ती वाचली तरी त्या वाचण्याला काही अर्थ नाही. " निर्णय घेणे सोपे नव्हते. अमिताच्या बारीक होण्याच्या नादाने असे टोक गाठले जाईल असे क्वचित वाटले तरी ते तेवढ्यापुरते होते, तिला सांगण्यापुरते, तिने त्यातून बाहेर पडावे म्हणून. खरेच असे काही होईल असे कुणालाच वाटले नव्हते. एक अंधुक आशा मनात तेवत होती. आज ना उद्या ती शुद्धीवर आली तर? असा कसा निर्णय घ्यायचा? डॉक्टर म्हणत आहेत म्हणून ठरवून टाकायचे? छे, इतके सोपे आहे का हे? प्रश्नचिन्हांच्या जाळ्यात तिघेही अडकले. पण अमिताने फारसा वेळ दिलाच नाही, निर्णय घेण्याची वेळच आणू दिली नाही. त्याच रात्री तिने या जगाचा निरोप घेतला.

आकाशभाई आणि उषाताई कपाळाला हात लावून बसले. ‘हे काय आलं आपल्या नशिबात, का? ’ विचारांचे थैमान चालू होते. ‘कळलं होतं का भविष्य मुलीला? काल रात्री दोघांच्या मध्ये येऊन बसली लहान मुलीसारखी ते आधारासाठीच असेल का? लहानपणी बोट धरून राहायची, घाबरली की कुशीत शिरायची, तसंच वाटत असेल का तिला? ’ आकाशभाई आणि उषाताईंचे डोके भंडावून गेले. प्रणव आईबाबांजवळ बसून हमसाहमशी रडला. दोघेही त्याला समजावत राहिले, कोरड्या चेहऱ्याने, अस्वस्थ मनाने. पुढच्या तयारीला लागायला हवे.

कॉफिनमध्ये ठेवलेल्या अमिताला हलवावे, तिथून बाहेर पडायला लावावे असे उषाताईंना वाटत होते. चालता बोलता देह असा एकदम निष्प्राण, थंड, निर्जीव. सुन्न मनाने ते तिघे चर्चमध्ये येणाऱ्यांना भेटत होते. केवढी ही गर्दी. भरल्या डोळ्यांनी उषाताई त्यांच्या सांत्वनासाठी रांग लावून उभ्या असणाऱ्या मुलांकडे, मुलींकडे पाहत होत्या.

‘यातलं कोण चिडवत होतं तिला? कुणामुळे सुरू झाला हा जीवघेणा खेळ? ’ एखाद्या मुलीकडे बघून वाटत होते, ‘हीच, हीच असेल ती मुलगी. हिच्यामुळेच गमावलं मी माझ्या लेकीला’. दुसरा चेहरा बघितल्यावर ती मुलगी त्यांना उगाचच अमिताची शाळेतली जवळची मैत्रीण असेल असा भास होत होता.

‘तुझ्याच मैत्रिणी ना या? त्यांना नाही वाटतं कुणी काही चिडवलं? आणि त्या का नाही ग भांडल्या तुझ्यासाठी, का नाही तुला चिडवणाऱ्यांना प्रतिकार केला? का नाही गेल्या तक्रार घेऊन शिक्षकांकडे? निदान आम्हाला तरी सांगायचं. ’ आता हे निरर्थक आहे हे समजत होते पण हेच प्रश्न तेव्हा का पडले नाहीत या विचाराने व्याकुळ व्हायला होत होते. तिच्या शाळेतले शिक्षक, महाविद्यालयातले मित्रमैत्रिणी तिच्याविषयी एक दोन वाक्य बोलत होते ते ऐकताना वाटत राहिले, ‘का वाटलं असेल अमिताला या माणसांच्या गर्दीत एकटं? केवळ आपण जाड आहोत ही भावना पार मृत्यूपर्यंत नेऊ शकते ही सुद्धा या देशाचीच देणगी म्हणायची का? इतके मित्रमैत्रिणी असूनही नाही ना कुणी वाचवू शकलं माझ्या मुलीला? आम्ही तरी काय असून नसल्यासारखेच. पण हिच्या भावाने काय गुन्हा केला होता. त्याला का दिलं तिने हे अपयश. ’ प्रणवने खांद्यावर टेकलेल्या आईला कुशीत ओढले आणि दुसऱ्या हाताने आकाशभाईंच्या खांद्यावर आधाराचा हात टेकवला.

प्रणव नंतरचा महिनाभर घरीच राहिला. एकमेकांच्या सोबतीने पुन्हा ते घर सावरू पाहत होते. आज प्रणव निघणार होता. सकाळपासून उषाताईंचे डोळे भरून येत होते. आकाशभाईंनाही तो आता आपल्याबरोबरच राहिला तर बरे असे वाटत होते. पण असे करून कसे चालणार होते? निघण्याच्या आधी तो लॅपटॉप घेऊन आला. दोघांना त्याने समोर बसवले.

"मला काही तरी दाखवायचं होतं तुम्हाला दोघांना. "

ती दोघं नुसतीच पाहत राहिली.

"अमिताच्या नावाचं संकेतस्थळ केलं आहे आम्ही दोघांनी. मी गेल्यानंतर बघा तुम्ही म्हणजे अमिता जवळ असल्यासारखं वाटेल आणि घरात अगदीच कुणी नाही असंही वाटणार नाही. मी उद्या बोलेनच तुमच्याशी. "

मागे वळून पाहत तो गाडीत बसला. आईबाबा दारात त्याला निरोप द्यायला उभे होते. त्यांच्या शरीरात भरून राहिलेले पराभूतपण प्रणवच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेले. हात हलवत, दूर जाणाऱ्या गाडीकडे ठिपका होईपर्यंत पाहत ती दोघं त्याला नजरेत साठवत राहिली.

आत आल्या आल्या घाईघाईत दोघांनी ते संकेतस्थळ उघडले.

पहिल्याच पानावर अमिताचा हसरा चेहरा पाहून उषाताई हरखल्या. अमिताच्या शब्दातले तिचे लहानपण, प्रणवबरोबरचे फोटो, आईबाबांच्या आठवणी, काय नव्हते त्या पानांमध्ये. कितीतरी प्रसंग. अमिताचे नाच, गाणी, खेळ, सहली. सगळे जिवंत झाले होते. दोघा भावंडांनी फार छान लिहिले होते. प्रसंग खुलवले होते. भावना सुंदर ओळींनी गुंफल्या होत्या. शेवटच्या पानावर ते कधी आले ते दोघांना कळलेच नाही. पण अमिताच्या फोटोऐवजी तिथे होती फक्त रिक्त चौकट. उषाताईंच्या थरथरणाऱ्या हातावर अलगद हात ठेवला आकाशभाईंनी.

"मी वाचून दाखवतो तुला काय लिहिलं आहे प्रणवने. " त्यांनी नुसतीच मान हलवली.

‘आश्चर्य वाटलं ना अमिताच्या फोटोऐवजी रिकामी चौकट म्हणून? आत्तापर्यंतचे फोटो तिच्या जायच्या आधीच्या काही महिन्यांपर्यंतचे होते. शेवटी शेवटी आमची अमू, रागवेल अमिता, अमू म्हणतोय म्हणून, पण मला फार आवडायचं तिला असं चिडवायला. फार थकली होती ती. अगदी बाजूला, हाताच्या अंतरावर असूनही फार दूर गेली, परकीच झाली ती अखेरीला. बरी होतेय, बरी होतेय या भ्रमात तिने ठेवलं सर्वांनाच. अप्रतिम अभिनय करून चक्क फसवलं तिने आम्हाला. का? याचं उत्तर आता कधीच मिळणार नाही. तुम्ही तिच्या, माझ्या बरोबरीने या संकेतस्थळावर प्रवास केलात पण आता तिला तुमचा निरोप घ्यायचा आहे. तिच्या शेवटच्या दिवसातली छबी नाही ठेवायची मला तुमच्यासमोर. माझी इच्छा आहे की शेवटी तुम्ही तिचा निरोप घ्यावा तो आधीच्या सुंदर फोटो आणि स्मृतींतून; म्हणूनच ती चौकट कोरी आहे, रिक्त! ती चौकट तुम्ही तुमच्या आठवणीतल्या अमिताने पूर्ण करा. अमू, आमच्या कुणाच्याच आयुष्यातला एकही क्षण असा नसेल की तुझी आठवण झाली नाही. तूही ठेवशीलच आमची आठवण कुठे असशील तिथे. पुढचा जन्म असेलच तर, मला पुन्हा एकदा तुझा भाऊ व्हायला आवडेल गं. मला ठाऊक आहे आईबाबाही पुढच्या जन्मात तूच पोटी यावीस असं म्हणत असतील. तेव्हा तरी असं फसवून निघून जाऊ नकोस अचानक. अमूच्या स्मृतीला हे संकेतस्थळ वाहतोय. हा वेदनेचा प्रवास, तिचा आणि आमचाही... तिच्या भावाचा, आईबाबांचा... वाचून कुणाला परावृत्त होता आलं, करता आलं, तर आमची अमूच परत मिळाल्यासारखं वाटेल आम्हाला. असं झालं तर कळवायला विसरू नका मला. माझ्या आधाराची आवश्यकता असेल, मदत हवी असेल तर जिथे असेन तिथून येईन मी ---- प्रणव’

आकाशभाई, उषाताई दोघेही डोके हातात धरून तसेच बसून राहिले बराच वेळ. आतल्या आत घुसमटत. भावनावेग आवरत. किती वेळ, किती तास, किती दिवस गेले...

त्या दिवशी उषाताईंनी आकाशभाईंसाठी कॉफी करून आणली. हातपाय गळून गेलेल्या उषाताईंच्या डोळ्यातली चमक आकाशभाई पाहत राहिले.

"मला वाटत होतं आता अमिता गेल्यावर जगणं म्हणजे यंत्रवत. पण प्रणवच्या या संकेतस्थळाने मला मार्ग दाखवलाय. गेले कितीतरी दिवस मी विचार करतेय. मला माहीत नाही सगळं सांभाळून तुम्हाला किती जमेल पण मला फक्त पाठिंबा हवाय. "

"तू काय करायचा विचार करते आहेस ते सांग ना आधी. नंतरच ठरवता येईल ना मला. "

"मी शाळा, महाविद्यालयात जाऊन प्रणवबरोबर या विकाराबद्दलची माहिती द्यायचा विचार करतेय. आपल्याला जमलं नाही ते, अमिता कुठे कमी पडली, आपण काय करू शकलो नाही, खूप काही आहे सांगता येईल असं. मुलांनाही कळेल त्यांच्यामध्ये हे न्यूनत्व कसं येत जातं, त्यामुळे घरात नातेसंबंधावर कसा परिणाम होतो आणि मुख्य म्हणजे वेळीच मदत घेतली तर हे कसं टाळता येतं. बरंच काही करता येईल, कदाचित कितीतरी मुलांना वेळीच सावध करता येईल आपले अनुभव सांगितले तर... "

त्या बराच वेळ बोलत होत्या. आकाशभाई मन लावून ऐकत होते.

"करता येईल. मीही मदत करेनच जमेल तशी. आपली अमिता नाही वाचवू शकलो आपण, पण कुठल्या तरी आईबाबांचे जीवलग त्या वाटेवरून परत येणार असतील तर हरकत नाही हे करून बघायला. प्रणवच्या मदतीने तुला स्वरूप ठरवता येईल. पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करतो तसं एक नवीन आयुष्य जगायचा प्रयत्न करू आपण. "

आकाशभाईंच्या साथीने नव्या उमेदीने जगायला हवे असे इतक्या वर्षाच्या सहप्रवासात त्यांना पहिल्यांदाच आतून आतून वाटून गेले. प्रणवला फोन लावायला आकाशभाई उठले तेव्हा त्यांच्याकडे पंख फुटलेल्या परीसारख्या त्या पाहत राहिल्या.


- मोहना प्रभुदेसाई जोगळेकर