रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ७

महिनाभराने अमिता घरी आली. सावकाशीने एकेकाचा दैनंदिन जीवनक्रम मार्गी लागला. दोघेही जास्तीत जास्त वेळ मुलांबरोबर घालवत होते. त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचा प्रयत्न करत होते. अमिता माणसांत आल्यासारखी वाटायला लागली तरी घरातल्या प्रत्येकाचे तिच्यावर बारीक लक्ष होते. ती या मार्गाकडे का वळली ते कधीतरी सांगेल या आशेवर उषाताई होत्या.

प्रणवचा आणि अमिताचा जास्तीत जास्त वेळ हल्ली संगणकावर जात होता. संध्याकाळचा वेळ त्यातच जायचा. बालपणाची स्मरणयात्रा संकेतस्थळावर लिहिण्यात दोघे गर्क होते. अमिताला कधी एकदा प्रणव शाळेतून येतो असे होऊन जाई. तिची शाळा बंद होती. हे वर्ष फुकट जाईल की काय या शंकेने अमिताची झोप उडाली, पण घरी अभ्यास करून परीक्षा द्यायची असे तिने ठरवले. शाळेने पण मान्यता दिली. त्यातूनही आई, बाबांचा मिळणारा सहवास तिला सुखावत होता. सारख्या पैशाच्याच गोष्टी करणारे बाबा तिचा शब्द झेलायला एका पायावर तयार असलेले बघून तर हल्ली तिला बरे होऊच नये असे वाटायला लागले होते.

"आईचा किती जीव आहे ते ती बोलून दाखवते म्हणून समजतो, पण बाबांचा पण किती जीव आहे ते मी आजारी पडल्यावरच समजलं. " न राहवून तिने प्रणवपाशी हे बोलून दाखवले.

"हे पण लिहायला हवं आपल्या त्या स्मरणयात्रेत. तुझ्या किंवा माझ्या वाढदिवसाला आपण आई, बाबांना दाखवूया आपलं संकेतस्थळ. "

"हो, आई सारखी येरझारा घालते आपण लिहीत असलो की. "

"मग आता प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे आपल्या आयुष्यातली असा निर्धार आहे तिचा. धन्यवाद तुला त्याबद्दल. " प्रणवने चेष्टा केली, पण आपल्या शब्दांनी ती दुखावली तर नाही ना असेही त्याला वाटून गेले. अमिता नुसतीच हसली.

"खरं आहे रे तिचं. तुझ्या लक्षात नाही आलं? " काही न कळल्यासारखा तो पाहत राहिला.

"आपल्याकडे जेवायला येणारे पाहुणे कमी झाले आहेत. "

"अगं तू आत्ता तर बरी होते आहेस. "

"नाही आई तिच्या मैत्रिणींबरोबरही जात नाही बाहेर. "

"सध्या सगळे सरबराईत आहोत ना तुझ्या म्हणून, " तो हसून म्हणाला पण अमिता गंभीर होती.

"नाही, खरं कारण आहे लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देणं जमत नाही तिला. फार प्रश्न विचारतात आणि प्रत्येकाच्या नजरेत मुलांकडे इतकं कसं दुर्लक्ष केलं असा भाव दिसतो तिला. "

"हे तुला आईने सांगितलं? "

"छे, बाबा तिच्याशी बोलत होते. आता पुन्हा लोकांना बोलावलं पाहिजे घरी तरच व्यवसाय वाढेल असं त्यांना वाटतं. पण लोकांना घरी जेवायला बोलवायचं नाही असं आईने सांगितलं. "

"मग वादावादी का दोघांची? "

"नाही. शांतपणे ऐकून घेतलं बाबांनी. माझ्या आजारपणाने बाबांमध्ये बराच बदल झालाय. मी मेले ना या आजारामुळे, तर तेवढंच समाधान असेल मला. आईला आणि सर्वांनाच समजून घेतात आता बाबा. "

"पण तू का मरणाच्या गोष्टी करतेस? "

"मला पुन्हा नव्यानं सगळं सुरू करायची भीती वाटायला लागली आहे. "

"असं म्हणून नाही चालणार अमिता. कॉलेजला जाशील आता तू लवकरच. "

"अगं किती सदिच्छापत्रं येताहेत तुला सर्वांची. तुला उगाचच चिडवणाऱ्यांनी क्षमा मागितलेली पत्रं आई नाही का तुला वाचून दाखवत. सगळे जण कधी एकदा तू परत येतेयस म्हणून वाट बघताहेत. या शाळेतलं अजून एक वर्ष, " अमिता प्रणवचे बोलणे मन लावून ऐकत होती. शाळेत मुली चिडवतात त्याचे हे पर्यवसान होते. जवळजवळ मरणाच्या दारात पोचवणारे. तिने इतके कसे टोक गाठले या प्रश्नाचे उत्तर तिला स्वत:लाच सापडत नव्हते. कॉलेजचे कुणी पाहिले आहे? तिथे आणखी काही तरी निघायचे!... आईची हाक ऐकू आली तसे दोघांचे बोलणे थांबले. अमिता संथपणे जिना उतरून खाली आली.

‘कधी भरणार हिचं वजन परत? ’ तिच्या हाताला धरून तिला खाली आणावे अशी इच्छा झाली तरी उषाताईंनी ती दाबली. उगाच तेवढ्याने चिडचिड नको तिची. अमितासमोर पोळी भाजीचे ताट ठेवले.

"तुम्ही सगळे नंतर जेवणार आहात का? मला का आधी वाढतेयस? "

"तुझं खाऊन झालं की मला बाहेर जायचंय. त्या दोघांना वेळ मिळेल तसं खाऊन घेतील ते. तू बस आता. "

आपण सगळे संपवल्याशिवाय आई उठायची नाही हे तिला माहीत होते. अमिताला स्वतःचीच चीड आली. स्वतःहून हा धोंडा तिने आपल्या पायावर पाडून घेतला होता. आता तक्रार करणार तर कुणाकडे? ती न बोलता घास चिवडत राहिली. उषाताई तिचे घास चिडाळणे असह्य होऊनही तिच्याशी या ना त्या विषयावर बोलत राहिल्या. तिचे खाणे संपेपर्यंत समोर बसून राहिल्या. किती दिवस चालणार हे असे?

सप्टेंबरपासून प्रणवचे कॉलेज सुरू झाले. अमिताही परत शाळेत जायला लागली. पण मन रमत नव्हते. तिला चिडवणाऱ्या मुली आता तिच्या वाटेला जात नव्हत्या. कुणी ना कुणी सतत तिच्या आजूबाजूला राहत होते. पण तिला त्याचा त्रास व्हायला लागला. सगळेजण आपल्याकडे सहानुभूतीने बघतात, आपली कीव करतात हेच तिच्या मनाने घेतले. ती खंगत चालली. एक महिना, दोन महिने.... अजून सात आठ महिने, नंतर कॉलेज. पण हे चार महिने काढता काढता नकोसे झाले होते. अजून सात आठ महिने... कल्पनेने अमिताचे हताशपण वाढत होते. त्या दिवशी उतरलेल्या चेहऱ्याने ती घरात आली आणि उषाताईंचा तोल सुटला.

"हे काय गं सारखं चेहरा पाडून वावरणं. स्वत:ला सुख लागू द्यायचं नाही आणि आमचीही फरफट तुझ्याबरोबर. अगं, काय करायचं तरी काय आम्ही तुझ्यासाठी बाई? डॉक्टर झाले, मानसोपचारतज्ज्ञ झाले. समजून घ्यायचं, समजून घ्यायचं म्हणजे किती? आणि तुला नाही आमची तगमग समजत? काय अवदसा आठवली आहे तुला भरल्या घरात ही?  तुझ्या भावाला तुझ्या काळजीने झोप लागत नाही रात्र रात्र. त्याचंही

हेच वय आहे ना मित्रमंडळींत रमायचं? पण सगळं सोडून तो तुझ्या काळजीत. बाबांच्या जीवाला घोर आहेच, पुन्हा त्यांना तुझ्या उपचाराच्या खर्चासाठी रात्रीचा दिवस करावा लागतोय. आणि का हे सगळं?  तर कुणी एक मुलगी काहीतरी चिडवते, आणि तुझ्यासारखी मूर्ख ते इतकं मनावर घेते की तिला स्वत:च्या जीवाची पर्वा वाटत नाही! अगं पण आमचं काय? का हा असा छळ चालवला आहेस तू, तुझाही आणि आमचाही? "

घरात आल्या आल्या आपल्यावर आई इतकी चिडेल याची अमिताला पुसटशीही कल्पना नव्हती. ती सुन्न होऊन आईकडे पाहत राहिली. पाठीवरची बॅकपॅक खाली टाकून अमिता डायनिंग टेबलवर डोके टेकून हुंदके द्यायला लागली. उषाताईंच्या मनातला संताप खदखदायला लागला. पुढे होऊन त्या वेड्यासारख्या तिच्या पाठीवर गुद्दे मारायला लागल्या. आईला थांबवायचे त्राण त्या जीवात राहिले नव्हते. मारता मारता केव्हातरी अमिताचे स्तब्ध पडून राहणे उषाताईंच्या लक्षात आले. थकून उषाताई तिच्या बाजूला बसून मान खाली घालून रडत राहिल्या. मायलेकी एकमेकींच्या बाजूला बसूनही शेकडो कोस दूर होत्या.

अमिताला प्रणवच्याच कॉलेजध्ये प्रवेश मिळाला. नवीन सुरुवात. आता सगळे सुरळीत व्हायला हवे. घडी बसायला हवी. शाळा, वातावरण, मित्रमैत्रिणी सर्वच नवेकोरे. नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला प्रणव होता. अमिताची खास मैत्रीण नीनाही होती. कोऱ्या पाटीवरची सुरुवात सुलभ होईल याची खात्री होती उषाताई आणि आकाशभाईंना. अपेक्षेप्रमाणे बस्तान बसते आहे असे वाटत होते. वसतिगृहात स्वतंत्र राहण्याऐवजी प्रणव आणि अमिता खोली भाड्याने घेऊन एकत्र राहत होते. आकाशभाई आणि उषाताई दर आठवड्याला भेटायला जात नाहीतर दोन्ही भावंड कपड्याचे गाठोडे धुवायला घेऊन शुक्रवारी घरी येत. दोन चार महिने बरे गेले. अमिता रुळते आहे असे वाटायला लागले. त्यातही अमिताच्या खाण्याबद्दल विचारले नाही की दिवस चांगले जात. ती दोघेही प्रणवाकडेच तिची खुशाली विचारत. पण या सुरळीतपणाला खीळ बसल्यासारखे वाटायला लागले. उषाताईंना अमितामध्ये अपेक्षित सुधारणा दिसत नव्हती. अलीकडे तर ती फार असंबद्ध बोलायला लागली होती. एक दोन महिने अमिता नाहीतर प्रणवकडूनच काही समजेल ह्या अपेक्षेत गेले. पण आणखी थांबून चालणार नव्हते. उषाताईंनी नीनाला, अमिताच्या मैत्रिणीला गाठले. दोघी एका खोलीत राहत असल्या तरी प्रणव आणि अमिता तासनतास लॅपटॉपसमोर असतात एवढेच ती सांगू शकली.

"पार्ट्या, हल्लागुल्ला अशा प्रकारात रस नाही तिला आंटी. फार अभ्यासू मुलगी आहे तुमची. आणि भावाची लाडकी. "

"खाते ना गं ती व्यवस्थित? तू मैत्रीण आहेस तिची. एकदा कशी तिला परत मिळवली आहे ते माहीत आहेच न तुला? " नीनाने मान डोलवली. अगदी पहिल्यांदा तिलाच तर शंका आली होती. शाळेतल्या त्या भाषणानंतर नीनाला टाळायचे म्हणून अमिताने पळच काढला होता. तेव्हाच एक नकोसा दुरावा दोघींत निर्माण झाला. त्या वेळेस सांगावेसे वाटूनही ना अमिता बोलली, ना नीनाने तिला काही खोदून खोदून विचारले, ना मदतीचा हात पुढे केला. अमिता टाळते या रागात ही महत्त्वाची बाब तिने दुर्लक्षित केली होती. पण मैत्रिणीच्या आजारपणात मात्र ती सावलीसारखी मागे होती.

"खायच्या गोष्टींमध्ये रसच नाही तिला. एकेक घास बराच वेळ चिवडत बसते. बाथरूममध्येही असते खूप वेळ. पण तुम्ही काळजी करू नका. हळूहळू लागेल मार्गाला. "

"तुझा कसा चाललाय अभ्यास? " काही तरी विचारायचे म्हणून उषाताईंनी विचारले.

"चांगला चाललाय. पहिलंच वर्ष आहे ना तर जरा मजा पण करतेय. अमितालाही न्यायचा प्रयत्न करते मी जिथे जाईन तिथे. " अमिताला कसे जपते आहे ते नीना सांगत राहिली. खरे तर इतक्या नवीन मैत्रिणी, मित्र मिळाले होते तिला की अमिताच्या आशा निराशेच्या लपंडावांच्या मागे लागणे तिने कधीच सोडून दिले होते. जीवाभावाची मैत्रीण असली तरी तिचेही वय नवीन नवीन अनुभव उपभोगायचे होते.