रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ३
"आज तुझा आणि माझा खेळाचा तास साधारण एकाच वेळेस आहे. जमलं तर मी येईन तुझा खेळ बघायला. "
"दादल्या, का रे मस्काबाजी? काम असेल तर सांगून टाक. की माझी मैत्रीण आवडली आहे एखादी? खेळ बघायला नाही आलास तरी देईन ओळख करून. " तिचे केस विस्कटत तो नुसताच हसला. केस विस्कटले म्हणून चिडलेली अमिता तरातरा निघूनही गेली. जाता जाता सलील आल्याचे तिने ओरडून सांगितले.
सलील अस्वस्थ हालचाली करत खाली उभा होता. घाईघाईने बॅकपॅक पाठीवर अडकवत प्रणव बाहेर पडला. रस्ताभर सलील इकडचे तिकडचेच बोलत राहिला. तो अस्वस्थ आहे हे प्रणवच्या लक्षात आले होते. दोघेही निमूटपणे चालत राहिले. शाळेपाशी पोचल्यावर मात्र सलीलने तास चुकवायची गळ घातली. मैदानावर ते दोघे बोलत राहिले.
"बहुधा आम्ही इथून कायमचं जातोय. "
"कुठे? "
"कॅनडा. "
"काय? अचानक ठरलं का? " प्रणवला एकदम धक्काच बसला.
सलील बोटांच्या अस्वस्थ हालचाली करीत तिथल्या तिथे फेऱ्या मारायला लागला. प्रणव नुसताच त्याच्याकडे पाहत उभा राहिला.
"आईला नाही राहायचं इथे. तिला कॅनडालाच जायचं आहे परत. बाबांच्या मागे लागली आहे ती. तिच्या वडिलांच्या व्यवसायात भागीदार व्हा म्हणून. बरेच दिवस चालले होते वाद. आता मला घेऊन जाणार म्हणते. "
"असं कसं चालेल करून? "
"ते तिला नको समजायला? मला नाही जायचं कॅनडात. "
"पण कॅनडा का? "
"तुला माहीत आहे ना, माझ्या आईने आणलंय बाबांना इथे? "
प्रणवने अशा गोष्टी घरात बऱ्याचदा ऐकल्या होत्या. इथेच वाढलेल्या मुलींसाठी त्यांच्या आईवडीलांना नवरे मात्र भारतातले हवे असतात. मग अमेरिकेत यायला आतुर झालेली मुले एकदम इथले नागरिकत्व मिळणार म्हटल्यावर अशा लग्नांना तयार होतात. सलीलचे बाबा त्यातलेच. पण त्यांनी इथे उत्तम जम बसवला होता. आता हे काही तरी नवीनच.
"पण तू राहा ना इथे तुझ्या बाबांबरोबर. "
"मला कोण विचारतंय रे? बाबा देखील मूग गिळून गप्प. हे बघ, मला इथलं घर, मित्र, मैत्रिणी सोडून नाही रे जायचं कॅनडाला. आणि खरं सांगू का बाबांनी नाही ऐकलं आईचं तर घटस्फोट घेतील ती दोघं असं वाटायला लागलंय मला. "
दोघेही काही न बोलता नुसतेच एकमेकांकडे बघत राहिले. अस्वस्थ होत सलीलने बॅकपॅकमधली पाण्याची बाटली काढली. पाण्याच्या बाटलीबरोबर काही तरी पडले. प्रणव ते उचलायला खाली वाकला पण त्याचा हात बाजूला ढकलत सलीलने घाईघाईने खाली पडलेली ती छोटीशी पुडी उचलली.
"काय आहे ते? बघू ना मला, " घाईघाईत सलीलने काय उचलले ते त्याला समजेना. सलीलचा चेहरा इतका का पडला ते ही त्याला समजत नव्हते. त्याच्या आढ्यावेढ्यांना न जुमानता प्रणवने सलीलच्या हातातून पुडी ओढली. मान खाली घालून सलील पुटपुटला.
"तुला आठवतंय का रे, मागे एकदा काही मुलं मॅरिवाना घेण्यासाठी आपल्या मागे लागली होती? "
"तू घ्यायला सुरुवात केली आहेस? " प्रणवने त्याचा हात एकदम पिरगळला. हात दुखला, पण भरून आलेल्या डोळ्यांतून पाणी बाहेर येऊ न देता सलील नकारार्थी मान हालवत राहिला.
"तोंडाने सांग. नुसतीच मान हालवू नकोस. "
"नाही अजून. सगळं विसरायला होतं ना थोडीशी पावडर हुंगली की, म्हणून घेतली पावडर विकत. घरात एवढी भांडणं चालू असतात त्याची भीती वाटते रे. मला माझे आई, बाबा दोघंही हवे आहेत. "
"तू घेतोस का ते सांग आधी. "
"नाही. धाडस नाही झालं चव घ्यायचं"
"पण मिळाली कुठे तुला? "
"एकदा शाळेच्या मुतारीत मुलं मागे लागली होती आपल्या, आठवतंय? "
प्रणवला सगळे आठवत होते. तो काही न बोलता चुळबुळत उभा राहिला. अस्वस्थ, सैरभैर. न भंगणाऱ्या शांततेला तडा गेला तो दुसऱ्या तासाच्या घंटेने. दोघेही न बोलता वर्गात गेले. तासावर लक्ष केंद्रित करणे प्रणवला जमेना. सलीलची त्याला चिंता वाटायला लागली होती. हा तास संपला की त्याला अमिताचा खेळ बघायला जायचे होते. पण इथून उठूच नये असे त्याला वाटत राहिले.
प्रणव मैदानाच्या कडेला राहून खेळ पाहत होता. जोरजोरात आरडाओरडा करून अमिताला प्रोत्साहन देत होता. खेळ संपतो आहे असे वाटते आहे तितक्यात अमिताची आणि दुसऱ्या मुलीची बाचाबाची अंधुकशी त्याच्या कानावर आली. तो थोडा पुढे सरकला पण एकदम मुलींच्या घोळक्यात शिरायचा त्याला संकोच वाटला. काय झाले असावे त्याचाही त्याला अंदाज येईना. झाले होते ते असे, अमिता चेंडू घ्यायला खाली वाकली आणि सारा फिसकन हसली.
"कमी खात जा अमिता. पाव वाढले आहेत. " अमिताने रागाने साराला ढकलले आणि काहीच न झाल्यासारखे तिने बॉल दुसऱ्या मुलीकडे फेकला. खेळात गर्क झालेल्या मुलींच्या, अमिताने साराला ढकललेले लक्षात आले नाही, पण दात ओठ चावत सारा अमिताच्या अंगावर धावली. जोरात धक्का मारत तिने अमिताला पाडले. ताडकन उठून अमितानेही साराचे केस ओढले. खेळ सोडून दोघींची जुंपलेली पाहायला मुली धावल्या. त्या दोघींभोवती कडे करत मुलींचा गोंधळ चालू झाला. टाळ्या वाजवीत काही जणी अमिताच्या नावाने ओरडत होत्या तर काही जणी साराच्या नावाने. वर्गशिक्षिका पुढे धावली. मुली आजूबाजूला पांगल्या तरी त्या दोघींवर प्रत्येकीची नजर होती. अमिता, सारा आपापली बाजू कळकळीने मांडत होत्या. अमिता आता मात्र घाबरली. मान खाली घालून रांगेत उभी राहिली. प्रणव तिच्याकडे धावला पण त्याला तिने ढकलूनच दिले. त्यानंतर घडलेले अनपेक्षित होते. लेखी कबुलीजबाब, शिक्षा, पालकांसाठी चिठ्ठी. अमिताला तिथून धावत सुटावे, तोंड लपवावे असे वाटायला लागले. घरी जायच्या कल्पनेने तिचे हातपाय गळले. आतापर्यंत एकदोन मैत्रिणींच्या बाबतीत घरापर्यंत तक्रारी गेल्या होत्या पण शिक्षकांना तिच्याबाबतीत घरी चिठ्ठी द्यावी लागेल याची अमिताने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. पुढच्या तासावरून तिचे लक्ष उडाले. कसे दाखवायचे तोंड घरी? तिचे डोके एकदम भणभणून गेले. उलटसुलट विचारांच्या चक्रात जीव अगदी थकून गेला.
आईच्या हातात चिठ्ठी ठेवली आणि हमसून हमसून तिला रडायला आले.
"मला बारीक व्हायचं आहे आई. " हुंदक्यांनी तिचे अंग गदगदत होते.
"अगं मला आधी वाचू दे. आणि नुसतं रडत राहून काही साधणार आहे का? " ती थोडीशी शांत झाली.
"तू वाच, मी खोलीत जाते माझ्या. " उषाताईंनी नुसतीच मान हलवली.
अमिताने जोरात पलंगावर अंग टाकले आणि एकदम ती दचकली. आपल्या वजनाने हा पलंग मोडला की काय अशी शंका तिला चाटून गेली. पुन्हा उठून तिने खात्री करून घेतली. पलंगावरच भिंतीला टेकून ती तशीच बसून राहिली. पाव वाढले आहेत, हे काय बोलणे झाले? आणि हे असे बदल तर होणारच ना? मुलीच मुलींना का चिडवतात माहीत असूनही? पाळी सुरू झाल्यानंतर शरीरात बदल होणारच. एक अख्खा तास झाला की याच विषयावर दोन वर्षांपूर्वी. तरीही मुली का करतात असे? कुणी आहे तसेच राहिले आहे, कुणी खूप जाड, तर कुणी खूप बारीक. मनातल्या प्रश्नांबरोबर तिचे हात देहाच्या रेषा चाचपडत राहिले. झटकन उठत ती आरशासमोर उभी राहिली. दहा वेळा तिने तिचा आखूड शर्ट खाली ओढला. केस सारखे केले. वेगवेगळ्या कोनातून स्वतःला निरखत राहिली पण समाधान होत नव्हते. शर्ट वर करीत तिने पोटाचा भाग ओढून पाहिला आणि निराशेने तिला ग्रासले. तिचे डोळे एकदम भरून आले. हातात मावणारी ती छोटीशी वळी दाबत दाबतच तिने डोळे मिटले. साराचे शब्द मनात घुमत राहिले. ती पुन्हा पुन्हा आरशात स्वतःला पाठमोरी निरखत राहिली. उषाताई खोलीत येताना दिसल्या तसे तिला परत रडायला यायला लागले.
"त्या मुलींकडे कसलं लक्ष देतेस? आणि चांगली बारीक आहेस तू. " उषाताईंनी अमिताच्या पाठीवर थोपटले पण अंग आक्रसत अमिता बाजूला झाली. तिची अशी प्रतिक्रिया त्यांना अनपेक्षित होती. त्याही उगाचच संकोचून गेल्या. लांबून लांबूनच तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करीत राहिल्या, तिच्या मनाचा अंदाज घेत राहिल्या. एक न बुजणारी दरी दोघींमध्ये उभी राहिल्यासारखे त्यांना वाटून गेले. कितीतरी बोलायचे होते त्या चिमुकल्या जीवाशी. मुलींचे चिडवणे इतके मनावर घेऊन कसे चालेल? कुठल्या शब्दात सांगावे, कशी समजूत घालावी तेच समजेना. त्या तशाच बसून राहिल्या.
"किती वेळ त्या आरशासमोर? "
"तू का माझ्यावर लक्ष ठेवून असतेस? "
"बराचवेळ तिथेच उभी होतीस म्हणून म्हटलं गं. " सकाळच्या गडबडीत उगाच वादाला तोंड फुटायला नको.
"मी जाड झालेय खूप. " उषाताई नुसत्याच हसल्या.
"हे बघ अमिता, एकमेकांना शाळेत चिडवणं हे प्रकार होतच असतात गं. जेवढं तू मनावर घेशील तितका अधिक त्रास देतील त्या मुली तुला. "
"नाही, मलाही वाटायला लागलं आहे बारीक व्हायला हवं म्हणून. "
"काहीतरीच काय गं. चांगली बारीक आहेस तू. अशानं सुकून जाशील. "
"तुझी समजूत घालायची हीच व्याख्या आहे का? बारीक आहेस म्हटलं की झालं? "
"अगं खरं तेच सांगतेय मी. "
"कळलं. जाऊ दे मला शाळेत. " अमिता एकदम चिडली.
"ही उडवाउडवीची आणि आगाऊपणाची उत्तर बंद कर. मी इथे जीव तोडून समजावून सांगायचा प्रयत्न करते आहे तर उपकार केल्यासारखं ऐकायचं. "
"जाऊ दे ना गं मला. बस निघून जाईल शाळेची. "
"बस चुकली तर मी सोडेन तुला. पण नीट बोलल्याशिवाय मी जाऊ देणार नाही. "
अमिताने पडेल आवाजात तेच परत सांगितले तशी तिची सुटका झाली. ती गेलेल्या दिशेने उषाताई पाहत राहिल्या. बारीक व्हायचे एवढे वेड ते ही कुणी एका मुलीने चिडवले म्हणून. कशी समजूत घालायची? कसे परावृत्त करायचे या मुलीला या वेडापासून? एवढा वेळ शांतपणे नाश्ता खात बसलेल्या प्रणवला एकदम तोंड फुटले.
"शाळेत चिडवत असतील तिला. "
"काय? " प्रणवचे अस्तित्व त्या विसरल्याच होत्या.
"चिडवत असतील तिला. सकाळी सकाळी चिडचिड, रागारागाने निघून जाणं अशीच असतात लक्षणं अशा वेळेस. " पुस्तके उचलत प्रणव म्हणाला.
"जाड म्हणून चिडवतात तिला. काल मारामारी झाली तिची शाळेत. " उषाताईंच्या आवाजात कमालीचा थकलेपण आले.
" बघितली मी ती मजा. मांजरीसारख्या फिसफिसत होत्या एकमेकांवर. "
"प्रणऽऽव"
"चुकलं माझं. आणि मी गेलो होतो अमिताला समजावायला. पण मला ढकलून गेली ती वर्गात. " घाईघाईत प्रणवने सांगितले.
"तू बघ ना जरा तिचं काय बिनसतंय शाळेत. अरे एवढी बारीक असूनही स्वतःला जाड समजायला लागली आहे ती. "
"शाळेत ओळख नाही दाखवत आम्ही एकमेकांना. राहवलं नाही म्हणून गेलो तिचा खेळ बघायला आणि समजूत घालायला. मी फक्त माझ्या अनुभवावरून सांगतोय ती का असं वागत असेल ते. "
"तुझा अनुभव? तुला पण चिडवतात? सांगत नाहीस तू काही. "
"कधी ऐकतच नाही तुम्ही तर काय सांगणार? "
"असं तोडून नको बोलूस. सांग बघू आत्ता, आम्ही काय ऐकत नाही ते. "
"आत्ता नाही. मलाही शाळेत वेळेवर पोचायचं आहे. " प्रणवने दप्तराचे धोपटे काखोटीला मारले आणि तो निघालाच. उषाताईंना काय करावे तेच सुचेना. एकाच वेळेस दोन मोठी प्रश्नचिन्हे सोबतीला ठेवून पोरे पसार झाली होती. आता कुठेही लक्ष लागणार नाही हे त्यांचे त्यांनाच जाणवले. त्या उगाचच इकडे तिकडे करत राहिल्या. काय चुकत होते तेच कळत नव्हते. पण प्रणव सारखा तोडून बोलतोच, आता अमिताचेही वागणे बदलत आहे. खूप जास्त लक्ष घालतो म्हणून, की त्यांच्या अडचणी समजत नाहीत म्हणून चिडचिड करतात ही मुले? आकाशभाईंना सांगायला लागले की त्याचे एकच, वैद्यकीय शाखा हवी, मुसलमान नको, आणि सुटीत पण अभ्यास करायला हवा. त्याच्यापलीकडे काही असेल तर सकाळी ध्यान धरा आणि संस्कारवर्गात जाऊन श्लोक म्हणा. पंधरा, सोळा वर्षाच्या मुलांना हे धडे रोज उठून देणे हेच त्यांना हास्यास्पद वाटायचे. पण बोलणार कोण? उषाताईंनी सवयीने भांडी घासायचे, कपडे धुवायचे अशी दोन्ही मशीने हातासरशी चालू केली. त्या यंत्रांची घरघर शांत घरात घुमत राहिली.