रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ५

प्रगती पुस्तक हातात घेतले तसा अमिताचा चेहरा उजळला. आईच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागणार नव्हती. आता मात्र घरी जायची तिला घाई झाली. तिने जाडाभरडा कोट अंगावर चढवला. आतमधले शरीर जाड आहे की बारीक हे समजण्याची शक्यताच नाही. कडाक्याची थंडी पूर्वी तिला नकोशी वाटे, पण हल्ली सतत गारठवून टाकणारी थंडी पडावी असे तिला मनोमन वाटायला लागले होते. ती घरी आली पण घर शांत होते. प्रणव परत आलेला नव्हता अजून. बहुधा आज त्याला थांबावे लागले असणार शाळेत. सारखा कोणत्या ना कोणत्या गटात आणि स्पर्धेत भाग घेतो तो. स्पेलिंग बी, वादविवाद, भाषणे काही ना काही सतत चालू. या वेळेला तो विद्यार्थी अध्यक्षपदासाठी उभा राहणार होता. कधी करणार या गोष्टी आपणही, का आयुष्य सगळे बारीक राहायच्या नादातच संपणार? अजून दोन वर्षे. मग कॉलेज. कदाचित तेव्हा हे चित्र बदलेल. तिथे या शाळेतली मुले नसतील. कुणी चिडवणार नाही. मोकळे आयुष्य. पुढच्या वर्षी प्रणवकडून तिला कॉलेजजीवन थोडेफार कळणार होतेच.

अमिताने पास्ताचे पाकिट काढले. पास्तासाठी उकळत ठेवलेल्या पाण्याकडे ती ओट्याला टेकून एकटक नजरेने पाहत राहिली. उकळणाऱ्या पाण्यासारखेच तिच्या मनातले विचार बुडबुड्यासारखे उडी मारत होते. विद्यार्थी आणि स्वप्रतिबिंब या विषयावर एक भाषण नुकतेच शाळेच्या मोठ्या वर्गात झाले होते. आहाराच्या सवयीबद्दल ते गृहस्थ बोलायला लागले तशी नकळत अमिता अस्वस्थ व्हायला लागली. काय काय सवयी ते सांगत होते आणि त्यानुसार त्या त्या विकारांची नावे. या सर्व लक्षणांना रोग म्हणत नाहीत, विकार म्हणतात हेही त्यांनी स्पष्ट केले होते. काही वेळेला अशी मुले भरपूर खातात पण नंतर सगळे ओकून टाकतात. तर काही वेळेला काही खातच नाहीत. प्रत्येक विकाराचे वेगळे नाव. ऐकता ऐकता अमिताला आपण या सर्वच विकारांचे बळी आहोत असेच वाटत राहिले. बाजूला बसलेल्या तिच्या मैत्रिणीचा हात तिने घट्ट पकडला. नीनाने तिच्याकडे चमकून पाहिले तसा तिने आपला हात हळूच सोडला. तुमच्यापैकी कुणाला स्वतःमध्ये किंवा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा असा इशारा त्या गृहस्थांनी दिल्यावर वर्गात क्षणभर शांतता पसरली, अमिता अस्वस्थ झाली. प्रत्येक जण आपल्याकडेच बघतोय या भावनेने ती त्रस्त झाली. तिच्या बोटांच्या अस्वस्थ हालचाली व्हायला लागल्या. पाय थरथर कापायला लागले. त्या गृहस्थांबरोबर आलेल्या त्या नाजूक, भुरकट केसांच्या मुलीने, सुझीने जेव्हा तिला ऍनोरेक्सिया नर्वोसा हा विकार कसा जडला ते सांगितले तेव्हा मात्र अमिताच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहायला लागले. नीनाने चमकून तिच्याकडे पाहिले. अमिताने मान खाली घालत डोके लपवले तसे नीनाने डोके खाली वाकवले.

"अमिता? " प्रश्नार्थक नजरेने नीना अमिताकडे पाहत राहिली. तिला काय विचारायचे आहे हे अमिताला कळले.

"हळू, हळू बोल. सगळे बघायला लागले आहेत. नाहीतर असं करू, आपण नंतर बोलू. " नीनाने मानेने होकार दर्शवला तसे अमिताला हायसे वाटले. पण नंतर नीनाला टाळूनच ती घरी परतली.

’बाप रे, असं असेल तर आपण लवकरच मरणार की काय? ’

समोरचे पातेले चर्र चर्र वाजायला लागले तशी ती भानावर आली. पास्तासाठी उकळत ठेवलेले पाणी संपत आले होते. तिने भांडे तसेच बाजूला ठेवले. पोटात प्रचंड भूक होती, पण आता पुन्हा पाणी उकळायला ठेवावे लागणार. ती तशीच टेबलावर बसून राहिली. जिन्यावरून उषाताईंच्या पावलांचा आवाज तिने ऐकला, पण आत्ता तिला अगदी कुणी म्हणजे कुणी नको होते आसपास. अंगाभोवतीचे जॅकेट आवळत तिने कोशात शिरण्याचा प्रयत्न केला.

"अगं घरात सुद्धा कसले ते जाडेभरडे कपडे चढवतेस? आणि आलीस कधी तू? हाक तरी मारायचीस. "

"आत्ताच आले. खायला कर ना काही तरी. "

"वा, भाग्यं उजळलं आमचं, खायचं सुचतंय म्हणजे. " उषाताईंना मनापासून आनंद झाला.

"राहू दे. भूकच मेली माझी एकदम. "

"अगं, मजेत बोलले मी. काय करू सांग. गोड शिरा की बटाटे पोहे तुझ्या आवडीचे? "

"नको म्हटलं ना. "

"अमिता हे जास्त होतंय. " उषाताईंना वैतागल्याच. काही बोलायची खोटी, मुले कसा अर्थ काढतील तेच सांगता येत नव्हते. पण अमिताच्या तारवटलेल्या डोळ्यांकडे त्यांचे लक्ष गेले आणि त्या स्तब्ध झाल्या. पुढे होऊन अमिताला जवळ घ्यायचा मोह त्यांनी टाळला. बाजूला ढकलले तर...

"अमू काय झालं बेटा? का रडतेयस? "

"अमिता, अमिता म्हण. स्टॉप दॅट ‘बेटा’ थिंग. "

"चुकलं माझं, पण सांगतेस का आता का रडतेयस ते. " खरे तर चुकले म्हणायची आवश्यकता नव्हती असेही त्यांना तितक्यात वाटले. अमिता गप्प बसून राहिली. ती काही बोलत नाही हे बघून न बोलता त्यांनी पोहे केले. तिच्यासमोर बशी ठेवली. कोथिंबीर, खोबरे, लिंबाची फोड... अमिताची भूक चाळवली. ती न बोलता खात राहिली. उषाताई मग तिथून निघूनच गेल्या.

आई गेलेली पाहिल्यावर अमिता झटक्यात उठली. आत्ताच खाल्लेल्या पोह्यांनी ती अस्वस्थ झाली होती. स्वयंपाकघरालगतच्या बाथरूममध्ये शिरत घाईघाईत तिने नळ जोरात सोडला. पाण्याच्या आवाजात ओकारीचे आवाज विरून जातील याची तिला खात्री होती. घशात अगदी आतपर्यंत तिने बोटे खुपसली आणि खाल्लेले सगळे बाहेर टाकल्यावर तिचा जीव शांत झाला. बाहेर येऊन पटकन ती तिच्या खोलीत गेली. गादीच्या खाली लपवलेली पिशवी तिने बाहेर काढली. पुदिन्याची गोळी खाल्ल्यानंतर सुवासिक वासाने तिचे तिला बरे वाटले.

आकाशभाई घरी परतले तेव्हा सगळे घर शांत होते. मुलांचा आरडाओरडा, गोंधळ नाही म्हटल्यावर त्यांना एकदम चुकल्यासारखे झाले. उषाताईंचीही चाहूल लागली नाही तसे ते थोडेसे चिडलेच. तेवढ्यात प्रणव धावत खाली आला.

"सोडताय ना मला? "

"मी? मी कुठे सोडणार तुला? आई कुठे आहे? मी आत्ता येतोय घरात. "

"कालच ठरलं होतं की आज खेळाच्या सरावासाठी तुम्ही सोडणार. "

"काय उपयोग आहे या खेळांचा? पैसा मिळणार आहे का खेळून? ".

"कॉलेजमध्ये प्रवेश मिळवताना उपयोग होतो. नुसत्या अभ्यासावर प्रवेश मिळत नाही म्हणून तुम्हीच खेळायला सुरुवात कर म्हणून सांगितलं होतं. आठवतंय.? "

"बरं चल, च्यायला काय कटकट आहे. " ते स्वतःशीच पुटपुटले.

"काय म्हणालात? "

"काही नाही. अमिता येतेय का आपल्याबरोबर? "

"नाही. ती खोलीत आहे तिच्या. मला गाडीत बोलायचं आहे तिच्याबद्दल. "

"भांडण झालं? "

"नाही. पण तिची लक्षणं चांगली नाही वाटत मला. "

"काय? "

"गाडीत सांगतो. "

गाडीत बसल्या बसल्या प्रणवने अमिताबद्दल बोलून टाकले.

"बहुधा ऍनोरेक्सिया किंवा बुलेमिया झालाय तिला. "

"म्हणजे? " आकाशभाईंनी हे शब्द देखील कधी ऐकले नव्हते.

प्रणवने शाळेत यासंदर्भात ऐकलेल्या भाषणाचा तपशील सांगितला. त्याने गूगल करून एकत्र केलेली माहिती दिली.

"बारीक होण्यासाठीचे सहजसाध्य उपाय म्हणून सुरू झालेल्या गोष्टीचा अतिरेक झाला की माणूस या विकाराला बळी पडतो असं म्हणतात. अमिताचं वागणं मला तरी तसं वाटतं. "

"आईशी बोललास तू? "

"नाही. तिला बारीक व्हायचं वेड लागलंय असंच समजतोय आपण बरेच दिवस. पण शाळेतलं ते भाषण ऐकल्यापासून मी लक्ष ठेवून आहे तिच्यावर. तिला आपण लगेच डॉक्टरकडे न्यायला हवं. "

"छे, काहीतरीच काय? बारीक राहायची धडपड म्हणून घाबरायचं कशाला? "

"माणूस मरू पण शकतो असं सांगितलं भाषणात. "

"हो पण अमिताने एवढं टोक गाठलेलं आहे असं नाही वाटत मला. "

"तिचं वजन किती कमी झालंय ते पाहा तुम्ही. मी आईला पण सांगणार आहे. " पुढे बोलायला काही नसल्यासारखे दोघेही गप्प झाले. आकाशभाईही मुकाट गाडी हाकत राहिले. प्रणव म्हणतो तसे खरेच असले तर?