रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ४

आकाशभाई भराभर कागदावर कसलीतरी आकडेमोड करत तयार झाले. आज एका गृहस्थांना भेटायचे होते. गडबडीत त्यांनी उषाताईंना असंख्य सूचना दिल्या. त्या त्यांनी ऐकल्या की नाही याकडे त्यांचे लक्ष नव्हते. गाडीची किल्ली बोटावर गोल फिरवत ते गराजमध्ये आले. आरशातून मागे पाहते त्यांनी गाडी रस्त्यावर आणली. आता अर्धा तास नाकासमोर गाडी चालवायची होती. हिशोबाचे आकडे त्यांच्यासमोर नाचायला लागले. प्रणवला वैद्यकीय शाखेत घालायचे तर भरपूर पैसा हाताशी लागणार, अमिता पण हुशार होतीच. दोन्ही मुले उशीरा झालेली. एकदम त्यांना पहिला गेलेला मुलगा आठवला. बऱ्याच वर्षांनी दिवस गेले होते उषाताईंना. काही धोका नको म्हणून शस्त्रक्रिया करायची हे ही ठरलेले. सगळे व्यवस्थित ठरवूनही फसवले त्या छोटा जीवाने. जगात आला तो फक्त तुम्ही आईबाप होऊ शकता हा दिलासा द्यायला. त्यानंतर झाले त्यात कुणाची चूक होती की आपले नशीब हा प्रश्न त्यांना अजूनही सोडवता आला नव्हता. वीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट दरवेळेस त्या त्या क्षणी अनुभवल्यासारखी अवस्था होई. आत्ताही ते सवयीने गाडी चालवत होते, पण आतून आतून अस्वस्थपणा शरीराचा ताबा घेतो आहे हे ही त्यांना समजत होते. समोरचे दिवे अंगावर धावून आल्यासारखे पिवळे झाले आणि त्यांनी गाडी करकरत थांबवली. विचारांची साखळीही त्याबरोबर तुटली.

आकाशभाईंनी अर्जावर स्वाक्षऱ्या घेतल्या. पैसे गुंतवायचे म्हटले की सगळे कसब पणाला लावून वेगवेगळ्या योजना समोरच्याला पटवून द्याव्या लागत, लॅपटॉपवर प्रात्यक्षिक दाखवावे लागे. पुन्हा त्याच वेळेस व्यवहार होईलच याची शाश्वती नसे. आजची पाचवी खेप झाली आणि सत्तर हजार डॉलर्सचा चेक आणि एक नवीन व्यवहार हातात आला. मगाशी आलेला त्यांचा अस्वस्थपणा, हुरहुर अलगद दूर पळाली. तो दिवस मजेत घालवायचा ठरवला त्यांनी. उषाताईंना फोन करून ‘ऑलिव्ह गार्डन’ रेस्टॉरेंट मध्येच भेटायचे ठरले. त्या दिसल्यावर किती बोलू अन् काय बोलू असे होऊन गेले आकाशभाईंना. पण उषाताई गप्प गप्प होत्या.

"काय झालं? तुझं लक्ष नाही दिसत. "

"अमिताला शाळेत चिडवतात. " आकाशभाईंनी विचारण्याचीच वाट बघत असल्यासारखे त्या म्हणाल्या. ते नुसतेच हसले. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींना ती स्वतःचा ताबा घेऊ देते याचेच त्यांना आश्चर्य वाटले.

"आपल्याला नाही का कुणी कधी चिडवलेलं? तेवढ्यापुरतं असतं गं ते. " फार खोलात शिरायची इच्छा नव्हती त्यांची.

"अमिता स्वतःला जाड समजायला लागली आहे. बारीक राहावं म्हणून धडपड चालली आहे तिची. अशाने अंगावर मांस उरणार नाही तिच्या. " बरेच दिवस केलेले निरीक्षण त्या बोलून दाखवीत होत्या. कळवळून सांगत होत्या.

"भलतीसलती नाटकं तू तरी कशाला करू देतेस तिला? "

"जी काय शिस्त आहे मुलांना ती माझ्यामुळे आहे हे विसरू नका. "

"तिच्या खाण्यापिण्याच्या वेळेतच आपणही बसू तिच्याबरोबर म्हणजे आपोआप लक्ष राहील. " शिस्तीचा विषय आकाशभाईंना अजिबात आवडत नसे. मुलांसमोर ते मनापासून नियमांवर बोट ठेवायचे, पण अजूनपर्यंत त्याबाबतीत ठाम राहणे त्यांना कधी जमले नव्हते.

"आपल्यासमोर खाते व्यवस्थित ती. पण नंतर ओकून टाकते, नाहीतर दिवसभर दोरीच्या उड्या, पोटाचे व्यायाम. हसाखेळायचं वय हे, आणि ही मुलगी कायम कसल्यातरी चिंतेत वाटते मला. "

"शाळेत प्रणवला लक्ष ठेवायला सांग. दोघांचे वर्ग जवळजवळच आहेत ना? "

"शाळेत ही पोरं एकमेकांना ओळखही दाखवीत नाहीत. लक्ष कुठला ठेवतोय तो. पण चिडवत असणार मुली तिला. त्यालाही चिडवतात म्हणे. "

"तू बघ बाई काय ते. नाहीतर असं करू दोघांशी एकदम बोलू. " त्यांनी आपले लक्ष खाण्यावर केंद्रित केले. आत्ता त्यांना मिळालेल्या सत्तर हजारांच्या व्यवहाराचा आनंद मनापासून साजरा करायचा होता. त्यात हे मुलांचे प्रश्न आणू नयेत एवढेही उषाताईंना समजू नये ह्याचेच दुःख त्यांना झाले. मुलांकडे त्याचे लक्ष नाही असे अजिबात नव्हते पण प्रसंगाचे भान हे राहिले पाहिजे या मताचे होते आकाशभाई. उषाताईही न बोलता समोरच्या पदार्थांवर काटे मारत राहिल्या. समोरासमोर बसलेल्या त्या दोघांना एकमेकांच्या विचारांचा थांगपत्ताही नव्हता.

"अमिताऽऽऽ" उषाताईंनी जोरात दोन तीन वेळा हाका मारल्या. इंटरकॉमचे बटण दाबले पण इतकी खरखर येत होती की नेहमीप्रमाणे त्या वैतागल्या. इतकी मोठी घरे कशाला असतात इकडे कोण जाणे. वरखाली करावे लागू नये म्हणून अशा सोयी, पण त्याचा उपयोग तरी करता यायला हवा ना आमच्यासारख्यांना. त्या जिन्यापाशी जाऊन उभ्या राहिल्या. बारा पायऱ्या चढून वर जायचे अगदी जीवावर आले. खालूनच जोरजोरात हाकांचा सपाटा त्यांनी चालू ठेवला. काही प्रतिसाद नाही म्हटल्यावर मान वर करून दाराकडे नजर टाकली.

’खोलीचं दार बंद करायचं नाही, हजार वेळा सांगितलंय. ’ तिरमिरीत वर जाऊन त्यांनी बंद दार जोरजोरात वाजवले.

अमिताने रागारागाने दार उघडले.

"काय आहे गं? एरोबिक्स करत होते मी. "

"दार बंद कशाला करायचं त्यासाठी? "

"तो मूर्ख येतो ना चिडवायला. "

"काय भांडत असता दोघं तुम्ही. " त्या तिथेच बसल्या तसे अमिताने एरोबिक्स करणे थांबवले. नाईलाजाने ती गप्पा मारत राहिली. लाराबद्दलही उषाताईंनी तिलाच विचारून घेतले. हळूहळू अमिता आईशी गप्पा मारण्यात रमली. तिच्या मैत्रिणींबद्दल काही ना काही सांगत राहिली. हा क्षण मुठीत पकडावा, आईला आपल्या मनातली खळबळ सांगून टाकावी, असे खूप वाटले अमिताला. पण मनात भीतीही दाटून आली. आईला सांगितले तर ती मागे लागणार, मी बारीक कशी आहे हेच पटवत राहणार. विश्लेषण, चर्चा, उपदेश, नकोच ते.... मनात असूनही ती बोलू शकली नाही. पुन्हा उठून ती दोरीच्या उड्या मारायला लागली.

"अगं, एरोबिक्स करत होतीस ना.? "

"हो, आता दोरीच्या उड्या माराव्या असं वाटतंय. "

"कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. मला तर तुझी काळजी वाटायला लागली आहे अमू! "

"तू मला अमू म्हणणं थांबव आधी. आणि मारतेय उड्या तर मारू दे की नीट. " अमिता एकदम चिडलीच.

"अगं पण बाहेर मैत्रिणींबरोबर खेळायचं वय तुझं. घरात कोंडून घेतेस स्वत:ला असं, ते बरं नाही वाटत. "

उत्तर न देता दाणदाण पावले आपटत अमिता खोलीबाहेर पडली. मनातले काही सांगितले नाही ते बरेच केले असे तिला वाटले. काही झाले तरी सर्वांना हे बारीक राहायचे वेडच वाटत असेल तर कशाला सांगायचे काही. आईने मागे येऊन समजूत घालावी असे अगदी आतून आतून तिला वाटून गेले. पण आई विचार करत पलंगावर बसून राहणार हे तिला पक्के ठाऊक होते. धडधडा जिने उतरत ती खाली आली. फ्रिज उघडून तिने आइसक्रीमचा डबा उघडला. गारगार आइसक्रीमने हाताला झिणझिण्या आल्या तसे चमच्याने भराभर ती आइसक्रीम खात सुटली. उष्टा चमचा पुन्हा आइसक्रीममध्ये घातलेला घरात समजले तर कुणी त्याला हात लावणार नाही ह्याची कल्पना असूनही तिने ते विचार दडपून टाकले. बाजूलाच पडलेल्या खोबऱ्याच्या वड्यांवर तिने ताव मारला. आता यापुढे एक घासही खाऊ शकणार नाही हे जाणवले तेव्हाच ती थांबली. रिकाम्या झालेल्या आइसक्रीमच्या डब्याकडे, उरलेल्या वड्यांच्या तुकड्यांकडे पुन्हा लक्ष जाताच ती शून्य, पराजित नजरेने पाहत राहिली. तिच्या पोटात ढवळले. आपोआप हात पोटाकडे वळले. तिने पोट घट्ट दाबले. हाताच्या चिमटीत पोटाचा भाग आला नाही तरी एकदोन दिवसात आइसक्रीम, वड्यांचे परिणाम तिथे उमटणार ह्या जाणिवेने तिचे हातपाय गळले. ती बाथरूमच्या दिशेने धावलीच. दोन्ही बोटे घशात घालून खाल्लेले सगळे बाहेर काढायचे होते. भडभडा ओकल्यावर अमिताला एकदम शांत झाल्यासारखे वाटले. प्रणवने येऊन पाठीवर हात फिरवला तशी ती त्याच्या कुशीतच शिरली. तो तिला थोपटत राहिला.

"शाळेत जावसं वाटत नाही मला. वर्गात मुलींमध्ये मी बुटकी आणि जाड आहे. "

"बुटकोबा आहेसच तू इथल्या मुलींसमोर. पण जाड काय समजतेस तू स्वत:ला? एक जादू सांगू? तू एखाद्या थोराड मुलीशी मैत्री कर म्हणजे तिच्यासमोर एकदम चवळीची शेंग असशील तू. "

"तेच करावं लागणार असं दिसतंय. " चवळीची शेंग दिसण्याच्या कल्पनेने तिला हसायला आले.

"चल, आई वरती एकटीच बसली आहे काळोखात. " दोघही वरती आले.

पलंगावर पाठ टेकून बसलेल्या आईच्या थकलेल्या चेहऱ्याकडे पाहून दोघांना काय करावे ते सुचेना. उषाताईंच्या कानावर अमिताने सोडलेल्या जोरदार नळाच्या आवाजातूनही ओकण्याचे आवाज घुमत राहिले होते. अमिता लहान होती तेव्हा भरवायचो तसे घास भरवावे, पाठीवर हात फिरवून ढेकर काढावा अशी तीव्र इच्छा त्यांना झाली. पण काहीही न करता त्या नुसत्या बसून राहिल्या. प्रणव धावत खाली गेलेला त्यांच्या कानांनी टिपले. सगळे आवाज शांत झाल्यावरही खोलीतल्या काळोखाची संगत सोडावी असे मात्र वाटत नव्हते. प्रणवने दिवा लावला तसे कसनुसे हसत त्या उठल्या. काही न बोलता त्या सावकाश खाली आल्या. आई खाली गेल्याची खात्री झाल्यावर अमिता दोरीउड्या मारायला लागली. विचारांचा तीव्रपणा जेवढा वाढत होता तेवढा तिचा वेग वाढत होता. तिच्याच पलंगावर पडून प्रणव शांतपणे टी. व्ही. बघत होता. अमितासाठी काय केले तर तिचा हा वेडेपणा जाईल तेच त्याला कळत नव्हते. त्या मुलीने चिडवल्यानंतर हे सुरू झाले. थांबेल थांबेल म्हणताना गेल्या सात आठ महिन्यात तिच्या या वेडाने टोक गाठले होते. अमिताही अधूनमधून प्रणवकडे पाहत होती. घरात कुणालाच तिचे मन कळत नव्हते. प्रत्येकाला हा तिचा वेडेपणाच वाटत होता. वेगवेगळ्या मार्गाने अमिता तिला तिच्या जाडीबद्दल वाटणारी चिंता व्यक्त करत होती. घरातले कुणीतरी उपाय सुचवेल, त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल, धीर मिळेल या तिच्या अपेक्षा फोल ठरल्यासारखे तिला वाटत होते. गालाची हाडे बाहेर यायला लागली होती. पण घरातली माणसे व्यवस्थित सर्व पदार्थावर ताव मारत. ते बघितले की अमिताला खावेसे वाटे. खाल्ले की आता वजन वाढणार ही काळजी, मग ओकून टाकायचे. ओकारीचे आवाज, वास घरात येऊ, पसरू नयेत यासाठी तारेवरची कसरत होतीच. फरसाण, चीजचे पदार्थ, तळकट खाणे नियंत्रणात येईल असे काही तरी व्हायला हवे होते. आईला हे समजत कसे नाही हेच तिला कळत नव्हते. सगळेजण तिच्या नादिष्टपणाला, वेडेपणाला हसत होते. दोनशे दोन, दोनशे तीन, दोनशे चार..... पाचशे उड्या मारल्याशिवाय ती थांबणार नव्हती.

संध्याकाळी उषाताई निवांत टी. व्ही. वर कुठलातरी कार्यक्रम बघत होत्या. थोड्या वेळाने सर्वांनी एकत्र चक्कर मारायला बाहेर पडायचेच होते.

"अमिताला बोलाव ना खाली" त्यांच्या बाजूला बसलेल्या प्रणवला त्या म्हणाल्या.

"ती हुलाहू" खेळतेय.

"हुलाहू? " आकाशभाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले.

"हा कुठला खेळ? "

"बारीक होण्याचा. दोरीच्या उड्या, स्टेपर, एरोबिक्स... हेच चालू असतं दिवसभर तिचं. डॉक्टरांकडे घेऊन जा तुम्ही तिला. एवढी बारीक झाली आहे तरी स्वतःला जाड समजते. मला तर वाटतं तिला काही तरी आजार आहे. " प्रणवचा चेहरा बहिणीच्या चिंतेने गंभीर झाला होता.

"काही तरी खूळ घेतलं असेल डोक्यात. जाईल हळूहळू. चला, निघूया आता. "

"काय सारखं खूळ असेल, जाईल हळूहळू म्हणता? हाडं दिसायला लागली आहेत तिची. खायचं, ओकायचं आणि सारखा व्यायाम. उरलेला वेळ अभ्यास. तरुण मुलगी ही पण एकही मैत्रीण नाही हिला. आपल्या डोळ्यांदेखत हा प्रकार. अजून एक दोन वर्षात कॉलेजात जायला लागेल तेव्हा कसं लक्ष ठेवणार आपण. आणि आत्ताच काही तरी करणं भाग आहे नाहीतर हातातून जाईल मुलगी. " उषाताईंचे डोळे भरून आले. आकाशभाईही गप्प झाले. कुणीच काही बोलेना. प्रणवने आज फिरायला जायचे ठरवले आहे त्याची आठवण करून दिली.

तळ्याकाठचा तो रस्ता घरातल्या प्रत्येकाच्या आवडीचा होता. दाट झाडीतून पायवाटा धुंडाळत ती सगळी खूप आतवर पोचली. मध्येच धावत गेलेले हरीण, झाडाच्या बुडाशी बसलेला ससा बघत अमिता, प्रणव गप्पांमध्ये रमले. आकाशभाई थकून लहानशा ओढ्याकाठच्या दगडावर बसले. अमिताची त्यांनाही हळूहळू काळजी वाटायला लागली होती. पण हा तिढा कसा सोडवायचा ते मात्र समजत नव्हते. उषाताई संथपणे चालत होत्या पण त्यांच्या मनात विचारांचे आर्वतन चालू होते. अमिताला खरेच न्यायला हवे का डॉक्टरांकडे? का एकदा शाळेत जाऊन तिच्या शिक्षिकेशी बोलून घ्यावे. हे चक्र वेळीच थांबायला हवे हे त्यांना समजत होते पण त्यासाठी काय करायला हवे ते कळत नव्हते. प्रणव म्हणाला तसा हा काही तरी विकार तर नसेल ना? त्यांना काही केल्या ते नाव आठवेना. संगणकावर जाऊन गूगलवर कसे सगळे शोधायचे ते त्यांना शिकून घ्यायचे होते. नुसती लक्षणे लिहिली की काय झाले आहे ते समजते याचेच त्यांना आश्चर्य वाटत होते. अमिताच्या वागण्याच्या मुळाशी जायचे तर हे करायला हवे.

एकदम कुणीतरी पाठीमागून त्यांच्या पाठीवर मारले. त्या प्रचंड दचकल्या. अमिता, प्रणव दोघेही कशी केली मजा अशा थाटात उभे होते.

"बाई! ठोके थांबले असते नं हृदयाचे. केवढ्याने धडकता अंगावर. "

दोघेही त्यांना लगटून, हातात हात घालून परत फिरले.

आकाशभाई बसले होते तिथे जवळच सगळी बसली. निवांतपणे ती सगळी तळ्यातल्या बदकांना, त्यांच्या पिल्लांना निरखत राहिली. किती वेळ झाला होता कोण जाणे. घरून करून आणलेली शेव बटाटा पुरी, थर्मासमधल्या चहाबरोबर फस्त झाली दोन मिनिटांत.

परत फिरताना अमिताचा अस्वस्थपणा वाढत चालला होता. म्हटले तर किती जवळीक होती एकमेकांमध्ये, प्रणवसारखा भाऊ होता, आईही दोघांच्या मनातले जाणून घेऊन तसे वागायचा प्रयत्न करत होती, बाबांनी कधी दर्शवले नाही तरी जीव होताच की त्यांचा. असे असूनही अमिताला फार एकटे वाटत होते. आजचा हा दिवस इथेच थांबावा असे तिला मनापासून वाटत होते. आई, बाबा आणि प्रणवबरोबरचे हे आनंदाचे क्षण संपतील या भीतीने तिचा जीव विनाकारण दडपत होता. त्यात उद्या सहामाही परीक्षेचा निकाल. परीक्षा देताना तिला इतर मुले चिडवत आहेत असेच वाटत राहिले होते. बसल्यावर पोटाच्या वळ्या दिसतात म्हणून अगदी ताठ बसून लिहिण्याच्या कसरतीत तिची पाठ दुखायला लागली होती. चार वेळा ती ओकारी होत आहे या भावनेने उठली होती. तिची शिक्षिका परत परत घरी कळवू का विचारत होती. पण तिने ते नाकारत परीक्षा पूर्ण केली होती. आता निकाल लागल्यावर घरात काय प्रतिक्रिया होणार या चिंतेने तिचा चेहरा झाकोळला.