रिक्त: पृष्ठ (८ पैकी) ६

घरी आल्या आल्या ते उषाताईंशी बोलले. प्रणव आईबाबा बोलत आहेत हे बघून धावत धावत अमिताच्या खोलीत शिरला. अमिताला ते खाली बोलवून विचारणार याची त्याला शंभर टक्के खात्री होती. त्याआधी तिचा भाऊ म्हणून त्याला तिच्याशी बोलायचे होते.

"अमू"

अमिताने रागाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला.

"बरं बरं, अमिता. "

"आई, बाबा तुला खाली बोलावतील. "

"मग? त्यात काय एवढं सांगतोयस? "

"मी त्यांना जे काही सांगितलंय त्याबद्दल बोलायचंय मला तुझ्याशी. " त्याला विषयाला कसे तोंड फोडावे तेच कळेना.

"हं? " तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते.

"तुला काही तरी विकार झालाय असं वाटतंय मला. "

"विकार? "

"वजन पाहिलंस किती झालंय तुझं? "

"तू कशाला काळजी करतोयस माझ्या वजनाची? "

"वाढलंय म्हणून नाही, कमी झालंय म्हणून. "

"बरं. बघू त्यांनी बोलावलं तर. "

"अमिता, तुला डॉक्टरांकडे न्यायला सांगितलंय मी बाबांना. तुला ऍनोरेक्सिया नाही तर बुलेमिया झालाय असं वाटतंय मला. ""

"तू कोण ते ठरवणारा? "

"म्हणजे तुला या विकाराची माहिती आहे. इंटरनेटवर वाचलंस? "

अमिता एकदम त्याच्या गळ्यात पडली.

"मला त्यातले सगळेच विकार झालेयत असं वाटतंय रे दादा. "

"अगं पण तू आईला बोलली का नाहीस? निदान माझ्याकडे तरी. " अमिताने शाळेत ऐकलेल्या त्या भाषणाबद्दल प्रणवला सांगितले.

"त्या भाषणानंतर सगळी माहिती वाचून काढली आहे मी. एकदा वाटतं ती सगळी लक्षणं माझीच आहेत. एकदा वाटतं मी उगाचच विचार करतेय. एवढं गंभीर नाही यातलं काहीच. " अमिताने आपल्या मनातली खळबळ त्याला सांगून टाकली. आपल्या मनातले कुणाला तरी समजते आहे या भावनेने तिला भरून येत राहिले. तो गळल्यासारखा तिच्या पलंगावर बसला. तिला समजावीत राहिला. त्याची बहीण त्याला काही करून बरी व्हायला हवी होती. त्याला नव्हते का किती वेगवेगळ्या प्रसंगातून जावे लागले. लाराने वर्णावरून त्रास दिल्यावर त्याने काढलेल्या चित्रांबद्दल प्रणवने अमिताला सांगून टाकले. तीन चार वर्षांपूर्वी बाथरूमजवळ एका मुलाने त्याला आणि सलीलला गाठून जबरदस्तीने हुंगायला लावलेली पावडर... त्या वेळेस केवढे घाबरायला झाले होते. एकीकडे ती पावडर चाखून बघावीशी वाटत होती तर दुसरीकडे आई, बाबांचा चेहरा समोर येत होता. तो आणि सलील हातात हात घालून घाबरून बाजूच्या मुलांना धक्के देत बाहेर पडले तिथून. त्यानंतर कितीतरी दिवस सगळी मुले त्या दोघांना चिडवत होती. निर्धाराने त्याने स्वत:वर नियंत्रण ठेवले. सलीलचे काय झाले कुणास ठाऊक. तो कॅनडाला गेल्यापासून फारसा संबंध उरला नव्हता. पुन्हा फोनवर त्याला कसे विचारणार याबाबत काही? सलीलच्या खिशातून पडलेली ती पुडी. प्रणवने त्याला ती टाकून द्यायला भाग पाडले होते. पण पुढे काय? कसा असेल सलील आता? अमिताचा हात हातात घेऊन त्याने भरल्या डोळ्यांनी तिला तो प्रसंग सांगितला. दोघेही एकमेकांचे हात धरून थोपटत राहिले. आकाश, उषाताई आत येऊन कधी त्या दोघांच्या बाजूला बसले तेही त्यांच्या लक्षात आले नाही. उषाताई अमिताच्या केसातून हात फिरवीत राहिल्या. गदगदून रडणाऱ्या अमिताच्या पाठीवर कासावीस आकाशभाई थोपटत राहिले. प्रणव भरल्या डोळ्यांनी ते दृश्य मनात साठवत राहिला.

आकाशभाई आणि उषाताईंनी प्रणवच्या मदतीने अमिताला समजावले. दवाखान्यात नेले. डॉक्टरांकडे अमिताला नेल्यावर तिचे रक्त निघणारे ओठ, हिरड्या पाहून उषाताई आतल्या आत आंवढे गिळत राहिल्या. अमिताचे सुजलेले गाल लक्षात आले नाहीत म्हणून स्वःतला दोष देत राहिल्या. कामाच्या रगाड्यात मुलांकडे निरखून बघणेही होत नाही? अनेकदा अमिताने वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त केलेली चिंता गंभीरपणे का घेतली नाही या विचाराने त्या मनातल्या मनात खजील झाल्या. अमिताला रुग्णायलात महिनाभर तरी राहावे लागणार होते. तिघांचा जीव तीळ तीळ तुटत राहिला तिच्या काळजीने.

रुग्णालयातून दिलेली माहिती आकाशभाई, उषाताई दोघेही परत परत वाचत होते. दर दोन चार वाक्यांनंतर त्यात लिहिलेली लक्षणे आणि अमिताच्या बाबतीत घडत गेलेल्या घटना आठवून आपल्याला कशी संगती लावता आली नाही याचा काथ्याकूट चालला होता. मुलांना वाढवण्यात आपण कमी पडलो ही भावना उषाताईंच्या मनात मूळ धरत होती. आकाशभाईंसमोर आपले मन मोकळे करावेसे वाटूनही त्यांच्या तोंडातून शब्द फुटेनात. त्या हरवल्या नजरेने माहिती वाचण्यात गढलेल्या आकाशभाईंकडे पाहत राहिल्या. आकाशभाईंनी उषाताईंकडे पाहिले, पण एका विलक्षण पोकळीने त्यांना ग्रासले होते. कुणाशीच काही बोलायची इच्छा उरली नव्हती. त्याचे मनही आतल्या आत जाब विचारत होते. दोन मुलांची जबाबदारी पार पाडता येत नाही, तेही घरातच कार्यालय असून. मुले समोर दिसतच नाहीत असे नव्हतेच आणि तरीही समोर घडणाऱ्या गोष्टी दिसल्या का नाहीत? त्यांनी स्वत:लाच विचारलेला प्रश्न उषाताईंना नेमका समजला.

"दोनच मुलं असूनही ही वेळ यावी ना आपल्यावर? आणि म्हटलं तर आपण सतत घरातच असतो की. " त्यांच्या डबडबलेल्या डोळ्यांकडे ते नुसतेच पाहत राहिले. त्या गदगदून रडायला लागल्या. आकाशभाईंनी त्यांच्या हातावर थोपटल्यासारखे केले आणि ते झटक्यासारखे उठले. तिथून निघूनच गेले. माहितीचे पुस्तक डोळ्यावर आडवे टाकत उषाताईंनी डोके खुर्चीवर मागे टाकले. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण दणकट, मायेचा स्पर्श त्यांच्या माथ्यावर जाणवला. प्रणवचा हात धरत त्यांनी डोळे उघडले. कर्त्या पुरुषासारखा तो आईला सावरत होता.

"तुला लॅपटॉपवर काही तरी दाखवायचंय. "

त्यांनी अनिच्छेनेच तो काय दाखवतोय ते बघण्याची तयारी दर्शविली.

कधीही न ऐकलेल्या त्या विकाराची इतकी विस्तृत माहिती त्या प्रथमच बघत होत्या. अमिता आणि त्यांच्या कुटुंबासारखे अनेक जण यातून गेलेले पाहून आपण एकटेच नाही हा दिलासा मिळत होता. पण तरीही ‘देसी’ लोक यातून जात असतील का, ही शंका पोखरत होती. कुणाला विचारणार हा प्रश्न होताच, पण हळूहळू मुलीचा विकार, उपाय, इतरांचे अनुभव अशा माहितीच्या विश्वात त्यांच्या मनातल्या शंका अंधुक झाल्या.

अमिताला रुग्णालयात भेटून आले की त्यांचा वेळ संगणकावर या विकाराची माहिती वाचण्यात जात होता. आकाशभाईंनी स्वत:ला कामाभोवती वेढून घेतले होते. अमिताच्या उपचारावर पाण्यासारखा पैसा चालला होता. त्यात एकदा नर्सने, वजन वाढते आहे असे दिसावे म्हणून अमिता कपड्यांच्या आत काही ना काही कोंबून वजनाला उभी राहते, हे सांगितले. आशा निराशेचा लपंडाव चालू होता. अमिताला यातून बाहेर काढायचे तर ती घरी परतल्यावर मानसोपचार तज्ज्ञाकडे खेपा घालणे भाग होते. प्रणव आईवडिलांच्या धडपडीत त्यांना हात देण्याचा प्रयत्न करत होता. एकदा उषाताईंनी त्याला जवळ घेऊन मनातली भीती व्यक्त केली होती.

"प्रणव, आम्ही पोळलोय अमिताच्या बाबतीत. असं नको व्हायला की तिला सावरता सावरता तू निसटून गेलास हातातून. "

"नाही गं, तसं नाही होणार. " तो हसून म्हणाला.

"खरं सांग बाबा काय ते. नंतर मनाला चुटपूट नको. "

"बरं तू विषय काढलाच आहेस तर, तुला राग येणार नसेल तर मला काही तरी बोलायचं होतं. "

त्या अकाली पोक्त झालेल्या त्यांच्या तरुण मुलासमोर लहान मुलीसारख्या बसल्या. अमिताने पूर्ण घराला मोठे, समजूतदार बनवले होते.

"अमिता घरी आली की आपण तिला काही विचारायचं नाही. "

"तेवढं कळतं रे आम्हाला. " उषाताई दुखावल्या सारख्या पुटपुटल्या.

"तेवढंच नाही. तुम्ही आधी पासून आम्ही काय सांगतो ते ऐकलं असतं तर समजलं असतं गं तुम्हाला किती काय काय प्रसंगातून जावं लागतं बाहेर आम्हाला. "

"का? वेळोवेळी विचारत नव्हतो आम्ही? "

"विचारत होता, पण ऐकत नव्हता आम्ही काय सांगतोय ते. कितीतरी वेळा अमिता आणि मी बोललोय याबद्दल. "

"आता तूच शिकवायचा राहिलायस. "

"तू शांतपणे ऐक. चिडू नकोस. "

त्या गप्प राहिल्या. ही आपल्याला बोलायला संमती आहे असे गृहीत धरून प्रणवने मुद्दा सोडला नाही.

"मला एवढंच सांगायचंय, जे अमिताच्या बाबतीत झालं ते माझ्या बाबतीतही झालंय. प्रसंग वेगळे फक्त. "

न समजल्यासारखे त्या उजवा हात डाव्या हातात घेऊन पालथ्या पंज्यावर बोटे फिरवत राहिल्या.

"एकदा दोनदा मुलांनी मला मॅरिवाना घ्यायला जवळजवळ भाग पाडलं होतं. बऱ्यांचदा समलिंगी म्हणूनही चिडवलंय. लारानेही बराच त्रास दिला होता. "

"लाराबद्दल तू बोलला होतास, पण मॅरिवाना? म्हणजे ते गर्द वगैरे म्हणतात ते? धुंदीत नेतं ते? बापरे! घेतलं होतस की काय तू ते? "

"नाही गं. मला तेच सांगायचं होतं. तुम्ही दोघं एकमेकांना सारखे आपण कसे कमी पडलो मुलांच्या बाबतीत ते सांगताना ऐकलंय मी, अमिता आजारी पडल्यावर. पण तुम्ही तुमच्या परीने खूप केलंय. कदाचित तुमचे मार्ग वेगळे असतील आम्हाला समजून घेण्याचे. मी मॅरिवाना घेतलं नाही ते त्यामुळेच ना? लारा किती त्रास द्यायची. दोन लगावून द्याव्या असं वाटूनही कधी हात उगारला गेला नाही ते तुमच्यामुळेच. अमिताचीही तीच इच्छा असावी की तुम्ही तिला मदत कराल. पण तिने मलाही कधी विश्वासात नाही घेतलं. त्याचं काय कारण असावं ते मीही समजावून घेण्याचा प्रयत्न करतोय. कधी कधी वाटतं आम्ही तुम्हाला काही सांगितलं की जाऊ दे, दुर्लक्ष कर, तुझंच चुकलं असेल असं म्हणायचात ना, नाही तर सारखा उपदेश; म्हणून तर झालं नसेल हे? आम्हाला दोघांनाही त्याचं फार वाईट वाटायचं गं. मग वाटायचं आमचं दुःख तुम्हाला समजतच नाही. उगाच भानगडी नकोत या देशात राहून, हे घोषवाक्य भिनलंय तुमच्या मनात, त्याचे नकारार्थी परिणाम होत असतील हे कधी लक्षातच घेतलं नाही तुम्हा दोघांनी. "

"असेल. मला तर काही कळेनासं झालंय. यातून अमिता बाहेर पडली की झालं. "

"पडेल. मी रुग्णालयात बसतो ना तिच्याबरोबर तर आम्ही लहानपणापासूनच्या सगळ्या आठवणी काढतो. अमिता तर मागे लागलीये लिहून काढ, संगणकावर टाक म्हणून. आणि आई, आमच्या बोलण्यात आपण पूर्वी किती मजा करायचो ते पण येतं सारखं. "

"पूर्वी असं का रे वाटतं तुम्हाला? मला तर आत्तापर्यंत तुम्ही मुलं आम्हाला सगळं सांगता असा विश्वास होता. "

"हळूहळू सगळं बदलत गेलं ते. "

"खरंच, लक्षातच आलं नाही आमच्या. काय काय आणि किती वेगवेगळे प्रश्न येतात मुलं मोठी व्हायला लागल्यावर. मुलींच्या बाबतीत वयात येणं आणि मुलाच्या बाबतीत व्यसनं याबाबत किती सावध राहायला हवं एवढंच माहीत होतं. आमच्या परीने आम्ही याबाबत बोललो होतो. पण हे असलं आजारपण, त्याची कल्पनाही नव्हती. आता सगळी माहिती वाचतेय तर वाटतंय, अमिता पडेल ना यातून बाहेर? तिला एकदा बरी होऊ दे. मग तुम्ही दोघं शिकवा आम्हाला कसं वागायचं ते तुमच्याबरोबर. " त्या एकदम बोलायच्या थांबल्या. प्रणवचा हात हातात घेऊन नुसत्याच त्याच्याकडे पाहत राहिल्या. तोही निःशब्दपणे त्यांच्या हातावर थोपटत राहिला. त्याचा थोपटणारा हात हातात घेऊन उषाताईंनी घट्ट दाबून धरला. अचानक त्यांना धाय मोकलून रडावेसे वाटायला लागले. बेभानपणे रडणाऱ्या आईला प्रणवने घट्ट मिठीत ओढले. तो कर्त्या पुरुषासारखा त्यांना थोपटत राहिला. समजावत राहिला. त्या शांत झाल्या तसे न राहवून त्याने सलीलबद्दल सांगितले. त्याच्याबद्दल प्रणवला वाटणाऱ्या चिंतेने उषाताईंचा जीव गलबलला.